Close Menu
AvaantarAvaantar

    Subscribe to Updates

    Get the latest creative news from FooBar about art, design and business.

    What's Hot

    साप्ताहिक राशीभविष्य : 16 ते 22 ऑगस्ट 2026

    August 16, 2026

    सार्थ ज्ञानेश्वरी : पैं पाणियाचिये भूमिके, पाणी तळपे कौतुकें

    August 16, 2026

    Panchang : आजचे पंचांग आणि दिनविशेष; 16 ऑगस्ट 2026

    August 16, 2026
    Facebook X (Twitter) Instagram
    Sunday, August 16
    AvaantarAvaantar
    Facebook X (Twitter) Instagram YouTube
    Home
    • अवांतर
    • आरोग्य
    • फिल्मी
    • फूड काॅर्नर
    • मैत्रीण
    • ललित
    • पंचांग आणि भविष्य
    • अध्यात्म
    • शैक्षणिक
    • थर्ड अंपायर
    Latest From Avaantar
    AvaantarAvaantar
    Home » सार्थक
    ललित

    सार्थक

    अतुला प्रणव मेहेंदळेBy अतुला प्रणव मेहेंदळेAugust 3, 2026No Comments7 Mins Read
    Share Facebook Twitter LinkedIn WhatsApp Copy Link
    अवांतर, मराठीकथा, मराठीलेखक, मराठीवाचन, मराठी साहित्य, मी मराठी, अभिजात मराठी, अतुला प्रणव मेहेंदळे, अतुला मेहेंदळे, लेखिका अतुला प्रणव मेहेंदळे, नमिता मिथिलाची कथा, मिथिला नमिता बहिणी, नमिताचे बाळंतपण, मावशीकडून बाळाचे नामकरण, निपुत्रीक मिथिला, नमिता भक्कमपणे मिथिलाच्या पाठीशी,
    फोटो सौजन्य - गूगल जेमिनी
    Share
    Facebook Twitter LinkedIn WhatsApp Email Copy Link

    “नमू, अगं चल नाश्ता करून घे. तुला आवडतात ते डिंकाचे दोन लाडू आणि अळीवाची खीर केली आहे. ती पटापट संपव बघू. मला जेवण पण बनवायचं आहे आणि मग मला थोडं बाहेर जायचं आहे. बारशाची सगळी तयारी आणायची आहे. हॉल घेतला असला तरी देण्याघेण्याचं बघायला हवं बाई. आमच्या बहिणाबाईंच्या सासरच्या मंडळींनी नाव काढलं पाहिजे, छान केलं बारस माहेरच्यांनी म्हणून…” असं नमिताची बहीण मिथिला हसत हसत म्हणाली.

    पण नामिताचा अजिबात नूर नव्हता खायचा. ती हॉलमध्ये खेळणाऱ्या बाळाकडे एकटक बघून रडत होती. नुसतंच त्याला खेळवल्यासारखं दाखवत होती, पण आज ती मनातून खूप दुःखी होती. बारसे झाल्यावर लगेचच आठवडाभरात तिला तिच्या घरी परत जायचं होतं. ताईला सोडून जायचं, या विचाराने ती नाराज होती. तरी, तिने ताईसाठी कसाबसा हसऱ्या चेहऱ्याने नाश्ता केला. मग मिथिला जेवण बनवून थोडा वेळ बाहेर गेली. जाताना तिने सतराशे साठ सूचना दिल्या नमिताला…

    आज बरोब्बर अडीच महिने झाले तिला तिच्या ताईकडे म्हणजेच, मिथिलाकडे येऊन. नमूचे दिवस भरत आले आणि तिच्या आई, शकुंतलाबाईंना वेगळीच काळजी वाटू लागली. हिचं बाळंतपण कोण करणार आता? नमू आणि मिथिलाचे बाबा दोन वर्षांपूर्वीच गेले आणि आईला पण या गोष्टीचा मानसिक धक्का बसला आणि मानसिक त्रास आला की, शारीरिक दुखणी डोकं वर काढतात. त्याप्रमाणे त्यांना कमरेचं मोठं दुखणं निघालं… साधं उठबस करताना त्रास होत होता. मग बाळंतपण तर आईचा दुसरा ‘पण’च जणू… जो पूर्ण करावाच लागतो आणि हसतहसत बायका करतातही. पण शकुंतलाबाईंना एकच ध्यास लागला होता ते म्हणजे नमिताचं बाळंतपण!

