Close Menu
AvaantarAvaantar

    Subscribe to Updates

    Get the latest creative news from FooBar about art, design and business.

    What's Hot

    Panchang : आजचे पंचांग, दिनविशेष आणि राशीभविष्य; 07 ऑक्टोबर 2026

    October 7, 2026

    फूल ना फुलाची पाकळी

    October 6, 2026

    पुण्यकर्म

    October 6, 2026
    Facebook X (Twitter) Instagram
    Wednesday, October 7
    AvaantarAvaantar
    Facebook X (Twitter) Instagram YouTube
    Home
    • अवांतर
    • आरोग्य
    • फिल्मी
    • फूड काॅर्नर
    • मैत्रीण
    • ललित
    • पंचांग आणि भविष्य
    • अध्यात्म
    • शैक्षणिक
    Latest From Avaantar
    AvaantarAvaantar
    Home » फूल ना फुलाची पाकळी
    ललित

    फूल ना फुलाची पाकळी

    दिलीप कजगांवकरBy दिलीप कजगांवकरOctober 6, 2026No Comments8 Mins Read
    Share Facebook Twitter LinkedIn WhatsApp Copy Link
    अवांतर, मराठीकथा, मराठीलेख, मी मराठी, अभिजात मराठी, दिलीप कजगांवकर, लेखक दिलीप कजगांवकर, फुलाची पाकळी, राजचा चांगुलपणा, राजची माणुसकी, नामसाधर्म्य, 4 लाख, वरदचे वडील, राजचे वडील, सदानंदांचे ऑपरेशन, चांगुलपणाचे फळ, सावित्रीबाईंची चिडचिड, राजला नवी संधी, राजला वरदकडून नवी संधी,
    फोटो सौजन्य - AI
    Share
    Facebook Twitter LinkedIn WhatsApp Email Copy Link

    राज हा सदानंद आणि सावित्रीबाईंचा एकुलता एक मुलगा. नोकरीच्या निमित्ताने गेली काही वर्षं तो आई-बाबांसह इंदूरला राहात होता. पुण्याला नोकरी मिळाली म्हणून मागच्या महिन्यातच तो आई-बाबांसह पुण्यात आला होता. पुण्यात ना नातेवाईक, ना मित्र. नवं शहर.. नवी नोकरी… नवं आयुष्य… सगळं हळूहळू स्थिरावत होतं.

    आणि एक दिवस अचानक राजच्या मोबाइलवर फोन आला.

    “सदानंद हे तुमचे बाबा ना?”

    “हो.”

    “तुमचे बाबा हॉस्पिटलमध्ये आहेत. त्यांची प्रकृती गंभीर आहे. ऑपरेशन आजच करावं लागेल, त्यासाठी चार लाख रुपये भरावे लागतील.”

    राज थरथरू लागला, “बाबांना काय झालं?”

    “ते बोलण्याच्या अवस्थेत नाहीत. तुम्ही लगेच हॉस्पिटलला या.”

    फोन कट झाला.

    राज सुन्न झाला. त्याच्या डोळ्यांसमोर बाबांचा चेहरा आला. सतत कष्ट करणारे बाबा, त्याच्यावर जिवापाड प्रेम करणारे बाबा. अचानक काय झालं?

    “बाबा नीट व्हायला हवेत.”

    राजने सावकाराकडून चार लाख रुपये कर्ज घेतलं आणि घाईघाईने हॉस्पिटल गाठलं.

    “मी राज. माझे वडील सदानंद.”

    “बरं झालं, तुम्ही आलात. चार लाख भरा म्हणजे ऑपरेशन सुरू करता येईल.”

    “मी पैसे भरतो; पण त्याआधी एक मिनिट बाबांना भेटता येईल का?”

    “हो, ते रूम नंबर 120 मध्ये आहेत.”

    राज देवाचं नाव घेत घेत रूममध्ये गेला. बाबा झोपलेले होते. राज त्यांच्याजवळ गेला. त्याने चेहऱ्याकडे पाहिलं. क्षणभर… दोन क्षण… आणि त्याच्या लक्षात आलं — हे त्याचे बाबा नव्हते!

