“आई, यंदा गौरी थोड्या साध्या पद्धतीने करूया का?” मधुराचा प्रश्न ऐकून आजीने हातातले तांदूळ खाली ठेवले.
“का गं?”
“वेळ कमी आहे. नोकरी, घर, मुलांचं सगळं… आणि एवढा मोठा थाट करण्याची गरज तरी काय?”
आजी काही बोलली नाही. फक्त हसून म्हणाली, “गौरी साध्या केल्या तरी चालतील गं… पण घरातली माणसं मनाने दूर जाऊ नयेत.”
बाजूला उभी असलेली सई हे ऐकत होती. सईला या सगळ्या परंपरांचा फारसा अर्थ वाटत नव्हता. तिने आईला विचारलं, “आई, खरंच सांग… गौरी आल्या म्हणून काय बदलतं? दोन दिवस पूजा, नैवेद्य, पाहुणे आणि मग सगळं पूर्वीसारखंच!”
मधुरा काही बोलणार, तेवढ्यात आजी म्हणाली, “बदलतो तो मनाचा कोपरा.”
सई हसली… “आजी, तुम्ही ना, प्रत्येक गोष्टीत भावना शोधता.”
आजीने तिच्याकडे पाहिलं… “कारण, आम्ही त्या भावनांवरच संसार केला आहे गं!”
गौरींच्या आगमनाचा दिवस उजाडला. आजीने आपल्या जुन्या पेटीतून एक सुंदर हिरवी साडी काढली. साडीवर जुनं सोन्याचं काम होतं.
मधुराने विचारलं, “आई, ही साडी अजून जपून ठेवली आहे?”
आजी हसली…. “तुझ्या आजीने मला दिली होती.”
सईने साडी हातात घेतली… “म्हणजे चार पिढ्यांची आठवण आहे?”
हेही वाचा – उपवास
“हो.”
“मग आईने वापरली नाही?”
आजी शांत झाली.
“तुझ्या आईने लग्नानंतर एकदा नेसली होती. नंतर संसाराच्या धावपळीत वेळच मिळाला नाही.”
मधुरा दूर उभी होती. तिच्या चेहऱ्यावर हलकं हसू होतं. पण डोळ्यांत काहीतरी दडलेलं होतं.
पूजा सुरू झाली. मंत्र म्हणताना आजीच्या आवाजात थोडा कंप होता. सईने पाहिलं — आजी वारंवार मधुराकडे पाहत होती.
पूजा झाल्यावर आजीने ती हिरवी साडी मधुराच्या हातात दिली… “ही तू ठेव.”
मधुरा दचकली… “आई, मला नको. तुमची आठवण आहे.”
आजी म्हणाली, “माझी आठवण वस्तूत ठेवू नकोस. माझ्या जगण्यात ठेव.”
मधुराच्या डोळ्यांत पाणी आलं.
“आई…”
आजीने तिच्या डोक्यावर हात ठेवला… “तू आयुष्यभर सगळ्यांसाठी जगलीस. पण स्वतःसाठी जगायला उशीर करू नकोस.”
सई स्तब्ध झाली. तिने पहिल्यांदाच आईकडे वेगळ्या नजरेने पाहिलं. तिला जाणवलं — आई फक्त आई नव्हती. तीही कधीतरी मुलगी होती. तिलाही स्वप्नं होती. तिलाही स्वतःसाठी काहीतरी करायचं होतं. पण संसाराच्या जबाबदाऱ्यांमध्ये ती स्वप्नं कुठेतरी मागे राहिली होती.
गौरींच्या विसर्जनाच्या आधी सई आजीजवळ बसली.
“आजी, मला एक विचारायचं आहे.”
“विचार.”
“तुमच्या काळात तुम्हाला सगळं आवडायचं का? म्हणजे, ज्या काही परंपरा होत्या, त्या?”
आजी हसली… “नाही.”
“मग?”
“काही परंपरा मला आवडायच्या. काही मी फक्त माझ्या आईसाठी केल्या. काही माझ्या मनाविरुद्ध होत्या.”
सई आश्चर्याने पाहत राहिली.
आजी पुढे म्हणाली, “पण आम्हाला प्रश्न विचारायला फारशी जागा नव्हती.”
क्षणभर शांतता.
“म्हणून तुझ्या आईला मी एक गोष्ट शिकवली — परंपरा जप, पण स्वतःला हरवू नकोस.”
मग तिने सईचा हात हातात घेतला.
“…आणि तुझ्या आईने तुला शिकवायचं आहे — स्वातंत्र्य घे, पण माणसांना मागे सोडू नकोस.”
सईच्या डोळ्यांत पाणी आलं.
“मग माझं काय?”
आजी हसली.
“तू दोन्ही घे. परंपरेची माया आणि नव्या विचारांचे पंखं.”
गौरी निघाल्या. ढोल-ताशांचा आवाज हळूहळू दूर जाऊ लागला. घर पुन्हा शांत झालं.
सईने आईला हाक मारली. “आईSSS”
“काय?”
“तू तुझ्यासाठी काय करणार आहेस?”
मधुरा काही क्षण तिच्याकडे पाहात राहिली. मग हसली.
“माहीत नाही.”
सईने तिचा हात धरला… “मग शोधूया.”
दोघी हसल्या. दूर उभी असलेली आजी हे सगळं पाहत होती. तिच्या चेहऱ्यावर समाधान होतं.
कारण तिला माहीत होतं —
गौरींचं विसर्जन झालं होतं, पण त्यांचा खरा प्रसाद घरात राहिला होता. तो प्रसाद होता —
एका पिढीने दुसऱ्या पिढीला दिलेला विश्वास, दुसऱ्या पिढीने तिसऱ्या पिढीला दिलेली मोकळीक, आणि तिसऱ्या पिढीने पुन्हा मागच्या पिढीला दिलेली साथ.
त्या रात्री सईने आजीच्या मांडीवर डोकं ठेवलं…
“आजी, पुढच्या वर्षी गौरी आल्या की, आपण तिघी मिळून सगळं करूया.”
आजीने तिच्या केसांवरून हात फिरवला.
“हो गं.”
थोडं थांबून आजी म्हणाली — “पण पुढच्या वर्षीपर्यंत मी असेनच असं नाही…”
सईने आजीच्या तोंडावर हात ठेवला…
“असं बोलू नकोस.”
हेही वाचा – चातुर्मास आमचा-तुमचा… आपल्या सर्वांचा
आजी हसली…
“मरणाची भीती नाही गं मला… फक्त एवढीच इच्छा आहे, माझ्यानंतरही या घरात गौरी येत राहाव्यात.”
सईने आजीला घट्ट मिठी मारली.
“गौरी नक्की येतील आजी आणि आपण तिघीही त्यांचं स्वागत करू.”
आजीच्या डोळ्यांत अश्रू होते. ती हळूच म्हणाली — “मग माझं गौरीचं पूजन पूर्ण झालं.”
आणि त्या क्षणी सईला जाणवलं —
देवघरातली ज्येष्ठा गौरी एक दिवस निघून जाते… पण घरातल्या आजीसारखी माणसं आपल्या संस्कारांच्या रूपाने कायमची राहून जातात.