    एकदा मिथिला आईकडे आली, तेव्हा आई शांत-शांत आहे, हे बघून तिने विचारलं, “काय गं आई अशी शांत का आहेस? काय झालं? तब्येत बरी आहे ना?” तेव्हा शकुंतलाबाई रडव्या स्वरात म्हणाल्या, “काय करू मग. डोकंच चालत नाहीये. मी ही अशी अधू झालेली. आता मनूचं बाळंतपण कोण करणार? पहिलं असल्याने ती माझी जबाबदारी, पण कसं जमवू तेच कळत नाहीये. नमूच्या सासूबाई म्हणतायत, तिथेच करतो बाळंतपण… पण अगं माझंच मन मला खातंय. सगळं कसं रीतीनुसार झालं पाहिजे. तुला तर माहीतच आहे, मला जरा रीतिभातीत कसर राहिली तर अजिबात आवडत नाही. पण…” असं म्हणून शकुंतलाबाई विचारात पडल्या.

    त्यावर मिथिला आईला म्हणाली, “एवढंच न! अगं मी करते की, मनूचं बाळंतपण. म्हणजे बघ हो तुला, मनूला आणि तिच्या सासरच्या मंडळींना चालणार असेल तर…” हो, नाही करता करता नमू नोकरी करत असल्याने नववा महिना लागला त्याच दिवशी मिथिलाकडे आली आणि त्याच दिवशी तिचं तिच्या लाडक्या मिथिला ताईकडे डोहाळजेवण होतं. सगळी तयारी मिथिलाने चोख केली होती. फक्त ती तेव्हा जरा नमूपासून लांब लांब होती. बायका पण मिथिलाच्या आईशीच जास्त बोलत होत्या. मिथिलाशी कुणी जास्त बोलत नव्हतं. नमिताला ही गोष्ट खटकली. पण ती आनंदात होती त्यामुळे त्यावेळी तिने बोलणं टाळलं. मिथिलाने संध्याकाळी नमिताची दृष्ट काढली. “माझ्या लाडक्या लाडूला कुणाची दृष्ट नको लागायला. किती छान तेज आलं आहे, ते कुण्णामुळे म्हणजे, अगदी माझ्यामुळे सुद्धा कमी नको व्हायला…”

    हा हा म्हणता 10 दिवस झाले आणि अचानक एका मध्यरात्री नमिताला पोटात दुखायला लागलं. मिथिलाने अनुभवी बाईसारखी सगळी तयारी केलीच होती. तिच्या नवऱ्याने गाडी काढून लगेच हॉस्पिटलला नेलं. धावाधाव करायला लागली. सासरची मंडळी आत्ता कुठे 8-10 दिवसांपूर्वी मुंबईला गेली होती, तोच परत यायला लागलं. आई तर आता परत येऊच शकणार नव्हती. सासरची माणसं पोहोचेपर्यंत गोड बातमी आली सुद्धा होती. गोंडस असा राजपुत्र झाला होता नमूला! सगळीकडे आनंदी आनंदी झाला.

