दर्शन कुलकर्णी
- आज, दिनांक : 28 जून 2026; वार : रविवार
- भारतीय सौर : 07 आषाढ शके 1948; तिथि : चतुर्दशी 27:06 ; नक्षत्र : ज्येष्ठा 25:08;
- योग : शुभ 13:28; करण : गरज 13:54;
- सूर्य : मिथुन; चंद्र : वृश्चिक 25:08; सूर्योदय : 06:02; सूर्यास्त : 19:19;
- पक्ष : शुक्ल; अयन : दक्षिणायन; संवत्सर : पराभव;
- शालिवाहन शक : 1948; विक्रम संवत : 2082; युगाब्द : 5128
पौर्णिमा प्रारंभ उत्तर रात्री 03:06
वेद कन्सल्टन्सी / 9987433660
दिनविशेष
लेखक, संशोधक, समीक्षक, आंबेडकरवादी विचारवंत डॉ. गंगाधर पानतावणे
टीम अवांतर
लेखक, संशोधक, समीक्षक, आंबेडकरवादी विचारवंत डॉ. गंगाधर पानतावणे यांचा जन्म 28 जून 1937 रोजी नागपूर मधील पाचपावली वस्तीत झाला. पानतावणे यांनी मॅट्रिक झाल्यानंतर लिखाणाला सुरुवात केली होती. दलित साहित्य हा त्यांचा जवळचा विषय होता. यामध्ये त्यांचा भरपूर अभ्यास होता, त्यामुळेच त्यांनी विपुल लेखन केले. मराठवाडा विद्यापीठातून ते 1987 साली पी.एच.डी. झाले. बाबासाहेबांच्या पत्रकारितेवर ‘पत्रकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर’ हा शोधप्रबंध त्यांनी यावेळी लिहिला होता. त्यानंतर याच डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठात मराठीचे प्राध्यापक म्हणून ते कार्यरत होते.
हेही वाचा – मारवाडी…
दलित साहित्याचे मुखपत्र असलेल्या अस्मितादर्श या वाङ्मयीन नियतकालिकाचे संस्थापक संपादक म्हणून त्यांनी 50 वर्षे कार्य सांभाळले. या नियतकालिकांच्या माध्यमातून त्यांनी अनेक साहित्यिक मराठी साहित्यविश्वाला दिले.
साहित्य, समाज आणि संस्कृती या विषयांवरील त्यांनी एकूण 20 वैचारिक आणि संशोधनपर ग्रंथ प्रकाशित केले. याखेरीज 12 पुस्तकांचे संपादनही त्यांनी केले. तसेच अनेक आंतरराष्ट्रीय आणि राष्ट्रीय पातळीवरील चर्चासत्रात त्यांनी शोधनिबंध सादर केले.
सॅनहोजे (अमेरिका) येथे पार पडलेल्या पहिल्या विश्व मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्षपद त्यांनी भूषविले आहे. यासोबतच विदर्भ साहित्य संमेलन (आनंदवन वरोरा), मराठवाडा साहित्य संमेलन (परभणी), या आणि इतर अनेक साहित्य संमेलनांचे ते अध्यक्ष होते.
हेही वाचा – ट्रेनला विलंब… वाढली जुईलीच्या मनातील घालमेल!
भारत सरकार तसेच महाराष्ट्र शासनाच्या साहित्य, समाज तथा संस्कृतीविषयक अनेक समित्यांवर त्यांनी कार्य केले. मराठी भाषेतील आणि साहित्यक्षेत्रातील योगदानाबद्दल त्यांना आंतरराष्ट्रीय तसेच अनेक राष्ट्रीय पुरस्कारांनी गौरविण्यात आले. महाराष्ट्र शासनाचे तसेच महाराष्ट्रातील अनेक साहित्यसंस्थांचे ग्रंथपुरस्कार त्यांच्या ग्रंथांना प्राप्त झाले. पुणे, वाई, नाशिक येथील प्रतिष्ठित ‘वसंत व्याख्यानमाला’, याशिवाय महाराष्ट्रातील अन्य व्याख्यानमाला तसेच मुंबई, पुणे, कोल्हापूर, अमरावती आणि उत्तर महाराष्ट्र विद्यापीठातील विविध व्याख्यानमालेत त्यांनी महत्त्वपूर्ण व्याख्याने दिली.
डॉ. गंगाधर पानतावणे यांनी मराठी साहित्याला दिलेल्या योगदानाबद्दल महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळाने त्यांना गौरववृत्तीने सन्मानित केले. तसेच साहित्य अकादमीकडून भारतीय लेखक म्हणून त्यांचा सन्मान करण्यात आला. शिवाय 2018 साली भारत सरकारने त्यांना पद्मश्री पुरस्कारानेही गौरविले होते. 27 मार्च 2018 रोजी त्यांचे औरंगाबाद येथे निधन झाले.


