“अहो, यावर्षी गणपती आणलाच पाहिजे का?” कावेरी काकू डोळ्यांतील अश्रू पुसत म्हणाली. “प्रतीकला जाऊन महिनाही झाला नाही…”
“प्रतीक कुठेच गेला नाही… तो आहे… काहीही झाले तरी गणपती घरी आलाच पाहिजे, हीच त्याची इच्छा होती आणि म्हणूनच त्याच्या इच्छेचा मान राखायलाच हवा,” गणपत नाईक ठाम स्वरात म्हणाले.
“गणपती आगमनाला आठवडा राहिलाय… तू तुझी तयारी कर. मी गणपती ठरवून येतो…” असे बोलून ते बाहेर पडले.
गेला महिनाभर नाईक कुटुंब दुःखात होते. त्यांचा मुलगा प्रतीक नाईक सैन्यात सुभेदार होता. नाईक घराण्यात सैन्यात कोणीच गेले नव्हते. ते शेतकरी होते. थोडीफार जमीन होती. काही कलमे होती… त्यातच सुखी होते. प्रतीक सैन्यात गेला, हे त्यांना काही रुचले नव्हते, पण नंतर त्यांनी स्वीकारले. नाईक कुटुंब गणेशोत्सव जोरात साजरा करायचे. सैन्यात गेला तरी, प्रतीक गणपती विसरला नव्हता. संपूर्ण वर्षात फक्त गणपतीसाठी तीन दिवसच सुट्टी घेऊन प्रतीक घरी यायचा आणि विसर्जन झाले की निघायचा.
यावर्षी त्याची पोस्टिंग काश्मीरला होती. ‘काश्मीर पूर्वीसारखे अतिसंवेदनशील राज्य राहिले नाही. आता खूपच शांत झालेय,’ असे फोन करून आईवडिलांना तो सांगायचा. यावर्षी नेहमीसारखा तीन दिवस घरी येईन आणि विसर्जन करून निघेन, असा निरोपही गणपत नाईकांना दिला होता.
हेही वाचा – वधू-वर सूचक मंडळ
“पोरगो जगाच्या पाठीवर खंयसर पण रावांदे, पण गणेशोत्सवास हजर असता. स्वतःच्या डोक्यावरून गणपती विसर्जन करायचा हक्क सोडूचा नाय…” गणपत फोन ठेवत हसत म्हणाले.
त्याच रात्री गस्तीवर असताना अतिरेक्यांच्या गोळीबारात प्रतीक शहीद झाला. पण मरताना तो साथीदाराच्या कानात काहीतरी पुटपुटला. दुसऱ्या दिवशी गावात तिरंग्यात लपेटून प्रतीकचे शव गावात आणले आणि लष्करी इतमामात त्याच्यावर अंत्यसंस्कारही झाले. कालच फोनवर बोलणारा आपला मुलगा आज शहीद झाला, याचे दुःख नाईक कुटुंबाला सहन होत नव्हते.
यावर्षी गणपती आणायचा नाही, हे दोघांनीही ठरविले होते.
0000
“यावर्षी एक घर तर सुटले. थोडा आराम आहे, आपल्याला आणि पोटालाही. तसेही त्या सुतकी घरात काय आदरातिथ्य होणार आपले?” पलंगावर स्वतःला झोकून देत उंदीर कुत्सितपणे म्हणाला.
“अरे, प्रतीक देशासाठी शहीद झालाय. सैनिकांचा आदर करा, हेच आपण शिकवतो आणि तू आराम बघतोस? यावेळी मलाच तुझी तक्रार केली पाहिजे,” तो सोंड त्याच्याकडे करून चिडून म्हणाला.
“हे बघ, आपण ग्लोबल होणार आहोत, हे सत्य स्वीकार. कोकणातून चाकरमानी मुंबईत आले आणि आता मुंबईतून परदेशी जाऊ लागले. हल्ली आपणही फॉरेन ट्रिप करतोच की!” उंदीर शेपटी फिरवत म्हणाला.
0000
आताच एक तरुण नाईकांच्या दारात उभा राहिला. प्रतीकच्या लॉकरमधील काही वस्तू त्याच्या हातात होत्या.
“मी सिद्धी वर्तक. प्रतीकच्या रेजिमेंटमध्ये आहे,” तो दारातूनच म्हणाला आणि आत शिरला. तो आत शिरताच एक चैतन्याची लहर घरात शिरली, असा भास कावेरी आणि गणपतला झाला.
“या काही वस्तू आहेत प्रतीकच्या. मरणानंतर त्या मी तुमच्याकडे पोहोचवाव्यात, अशी त्याची इच्छा होती,” असे बोलून त्याने त्या गणपतरावांच्या हाती दिल्या.
सामानात गणपतीची छोटी मूर्ती, ताईत आणि एक चिठ्ठी होती. ‘आपण शहीद झालो तरी, गणपती आणणे बंद करू नये. दरवर्षी जसा उत्सव साजरा करतो, तसाच साजरा करावा,’ असे त्या चिठ्ठीत लिहिले होते. म्हणूनच कावेरी काकूंचा विरोध असला तरी, गणपती आणायचा या मतावर गणपतराव ठाम होते.
0000
दरवर्षी प्रमाणे तो गणपतरावांच्या हातावर बसून घरात शिरला, तेव्हा घरातील दुःखी वातावरण ताबडतोब जाणवले त्याला. आता गणपतरावांचे हातही थरथरतायत याचीही जाणीव झाली. कावेरी काकूंनी पूजेची तयारी नेहमीसारखीच केली होती.