    मिथिलाच्या घरभर नुसता धुरी, पावडर, शी शू चा वास भरून राहिला होता. मिथिलाने अगदी मनापासून सगळं केलं नमिता आणि बाळाचं. एवढ्या मोठ्या बंगल्यात राहून सुद्धा तिने नमिताला सांगूनच ठेवलं होतं, “काहीही झालं तरी मी माझ्या हाताने माझ्या लाडूसाठी सगळं करणार. आंघोळ वगैरे काय ते घालू देत बायकांना, पण बाकी बाळाचं सगळं आणि नमूचं खाणं-पिणं सगळं मीच करणार आहे. मला कुठलीच हयगय नकोय. माझा पहिलावहिला भाचा आहे. मावशीने सगळं करायला हवंच. माझ्यासाठी यातलं काहीच करता नाही आलं पण…” असं म्हणून ती थोडी थांबली. डोळ्यांच्या कडा पाणावल्या… पण नंतर इकडे तिकडे बघून पुन्हा म्हणाली, “जाऊदे! तू आराम कर बघू. मी आहे सगळं करायला. फक्त ताईला ऑर्डर सोडायची. ताई सगळं देणार. कळलं का नमू”.

    बोलल्याप्रमाणे त्या दोघांचं कित्ती करू आणि कित्ती नको, असं झालं होतं तिचं. रात्री बाळ खूप जागवायचं, पण तरीही ती सगळं प्रेमाने करत होती आणि उद्या बारसं सुद्धा येऊन ठेपलं बाळाचं. नमिता विचारांमधून बाहेर आली. बाळाने कार्यक्रम केला होता. पण ती उठणार तेवढ्यात मिथिला आलीच. तिने नमूला सक्तीने आराम करायला लावला. म्हणाली, “अगं आता थोडेच दिवस आराम आहे तुला, तो करून घे. नंतर घरी गेलीस की, काय आहेच सगळं करायचं. मी कुठे असणार आहे तिकडे? ऑर्डर सोडून घे आत्ताच. नंतर सासूबाई, बाळ आणि नोकरी यात ‘चक्की पिसिंग अँड पिसिंग’ करत बसणार आहेस…” असं म्हणाल्यावर दोघी खदखदून हसल्या.

    बारसं म्हणून मिथिलाची आई आली होती चार दिवसांपूर्वीच. पण कामाला तशी तिची काही मदत नव्हती. ती दुखऱ्या पाठीने आली हेच खूप होतं. तिला तर मिथिलाचं प्रचंड कौतुक वाटत होतं. ती म्हणाली सुद्धा, ” मिथिला धन्य आहेस तू. अगं अगदी आईच्या मायेने करते आहेस सगळं आपल्या धाकट्या बहिणीचं. आजकाल कुणीच करत नाही इतकं! तुझ्यासारखी समजूतदार बहीण आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मुलगी सगळ्यांना मिळो, हीच देवाचरणी प्रार्थना.” मिथिलाने हसतच आईला मिठी मारली.

    मिथिला नमिताचं सगळं करण्यात अगदी गुंग झाली होती. बारशाची तयारी तिने अगदी जोरदार केली होती. तिच्या सासरच्या मंडळींचाही अगदी हिरीरीने सहभाग होता. शेवटी बारशाचा दिवस आला. सगळे गाडीतून हॉलवर गेले. पुरुष मंडळी, नमिताचा आणि मिथिलाचा नवरा सगळे मागच्या खुर्च्यांवर बसले. हळूहळू बायकांची आणि घरातल्या मंडळींची वर्दळ चालू झाली. तसं मिथिलाने अंग काढून घ्यायला सुरुवात केली. ती स्वयंपाक घरातच जास्त रहायला लागली. नमिताला अशीही नणंद नव्हतीच. त्यामुळे तिथल्या बायकांनी नमितालाच बाळाचं नाव ठेवायला सांगितलं. बाळाला पाळण्यात घातलं आणि नमिताने हाक मारली…

    “ताई अगं इकडे ये ना. तिकडे आत काय करतेस?” त्यावर एक सत्तरीकडे झुकलेली आजी म्हणाली, “अगं, ती कशाला हवी आहे? नाव तर तुला ठेवायचं आहे… ती तिकडे आहे तेच बरं आहे. उगीच आजच्या दिवशी बाळावर तिची सावली कशाला?” असं म्हणत असतानाच मिथिला तिथे आली. तिच्या चेहऱ्यावरचं हसू एकदम मावळलं आणि ती परत आत जायला निघाली. तेव्हा नमिताने तिचा हात धरला. ती म्हणाली, “ताई थांब. तू कुठेही जायचं नाहीस. अगं बघ बाळ कसं टूकुटूकू बघतंय तुझ्याकडे… आणि कसा गोड हसतोय गुलाम! ताई, बाळाचं नाव तूच ठेवायचं आहेस.”

