दर्शन कुलकर्णी
- आज, दिनांक : 02 जुलै 2026; वार : गुरुवार
- भारतीय सौर : 11 आषाढ शके 1948; तिथि : द्वितीया 09:37 ; नक्षत्र : उत्तराषाढ 09:26;
- योग : वैधृति 16:38; करण : वणिज 22:31;
- सूर्य : मिथुन; चंद्र : मकर; सूर्योदय : 06:03; सूर्यास्त : 19:19;
- पक्ष : कृष्ण; अयन : दक्षिणायन; संवत्सर : पराभव;
- शालिवाहन शक : 1948; विक्रम संवत : 2082; युगाब्द : 5128
वेद कन्सल्टन्सी / 9987433660
दिनविशेष
गायिका, अभिनेत्री आशालता वाबगावकर
टीम अवांतर
उत्तम गायिका ते अभिनेत्री असा प्रवास झालेल्या आशालता वाबगावकर यांचा जन्म 02 जुलै 1941 रोजी दक्षिण गोव्यातील काणकोण तालुक्यातील पाळोले येथे झाला. मात्र मुंबईतच त्यांचे शालेय आणि महाविद्यालयीन शिक्षण झाले. तेव्हाच्या अकरावी मॅट्रिकनंतर मंत्रालयातील नोकरी सांभाळून त्यांनी कला शाखेतून पदवी आणि पदव्युत्तर शिक्षणही पूर्ण केले. एसएनडीटी महिला विद्यापीठातून त्यांनी ‘मानसशास्त्र’ या विषयात ‘एम.ए.’ केले.
आशालता यांना बालपणापासूनच गायनाची आवड होती. त्यामुळे पं. जितेंद्र अभिषेकी यांच्याकडे त्यांनी गाण्याचे प्राथमिक शिक्षणही घेतले. त्याचवेळी आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावर त्यांनी काही कोकणी गाणीही गायली. अर्थात आधी शिक्षण नंतरच नाटक अशी घरच्यांची इच्छा असल्याने शिक्षण पूर्ण झाल्यावर नोकरी करत असतानाच त्यांना नाटकात काम करायची संधी मिळाली. ‘द गोवा हिंदू असोसिएशन’च्या माध्यमातून आशालता यांचे रंगभूमीवर पदार्पण झाले.
हेही वाचा – आरोग्य… औषधं खाण्याचा आजार!
राज्य नाट्यस्पर्धेसाठी ‘संगीत संशयकल्लोळ’ या नाटकातील ‘रेवती’च्या भूमिकेसाठी त्यांची निवड करण्यात आली. या भूमिकेसाठी त्यांना सर्वोत्कृष्ट अभिनयाचा प्रथम पुरस्कार मिळाला. आशालता वाबगावकर यांच्या आजवरच्या अभिनय कारकिर्दीतील त्यांचे ‘मत्स्यगंधा’ हे नाटक मैलाचा दगड ठरले. वसंत कानेटकर लिखित आणि मा. दत्ताराम दिग्दर्शित या नाटकाचे संगीत पं. जितेंद्र अभिषेकी यांचे होते. नाटकातील ‘सत्यवती’ (मत्स्यगंधा)च्या भूमिकेसाठी आशालता यांची निवड झाली. अठरा वर्षांची अल्लड तरुणी, पराशराकडून फसविली गेलेली आणि सूड घेण्याची प्रतिज्ञा करणारी राजकन्या आणि आयुष्य पूर्णपणे हरलेली राजमाता अशा 18 ते 70 वर्षे वयोगटातील विविध छटा यातून सादर करायच्या होत्या. ते एक आव्हानच होते. या नाटकात त्यांनी गायलेली ‘गर्द सभोवती रान साजणी तू तर चाफेकळी’, ‘अर्थशून्य भासे मज हा कलह जीवनाचा’ ही नाट्यपदे खूप गाजली. ‘मत्स्यगंधा’ नंतर त्यांनी पूर्णवेळ नाटकात अभिनय करायचा असे ठरवून नोकरी सोडली. ‘संगीत शारदा’, ‘संगीत मृच्छकटिक’, ‘रायगडाला जेव्हा जाग येते’, ‘गुंतता हृदय हे’, ‘तुझे आहे तुजपाशी’, ‘छिन्न’, ‘महानंदा’, ‘गारंबीचा बापू’, ‘गुडबाय डॉक्टर’, ‘स्वामी’, ‘तरुण तुर्क म्हातारे अर्क’, ‘हे बंध रेशमाचे’, ‘विदूषक’, ‘ही गोष्ट जन्मांतरीची’, ‘देखणी बायको दुसर्याची’ अशा कितीतरी गाजलेल्या नाटकांतील त्यांच्या भूमिका नाट्यरसिकांना भावल्या.
