दर्शन कुलकर्णी
- आज, दिनांक : 07 ऑक्टोबर 2026; वार : बुधवार
- भारतीय सौर : 15 आश्विन शके 1948; तिथि : द्वादशी 23:16; नक्षत्र : मघा 21:40;
- योग : शुभ 26:51; करण : कौलव 11:53;
- सूर्य : कन्या; चंद्र : सिंह; सूर्योदय : 06:29; सूर्यास्त : 18:23;
- पक्ष : कृष्ण; अयन : दक्षिणायन; संवत्सर : पराभव;
- शालिवाहन शक : 1948; विक्रम संवत : 2082; युगाब्द : 5128
द्वादशी श्राद्ध
मघा श्राद्ध
संन्यासिजनांचा महालय
वेद कन्सल्टन्सी / 9987433660
दिनविशेष
शास्त्रीय गायिका अश्विनी भिडे-देशपांडे
टीम अवांतर
जयपूर अत्रौली घराण्याच्या शास्त्रीय गायिका अश्विनी भिडे-देशपांडे यांचा जन्म 7 ऑक्टोबर 1960 रोजी मुंबईत झाला. शास्त्रीय गायिका माणिक भिडे आणि गोविंद भिडे हे अश्विनी भिडे यांचे आई-वडील. संगीताची परंपरा असलेल्या घराण्यात जन्मलेल्या अश्विनी यांचे शास्त्रीय संगीताचे प्राथमिक शिक्षण पंडित नारायणराव दातार यांच्याकडे झाले. नंतर त्यांनी गांधर्व महाविद्यालयातून ‘संगीत विशारद’ ही पदवी वयाच्या अवघ्या सोळाव्या वर्षी घेतली.
त्यानंतर त्यांनी आपली आई माणिक भिडे यांच्याकडून जयपूर-अत्रौली घराण्याची तालीम घेतली. याशिवाय 2009 पर्यंत रत्नाकर पै यांच्याकडूनसुद्धा मागर्दर्शन घेतले. अश्विनी यांनी सूक्ष्मजीवशास्त्रात पदव्युत्तर पदवी घेतली असून मुंबई येथील भाभा अणुसंशोधन केंद्रातून जैवरसायनशास्त्रात पीएच.डी. मिळवली आहे. डॉक्टरेट मिळेपर्यंत त्यांनी संगीतातील व्यावसायिक कारकीर्दीचा विचार देखील केला नव्हता.
हेही वाचा – पुण्यकर्म
मादाम क्युरी प्रेरणास्थान असणाऱ्या अश्विनी यांनी जयपूर-अत्रौली, मेवाती आणि पतियाळा या घराण्याच्या प्रभावातून स्वतःची स्वतंत्र गायनाची शैली तयार केली आहे. शास्त्रीय संगीताबरोबरच ठुमरी, दादरा हे उपशास्त्रीय गायन प्रकारसुद्धा त्या गातात. त्यांच्या संस्कृत भाषेवरील प्रभुत्वामुळे त्यांनी अनेक स्तोत्रे, स्तुती यांचे गायन केले आहे.
बंदिश आणि बंदिश रचना या विषयांचे त्यांना सखोल ज्ञान आहे. त्यांनी स्वतः अनेक बंदिशी रचल्या आहेत. ‘राग रचनांजली’ या पुस्तकामध्ये या रचना प्रकाशित करण्यात आल्या आहेत. 2010 मध्ये प्रसिद्ध झालेल्या ‘राग रचनांजली 2’ या पुढच्या भागामध्ये आणखी 98 बंदिशी आहेत.
अश्विनी यांनी जगभरातील अनेक संगीत संमेलने आणि मैफिलींमध्ये आपल्या कलेचे सादरीकरण केले आहे. त्यामध्ये पुण्यातील सवाई गंधर्व भीमसेन महोत्सव, ओरिसाच्या भुवनेश्वर येथील राजा राणी महोत्सव, पुण्यातील गान सरस्वती महोत्सव यांचा समावेश आहे. त्या आकाशवाणी आणि दूरदर्शनच्या टॉप ग्रेड गायिका आहेत. त्यांनी अनेक राष्ट्रीय कार्यक्रम आणि आकाशवाणीच्या संगीत संमेलनामध्ये सहभाग घेतला आहे.
