सिक्युरिटी गार्ड साटमने सांगितल्यापासून माझ्या डोक्यातून ती गोष्ट काही केल्या जात नव्हती. गेल्या आठवड्यात दुपारच्या जेवणानंतर साटम सहज बोलून गेले होते की, एक आजोबा बाहेर कंपाऊंडमधील बाकावर बसून आपल्या ऑफिसकडे सतत बघत असतात. साधारण तासभर बसून ते निघून जातात. वर्षापूर्वी व्यवसाय वृद्धीमुळे या प्रशस्त जागेत मी माझ्या शेअर व्यवसायाचे ऑफिस स्थलांतरित केले होते. आज ऑफिसमध्ये जवळपास 50 जणांचा स्टाफ आहे. बसण्याची जागा, मीटिंग रूम, वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या केबिन, लंच रूम असं सगळं डोळ्यांसमोर ठेवून हे अवाढव्य ऑफिस मी भाड्याने घेतले होते.
आज आठवड्याचा पहिलाच दिवस… त्यामुळे सकाळपासूनच कामाची धावपळ सुरू असताना अचानक केबिनच्या दरवाजावर नॉक करत साटम आत आले…
“काय साटम? बोला लवकर काय काम आहे ते… मला खरंच वेळ नाहीये तुमचं बोलणं ऐकायला.”
“सर, ते आजोबा नुकतेच आलेले दिसले म्हणून तुम्हाला सांगायला आलोय.”
“काय?” असं म्हणून मी माझ्या खुर्चीवरून ताडकन उठून उभा राहिलो आणि केबिनबाहेर पडून मुख्य दरवाज्यातून आमच्या बिल्डिंगच्या कंपाऊंडमधील त्या बाकाजवळ जाऊन पोहोचलो आणि मला आश्चर्याचा धक्काच बसला. बाकावर सामंत काका बसलेले होते. मी त्यांच्या जवळ जाऊन उभा राहिलो. माझी चाहूल लागताच काकांनी मान वर करून बघितले.
“काका, मी शौनक… सरदेसाईंचा मुलगा… आपली पूर्वीची सुखदा सोसायटी… आठवलो का मी? आधी उठा बरं इथून आणि चला माझ्याबरोबर माझ्या ऑफिसमध्ये…” असं म्हणून मी सामंत काकांना माझ्या केबिनमध्ये आणून बसवलं. केबिन आवडल्याचे त्याने हातानेच दर्शवून मला सांगितले. ते पुढे म्हणाले, “सगळं आठवतंय मला. तुझ्या प्रगतीची घोडदौड वर्तमानपत्रातून, टीव्हीवरून जेव्हा वाचायला आणि बघायला मिळते, तेव्हा ऊर अभिमानाने भरून येतो. खूप पुढे गेलास तू. तुझ्या नवीन ऑफिसच्या पहिल्या वाढदिवसाची पानभर जाहिरात नुकतीच वाचनात आली. मोठ्या उत्साहाने त्यातला पत्ता मी लिहून घेतला. कधीतरी तुझी आठवण आली की, लोकलमध्ये बसून येतो इथे. तुझ्या ऑफिससमोर असलेल्या बाकावर बसून जुन्या आठवणींना उजाळा देतो. ऑफिसची भव्यता, सतत चाललेली धावपळ बघून मन समाधानाने भरून येतं आणि मग निघतो मी घरी जायला. एक दोनदा चौकशी देखील केली तुझी, पण तू ऑफिसमध्ये नाहीस, असं कळलं तेव्हा.”
हेही वाचा – दोन शब्द पुरे जगण्याला…
“काका, आज सगळी सुखं भरभरून आहेत माझ्या अवतीभोवती. आजवर तुम्हाला विचारण्याची हिंमत नाही झाली माझी, पण आज मात्र माझ्या एका प्रश्नाचे उत्तर तुम्ही द्याल का?”
“विचार तू. मी देईन उत्तर.”
“काका, तेव्हा मी नुकतीच सुरुवात केली होती, माझ्या शेअर व्यवसायाला आईबाबांच्या इच्छेविरुद्ध. पहिल्याच वर्षी बाजारातील घडामोडींचा अंदाज न आल्याने मी केलेल्या सौद्यांमध्ये मी सपाटून मार खाल्ला. ज्यांनी माझ्याकडे पैसे दिले होते, ते बुडाल्यात जमा होते. इतके पैसे उभे करायचे कसे? या काळजीने बाबा आजारी पडले. त्यावेळी त्या संकटातून तुम्ही आमच्या घराला सावरलंत, तुमच्या घरचं सोनं विकून! आम्ही तुम्हाला तेवढे पैसे परत देऊ की नाही? आणि समजा दिले तरी, ते कधी देऊ, याची खात्री नसताना तुम्ही एवढी जोखीम का उचलली आमच्या घरासाठी?”
“मला माहीत होते की, जेव्हा कधी तू मला भेटशील तेव्हा हा प्रश्न नक्कीच विचारशील. तुझ्या प्रश्नाचं उत्तर आहे, ‘विश्वास’! तो खूप अनमोल असतो. मला त्यावेळी ती रक्कम उभी करणं शक्य होतं म्हणून मी ते पाऊल उचलले. त्यावेळी जर तुला ज्यांनी पैसे दिले, त्यांचे पैसे तू परत केले नसतेस तर, त्यांचा तुझ्यावरचा, तुझा स्वतःवरचा आणि तुझ्या आईबाबांचा तुझ्यावरचा विश्वास उडाला असता आणि तो परत मिळवणं तुझ्यासाठी कठीण काम होऊन बसलं असतं. निराशेच्या गर्तेत सापडून तू कदाचित टोकाची भूमिका घेऊन बसला असतास, जे पचवणं तुझ्या घराला शक्य झालं नसतं. त्याच संभाव्य धोक्यांना टाळण्यासाठी मी माझ्या घरचं सोनं विकलं. तुझे बाबा आणि मी लहानपणापासूनचे मित्र. त्यामुळे माझ्यावरचं संकट आहे, असं समजून मी योग्य तो निर्णय घेतला. त्या धक्क्यातून तू नुसता सावरला नाहीस तर तू बाजारातील घडामोडींचा सखोल अभ्यास करून सौदे करायला लागलास आणि त्यात यशस्वी होऊन पुढच्या काही वर्षांत आपली सुखदा सोसायटी सोडून तुम्ही मोठ्या प्रशस्त जागेत रहायला गेलात. तुझ्या बाबांना अधूनमधून फोन करतो मी, तेव्हा तुझी प्रगती कळत असते मला. एक गोष्ट कायम लक्षात ठेव विश्वास कमवायला कधी कधी अख्खं आयुष्य पुरत नाही, पण तो गमवायला एक क्षण देखील पुरेसा असतो.”
हेही वाचा – गुलामगिरीच्या जोखडात अडकलेले…
“तुझ्या शेअर बाजारातील मंदी त्या विश्वासाच्या जवळपास देखील फिरकू देऊ नकोस. विश्वास कायम तेजीतच ठेवण्यात तू जर यशस्वी झालास तर, तुझ्या आयुष्याचा शेअर बाजार कायम स्थिर राहील.”
“हा मोलाचा सल्ला मी कायम लक्षात ठेवीन,” असं वचन मी काकांना दिले. दुपारी आमच्या सगळ्यांसोबत काकांना जेवू घालून माझ्या ड्रायव्हरला मी काकांना घरी सोडायला सांगितले.