    हेही वाचा – दुधावरची साय…

    तिच्या या बोलण्याने तिकडच्या बायका कुजबूज करायला लागल्या. मिथिलाला कसनुसं झालं. तिने मानेनेच नमितला नकार दिला. त्यावर सगळ्यांकडे बघत नमिता म्हणाली, “ही माझी ताई सौ. मिथिला मनोहर पितळे. माझ्यापेक्षा 10 वर्षांनी मोठी. हिला मूल नाही म्हणून तुम्हाला ही चालत नसेल इकडे आलेली. हो ना?  पण त्यात तिचा काय दोष? आणि दोष असेलच तर तो तुमच्या दृष्टीचा आहे. तुम्हाला हे दिसलं की, तिला मूल नाही… आणि आज नाहीये कदाचित उद्या होईलही. पण तुम्हाला हे का नाही दिसलं की, तिनेच माझ्या बाळाचं दोन महिने संगोपन केलं आहे. अहो, आई सुद्धा करणार नाही, इतकं तिने केलं आहे… अगदी बाळाचं आणि माझंही! किती रात्री तिने जागून काढल्यात हे मला माहितीय. माझी आई होऊन तिने मला जपलं आहे, या सगळ्या गोड प्रवासात… आईला जमणार नाही म्हणून कसलाही मागचा पुढचा विचार न करता स्वतःच्या दुःखाला बाजूला ठेवून तिने आनंदाने हे आमचं ओझं पेललं आहे. तिचं, तिच्या नवऱ्याचं, सासरच्यांचं सगळं सांभाळून तिने आमचं केलं आहे. आईची उणीव जराही भासू दिली नाही. माझ्या बरोबरीने तिनेही आईपणाचा ‘पण’ पूर्ण केला आहे. मी तिच्या जागी असते तर, कदाचित मीही एवढं करू शकले नसते. ताई तुला hats off आहे… आणि याची जाणीव मी सदैव ठेवीन. राहिला प्रश्न तिने इथे येऊन बाळाचं नाव ठेवण्याचा… तर हे बघा ज्यांना हे रुचत नसेल, त्यांनी गेलं तरी हरकत नाही. पण माझ्या बाळाचं नाव त्याची मावशीच ठेवणार!”

    एवढं बोलून नमूने मिथिलाला मिठी मारली. काही मंडळी वगळता बाकी सगळ्यांनी उभं राहून टाळ्या वाजवून या आदर्श बहिणींचं कौतुक केलं. मिथिलाचे डोळे आनंदाश्रूंनी सतत वाहत होते. तिने केलेल्या परिश्रमाचं तिला सार्थक झाल्यासारखं वाटलं. कुठलीही अपेक्षा न धरताही आज तिच्या पदरात भरपूर सुखाचं दान पडलं होतं. शिवाय, नमूचं मातृत्वही सार्थकी लागलं. म्हणून तिने बाळाचं नाव पण साश्रू नयनांनी “सार्थक” ठेवलं… आणि देवाला मनोमन प्रार्थना केली “मला मातृत्व अजून लाभलं नसलं तरी बाळाच्या रुपात ही आगळीवेगळी तुझी सेवा करण्याची संधी दिलीस त्याबद्दल खूप आभार!”