सध्या त्या अनेक शिष्यांना आपल्या जयपूर-अत्रौली घराण्याच्या गायकीचे शिक्षण देत आहेत तसेच हिंदुस्तानी शास्त्रीय संगीताच्या प्रसारासाठी त्या अनेक शाळा, महाविद्यालयांमध्ये शास्त्रीय संगीतावर व्याख्याने – प्रात्याक्षिके देतात.
भारतीय शास्त्रीय संगीतातील मूर्च्छना पद्धतीवर आधारित जसरंगी जुगलबंदी म्हणजे एकाच वेळी स्त्री आणि पुरुष गायकाने दोन वेगवेगळे राग सादर करण्याची पद्धत. अश्विनी भिडे- देशपांडे यांनी संजीव अभ्यंकर यांच्याबरोबर अनेकवेळा जसरंगी जुगलबंदीचे सादरीकरण केले आहे.
आतापर्यंत त्यांना ऑल इंडिया रेडीओ संगीत स्पर्धेत राष्ट्रपतींचे सुवर्णपदक, संगीत नाटक अकादमी पुरस्कार, कुमार गंधर्व राष्ट्रीय सन्मान (हा हा पुरस्कार मिळवणाऱ्या त्या पहिल्या गायिका होत्या), सह्याद्री दूरदर्शनचा संगीत रत्न पुरस्कार, महाराष्ट्र शासनाचा सांस्कृतिक पुरस्कार, गानतपस्विनी मोगुबाई कुर्डीकर सन्मान, पंडित जसराज गौरव पुरस्कार, संगीत शिखर सन्मान, वत्सलाबाई जोशी पुरस्कार, माणिक रत्न पुरस्कार, भारत सरकारचा पद्मश्री पुरस्कार, ग्वाल्हेर येथील ITM विद्यापीठाकडून मानद डी.लिट् पदवी अशा असंख्य पुरस्कारांनी गौरविण्यात आले आहे.
आजचे राशिभविष्य
मेष – आजचा दिवस आनंद घेऊन येणारा असू शकतो. मात्र त्याचवेळी दूर राहणाऱ्या संततीच्या आठवणीने तुम्ही भावुक होऊ शकता. काम किंवा करिअर-संबंधित कामासाठी प्रवास घडेल. कामाच्या ठिकाणी एखादा सहकारी तुमच्यासाठी किरकोळ अडचणी निर्माण करण्याचा प्रयत्न करेल, अर्थात तुमची समज ही परिस्थिती हाताळण्यास मदत करेल. आज कठीण कामेही सहजपणे हातावेगळी कराल. त्यावेळी कोणतेही काम हलक्यात घेऊ नका किंवा निष्काळजीपणा करू नका.
वृषभ – आज, कुटुंब आणि जवळच्या व्यक्तींसोबतचे नातेसंबंध अधिक घनिष्ठ आणि दृढ होतील. एखाद्या सामाजिक कार्यक्रमात सहभागी झाल्याने तुमचा संपर्क आणि प्रभाव दोन्ही वाढतील. विरोधकांची रणनीती समजून घेतली तर तुम्ही त्यांच्यावर मात करण्यात यशस्वी व्हाल. वैयक्तिक किंवा महत्त्वाच्या गोष्टी सर्वांना सांगणे टाळा. कामाचा ताण थोडा जास्त असेल, ज्यामुळे थकवा येऊ शकतो. कर्जफेडीसाठी संबंधित व्यक्ती किंवा बँकेकडून दबाव वाढण्याची शक्यता आहे.