पु. ल. देशपांडे यांनी दूरदर्शनसाठी केलेल्या ‘वार्यावरची वरात’मध्येही त्यांनी महत्त्वाची भूमिका साकारली. याशिवाय ‘सावित्री’, ‘उंबरठा’, ‘पुढचं पाऊल’, ‘माहेरची साडी’, ‘नवरी मिळे नवर्याला’, ‘एकापेक्षा एक’, ‘आत्मविश्वास’, ‘गुपचूप गुपचूप’ आणि अन्य अशा अनेक मराठी चित्रपटांतही त्यांनी काम केले.
प्रसिद्ध हिंदी चित्रपट दिग्दर्शक बासू चॅटर्जी यांचा ‘अपने पराये’ हा आशालता यांचा पहिला हिंदी चित्रपट. आशालता यांचे मुंबई दूरदर्शनवरील एका कोकणी नाटकातील काम व ‘गुंतता हृदय हे’ नाटक बासू चॅटर्जीं यांच्या पाहण्यात आले होते. या कामाची दखल घेत त्यांनी ‘अपने पराये’साठी आशालता यांची निवड केली. या चित्रपटातील आशालता यांनी साकारलेली भूमिका ‘फिल्मफेअर’ पारितोषिकासाठी निवडली गेली. ‘अपने पराये’ नंतर आशालता यांची हिंदीतही यशस्वी कारकिर्द सुरू झाली.
‘अंकुश’, ‘अग्निसाक्षी’, ‘नमक हलाल’, ‘शराबी’, ‘कुली’, ‘निकाह’, ‘सदमा’, ‘चलते चलते’, ‘जंजीर’, ‘आज की आवाज’, ‘वो सात दिन’, ‘पसंद अपनी अपनी’, ‘मंगल पांडे’, ‘ये तो कमाल हो गया’, ‘तेरी माँग सितारों से भर दू’, ‘मरते दम तक’, ‘घायल’ ‘शौकिन’ आदी सुमारे 200 हून अधिक हिंदी चित्रपटांत त्यांनी काम केले. ‘अंकुश’ चित्रपटात त्यांच्यावर चित्रित झालेले आणि पुष्पा पागधरे यांनी गायलेले ‘इतनी शक्ती हमे दे ना दाता’ हे गाणेही लोकप्रिय आहे.
मराठी, हिंदी व्यतिरिक्त तीन कोकणी आणि एका इंग्रजी चित्रपटातही त्यांनी काम केले आहे. मुंबई दूरदर्शनवरील ‘महाश्वेता’, ‘पाषाणपती’ तसेच ‘जावई विकत घेणे’, ‘कुलवधू’ या मालिकाही प्रेक्षक पसंतीस उतरल्या.
आशालता यांनी कल्याणजी-आनंदजी यांच्या वाद्यवृंदातून मुख्य गायिका म्हणून मुकेश, हेमंतकुमार आदींबरोबर काही काळ गाणीही गायिली. अभिनेत्री सुधा करमकर यांच्या ‘लिटिल थिएटर’च्या ‘गणपती बाप्पा मोरया’ या बाल नाट्यातील त्यांनी गायलेली ‘तू सुखकर्ता तू दु:खहर्ता, विघ्नविनाशक मोरया, संकटी रक्षी शरण तुला मी, गणपती बाप्पा मोरया’ ही आरती आजही लोकप्रिय आहे. याशिवाय गर्द सभोवती हे पुस्तकही त्यांच्या नावावर आहे. यात त्यांना आलेल्या विविध प्रकारच्या 67 अनुभवांचा समावेश आहे. ‘आई माझी काळूबाई’ या मालिकेच्या चित्रीकरण दरम्यान त्यांना कोरोनाची लागण झाल्याने 22 सप्टेंबर 2020 रोजी त्यांचे निधन झाले.
आजचे राशिभविष्य
मेष – आजचा दिवस संमिश्र स्वरूपाचा असेल. काही रखडलेल्या कामांना गती मिळू शकते. व्यवसायाची परिस्थिती चांगली राहील. कोणतीही गुंतवणूक करणे किंवा आर्थिक जोखीम घेणे टाळा. खर्च नियंत्रणात ठेवा. आज शारीरिक आणि मानसिकदृष्ट्या तुम्ही तंदुरुस्त असाल.
वृषभ – आजचा दिवस खूप आनंदी आणि सकारात्मक असेल. बऱ्याच दिवसांनी मनःशांती मिळेल. आर्थिक बाबींसाठी आजचा दिवस चांगला आहे. कुटुंबीयांसोबतचे संबंध अधिक दृढ होतील. जमीन, इमारत किंवा वाहन खरेदीच्या दृष्टीने हालचाली सुरू कराल.