    राजने सुटकेचा निःश्वास टाकला आणि तणावमुक्त होऊन बाहेर आला. बरं झालं आधी पैसे भरले नाहीत, असा विचार करत तो सावकाराचे पैसे लगेचच परत करण्याचा विचार करू लागला म्हणजे फक्त एकच दिवसाचं व्याज लागेल.

    “पेशंटची अवस्था गंभीर आहे,” डॉक्टर म्हणाले. “ऑपरेशन तातडीने करावं लागेल. तुम्ही पैसे भरले का? भरले नसतील तर त्वरा करा. उशीर झाला तर मी जबाबदार नाही.”

    “माझ्या बाबांचं नावसुद्धा सदानंद आहे; पण ते माझे बाबा नाहीत. मी त्यांना ओळखतही नाही,” हे ओठांवर आलेले शब्द त्याने बाहेर पडू दिले नाहीत; कारण रूम नंबर 120मध्ये ग्लानीत असलेल्या त्या माणसाचा चेहरा डोळ्यांसमोरून जात नव्हता. ते कोण? त्यांचं कुणीही आलेलं नव्हतं आणि येणार तरी कसे? हॉस्पिटलमधील सगळे राजला त्यांचा मुलगा समजत होते. त्यांचा जीव जाणार होता किंवा वाचणार होता, हे ठरणार होते… राज पुरता गोंधळला होता, पण तरीही त्या क्षणी त्याच्यासाठी महत्त्वाचं होतं ते नातं नव्हे तर, त्या पेशंटचा जीव! कारण, तो माणूस होता, कोणाचा तरी बाप होता…

    हेही वाचा – नाते… रक्ताचे अन् प्रेमाचे!

    “मिस्टर राज… मी तुमच्याशी बोलतोय,” डॉक्टरांचा आवाज वाढला होता.

    “हो, हो, मी भरतो पैसे,” राजने पैसे भरले आणि डॉक्टर कामाला लागले. ऑपरेशन सुरू झालं. राज बाहेर बसला होता. त्याच्या मनात सतत एकच विचार होता — ‘देवा, हा माणूस वाचला पाहिजे.’

    थोड्या वेळाने डॉक्टर बाहेर आले आणि म्हणाले, “ऑपरेशन व्यवस्थित झालं. तुमचे बाबा चार-पाच तासांनी शुद्धीवर येतील.”

    राजने हात जोडून डॉक्टरांचे आणि परमेश्वराचे आभार मानले. त्याच्या डोळ्यांत पाणी आलं. त्याने मनात म्हटलं, ‘ते शुद्धीवर आल्यावर त्यांच्याबद्दल समजेल.’

    राज अर्ध्या तासासाठी घरी आला. आई-बाबांना त्याने सगळं सांगितलं. आई-बाबा अवाक् झाले. आई म्हणाली, “अरे राज! किती साधा भोळा रे तू… ते तुझे बाबा नाहीत, हे समजल्यावर तू चार लाख रुपये का भरलेस?”

    राज काही क्षण शांत राहिला. मग म्हणाला, “आई, मला त्या क्षणी एकच वाटलं.”

    “काय?”

    “पैसे भरले नाहीत आणि… त्यांचा जीव गेला तर? मी मदत केली नाही, म्हणून त्यांचा जीव गेला… हे ओझं मला आयुष्यभर सहन करावं लागलं असतं.”

    आई काही बोलणार होती; पण राजने तिचा हात हातात घेतला.

    “आई, चार लाख रुपये कमावता येतील; पण एका माणसाचा जीव गेला, तर तो परत आणता येणार नाही.”

    बाबा सर्व ऐकत होते, त्यांच्या डोळ्यांत अश्रू होते.

    “राज…”

    राज त्यांच्याकडे पाहू लागला. बाबा म्हणाले,

    “आजपर्यंत आम्ही तुला आमचा मुलगा म्हणून ओळखत होतो. आज कळलं, तू माणूस म्हणून किती मोठा आहेस.”

    राजच्या डोळ्यांत पाणी आलं. आईनेही त्याच्या डोक्यावरून हात फिरवला आणि म्हणाली, “जा… ते तिथे एकटे आहेत. त्यांचा मुलगा येईपर्यंत तूच त्यांचा मुलगा!”

