उत्तरार्ध
राजूशेठच्या कपड्यांच्या दुकानात सफाईचे काम प्रदीप करत होता. पंधरा-सोळा वर्षांचा गोरागोमटा स्मार्ट मुलगा होता तो. त्यामुळे तो जेव्हा काम मागायला आला, तेव्हा तो दुकानाच्या सफाईकामासाठी योग्य आहे, असं राजूशेठ वाटेना. तरीही, तीन दिवसांपासून सफाईसाठी माणूस नव्हता. त्यामुळे दारी आलेल्या माणसाला परत पाठवणे, त्यांना योग्य वाटत नव्हतं, म्हणून त्याला दुकानात कामाला ठेवला.
सुरुवातीला त्याला काम व्यवस्थित जमत नव्हते. पण हळूहळू तो शिकला. सफाईच्या कामाबरोबर तो इतरांनाही मदत करायचा. त्याच्या या मदतीमुळे सेल्समन त्याच्यावर खूश होते. महिना झाल्यावर राजूशेठने प्रदीपच्या हातात तीन हजार ठेवले, तेव्हा प्रदीपचे डोळे भरून आल्याचं त्यांना जाणवलं.
“काय रे काय झालं?”
“काही नाही. पहिला पगार आहे ना म्हणून…”
त्याने डोळे पुसले. शेठजींना आठवलं या महिन्यात प्रदीपने एकही दिवस खाडा केला नव्हता. उलट, सीझनमुळे कधी रविवारीही दुकान सुरू असायचं तेव्हा तो स्वतःहून दुकानात येऊन काम करायचा. त्याच्या कामावर खूश होऊन राजूशेठने त्याचा पगार चार हजार करायचं ठरवलं. पण एकेदिवशी त्याने राजूशेठला आता आपण दुकानात काम करू शकत नसल्याचे सांगितले. त्याने बारावीच्या क्लासचे कारण दिले. ते ऐकून शेठजींना धक्का बसला. मग प्रदीपने दुसरा माणूस मिळेपर्यंत बिनपगारी काम करायची तयारी दर्शवली.
शेठजींना आश्चर्य वाटलं. एक एक दिवसाच्या पगारासाठी भांडणारी, खाड्याचे पैसे कापले म्हणून वाद घालणारी माणसं त्यांनी बघितली होती. या पोराने तर सहजगत्या त्यावर पाणी सोडलं होतं. तरुण पोरांना अशीही पैशांची किंमत असते कुठे?
नशिबाने शेठजींना दुसरा माणूस लगेच मिळाला. पण तो चार हजार पगारावर अडून बसला. शेवटी राजूशेठना त्याचं ऐकावं लागलं. येत्या सोमवारपासून तो कामावर येणार होता.
सोमवार उजाडला. शेठजी दुकानात आले. अजून ग्राहकांची वर्दळ सुरू व्हायची होती. प्रदीपला आलेला पाहून त्यांना आश्चर्य वाटलं… “काय रे विचार बदलला की काय तुझा?”
हेही वाचा – प्रदीप नक्की कोण होता?
प्रदीप हसून म्हणाला, “नाही शेठजी. या नवीन दादांना काम समजावून सांगायला आणि सगळ्यांना शेवटचं भेटून घ्यायला आलोय.”
“बरं बरं…”
प्रदीप आणि तो नवीन माणूस आत गेला. शेठजी खुर्चीवर बसत नाहीत, तोच एक आलिशान कार दुकानासमोर उभी राहिली. आजची सकाळ एका दांडग्या ग्राहकाने सुरू होणार याचा शेठजींना आनंद झाला.
“बोला साहेब…” ती व्यक्ती आत आल्यावर शेठजी म्हणाले
“प्रदीपला घ्यायला आलोय…”
शेठजींनी एकदा कारकडे पाहिलं… एका मामुली सफाईकामगाराला घेण्यासाठी हा रुबाबदार माणूस एवढी आलिशान कार घेऊन यावा. या माणसाकडे तर प्रदीप कामाला लागला नाही?
“प्रदीप तुमच्याकडे कामाला लागला की काय?” त्यांनी साशंक मनाने विचारलं.
“नाही नाही. प्रदीप मुलगा आहे माझा!”
“काय्यsss प्रदीप तुमचा मुलगा आहे?”
तेवढ्यात प्रदीप बाहेर आला. आल्या आल्या त्याने वेगाने धावत जाऊन त्या माणसाला मिठी मारली.