मिथुन – स्वतःच्या प्राधान्यक्रमांवर लक्ष केंद्रित करणे आज आवश्यक आहे. विचार न करता कोणत्याही गोष्टीची घाई करू नका, कारण यामुळे नुकसानच पदरी पडेल. आर्थिक बाबतीत सावधगिरी बाळगणे आवश्यक आहे. गरज पडल्यास तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्या. स्वतःच्या आरोग्याची काळजी घ्या.
कर्क – मानसिकदृष्ट्या कणखर असाल. तुमची ऊर्जाशक्ती वाढेल. तुम्हाला तुमच्या कामात यश मिळेल. नोकरीत किंवा व्यवसायात प्रगतीचे नवीन मार्ग खुले होतील. भावनेच्या आहारी जाऊन कोणताही निर्णय घेऊ नका. तुम्ही तुमच्या जोडीदारासोबत चांगला वेळ घालवाल.
सिंह – आजचा दिवस तुमच्यासाठी आव्हानात्मक असू शकतो. त्यामुळे अत्यंत सावध राहावे लागेल. कार्यालयात कामाचा ताण जाणवेल. स्वतःच्या बोलण्यावर आणि रागावर पूर्ण नियंत्रण ठेवा. अनपेक्षित खर्चामुळे आर्थिक नियोजन बिघडू शकते.
कन्या – तुमच्या मेहनतीचे आज फळ मिळेल. यामुळे तुमचा आत्मविश्वास वाढेल. कामाच्या ठिकाणी नवीन जबाबदाऱ्या मिळू शकतात, ज्या तुम्ही उत्तमरीत्या पार पाडाल. यासाठी तुमच्या सहकाऱ्यांकडून पूर्ण पाठिंबा मिळेल. आज आरोग्य चांगले राहील. आर्थिक परिस्थितीत सुधारणा होण्याची चिन्हे आहेत.
तुळ – दिवस उत्साहाने आणि नव्या आशेने भरलेला असेल. तुम्हाला जे काही साध्य करायचे आहे, त्यात तुम्हाला हमखास यश मिळेल. आज आर्थिक परिस्थिती सुधारेल. उत्पन्नाचे नवीन स्रोत निर्माण होतील. कुटुंबातील सदस्य आणि मित्रांसोबत चांगला वेळ घालवाल.
वृश्चिक – जुन्या मानसिक चिंता किंवा त्रासांपासून आज मोठा दिलासा मिळू शकतो. आर्थिक परिस्थिती हळूहळू सुधारेल. तुम्हाला तुमच्या प्रियजनांकडून आधार मिळेल. जोडीदारासोबत चांगला वेळ घालवाल. घाईचे निर्णय घेणे टाळा. कामाच्या ठिकाणी नवीन जबाबदाऱ्या मिळू शकतात.
हेही वाचा – …अन् प्रदीपला सर्वांची किंमत समजली!
धनु – आजचा दिवस चांगला असेल. कामाच्या ठिकाणी नवीन जबाबदाऱ्या मिळू शकतात. कामाचा व्याप जास्त असेल. चैनीच्या वस्तूंवर किंवा घरगुती सामानावर जरा जास्तच पैसे खर्च होऊ शकतात. स्वतःसाठी थोडा वेळ काढा आणि आराम करा.
मकर – आजचा दिवस तुमच्यासाठी आर्थिकदृष्ट्या चांगला असेल. व्यावसायिक आणि वैयक्तिक जीवनात संतुलन साधण्यात आज यशस्वी व्हाल. पैशाच्या बाबतीत कोणावरही आंधळा विश्वास ठेवू नका. समाजात तुमच्याबद्दलचा आदर वाढेल. मानसिक शांतीसाठी, दिवसाची सुरुवात योगाभ्यासाने करा.
कुंभ – आजचा दिवस तुमच्यासाठी भाग्यशाली ठरणार आहे. नशीबाची मोठी साथ मिळेल. गुंतवणुकीसाठी काळ अनुकूल असून, तुम्हाला त्याचा पूर्ण लाभ मिळेल. कौटुंबिक समस्या संपुष्टात येतील, यामुळे तुम्हाला मानसिक दिलासा मिळेल.
मीन – आज करिअरमध्ये अपेक्षित यश मिळू शकते. न्यायालयीन कामात विजय मिळण्याची शक्यता आहे. व्यावसायिकदृष्ट्या आजचा दिवस उत्तम आहे. प्रलंबित कामे पूर्ण होतील. गुंतवणुकीसाठी आजचा दिवस चांगला आहे. स्वतःच्या आरोग्याकडे लक्ष द्या.