    राज पुन्हा हॉस्पिटलमध्ये आला. त्यांना प्रायव्हेट रूममध्ये हलवलं होतं; परंतु ते पूर्ण शुद्धीत नव्हते. राज बेडजवळ बसला होता. नर्स येऊन जायच्या. डॉक्टर तपासून जायचे. राज कधी त्यांच्या चेहऱ्याकडे पाहायचा, कधी मॉनिटरकडे… साधारणतः 8 वाजता त्यांनी किंचित डोळे उघडले. राज लगेच पुढे झाला…

    “काका…”

    त्यांनी काहीतरी बोलण्याचा प्रयत्न केला. राजने त्यांचा हात हातात घेतला.

    “काळजी करू नका. तुम्ही ठीक आहात.”

    त्यांच्या डोळ्यांत पाणी आलं. त्यांनी कदाचित राजला त्यांचा मुलगा समजलं असावं. राजच्या डोळ्यांतही पाणी आलं. तो हळूच म्हणाला,

    “तुमचा मुलगा येईल काका… तो नक्की येईल.”

    “मग तू कोण?” म्हणताना त्यांचा डोळा लागला.

    इकडे बाबा घरी परतले नाहीत म्हणून त्यांचा मुलगा वरद अगदी वेडापिसा झाला होता. बाबा फोन घरीच विसरले होते. त्याने नातेवाईकांना फोन केले. मित्रांना फोन केले. जवळपासच्या हॉस्पिटलमध्ये फोन केला. शेवटी एका हॉस्पिटलमधून उत्तर मिळालं…

    “आमच्याकडे आज एक गृहस्थ अॅडमिट झाले आहेत. नाव, वय आणि वर्णनही जुळतंय.”

    वरद लगेचच हॉस्पिटलमध्ये आला…

    “कुठे आहेत ते? मी भेटू शकतो का त्यांना?”

    सिस्टरने वरदला सदानंदांच्या रूममध्ये नेलं. समोरचं दृश्य पाहून तो थबकला. एक अनोळखी तरुण त्याच्या बाबांच्या जवळ बसला होता. त्यांच्या डोक्यावरून प्रेमाने हात फिरवत होता.

    “हे माझे बाबा!” वरद आनंदाने उद्गारला… “तुम्ही कोण?” त्याने राजला विचारलं.

    “मी राज. तुम्ही येईपर्यंत मी यांचा मुलगा बनलो. काका आता ठीक आहेत.”

    “म्हणजे, हे तुमचे बाबा नाहीत? आणि तरीही तुम्ही चार लाख भरले आणि पूर्ण वेळ इथे बसून होता?” सिस्टरने चकीत होऊन विचारलं.

    तिने सांगितलं, “काल काका चक्कर येते म्हणून इथे आले. त्यांच्याकडे फोन नव्हता. त्यांनी त्यांच्या मुलाचा फोन नंबर सांगितला होता, पण ते व्यवस्थित बोलू शकत नव्हते. मी नंबर लिहिताना काही तरी चूक केली असणार, त्यामुळे फोन राज यांना लागला.”

    वरद काही क्षण राजकडे पाहत राहिला…

    “राज, तुमचे आभार मानण्यासाठी माझ्याकडे शब्द नाहीत. माझ्या बाबांसाठी तुम्ही जे केलं, ते मी आयुष्यभर विसरणार नाही.”

    राज म्हणाला, “आभार मानू नका. मी फक्त माणुसकी म्हणून जे करायला हवं होतं ते केलं.”

    “पण चार लाख रुपये भरले तुम्ही?”

    “ते केवळ पैसे होते. क्षणी मला निवड करायची होती – पैसे की माणूस? मी माणसाला निवडलं.”

    वरदच्या डोळ्यांत पाणी आलं…

    “राज, तुमचे उपकार मी कधीच विसरणार नाही.”

    राजने हलकंसं हसत म्हटलं, “तुमच्या बाबांची काळजी घ्या. आता त्यांची जबाबदारी तुमच्यावर.”

    वरदने राजचा फोन नंबर घेतला आणि पत्ताही घेतला.

    दोन दिवसांनी वरद राजच्या घरी आला चार लाखांचा चेक घेऊन. सावित्रीबाई एकट्याच घरी होत्या…

    “मी वरद. तुमच्या राजने माझ्या बाबांसाठी खूप केलं. राज घरी नाही का?”

    “तो ऑफिसला गेला आहे. या ना, बसा.”

