दर्शन कुलकर्णी
- आज, दिनांक : 05 जुलै 2026; वार : रविवार
- भारतीय सौर : 14 आषाढ शके 1948; तिथि : पंचमी 13:30; नक्षत्र : शततारका 15:11;
- योग : आयुष्मान 16:39; करण : गरज 25:43;
- सूर्य : मिथुन; चंद्र : कुंभ; सूर्योदय : 06:04; सूर्यास्त : 19:20;
- पक्ष : कृष्ण; अयन : दक्षिणायन; संवत्सर : पराभव;
- शालिवाहन शक : 1948; विक्रम संवत : 2082; युगाब्द : 5128
वेद कन्सल्टन्सी / 9987433660
दिनविशेष
चित्रपट संकलक रेणू सलुजा
टीम अवांतर
पुरुषांचे वर्चस्व असलेल्या चित्रपट संकलन क्षेत्रात आपले स्वतःचे वेगळे स्थान निर्माण करणाऱ्या रेणू सलुजा यांचा जन्म 5 जुलै 1952 रोजी पंजाबी हिंदू कुटुंबात झाला. त्यांनी 1974 मध्ये पुण्यातील भारतीय चित्रपट आणि दूरदर्शन संस्थेच्या दिग्दर्शन अभ्यासक्रमासाठी अर्ज केला, मात्र त्यांना प्रवेश मिळाला नाही. त्यामुळे त्यांनी संकलन (editing) अभ्यासक्रमात प्रवेश घेतला. 1976 मध्ये पदवी प्राप्त झाल्यावर त्यांनी भारतात चित्रपट संकलक म्हणून आपल्या कारकिर्दीला सुरुवात केली.
रेणू यांचे सुरुवातीचे काम एफटीआयआयमधील त्यांचे सहकारी विधू विनोद चोप्रा, सईद मिर्झा, कुंदन शाह आणि अशोक आहुजा यांच्यासोबत समांतर चित्रपटांसाठी होते. त्यांनी सर्वप्रथम विधू विनोद चोप्रा यांच्या मर्डर ॲट मंकी हिलचे संकलन केले, ज्यासाठी त्यांना सहयोगी दिग्दर्शक म्हणून श्रेयही मिळाले. या चित्रपटाला 1977-78 मध्ये सर्वोत्कृष्ट प्रायोगिक चित्रपटासाठी राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार देखील मिळाला. रेणू यांनी सईद अख्तर मिर्झा यांच्या ‘अल्बर्ट पिंटो को गुस्सा क्यों आता है’ या चित्रपटाच्या संकलनाद्वारे बॉलिवूडमध्ये पदार्पण केले, त्यानंतर विधू विनोद चोप्रा यांचाच ‘सजाए मौत’, आणि नंतर कुंदन शाह यांच्या ‘जाने भी दो यारो’ या चित्रपटासाठी संकलक म्हणून काम केले. या दोन्ही कामांचे समीक्षकांनी कौतुक केले.
हेही वाचा – जित्याची खोड…
एफटीआयआयच्या चित्रपट निर्मात्यांच्या वर्तुळाबाहेरून रेणू यांना मिळालेली पहिली ऑफर गोविंद निहलानी यांच्या ‘अर्ध सत्य’ या चित्रपटाची होती. यानंतर त्यांच्या कारकिर्दीला गती मिळाली. पुढे त्यांनी दूरदर्शनवरील काही लोकप्रिय मालिकांचेही संकलन केले.
चोप्रांचा ‘परिंदा’ हा रेणू यांनी संकलित केलेल्या मुख्य प्रवाहातील सुरुवातीच्या चित्रपटांपैकी एक होता आणि त्यांनी दिग्दर्शनातही साहाय्य केले होते. 1990च्या दशकात रेणू मुख्य प्रवाहातील चित्रपट आणि ‘हैदराबाद ब्लूज’च्या यशानंतर आलेल्या नवीन स्वतंत्र चित्रपटांमध्येही सहभागी होत्या. रेणू यांनी संपादित केलेल्या काही प्रसिद्ध चित्रपटांमध्ये जाने भी दो यारों, कभी हाँ कभी ना, बँडिट क्वीन, जया गंगा, परदेस, रॉकफोर्ड आणि हे राम यांचा समावेश आहे. नागेश कुकुनूर यांचा ‘बॉलिवूड कॉलिंग’ आणि 2003 मध्ये प्रदर्शित झालेला ‘कलकत्ता मेल’ हा त्यांनी संकलित केलेला शेवटचा चित्रपट होता.
त्यांची मोठी बहीण राधा सलूजा या देखील चित्रपट अभिनेत्री होत्या, ज्यांनी अनेक हिंदी, पंजाबी आणि इतर प्रादेशिक चित्रपटांमध्ये काम केले आणि धाकटी बहीण डॉ. कुमकुम खडालिया एक प्लास्टिक सर्जन आहे.
हेही वाचा – सर्व विद्यार्थ्यांना आत्मपरीक्षण करायला शिकवूया
त्यांनी संकलित केलेल्या परिंदा, धारावी, सरदार, गॉडमदर या चित्रपटांना संकलनाचा राष्ट्रीय पुरस्कार मिळाला होता. तर 1989 साली परिंदा आणि 1995 साली 1942: अ लव्ह स्टोरी या चित्रपटांसाठी सर्वोत्कृष्ट संकलक फिल्मफेअर पुरस्कार आणि 1996 मध्ये इस रात की सुबह नहीं या चित्रपटाच्या संकलनासाठी स्टार स्क्रीन ॲवॉर्डने सन्मानित करण्यात आले.
पोटाच्या कर्करोगामुळे, 16 ऑगस्ट 2000 रोजी मुंबईत त्यांचे निधन झाले. 2006 मध्ये, FTII च्या माजी विद्यार्थी संघटनेने, GraFTII ने त्यांच्यावरील ‘इनव्हिजिबल – द आर्ट ऑफ रेणू सलुजा’ नावाचे पुस्तक प्रकाशित केले. 2006 पासून लिफ्ट इंडिया फिल्म फेस्टिव्हलमध्ये त्यांच्या नावाने संकलनासाठी पुरस्कार ठेवण्यात येऊ लागला. असा सन्मान मिळवणाऱ्या त्या पहिल्या संकलक ठरल्या. जून 2009 मध्ये, ग्राफ्टी आणि ई-सिटी व्हेंचर्स यांनी त्यांच्या चित्रपटांचा एक श्रद्धांजली महोत्सव आयोजित केला होता, ज्यामध्ये एका माहितीपटाचा समावेश होता ज्यात सलुजा यांच्यासोबत काम केलेल्या सर्व दिग्दर्शकांनी त्यांच्याबद्दलच्या आठवणी सांगितल्या आहेत.