“यावेळी वेगवेगळ्या नैवेद्याची अपेक्षा करू नकोस,” त्याने मखरात बसतानाच बाजूला उभ्या असलेल्या उंदराला खडसावले.
“तुमच्या इतका मी दगडी काळजाचा नाही,” तो चिडून म्हणाला.
“मी काय केले आता? तुझी नेवेद्य खाण्याची आवड बघूनच तुला सांगितले आणि यावर्षी सगळेच ॲडजस्ट कर… आपण शोकाकूल घरात आहोत,” तो डोळे मिटून म्हणाला.
“पण प्रतीकला वाचवू शकला असता तुम्ही. गोळीबार झाला तेव्हा तुम्हीच बाजूला होता त्याच्या. जास्त नाही, पण काही दिवस त्याचे मरण पुढे ढकलता आले असते तुम्हाला…” उंदीर शेपटी आवळून घेत म्हणाला.
“मी देव आहे, जादूगार नाही. आपल्या जगात काही नियम ठरलेले आहेत आणि यमराजांच्या कार्यात मी ढवळाढवळ करीत नाही. मी काही नियम मोडतो, पण कोणाचा मृत्यू थांबवू शकत नाही,” तो आजूबाजूला नजर फिरवीत पुटपुटला.
पूजा, आरती झाल्यावर एक तांब्याचा छोटा तांब्या गणपतरावानी मूर्तीच्या बाजूला ठेवला. तो तांब्या लाल कपड्याने बंद केला होता.
“आता हे काय?” उंदीर चिडून म्हणाला. या तांब्यामुळे त्याची जागा बदलली होती.
“प्रतीकच्या अस्थी आहेत त्या. मीच गणपतरावांना ही आयडिया दिली होती,” तो हसत म्हणाला.
“आधीच मखरात जागा कमी… आपणच कसेतरी राहतो. मला माझी शेपटीही मनासारखी फिरवता येत नाही. त्यात तुम्ही या स्मशानातील अस्थी इथेच ठेवायची आयडिया दिली. किती विचित्र वास येतोय…” उंदीर कुरकुरत म्हणाला.
“तोंड सांभाळून बोल. या अस्थीच्या मालकाने देशासाठी प्राण दिलेत, हे विसरू नकोस. तूच काय, माझ्या दर्शनाला येणाऱ्या कोणीही ते विसरू नये म्हणून त्या अस्थी माझ्याशेजारी राहतील. ही एक श्रद्धांजली असेल त्या शहीद प्रतीकला. अरे, त्या बीडीडी चाळीत यापेक्षा ही कमी जागेत आपण राहत होतो. झोपायला जागा नसायची, तेव्हा घरातील पुरुष मंडळी बाहेरच्या पॅसेजमध्ये झोपायचे, तर आपल्या मखराखाली छोटी मुले झोपायची… तेव्हा नाही तक्रार केलीस?” तो चिडून आपली सोंड फिरवीत म्हणाला.
हेही वाचा – टिपिकल
“तेव्हा प्रसाद भरपूर मिळायचा,” उंदीर छद्मीपणे हसत म्हणाला.
0000
आज त्याच्या विसर्जनाचा दिवस होता. विसर्जनाच्या दिवशी प्रतीकची खूपच आठवण नाईक कुटुंबीयांना आणि गावाला येत होती. गावातील गणपती हळूहळू बाहेर पडू लागले होते. गणपतराव गणपती उचलण्यास पुढे जाणार इतक्यात दारात सिद्धी वर्तक उभा राहिला.
“काका, प्रतीकचे काही झाले तर, गणपतीचे विसर्जन मी करावे, अशी त्याची इच्छा होती. म्हणून आलोय…” सिद्धी हात जोडून म्हणाला.
गणपतरावानी किंचित हसत मान डोलावली आणि अस्थीचा तांब्या मखरातून बाहेर काढला.
“काका, तो तांब्या मूर्तीच्या बाजूलाच ठेवा. त्याचेही विसर्जन करू. गणेशासोबत प्रतीकच्या अस्थीचे विसर्जन ही भाग्याची गोष्ट आहे आणि माझीही इच्छा आहे…”
काही न बोलता गणपतरावानी मान डोलावली.
सिद्धीने गणपती डोक्यावर घेतला आणि नदीकडे चालू लागला. आज गावात एक वेगळेच वातावरण होते. प्रत्यक्ष गणपतीच आपल्यासोबत चालतोय, असा भास सगळ्यांना होत होता.
उघड्या अंगाने डोक्यावर गणपती आणि हातात अस्थींचा तांब्या घेऊन सिद्धी पाण्यात शिरला तो परत आलाच नाही. बराच वेळ वाट पाहून गणपतराव खिन्न मनाने परत फिरले, तेव्हा दारातच रिकामा कलश आणि पाट ठेवलेला दिसला.
0000
“आज स्वतःचे विसर्जन स्वतःच केलेत. चला ही हौस ही पूर्ण केलीत आणि अस्थी विसर्जनाचे पुण्यही पदरात पाडून घेतलेत,” टॉवेलने डोके पुसत उंदीर म्हणाला.
“एका शहिदाच्या अस्थींचे विसर्जन करणे, हे पुण्याचेच काम आहे. आपले मरण डोळ्यासमोर दिसत असतानाही पाठ न दाखवणारे हे भारतीय सैनिक आहेत. आपण देव म्हणून आपले सर्व करण्यात पुण्य मानणाऱ्या, या मानवांसाठी थोडे पुण्य आपण केले, तर काय हरकत आहे?” आपले ओले केस पंख्यापुढे करत तो हसत म्हणाला.