    राजने सावकाराकडून चार लाख रुपये कर्ज घेतले होते. “पैसे परत कमावता येतात. माणूस नाही,” राज असं बोलल्याचं सावित्रीबाईंकडून समजल्यावर वरदचे डोळे पाणावले. त्याने सावित्रीबाईंकडून राजची सगळी माहिती घेतली. तो कुठे शिकला, इंदूरला किती वर्षं होता, पुण्यात कधी आला, नोकरी कुठे लागली, घरची परिस्थिती कशी आहे… हे जाणून घेतल्यावर 4 लाखांचा चेक त्यांना द्यायचा विचार त्याने रद्द केला.

    “मी निघतो. राजला माझे मनापासून आभार सांगा.”

    वरद गेल्यावर सावित्रीबाईंची चिडचिड वाढली.

    “चार लाख रुपये कर्ज काढून माझ्या मुलाने याच्या बाबांचा जीव वाचवला आणि हा पैसे परत करायचं नावही घेत नाही.”

    राज संध्याकाळी घरी आला.

    “आई, काय झालं?”

    “काही नाही.”

    “मग चेहरा असा का?”

    सावित्रीबाई काही क्षण गप्प राहिल्या. मग म्हणाल्या, “आज वरद आला होता.”

    “अरे वा! त्याचे बाबा कसे आहेत?”

    “ठीक आहेत.”

    सावित्रीबाई म्हणाल्या, “तू चार लाख रुपये कर्ज काढून त्याच्या बाबांचा जीव वाचवला आणि त्याने पैसे परत न करता फक्त तुझे आभार मानले.”

    राज शांतपणे म्हणाला, “आई, मी जे केलं ते पैसे परत मिळतील या अपेक्षेने केलं नव्हतं ना.”

    दोन दिवसांनी वरद पुन्हा आला तेव्हाही राज नव्हता, पण सदानंद आणि सावित्रीबाई दोघंही होते.

    “राज आहे का?”

    “नाही, पण या ना तुम्ही.” सावित्रीबाई म्हणाल्या. बहुतेक आज आपले चार लाख मिळतील ही वेडी आशा होती त्यांना.

    “हे वरदचे बाबा. यांचंही नाव सदानंद आहे.”

    वरदने एक कार्ड सावित्रीबाईंच्या हातात दिलं… “हे राजसाठी…”

    सावित्रीबाईंनी कार्ड हातात घेत विचारलं, “हे काय आहे?”

    “राजने माझ्या बाबांसाठी जे केलं त्याबद्दल थँक्सचं कार्ड.”

    “चहा घेणार?”

    “हो, चालेल.”

    सावित्रीबाईंनी नाराजीनेच चहा केला. चहा घेत वरद गप्पा मारत होता. निघताना त्याने सदानंदांच्या हातात एक पाकीट दिलं.

    “हे राजला द्या.”

    “काय आहे?” सदानंदांनी विचारलं.

    “राजसाठी काहीतरी खास…” म्हणत वरद निघून गेला.

    संध्याकाळी राज घरी आला. आईने त्याला ग्रीटिंग कार्ड दिलं.

    “वरद आला होता.”

    “काय म्हणाला?”

    “हे देऊन गेला.”

    राजने ग्रीटिंग उघडलं…

    “राज, माझ्या बाबांसाठी तू जे केलंस त्याबद्दल मनापासून थँक्स. हेच फूल नाही, पण फुलाची पाकळी समज.”

    तेवढ्यात सदानंदांनी वरदने दिलेलं पाकीट राजला दिलं.

    “वरद हेही देऊन गेला.”

    राजने पाकीट घेत विचारलं, “यात काय आहे?”

    “माहीत नाही. आम्ही उघडलं नाही. तुझ्यासाठी काहीतरी खास आहे असं म्हणाला.”

    राजने पाकीट उघडलं. आत एक पत्र होतं –

    राज,

    त्या दिवशी हॉस्पिटलमध्ये तू माझ्या बाबांसाठी जे केलंस, ते मी आयुष्यभर विसरणार नाही. तू चार लाख रुपयांचे कर्ज काढलेस आणि ऑपरेशनचे पैसे भरलेस आणि माझे बाबा शुद्धीवर येईपर्यंत त्यांच्या जवळ बसून राहिलास. खरंतर, ते तुझे बाबा नाहीत हे समजल्यावर तू खूश होऊन निघून जायला हवे होते; पण तू ते कर्ज काढून आणलेले पैसे वापरून माझ्या बाबांचा जीव वाचवला.

