हल्ली नियमित थकवा, सांधेदुखी, अशक्तपणा ही तक्रार घेऊन येणाऱ्या पेशंट्समध्ये पोस्टकोविड एलिमेंट तर आहेच, याउपर या कालावधीत चणेफुटाण्यासारखं औषधं खाण्याच्या सवयीचा वाटाही तितकाच मोठा आहे. ब्लड टेस्ट केली असता अनेकात फॉस्फेटची पातळी खूप कमी असल्याची दिसते, कॅल्शियम आणि मॅग्नेशियमचं बॅलन्स बिघडलेलं आढळतं आणि हाडांची डेन्सिटी टेस्ट अर्थात डेक्झा स्कॅन या तपासणीत हाडांची प्रचंड झीज झालेली आढळते…
पेशंट्सना प्रचंड आश्चर्य वाटतं, “हे कसं काय झालं? मी तर सगळं खातो, मला तर कुठला आजारही नाही… ब्ला… ब्ला…”
त्यांना समजावून सांगावं लागतं, “काकाजी, तुम्हाला औषधं खाण्याचा आजार आहे, त्याचं काय?”
“छ्याऽऽ कधी? अधूनमधून डोलो घेतो आणि आठवड्यातून दोनेकदा आणि विशेषत: ड्रिंक्स वगैरे झालं की, एखादं ॲन्टासिड घेतो त्यात काय?”
या मंडळींना जे सांगतो तेच तुम्हालाही सांगतो, “सामान्यत: ॲन्टासिड्समध्ये अॅल्युमिनियम किंवा कॅल्शियम-मॅग्नेशियमचे कंपाऊंड्स असतात… ते जास्त आणि सतत घेतल्यानं शरीरात फॉस्फेट शोषलं जात नाही. फॉस्फेट हाडांसाठी आणि स्नायूंसाठी अतिशय महत्त्वाचं असतं आणि त्याची कमतरता झाली की, हाडं कमकुवत होतात. थोड्या एक्झर्शननंही दुखतात, कधी कधी फ्रॅक्चर होण्याचीही शक्यता वाढते.
ॲसिडिटी एकच एक नसते! मळमळणं वेगळं, करपट ढेकर येणं वेगळं, आंबट पाणी येणं वेगळं आणि जळजळणं वेगळं… तद्वतच अॅन्टासिड्सचेही प्रकार असतात! थेट तोंडातच विरघळणारे, पोटात जाऊन हळूहळू रिलिज होणारे, फेस निर्माण करणारी औषधं वेळकाळ निदानानुरूप द्यावी लागतात.
हेही वाचा – बीपी आणि शुगरच्या गोळ्या सुरू आहेत…
कधी गोळी द्यावी लागते तर, कधी कॅप्स्यूल, कधी पातळ औषध द्यावं लागतं तर कधी पावडर… पण पेशंट अनेकदा डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय सरसकट आणि वर्षानुवर्षे आपल्याच मर्जीनं काहीबाही घेत रहातात म्हणून हे होतं. काही जण तर किराणासोबत डायजिन, इनो, जेल्युलिसचा स्टॅाक आणून ठेवतात. “साधं ॲन्टासिडच तर आहे, काहीच होणार नाही. आराम तर मिळतो ना!” असा अनेकांचा दावा असतो.
हेही वाचा – फक्त साखर बंद करून उपयोग होतो का?
बाबाहो, आराम तर मिळतो, पण तो तात्पुरता असतो. आम्लपित्ताच्या मूळ कारणांचा शोध घेऊन – जसं की, आहार बदल, वजन कमी करणं, स्ट्रेस मॅनेजमेंट किंवा गरज पडली तर PPI सारख्या योग्य औषधांचा डॉक्टरांच्या मार्गदर्शनात वापर असा – दीर्घकाळाचा उपचार करायला हवा.”
मधल्या काळात मी अनेकांना फॉस्फेट आणि कॅल्शियमचे सप्लिमेंट्स दिले. ॲन्टासिड पूर्णपणे बंद केले आणि आहारात काही बदल सुचवले. काही महिन्यांतच त्यांची अंगदुखी बंद झाली! सतत जाणवणारा थकवाही कमी झाला.
आता लागलीच “कॅल्शियम-फॅास्फेट घेऊ का?” हे विचारू नका किंवा घेऊही नका फक्त भारंभार! यथोचित कारणमीमांसा न करता कुठलंही औषध घेत असाल तर आधी ते बंद करा!