मिथुन – आजचा दिवस तुम्हाला दिलासा आणि आनंद देणारा असेल. तुमची मेहनत आणि समर्पण यामुळे प्रतिष्ठा वाढेल. संध्याकाळी कुटुंबासोबत चांगला वेळ घालवाल. जोडीदाराला नोकरी किंवा नवीन संधी यासंदर्भात एखादी चांगली बातमी मिळेल. व्यावसायिकांच्या एखाद्या प्रकल्पाचे काम अचानक थांबू शकते, ज्यामुळे थोडी अस्वस्थता निर्माण होऊ शकते, परंतु ही परिस्थिती फार काळ टिकणार नाही.
कर्क – आज खर्च थोडा जास्त होऊ शकतो, त्यामुळे बजेटवर बारकाईने लक्ष ठेवणे महत्त्वाचे ठरेल. संततीच्या शिक्षणाबद्दल किंवा भविष्याबद्दल महत्त्वाचे निर्णय घ्यावे लागतील. कुटुंबातील सदस्याच्या करिअर किंवा कामाशी संबंधित समस्या चर्चेद्वारे सोडवल्या जाऊ शकतात. घराची दुरुस्ती, सजावट किंवा नूतनीकरणाशी संबंधित कामे थांबली असतील तर ती पुन्हा सुरू होऊ शकतात. कामाच्या ठिकाणी वरिष्ठ तुमच्यावर नवीन जबाबदाऱ्या सोपवू शकतात.
सिंह – आजचा दिवस तुमच्यासाठी खास आणि अविस्मरणीय ठरू शकतो. नवीन लोकांना भेटणे करिअर किंवा व्यवसायासाठी फायदेशीर ठरू शकते. एखाद्या धार्मिक कार्यक्रमाला उपस्थित रहाल. कामाच्या किंवा व्यवसायाच्या ठिकाणी अशी परिस्थिती निर्माण होऊ शकतात, जिथे संयम बाळगणे आवश्यक असेल. क्षुल्लक गोष्टींवरून रागावणे किंवा घाईचे निर्णय घेणे टाळा. मालमत्ता खरेदी करण्याच्या किंवा चांगली गुंतवणूक करण्याच्या योजनाही आज प्रत्यक्षात येऊ शकतात.
कन्या – आजचा दिवस आशा आणि सकारात्मक बदलांचा आहे. प्रवास करताना महत्त्वाची माहिती मिळू शकते, जी भविष्यात तुमच्यासाठी फायदेशीर ठरेल. शिक्षकांच्या मार्गदर्शनामुळे विद्यार्थी कोणत्याही शैक्षणिक आव्हानांवर मात करू शकतील. व्यवसायात काही चढ-उतार येतील, ज्यामुळे थोडी चिंता वाटू शकते, परंतु परिस्थिती आटोक्यात असेल. वाहन खरेदी करण्याचा विचार करत असाल, तर आज त्यासंदर्भात पुढे जाणे योग्य ठरेल. पालकांच्या आशीर्वादाने एखादे रखडलेले काम लवकर पूर्ण होऊ शकते.
तुळ – आज आर्थिक बाबतीत दिलासा मिळेल, तुमची स्थिती पूर्वीपेक्षा अधिक मजबूत दिसेल. योग्य वेळी योग्य निर्णय घेण्याची तुमची क्षमता आज खूप उपयोगी पडेल. अर्थात कोणत्याही कामात निष्काळजीपणा टाळा, कारण एका लहान चुकीमुळेही नुकसान होऊ शकते. कुटुंबात आपलेच म्हणणे खरे करण्याचा आग्रह नात्यांमध्ये तणाव निर्माण करू शकतो. त्यामुळे, आज सौम्य दृष्टिकोन स्वीकारणे तुमच्यासाठी चांगले राहील.