    मला एक गोष्ट सर्वात जास्त भावली —

    तुला माझ्याकडून ते पैसे परत मिळावे, अशी अपेक्षाही नव्हती आणि म्हणूनच मी ते पैसे परत करणार नाही. मला आयुष्यभर तुझ्या ऋणात राहायचं आहे!

    हेही वाचा – माणुसकी…

    राजने पुढचं पान बघितलं आणि त्याच्या चेहऱ्यावरचं आश्चर्य हळूहळू वाढत गेलं त्यात लिहिलं होतं –

    मी एका कंपनीचा CEO आहे. तुझ्या झालेल्या त्या भेटीनंतर मी तुझ्याबद्दलची माहिती तुझ्या आईकडून घेतली. तुझं शिक्षण, तुझा अनुभव, तुझी परिस्थिती वगैरे वगैरे.

    माझ्या कंपनीत तुझ्यासाठी एक छान संधी आहे. तुझ्या पात्रतेला आणि अनुभवाला योग्य असा पदभार, चांगला पगार आणि पुढे जाण्याची मुबलक संधी!

    ही ऑफर तू स्वीकारावी, अशी माझी इच्छा आहे. मित्रा, कधी जॉइन करतोस?

    आणि शेवटी…

    मी एक लहानशी भेट पाठवली आहे, प्लीज स्वीकार करा. हा तुझ्या उपकारांचा मोबदला नाही. हा माझ्या बाबांना वाचवणाऱ्या महान माणसाचा लहानसा सन्मान आहे

    — वरद

    राजचे डोळे पाणावले, कारण ऑफर होती –

    3 लाख रुपये पगाराची आणि सोबत धनादेश होता दहा लाख रुपयांचा.

    सावित्रीबाईंच्या चेहऱ्यावरचा राग क्षणात नाहीसा झाला. सदानंद हसत म्हणाले,

    “राज, तू त्या दिवशी चार लाख रुपये देऊन एका अनोळखी माणसाचा जीव वाचवलास. आज त्या माणुसकीनेच तुझ्यासाठी आयुष्याची नवी दारं उघडली.”

    “हो बाबा,” म्हणत त्याने धनादेश आईच्या हातात ठेवला.

    “आई, 4 लाख कर्ज परत करून उरलेले सर्व तुझे; कारण हे सर्व झालं ते तू आणि बाबांनी केलेल्या उत्तम संस्कारांमुळे.”

    सावित्रीबाईंनी राजचा हात घट्ट पकडला. त्यांच्या डोळ्यांत आता चिडचिड नव्हती. मनात होता तो फक्त आपल्या मुलाबद्दल अभिमान आणि वरदबद्दल आदर, कारण वरदने फुलाची पाकळी नाही तर गुच्छच दिला होता राजला.

