अध्याय तेरावा
तंव आणिक म्हणती हें नव्हे । हें जिवाचेंचि न म्हणावें । आमुतें पुसा आघवें । शेताचें या ॥33॥ अहो जीवु एथ उखिता । वस्तीकरु वाटे जातां । आणि प्राणु हा बलौता । म्हणोनि जागे ॥34॥ अनादि जे प्रकृती । सांख्य जियेतें गाती । क्षेत्र हे वृत्ती । इयेची जाणैं ॥35॥ आणि इयेतेंचि आघवा । आथी घरमेळावा । म्हणोनि ते वाहिवा । घरीं वाहे ॥36॥ वाहिव्याचिये राहटी । जे कां मुदल तिघे इये सृष्टी। ते इयेचांचि पोटीं । जहाले गुण ॥37॥ रजोगुण पेरी । तेतुलें सत्त्व सोंकरी । एकलें तम करी । संवंगणी ॥38॥ रचूनि महत्तत्त्वाचें खळें । मळी एके काळुगेनि पोळें । तेथ अव्यक्ताची मिळे । सांज भली ॥39॥ तंव एकीं मतिवंतीं । या बोलाचिया खंतीं । म्हणितलें या ज्ञप्ती । अर्वाचीना ॥40॥ हां हो परतत्त्वाआंतु । कें प्रकृतीची मातु । हा क्षेत्रवृत्तांतु । उगें आइका ॥41॥
हेही वाचा – सार्थ ज्ञानेश्वरी : तोंडेसीं तोंडा न पडे, बोलेंसीं बोला न घडे
अर्थ
(येथून प्रकृतिवाद्यांच्या मतांचा अनुवाद करतात) त्यावर आणखी कित्येक (प्रकृतिवादी) म्हणतात की “तुम्ही (जीववादी) म्हणता ते बरोबर नाही. हे क्षेत्र जीवाचे असे तुम्ही म्हणू नका. तर या शेताविषयी तुम्ही सर्व आम्हाला विचारा ॥33॥ अहो, जीव हा येथे वाटेने जाता जाता वस्ती करणारा वाटसरू आहे आणि प्राण हा क्षेत्राचा बलुतेदार असल्यामुळे रात्रंदिवस जागतो (क्षेत्राचे संरक्षण करतो) ॥34॥ अनादि जी प्रकृति जिचे सांख्यशास्त्र वर्णन करते तिचे हे क्षेत्र वतन आहे असे समज ॥35॥ आणि हिच्याजवळ शेतकी चालवण्याचा सर्व बारदाना घरचा आहे. म्हणून (शेत बटाईने न देता) ही शेत घरीच वाहते ॥36॥ या जगात हे क्षेत्र वाहण्याच्या कामी मुख्य खटपट करणारे ते तीन गुण सत्व, रज, तम हे हिच्याच पोटी उत्पन्न झाले आहेत ॥37॥ (प्रकृतीने तीन कामे या तिघांकडे नेमून दिली आहेत. ती येणेप्रमाणे) – रजोगुण पेरणी करतो आणि जितके रजोगुणाने पेरले तितके सत्त्वगुण रक्षण करितो व एकटा तमोगुण काढणी करतो (कापणी करतो) ॥38॥ (आणि मग हा तमोगुण) महत् तत्त्वाचे खळे तयार करून एकट्या काळ नावाच्या पोळाकडून मळणी करतो. त्या वेळी तेथे सूक्ष्म सृष्टीची रास बनते. (याप्रमाणे प्रकृति ही क्षेत्राचा उपभोग घेते) ॥39॥ (येथून संकल्पवादी मताचा अनुवाद करतात). तेव्हा कित्येक बुद्धिवानांनी (संकल्पवाद्यांनी) या प्रकृतिवाद्यांच्या बोलण्याचे दु:ख वाटून म्हटले की, हे तुमचे ज्ञान अलीकडील आहे. ॥40॥ अहो, परब्रह्मरूपाच्या ठिकाणी (तुमच्या) या प्रकृतीची गोष्ट कोठे आहे? तर क्षेत्राची आम्ही बरोबर हकीकत सांगतो. ती तुम्ही निवांतपणे ऐका ॥41॥
क्रमश:
हेही वाचा – सार्थ ज्ञानेश्वरी : जे प्राणाचां घरीं, अंगें राबते भाऊ चारी


