आज तो इथून जाणार याचा आनंद व्यक्त करायचा की उद्यापासून तो नसणार याचं दुःख व्यक्त करायचं? खरंच कठीण आहे उत्तर देणं! आम्हा सगळ्या डॉक्टर्स, नर्सेस आणि आमच्या इतर सहकाऱ्यांना… कोरोना महामारीच्या काळात आमच्या हॉस्पिटलमध्ये तो महिन्याभरापूर्वी दाखल झाला होता जनरल वॉर्डात. मला आठवतंय आमच्यातील पहिले संभाषण…
“आईच्या गावात इतका देखणा डॉक्टर? डॉक्टर तुम्ही चुकीच्या क्षेत्रात आला आहात. चित्रपटसृष्टीत असायला पाहिजे होता तुम्ही…” त्याचं बोलणं ऐकून खरंच कित्येक दिवसांनी मी हसल्याची जाणीव मला झाली होती. मी हसूनच त्याला म्हणालो की, “मी तिथे असतो तर तुझी माझी भेट कशी झाली असती. देवाची काहीतरी योजना नक्कीच आहे यात.”
त्याला तपासून मी पुढे निघालो, पण माझ्या विचारात तो रेंगाळत होता. त्यानंतर पुढचे काही दिवस त्याचा वॉर्ड म्हणजे हसणं खिदळणं, गाणी, नाच यासारख्या गोष्टींनी सजलेला असायचा. त्याचा आजार बिलकुल गंभीर नव्हता. सकाळी उठल्यावर इतर रुग्णांकडून तो प्रार्थना म्हणून घ्यायचा. त्याचा आवाज खरोखरच सुंदर होता. हळूहळू सकाळच्या ड्युटीवर आलेल्या नर्सेस सुद्धा त्या प्रार्थनेत सामील व्हायच्या. प्रत्येक रुग्णाला त्याच्या आजाराचा विसर पडायला लावायचा हा पठ्ठ्या! गाणी म्हणायचा, नकला करायचा, सिनेमाचे किस्से सांगायचा, भारतात जिथे जिथे भ्रमंती केली, त्या त्या स्थळाची माहिती इतकी रंगवून सांगायचा की, ऐकणाऱ्याच्या डोळ्यांसमोर ती जागा उभी रहायची. बसल्या जागेवरून त्याने अष्टविनायकाचे दर्शन घडवून कित्येक वरिष्ठ नागरिकांच्या डोळ्यांत आनंदाश्रू आणले होते.
या माणसाचे मला खरंच कौतुक वाटायचं. मी कधी राऊंडला येतो त्याची वाट बघत बसायचा. एक दिवस अचानक मला प्रश्न विचारला, “माझ्या उतावळ्या स्वभावाचा तुम्हाला त्रास होत नाही ना डॉक्टर साहेब?”
“छे रे… उलट तू आमचं अर्ध काम करून टाकतोस!” मी त्याची समजूत काढायचो. त्याची तब्येत छानपैकी सुधारत होती.
हेही वाचा – शेअर बाजार अन् सामंत काका
“डॉक्टर, मी आज ना उद्या इथून जाणार आहे. मग जायच्या आधी सगळ्यांना आनंदात बघायचं आहे मला. हा आजार सगळ्यांसाठी नवीन आहे. काही कळायच्या आतच आजार आपल्या शरीरात प्रवेश करतो आणि मग नाईलाजाने आम्हाला इथे यावे लागते. आजारापेक्षा याची भीती जास्त निर्माण झाली आहे अवतीभवती. मला जेवढं जमेल तेवढं हे भयावह वातावरण प्रत्येकाच्या मनातून घालवायचं आहे कायमचं आणि सकारात्मकता रूजवायची आहे! जेवढा प्रत्येकजण मनातून खंबीर होईल, तेवढं लवकर त्यांना इथून जायला मिळणार आहे घरी… तुम्ही सगळे दिवसरात्र तहानभूक विसरून ज्या पद्धतीने आमची सेवा करता, ते बघून डोळे भरून येतात माझे. देवाला सुद्धा आम्ही रोज रात्री सर्वजण प्रार्थना करतो, या रोगाला कायमचे पिटाळून लावण्यासाठी. मला खात्री आहे देव आमची प्रार्थना नक्की ऐकेल.”