वृश्चिक – आज स्थावर मालमत्ता आणि त्याच्याशी संबंधित बाबींमध्ये चांगल्या संधी निर्माण होऊ शकतात. तुमच्या मेहनतीला सकारात्मक फळ मिळाल्याने आत्मविश्वास वाढेल. जर तुम्ही एखादे कायदेशीर प्रकरण हाताळत असाल, तर अनुभवी व्यक्ती किंवा पात्र वकिलाचा सल्ला घेणे फायदेशीर ठरेल. स्वतःची कामे पूर्ण करताना संयम आणि धैर्य टिकवून ठेवा. जर तुमचे तुमच्या वडिलांसोबत तणावाचे संबंध असतील, तर वाद वाढवण्याऐवजी शांतपणे बोलून तोडगा काढण्याचा प्रयत्न करा.
हेही वाचा – उंबऱ्यापलीकडचा सातबारा
धनु – आज कामाच्या ठिकाणी तुमच्राबद्दल आदर वाढू शकतो. नवीन वाहन घेण्यासाठी कर्जाचा अर्ज केला असेल, तर तुम्हाला त्यासंदर्भात काही चांगली बातमी मिळू शकते. आज जोडीदाराच्या भावना समजून घेणे महत्त्वाचे ठरेल. तुमच्या बोलण्यातील अगदी लहान गोष्टींमुळेही त्यांना वाईट वाटू शकते आणि वाद होऊ शकतो, म्हणून संभाषणात संयम ठेवा. कामाच्या ठिकाणी तुम्हाला हवे असलेले काम न मिळाल्याने थोडे निराश वाटू शकते. अशा परिस्थितीत, तुम्ही नोकरी बदलण्याचा किंवा नवीन संधी शोधण्याचा गंभीरपणे विचार करू शकता.
मकर – आजचा दिवस विद्यार्थ्यांसाठी उत्साहाचा आणि आनंदाचा असेल. जुन्या आर्थिक समस्या सुटल्याने दिलासा मिळेल. संततीच्या परीक्षेतील निकालामुळे कुटुंबाला आनंद आणि अभिमान वाटेल. वडिलांशी एखाद्या महत्त्वाच्या कामावर किंवा निर्णयावर चर्चा करू शकता. पालकांच्या आशीर्वादाने रखडलेली कामे पुढे नेण्यास मदत होईल. राजकारण किंवा सामाजिक क्षेत्रात असलेल्या जातकांची प्रतिष्ठा आणि प्रभाव वाढू शकतो. मात्र महत्त्वाच्या योजना आणि वैयक्तिक बाबी सर्वांना सांगणे टाळा.
कुंभ – आजचा दिवस आनंदी क्षणांनी भरलेला असू शकतो. प्रियजनांसोबत वेळ घालवण्याची संधी मिळेल. इतरांच्या समस्यांमध्ये जास्त गुंतणे टाळा, कारण त्यांचा ताण तुमचा होऊ शकतो. बऱ्याच काळापासून अडकलेले पैसे परत मिळाल्याने तुम्हाला खूप आनंद होईल. दुसऱ्याचे वाहन चालवत असाल, तर विशेष सावधगिरी बाळगा. भूतकाळातील चुका पुन्हा करण्याऐवजी त्यातून शिकून पुढे जाणे शहाणपणाचे आहे. आर्थिक परिस्थिती सुधारण्यासाठी महत्त्वाचे निर्णय देखील आज घेतले जातील.
मीन – आज, प्रत्येक पाऊल उचलण्यापूर्वी सावधगिरी बाळगण्याची गरज आहे. नोकरदार व्यक्तींनी अनोळखी लोकांवर अती विश्वास ठेवणे टाळावे. कोणासोबतही आपली वैयक्तिक आर्थिक माहिती शेअर करणे टाळा. सरकारी कामात काही विलंब किंवा अडचणी येऊ शकतात, त्यामुळे संयम ठेवा. एखादा विरोधक तुम्हाला त्रास देण्याचा प्रयत्न करू शकतो, परंतु शांत राहिल्याने परिस्थिती हाताळण्यास मदत होईल. पहिल्या पगारातून संततीने तुमच्यासाठी आणलेली एखादी भेटवस्तू घरात आनंदाचे वातावरण निर्माण करेल. आईला दिलेले आश्वासन वेळेवर पूर्ण करण्याचा प्रयत्न करा.


