पुण्याच्या विस्तारीत उपनगरातला, एक नव्यानेच उदयाला येत असणारा निवासी भाग. काही इमारतींमध्ये राहणारे रहिवासी, काही इमारतींचे काम सुरू… वगैरे नेहमीचंच दृश्य. माझा एक मित्र राहायला गेलाय तिथे नुकताच. या इमारतींपैकी एका इमारतीच्या तळमजल्याला मारवाडी समाजाच्या दुकानदाराची दोन दुकानं, नुकतीच सुरू झालेली… एक मिठाईचं आणि दुसरं जनरल स्टोर. माझा आत्तापर्यंचा अनुभव असा की, कुठल्याही नव्या विभागात पहिलं दुकान असतं ते मारवाड्याचं. तिथेही तेच दृश्य, परिचित!
आगे दुकान, पीछे मकान या तत्वावर त्यांचा ठाम विश्वास. एक दुकान आधी सुरू होतं, मग त्याचा कोणीतरी नातेवाईक येतो आणि शेजारीच औषधांचं, हार्डवेअरचं, किराणा सामानाचं किंवा इतर तत्सम दुकान सुरू करतो. लोकं राहायला यायच्या आधी यांचे सगळे व्यवहार सुरू झालेले असतात आणि फक्त त्यांचीच दुकानं सुरू असल्याने लोकांना दुसरा पर्याय नसतोच!
हळूहळू ते प्रस्थापित होतात. जिभेवर साखर, डोक्यावर बर्फ आणि काटकसर ही त्यांची तत्व असतात. अढळ विश्वास असतो त्यांचा या तत्वांवर आणि तेच तर त्यांच्या यशाचं गमक असतं. हे तर साधे दुकानदार, पण कित्येक मारवाडी जगाच्या कानाकोपऱ्यात बलाढ्य उद्योग चालवतात, तेही याच गुणांवर, असं म्हटलं तर वावगं ठरू नये.
हेही वाचा – परोपकार
या दुकानदाराकडे माझा मित्र दोन-चार वेळा गेला. स्तुती केली त्याच्या कष्टाळू स्वभावाची आणि मग छान ओळख झाली त्यांची. समोसे, वडे, जिलबी, मिठाया, चाट असे असंख्य प्रकार त्याच्याकडे विक्रीला होते. दोन मदतनीस सोबतीला घेऊन यथास्थित चाललेला व्यवसाय. त्याचं जनरल स्टोअर पण तसंच. मध्यमवर्गीय घरात लागू शकणाऱ्या सगळ्या वस्तू त्याच्याकडे उपलब्ध, एखादा अपवाद वगळता. नसली ती वस्तू त्याच्याकडे, तर जवळपासच्या भाऊबंदाकडे चौकशी करून, ती उपलब्ध करून, घरपोच आणून देण्यातही कमालीचा तत्पर!
व्यवसाय करणाऱ्या, कष्ट करून खाणाऱ्या माणसाला त्रास देणारे असतातच सगळीकडे, सिनेमातल्या खलनायकासारखे… इथे तो मक्ता घेतला होता महापालिका कर्मचाऱ्यांनी. वेळी अवेळी यायचं, हक्क असल्याप्रमाणे हवं ते उचलून खायचं, काहीतरी खुसपटं काढून पैसे मागायचे, असा रोजचा त्रास! तक्रार तरी कोणाकडे करणार, अशा किरकोळ गोष्टींची? सहन करण्यावाचून काहीच पर्याय नव्हता त्याच्याकडे.
असाच एकदा हा मित्र त्याच्या दुकानात काहीतरी घ्यायला उभा होता आणि तेवढ्यात पालिका कर्मचाऱ्यांसोबत त्यांचे साहेबही अवतरले दुकानात. मालक अदबीने त्यांचं स्वागत करून त्यांच्याशी बोलायचा प्रयत्न करत होता, पण साहेबांचा मूड काही ठीक नव्हता. ते एकदम अर्वाच्य शिव्याच द्यायला लागले, काहीही कारण नसताना!
हेही वाचा – मनाची घालमेल अन् देवभूमीची यात्रा…
माझा मित्र थोडा सणकी टाळक्याचा. ही अरेरावी बघताच खूप अस्वस्थ झाला आणि त्या साहेबाला अडविण्यासाठी पुढे सरसावला. दोघांची खडाजंगी झाली. CCTV कॅमेऱ्यात सगळं टिपलं जातंय, याची त्याने त्या अधिकाऱ्याला आठवण करून दिली आणि तो अधिकारी तणतणतच निघून गेला.
तो गेल्यावर दुकानदार म्हणाला, “कशाला उगाच मधे पडलात तुम्ही? मी सांभाळून घेतलं असतं त्याला.”
मित्र म्हणाला, “अरे, एवढ्या शिव्या दिल्या त्याने आणि तुला काहीच नाही त्याचं?”
दुकानदार म्हणाला, “साब, वह कुछ दे के गया, लेके तो नही गया ना? गाली तो गालीही सही! माझ्या अंगाला काही भोकं नाही पडली. धंदा करायचा असेल तर, हे हलाहल पचवावंच लागतं! आम्हाला ही शिकवण असतेच लहानपणापासून. बाळकडूच म्हटलं तरी चालेल.”
परवा हा प्रसंग मला सांगितला मित्राने गप्पांच्या ओघात आणि मी मनातल्या मनात नतमस्तक झालो, त्या न पाहिलेल्या अनामिक, मारवाडी दुकानदारासमोर! आपला मराठी बाणा, ‘मोडेन पण वाकणार नाही’ आणि त्यांचा, ‘वाकेन पण मोडणार नाही’. कोण बरोबर, कोण चूक यावर भाष्य करणे अप्रस्तुत!!