तो आल्यापासून आमच्या हॉस्पिटलचा चेहरामोहरा पार बदलून गेला आहे. दुःख, वेदना, नैराश्य, कटकटी, भकास चेहरे सगळं सगळं, काही दिवसांसाठी का होईना, पण नाहीसं झालं होतं. एव्हाना गंभीर रूग्णांच्या कानांवर या माणसाच्या करामती पोहोचल्या होत्या. सगळ्यांच्या आग्रहाखातर याच्या गाण्याचा, नकलांचा व्हिडीओ त्या वॉर्डात आम्ही थोडावेळ लावायला लागलो. सकाळची प्रार्थना स्पिकर्सच्या मदतीने सर्वांना ऐकवायला लागलो. या सगळ्या नाविन्यपूर्ण उपक्रमाचा सकारात्मक परिणाम दिसायला लागला.
पण काल रात्री सिस्टरच्या बोलण्याने मला खरंच धक्का बसला आणि माझे डोळे पाणावले…
“सर, आपल्या सर्वांचा लाडका रुग्ण ठणठणीत बरा झाला आहे. त्याचे सगळे रिपोर्ट नॉर्मल आले आहेत. उद्या त्याला डिस्चार्ज द्यायचा आहे.”
आज माझ्या चालण्यातला निरुत्साह मला जाणवत होता. इच्छा नसतानाही त्याच्या बेडजवळ मी पोहोचलो. बघतो तर काय स्वारी माझ्या स्वागतासाठी सज्ज होती. मला बघताच तो म्हणाला,
“मला वाटलंच होतं, तुम्ही दुःखी चेहरा करून येणार. कम ऑन डॉक्टर तुम्ही इथले देवदूत आहात. तुमच्या डोळ्यांत आम्हाला बरं करण्याची खात्री दिसली पाहिजे. या अश्रूंना तिथे बिलकुल जागा नाही. तुमच्या भरवशावर तर आम्ही सगळे तग धरून असतो. कृष्णाने मेरू पर्वत करंगळीवर उचलून गावकऱ्यांची पावसापासून सुटका केली होती. फरक एवढाच आहे की, इथे करंगळीच्या जागी तुमच्या हातातील स्टेथस्कोप आहे, इंजेक्शनची सिरिंज आहे… बाकी परिस्थिती तीच आहे. तुमच्या विश्वासाच्या, आधाराच्या आणि वैद्यकीय ज्ञानाच्या मेरूपर्वताखाली इथले सगळे रुग्ण सुखरूप आहेत. आज मी जाईन. उद्या माझ्यासारखा दुसरा कोणीतरी येईल. तुम्ही काळजी करू नका…”
हेही वाचा – बेसनाचे लाडू… माँची आठवण
माझ्याबरोबरच त्याने प्रत्येक रुग्णाच्या जवळ जाऊन त्यांचा निरोप घेतला आणि लवकरात लवकर बरं होऊन घरी जाण्यासाठी शुभेच्छा दिल्या. सकाळची आणि रात्रीची प्रार्थना म्हणण्याचे वचन घेतले.
खाली रुग्णवाहिका आल्याचा निरोप आला आणि आमच्या सर्वांचा निरोप घेऊन तो मदतनीसांसोबत रुग्णालयाच्या पायऱ्या उतरायला लागला… त्याची हळूहळू बारीक होणारी छबी बघून ‘बावर्ची’ चित्रपटातील मला राजेश खन्नाने वठवलेल्या भूमिकेची आठवण झाली. त्या चित्रपटातील प्रत्येक पात्राला आपलंस करून योग्य मार्गाला लावून तो दुसऱ्या घरी ‘बावर्ची’ म्हणून काम करण्यासाठी निघून जातो… तसाच काहीसा हा रुग्ण ‘बावर्ची’ ठरला होता. इतर सहकारी रुग्णांना सकारात्मकता आणि आनंदाने जगण्याची इच्छाशक्ती देऊन तो निघाला होता.
टीप : कोविड काळात माझ्या एका कोरोनाग्रस्त मित्राला हॉस्पिटलमध्ये भेटलेला एक अवलिया रुग्ण या कथेचा खरा नायक आहे. बाकी सगळा कल्पनाविस्तार आहे.