    Avatar photo
    दिलीप कजगांवकर

    तंत्रज्ञान क्षेत्रातील चार दशकांचा अनुभव आणि साहित्यविश्वातील संवेदनशील लेखन यांचा सुरेख संगम. शिक्षणाने बी.ई., एम.बी.ए. आणि कॉस्ट अकाऊंटंट असलेले दिलीप कजगांवकर हे सर्टिफाइड प्रोजेक्ट मॅनेजर, सर्टिफाइड क्वालिटी मॅनेजर आणि सिक्स सिग्मा ब्लॅक बेल्ट आहेत. इंजिनिअरिंग व इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी क्षेत्रात त्यांना सुमारे 40 वर्षांचा समृद्ध व्यावसायिक अनुभव आहे. ग्रीव्ह्ज, महाराष्ट्र स्कूटर्स, पथेजा ग्रुप, झेन्सार, हेक्सावेअर, कॅपजेमिनी, इन्फ्रासॉफ्ट व टेस्टिंगएक्स्पर्ट यासारख्या नावाजलेल्या कंपन्यांमध्ये त्यांनी विविध जबाबदाऱ्या यशस्वीपणे पार पाडल्या आहेत. लेखन, कथाकथन आणि कवितेची त्यांना विशेष आवड आहे. 2012 साली प्रकाशित झालेला “वाचावेसे” हा त्यांचा काव्यसंग्रह रसिक वाचकांच्या विशेष पसंतीस उतरला. त्यांच्या कथा आणि कविता विविध वृत्तपत्रे आणि मासिकांत नियमितपणे प्रसिद्ध होत असतात. त्यांच्या लेखनात माणूस, नातेसंबंध आणि जीवनातील सूक्ष्म भावविश्व यांचे प्रामाणिक दर्शन घडते. गेली अनेक वर्षे विविध दिवाळी अंकांत त्यांच्या कथा प्रकाशित होत आहेत. तसेच, गेली दोन वर्षे दर मंगळवारी व शुक्रवारी “विश्वास रेडिओ” (नाशिक) तसेच आकाशवाणी पुणे आणि जळगाव येथून त्यांच्या कथा प्रसारित होत आहेत. विविध संस्थांकडून त्यांना “महाराष्ट्र भूषण”, “साहित्य रत्न” यासारख्या मानाच्या पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले आहे. ते विविध कार्यक्रमांत 30 मिनिटांपासून 2 तासांपर्यंत आपल्या कथांचे प्रभावी कथाकथन करून श्रोत्यांना मंत्रमुग्ध करतात. त्यांनी स्वतः कथन केलेल्या तसेच दत्ता सरदेशमुख, सचिन दातार, मुकुंद जोशी, डॉ. सुचिता पाटील, डॉ. जयश्री अय्यंगार, विनया देशपांडे आणि अर्चना कापरे यांसारख्या दिग्गजांनी सादर केलेल्या त्यांच्या अनेक कथा युट्यूबवर उपलब्ध आहेत. आपल्या साहित्यिक प्रवासात दादर येथील जनरल एज्युकेशन इन्स्टिट्यूशनचे माजी संचालक, डोंबिवली स्थित आदरणीय व्ही. एस. वाणी सर यांच्या लाभलेल्या मौल्यवान मार्गदर्शनाचा ते आवर्जून उल्लेख करतात.

    Related Posts

    पुण्यकर्म

    October 6, 2026 ललित

    पितरांना मनापासून नमस्कार, पण…

    October 5, 2026 ललित

    मायेचा ओलावा

    October 5, 2026 ललित
    Leave A Reply Cancel Reply

    Demo
    Stay In Touch
    • Facebook
    • Twitter
    • Instagram
    • YouTube
    Don't Miss
    ललित

    पुण्यकर्म

    By किरण कृष्णा बोरकरOctober 6, 2026

    “अहो, यावर्षी गणपती आणलाच पाहिजे का?” कावेरी काकू डोळ्यांतील अश्रू पुसत म्हणाली. “प्रतीकला जाऊन महिनाही…

    पितरांना मनापासून नमस्कार, पण…

    October 5, 2026

    मायेचा ओलावा

    October 5, 2026

    ‘कुब्जा’… कृष्णप्रेम माझ्यास्तव!

    October 5, 2026

    Subscribe to Updates

    Get the latest creative news from Avaantar

    Latest From Avaantar

    Panchang : आजचे पंचांग, दिनविशेष आणि राशीभविष्य; 07 ऑक्टोबर 2026

    October 7, 2026

    फूल ना फुलाची पाकळी

    October 6, 2026

    पुण्यकर्म

    October 6, 2026

    उंबऱ्यापलीकडचा सातबारा

    October 6, 2026

    दूसरा आदमी… मनाला भुरळ घालणारे कथानक

    October 6, 2026

    सार्थ ज्ञानेश्वरी : बंधु कां न बंधिजे, हें जाणणें मज माझें

    October 6, 2026

    POPULAR CATEGORY

    • Blogs 1
    • अध्यात्म 460
    • अवांतर 216
    • आरोग्य 155
    • पंचांग आणि भविष्य 617
    • फिल्मी 71
    • फूड काॅर्नर 257
    • मैत्रीण 30
    • ललित 975
    • शैक्षणिक 87
    • 98699 75883
    • joshimanoj@avaantar.com
    Facebook X (Twitter) Instagram LinkedIn

    एक पाऊल सांस्कृतिक सर्जनशीलतेकडे...