“पप्पाsss”
त्या माणसाने त्याला मिठीत घेतलं आणि तो ढसाढसा रडू लागला. सगळे सेल्समन, नोकर जमा झाले. प्रदीपही रडत होता. हे काय गौडबंगाल आहे, हे कुणाला कळेना. थोड्या वेळाने प्रदीप जरा बाजूला झाला तसा तो माणूस म्हणाला,
“शेठजी मी ओंकारनाथ. माझी धुळ्यात चटईची फॅक्टरी आहे. दोन इंडस्ट्रिअल वर्कशॉप आहेत. अगोदर मीही एक कामगार होतो. मेहनतीने आणि देवकृपेने फॅक्टरीचा मालक झालो. मी गरीबी पाहिली आहे. कित्येक दिवस उपाशी राहून आयुष्य काढलं आहे. पण आमची मुलं तोंडात चांदीचा चमचा घेऊन जन्माला आलीत. त्यांना पैशाची, श्रमाची कसली आलीये किंमत? हा माझा अति लाडावलेला मुलगा माझ्या फॅक्टरीत यायचा. तिथल्या कामगारांवर रुबाब करायचा. लहानमोठं बघायचा नाही… वाटेल ते बोलायचा. माझ्या कानावर आलं होतं, पण एकुलत्या एक मुलावरच्या प्रेमापोटी मी चूप बसायचो. एक दिवस त्याने मर्यादा सोडली. वॉशरूम नीट साफ केलं नाही म्हणून आमच्या सफाई कामगाराला सगळ्या कामगारांसमोर शिव्या दिल्या. साठी उलटलेला तो माणूस. त्याच्या मनाला ते लागलं. तो माझ्याकडे रडत आला आणि “माझा हिशोब करून टाका… मला आता इथे रहायचं नाही.” असं म्हणू लागला. माझं डोकं सरकलं. मी याला बोलावलं, म्हाताऱ्याची माफी मागायला लावली तर, हा आपल्या मस्तीत. सरळ माफी मागणार नाही म्हणाला. मी उठून त्याच्या मुस्काटात मारली आणि त्याला म्हणालो की, “तुझ्यात एवढी मग्रुरी आहे ना तर, तू मला महिनाभर सफाईचं काम करूनच दाखव.” त्याने माझं चॅलेंज स्वीकारलं, पण आपल्याच फॅक्टरीत सफाई करण्याची त्याला लाज वाटत होती. मला म्हणाला, “मी जळगावला जातो आणि तिथे काम पहातो.” मीही संतापात होतो म्हणालो, “तू कुठेही जा. पण हेच काम करायचं आणि महिन्याने मला सांगायचं कसं वाटतं ते आणि हो, तुझं खाणं, पिणं, राहणं सगळं तू तुझं बघायचं. मी त्यासाठी एक पैसाही तुला देणार नाही…”
त्याच्या एका गरीब शाळकरी मित्राचा मित्र जळगावच्या समता नगरात रहातो. त्याच्याकडे तो आला. तुमच्या दुकानात कामाला लागला. मला फोन करून त्याने हे सांगितलं. मला वाईट वाटलं, शेवटी बापाचं मन ते. पण म्हटलं उतरू द्या याची मस्ती… अशीही त्याला सुटीच होती. रिकाम्या टवाळक्या करण्यापेक्षा आयुष्य किती खडतर आहे, हे तरी शिकेल. म्हणून मी काहीही चौकशी केली नाही. मागच्या आठवड्यात त्याचा फोन आला खूप रडला. म्हणाला, “मी आता खूप सुधारलो आहे. मी आठवड्याने परत येतो घरी.” मी म्हटलं, “मीच येतो. बघतो तुझं दुकान आणि तू कायकाय काम करत होता ते!” म्हणून आज मी ते बघायला आणि त्याला घ्यायला आलोय.”
राजूशेठ ते ऐकून अवाक झाले… म्हणाले, “तरीच मला वाटत होतं की, हा मुलगा सफाईच्या कामाला योग्य नाहीये. पण हा काम तर छान करत होता.”
