अध्याय चौदावा
सत्त्वं रजस्तम इति गुणाः प्रकृतिसंभवाः । निबध्नन्ति महाबाहो देहे देहिनमव्ययम् ॥5॥
तरी सत्त्वरजतम । तिघांसिही हें नाम । आणि प्रकृति जन्म- । भूमिका ययां ॥138॥ येथ सत्त्व तें उत्तम । रज तें मध्यम । तिहींमाजीं तम । सावियाधारें ॥139॥ हें एकेचि वृत्तीचां ठायीं । त्रिगुणत्व आवडे पाहीं । वयसात्रय देहीं । येकीं जेवीं ॥140॥ कां मीनलेनि कीडें । जंव जंव तूक वाढे । तंव तंव सोनें हीन पडे । पांचिका कसीं ॥141॥ पैं सावधपण जैसें । वाहविलें आळसें । सुषुप्ति बैसे । घणावोनि ॥142॥ तैसी अज्ञानांगीकारें । निगाली वृत्ति विखुरे । ते सत्त्वरजद्वारें । तमही होय ॥143॥ अर्जुना गा जाण । ययां नाम गुण । आतां दाखऊं खूण । बांधिती ते ॥144॥ तरी क्षेत्रज्ञदशे । आत्मा मोटका पैसे । हें देह मी ऐसें । मुहूर्त करी ॥145॥ आजन्ममरणांतीं । देहधर्मीं समस्तीं । ममत्वाची सूती । घे ना जंव ॥146॥ जैसी मीनाचां तोंडीं । पडेना जंव उंडी । तंव गळ आसुडी । जळपारधी ॥147॥
हेही वाचा – सार्थ ज्ञानेश्वरी : पैं उंचानीचा डाहाळिया, विषमा वेगळालिया
अर्थ
सत्व, रज व तम असे हे गुण आहेत व ही प्रकृति यांची जन्मभूमि आहे. हे महाबाहो, हे गुण देहामध्ये अविनाशी जो देही (आत्मा) त्याला बंधन करतात (असे) दिसते. ॥5॥
तरी सत्व, रज, तम ह्या तिघांनाही गुण म्हणतात आणि यांची प्रकृति ही यांची जन्मभूमि आहे. ॥138॥ या तीन गुणांत सत्त्वगुण हा उत्तम आहे, रजोगुण मध्यम आहे व तमोगुण हा सहज कनिष्ठ आहे. ॥139॥ ज्याप्रमाणे एका देहाच्या ठिकाणी वयाच्या तीन अवस्था (बाल्य, तारुण्य व वार्धक्य) भासतात, त्याप्रमाणे एकाच अंत:करणवृत्तीच्या ठिकाणी त्रिगुणत्व भासते, असे समज. ॥140॥ अथवा हिणकस धातु सोन्यात मिसळला असता जसे जसे त्या सोन्याचे वजन वाढत जाते, तसे तसे सोने पाच रुपये तोळा किंमतीपर्यंतच्या कसाचे हलके होते. ॥141॥ आळसामुळे सावधपणा नाहीसा झाल्यावर मग गाढ झोप दृढ होऊन बसते ॥142॥ त्याप्रमाणे अज्ञानाचा अंगीकार करून बाहेर पडलेली वृत्ति ज्या वेळेस फैलावते त्यावेळेस ती सत्त्व, रज होऊन तम देखील होते. ॥143॥ अर्जुना, यांना गुण असे म्हणतात, असे समज. आता हे गुण (आत्म्याला) कसे बांधतात ते वर्म दाखवितो. ॥144॥ तर आत्मा हा जीवदशेत थोडासा प्रवेश करतो न करतो (अज्ञानाचा थोडासा स्वीकार करतो न करतो) तोच हा देह मी आहे, असे म्हणण्यास आरंभ करतो. ॥145॥ जन्मापासून तो मरणापर्यंत सर्व देहधर्माच्या ठिकाणी ममत्वाचा (जन्ममरण वगैरे जे सर्व देहाचे धर्म आहेत ते माझे आहेत असा) अभिमान घेतो न घेतो तोच ॥146॥ ज्याप्रमाणे मशाच्या तोंडात आमिष पडल्यावर लगेच, धीवर गळास हिसका देतो, ॥147॥
क्रमश:
हेही वाचा – सार्थ ज्ञानेश्वरी : बंधु कां न बंधिजे, हें जाणणें मज माझें