    आजकाल वाचनसंस्कृतीबद्दल चिंता व्यक्त केली जात आहे. वास्तविक ‘पुस्तक वाचन’ संस्कृतीला धोका निर्माण झाला आहे. वाचनसंस्कृती अबाधित आहे आणि ती अबाधित राहील. कारण, पुस्तकांच्याच जोडीला स्मार्टफोन, ई-बुक, ई-मॅगझिन यासारखी आधुनिक काळाशी सुसंगत माध्यमे उपलब्ध झाली आहेत. याच अत्याधुनिकतेची कास धरत आम्ही हे पाऊल उचलले आहे... अवांतर ही वेबसाइट!

    ‘अवांतर’ हा एक वेब प्लॅटफॉर्म आहे, जो विचार, साहित्य, कला आणि संस्कृतीच्या सर्जनशील प्रवाहाला समर्पित आहे. विविध विषयांवर लेख, कविता, कथा आणि विचार आपल्यापर्यंत पोहोचविण्याचा हा प्रयत्न आहे. दैनंदिन धावपळीच्या जीवनात मिळाणारी काही क्षणांची उसंत सार्थकी लावावी, उत्तम साहित्याद्वारे वाचकांना नवनवीन दृष्टिकोन देणे, विचारांना चालना देणे आणि सर्जनशीलतेला प्रोत्साहन देणे, हा उद्देश आमचा यामागे आहे.

    ‘अवांतर’च्या निमित्ताने विविध लेखक, कवी, विचारवंत आणि कलाकारांना एक हक्काची वेबसाइट उपलब्ध केली आहे. त्यांचे वैविध्यपूर्ण साहित्य, माहिती जगासमोर मांडण्यासाठी एक मुक्त व्यासपीठ असे या वेबसाइटचे स्वरूप आहे. ‘अवांतर’ च्या माध्यमातून आम्ही मराठी भाषेतील समृद्ध साहित्यिक परंपरेला नवी दिशा देत, आधुनिक काळाशी जोडून ठेवण्याचा आमचा प्रयत्न आहे.

    या वेबसाइटला ‘अवांतर’ नाव विचारपूर्वक देण्यात आले आहे. कोणत्याही एका विचाराला किंवा विचारधारेशी बांधिलकी न दाखवता, सर्वांना सामावून घेत, पुढे जाण्याचा एक निखळ उद्देश यामागे आहे. आमच्या या प्रवासात जवळपास 25 ते 30 लेखक, कवी, आरोग्यतज्ज्ञ, शैक्षणिक तज्ज्ञ साथसोबत आहेत. पण आमचा हा प्रवास तुमच्याशिवाय अपूर्ण आहे. सर्जनशीलतेच्या या प्रवासात सर्वच सहभागी होऊया!

    संपादकीय मंडळ

    • मनोज शरद जोशी (संपादक)
    • आराधना जोशी (कार्यकारी संपादक)
    • चिन्मय आचार्य (कायदेविषयक सल्लागार)
    • भालचंद्र गोखले (आर्थिक सल्लागार)
    • गार्गी देवधर (सल्लागार)
    Read More
    • M.A.Y. Multimedia Rg.No.MH-17-0175213 Palghar, Maharashtr

    © 2026 Avaantar.com All Rights Reserved. | Design & Developed By Creative Marketix

    • Terms & Conditions
    • Privacy Policy
    About Us
    About Us

    Your source for the lifestyle news. This demo is crafted specifically to exhibit the use of the theme as a lifestyle site. Visit our main page for more demos.

    We're accepting new partnerships right now.

    Email Us: info@example.com
    Contact: +1-320-0123-451

    Facebook X (Twitter) Pinterest YouTube WhatsApp
    Our Picks

    Panchang : आजचे पंचांग, दिनविशेष आणि राशीभविष्य; 07 ऑक्टोबर 2026

    October 7, 2026

    फूल ना फुलाची पाकळी

    October 6, 2026

    पुण्यकर्म

    October 6, 2026
    Most Popular

    Homeopathy : होमिओपॅथीत महाराष्ट्रही अग्रेसर!

    October 4, 2026

    स्मृतीगंध

    January 26, 2025

    विष्णूरुपी जावई…

    January 26, 2025
    © 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.
    • Home
    • Buy Now

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.