एकही दिवस जात नाही असा, जेव्हा मला माझ्या आबाची आठवण येत नाही. काही माणसं तुमच्या आयुष्यात तुम्हाला सुरक्षित ठिकाणी ठेवण्यासाठी स्वतःचं आयुष्य कायम असुरक्षित करतात. माझा आबा देखील असाच होता.
न कळणाऱ्या वयात आई-बाबाविना पोरका झालो. तेव्हापासून आबा माझं सर्वस्व होता. गोडाऊनमध्ये दिवसभर जड पोती उचलायचं काम करायचा. थकून भागून घरी यायचा. मी रोज त्याच्या हातापायांना तेल लावून, मसाज करून द्यायचो माझ्या हाताने. मला पोटाशी घट्ट कवटाळून आबा म्हणायचा, “तू चार बुकं शिकून साहेब हो मोठा! मालकाशी बोलून मी प्रयत्न करतो तुला शहरात शिकायला पाठवायला…”
आबासारखा देव माणूस होता, आबाचा मालक… ज्याने मला पुण्याला शिकायला ठेवले आणि कष्टाची एकेक पायरी यशस्वीपणे चढत मी अमेरिकेत जाऊन कधी स्थिरावलो, ते माझे मलाच कळले नाही.
मी त्याला खूपदा बोलावलं अमेरिकेला माझ्या घरी… पण त्याला गावचं घर सोडवेना. मग मीच जायचो दर दोन वर्षांनी आबाला भेटायला. अमेरिकेत सगळी सुखं दिमतीला होती, हात पसरून… पण गावाला आबाच्या मांडीवर डोकं ठेवून मिळणारी शांत झोप मला अमेरिकेत कधीच नाही मिळाली. गावातील आमच्या त्या छोट्याशा घरातल्या प्रत्येक भिंतीला आणि प्रत्येक कोपऱ्याला चिकटलेल्या होत्या माझ्या आणि आबाच्या आयुष्याच्या कडूगोड आठवणी!
हेही वाचा – साताजन्माचे नाते
दिवसेंदिवस आबा थकत चालला होता आणि मी सैरभैर झालो होतो. शेवटी माझा व्यवसाय काही महिन्यांसाठी माझ्या पार्टनरच्या हाती सोपवून मी आमच्या गावी आलो. माझ्या चेहऱ्यावरून फिरणारे आबाचे थरथरणारे हात आणि क्षीण होऊन लुकलुकणारे डोळे, बरंच काही सांगून गेले मला.
मी आल्याच्या आनंदात आबा काही दिवस मला जुना आबा वाटला. किती मजेत घालवत होतो आम्ही एकेक दिवस! त्याला चालवत नसायचं, पण त्याचा उत्साह कमी नव्हता झाला. लहानपणी माझं मन रमवायला तो मला जिथे जिथे न्यायचा, त्या प्रत्येक ठिकाणी मी त्याला मोटारीतून नेलं. तिथल्या आठवणी येऊन तो मला गच्च मिठी मारुन म्हणायचा, “तुझं मन रमवायला माझ्याकडे काहीच नव्हते म्हणून मग कधी उजाड माळरानावर कधी देवळात तर कधी नदी किनारी तुला आणायचो. तेव्हा तुझ्यासाठी पैसे खर्च करताना जीवावर यायचं, कारण महिन्यांचं सामान आणण्यासाठी मला जास्त वेळ काम करायला लागायचं…”
आबा असं भावनिक बोलून मला पार रडवायचा.
मी येऊन काही आठवडे लोटले नाही तोच, एक रात्री आबा झोपला तो दुसऱ्या दिवशी उठलाच नाही… आबा नाही, ही गोष्ट न पचण्याच्या पलिकडची होती. आबाचे दिवसकार्य संपले. पुढचा प्रत्येक दिवस मला खायला उठायचा. एक दिवस ठरवलं आणि तिकिट काढून परत अमेरिकेला जाऊन कामाला लागलो.
ज्याने मला सांभाळून मोठं केलं… ओझी वाहून माझ्या पंखात बळ दिले… ज्याने मी आयुष्यात गरूड भरारी घेऊन आकाशाला गवसणी घालावी, असा हट्ट धरला होता… त्या माझ्या आबाला उंचावरून दिसणारं जग दाखवण्याची माझी इच्छा मात्र अपूर्ण राहिली, याचं मला खूप वाईट वाटतं.
हेही वाचा – एवढी काय घाई आहे!
आबाच्या पहिल्या पुण्यतिथीला आमच्या तालुक्यातील एका नावाजलेल्या आश्रमाला मी आबाच्या नावाने मोठी देणगी दिली, जेणेकरून तिथे येणाऱ्या कुठल्याही मुलामुलीच्या नातेवाईकांवर माझ्या आबासारखी जड पोती उचलून त्यांचा खर्च उचलण्याची पाळी येऊ नये.
आज आबा नाही. पण तालुक्याच्या आश्रमातल्या मुलांची शैक्षणिक प्रगती बघून तो जिथे कुठे असेल तिथे त्याच्या आत्म्याला नक्कीच शांतता आणि समाधान मिळेल, यात शंकाच नाही.
कोणाचा तरी आबा बनून
सुंदर आयुष्य त्याचे घडवू
आधार देऊन निराधारांना
इथे आत्मविश्वासाने जगवू…