प्रदीप हसला… “नाही शेठजी. मला सुरुवातीला काम जमत नव्हतं, पण या सगळ्या काकांनी मला खूप मदत केली. मी डबा आणत नव्हतो, कारण मित्राची आई खरंच आजारी आहे… पण महिनाभर यांनी त्यांच्या घासातला घास मला भरवला. माझ्याकडून खूप चुका व्हायच्या, पण ते माझ्यावर कधी रागावले नाहीत… मला त्यांनी सांभाळून घेतलं.”
प्रदीप परत रडायला लागला, तसं भास्करने त्याला जवळ घेतलं.
“अरे बेटा, आपण सगळेच पोटापाण्यासाठी नोकरी करतो ना? मग आपण एकमेकांना सांभाळून घ्यायला नको?”
“हो काका, पण मला हे समजत नव्हतं. आता ते कळायला लागलं. पप्पा तुम्ही मला म्हणत होते ना की, मला पैशाची, श्रमांची किंमत नाही म्हणून. मला इथं आल्यावर मेहनतीची, पैशांची, माणसांची, अन्नाची सगळ्यांची किंमत कळायला लागली. पप्पा शेठजींचंच पाहा ना! त्यांची तीन मोठी दुकानं आहेत जळगावात. पण त्यांना कसलाही गर्व नाही. ते कुणाशीच कधीही वाईट वागले नाहीत. त्यांच्या घरी काहीही कार्यक्रम झाला की, ते दुकानात सगळ्यांना मिठाई वाटायचे…”
“बेटा हेच मला हवं होतं. तुला ते कळलं यातच मला समाधान वाटतंय…”
“चला साहेब, तुम्हाला दुकान दाखवतो,” राजूशेठ प्रदीपच्या वडिलांना म्हणाले, “आणि भास्कर जरा सगळ्यांसाठी मिठाई घेऊन यायला सांग. आज एक बिघडलेला मुलगा माणसात आला याचा मलाही खूप आनंद होतोय!”
हेही वाचा – एप्रिल फूल… कोणी कोणाला केले?
“शेठजी एक विनंती आहे,” भास्कर म्हणाला.
“हं बोल….”
“आमच्या सगळ्या सेल्समनकडून प्रदीपला पँट-शर्टचं कापड द्यायचं म्हणतोय. त्याचे पैसे आमच्या पगारातून कापून घ्या.”
“अरे वा! चालेल. मग अजून एक काम कर, प्रदीपला त्याच्या आवडीचा एक टी-शर्ट काढून दे, माझ्याकडून गिफ्ट!”
ते भव्य दुकान पाहून प्रदीपच्या वडिलांना मुलाच्या मेहनतीची कल्पना आली. मिठाई खाऊन झाल्यावर ते म्हणाले, “चला मंडळी, आता निघायची वेळ आली. तुम्ही सर्वांनी माझ्या या नाठाळ मुलाला सांभाळून घेतलंत, त्याबद्दल तुमचे मनापासून आभार आणि हो, पुढच्या महिन्यात प्रदीपचा वाढदिवस आहे. तुम्ही सगळ्यांनी धुळ्याला पार्टीला जरूर यायचं आहे. गाडी करूनच या सगळे. खर्चाची काळजी करू नका, गाडीचा खर्च मी करेन.”
प्रदीप उठला. सगळ्या सेल्समन आणि नोकरांच्या पाया पडला. सगळ्यांनी मिळून त्याला पँटशर्टचं कापड दिलं. मग शेठजींच्या पाया पडायला आला, तसं शेठजी त्याला जवळ घेऊन आणि त्याच्या हातात टी-शर्ट देऊन म्हणाले, “बेटा, तुझ्या वडिलांनी आणि तूही नव्या पिढीसाठी एक आदर्श घालून दिलाय. भावी आयुष्यासाठी तुला खूप खूप शुभेच्छा!”
प्रदीप आणि त्याचे वडील गाडीत जाऊन बसले, तसे सर्व सेल्समन उदास मनाने त्यांना निरोप द्यायला बाहेर आले. गाडी निघाली… निरोपाचे हात हलले.
प्रत्येकजण आत येऊन आपापल्या कामाला लागला. शेठजींना काऊंटर बसल्यावर आपल्या अशाच बिघडलेल्या मुलाची आठवण झाली. सध्या तो पुण्यात इंजिनीअरिंग करत होता. तो करत असलेले रंगढंग, त्याला लागलेली व्यसनं त्यांच्या कानावर आली होती. त्याला सुधारण्यासाठी प्रदीपसारखं काही करता येईल का, या विचारात ते गढून गेले.