    Avatar photo
    अतुला प्रणव मेहेंदळे

    अतुला प्रणव मेहेंदळे, वय 38. राहणार ठाणे येथे. प्रॅक्टिसिंग सी. एस. आणि एल. एल. बी.चं शिक्षण घेतलं आहे. गेली 14 वर्षं कंपनी सेक्रेटरी म्हणून स्वतःची प्रॅक्टिस करत आहे. पुस्तक वाचन, जुनी गाणी ऐकणे, फिरण्याचा छंद आहे. तसं आधीही लिहावं असं खूप वाटायचं, पण खरी सुरुवात कोरोना काळात स्वामींच्या आशीर्वादाने म्हणा किंवा प्रसादाने म्हणा स्वामींच्या प्रकट दिनी त्यांच्यावरच्याच लेखाने झाली. मी लिहिलेल्या बऱ्याच कथांच्या अभिवाचनासह दिवाळी अंक, छोट्या छोट्या वर्तमानपत्रात विविध कथा छापून येत राहिल्या. त्यानंतर राज्यस्तरीय स्पर्धेत पुरस्कार मिळाल्याने आनंद द्विगुणित झाला. वय आणि अनुभव छोटा असला तरी आता बऱ्याच कथा लिहून आणि प्रसिद्ध करून झाल्या. व्यावसायिक दृष्टिकोनातून कधीच लिखाण केलं नाही. लोकांना आवडतील, रुचतील, कुणाच्या भावना दुखावल्या जाणार नाहीत अशा लघुकथा लिहिण्याचा प्रयत्न करते. शेवटी मायबाप रसिक, आईवडील, सर्व वडीलधारे नातलग आणि देवाच्या कृपाशीर्वादाने असं लिखाण आजन्म घडो, ही दत्तगुरूचरणी प्रार्थना.

    Related Posts

    जेन झी

    August 15, 2026 ललित

    भिऊ नकोस, मी आहे!

    August 15, 2026 ललित

    आराध्याने शोधला ‘क्षितिज 9’ प्रोजेक्टचा हायजॅकर!

    August 14, 2026 ललित
    Leave A Reply Cancel Reply

    Demo
    Stay In Touch
    • Facebook
    • Twitter
    • Instagram
    • YouTube
    Don't Miss
    ललित

    जेन झी

    By प्रदीप केळुस्करAugust 15, 2026

    आईचा साठावा वाढदिवस म्हणून समीराने आठ दिवसांची रजा घेतली आणि पुढील आठ दिवस आईसोबत घालवायचे…

    भिऊ नकोस, मी आहे!

    August 15, 2026

    आराध्याने शोधला ‘क्षितिज 9’ प्रोजेक्टचा हायजॅकर!

    August 14, 2026

    भैरू आणि पारू

    August 14, 2026

    Subscribe to Updates

    Get the latest creative news from Avaantar

    Latest From Avaantar

    साप्ताहिक राशीभविष्य : 16 ते 22 ऑगस्ट 2026

    August 16, 2026

    सार्थ ज्ञानेश्वरी : पैं पाणियाचिये भूमिके, पाणी तळपे कौतुकें

    August 16, 2026

    Panchang : आजचे पंचांग आणि दिनविशेष; 16 ऑगस्ट 2026

    August 16, 2026

    जेन झी

    August 15, 2026

    भिऊ नकोस, मी आहे!

    August 15, 2026

    ज्योतिषशास्त्र… कुंडलीतील महत्त्वाचे सूत्र – भावलग्न आणि होरा लग्न

    August 15, 2026

    POPULAR CATEGORY

    • Blogs 1
    • अध्यात्म 397
    • अवांतर 204
    • आरोग्य 139
    • थर्ड अंपायर 6
    • पंचांग आणि भविष्य 536
    • फिल्मी 63
    • फूड काॅर्नर 248
    • मैत्रीण 24
    • ललित 853
    • शैक्षणिक 84
    • 98699 75883
    • joshimanoj@avaantar.com
    Facebook X (Twitter) Instagram LinkedIn

    एक पाऊल सांस्कृतिक सर्जनशीलतेकडे...

    आजकाल वाचनसंस्कृतीबद्दल चिंता व्यक्त केली जात आहे. वास्तविक ‘पुस्तक वाचन’ संस्कृतीला धोका निर्माण झाला आहे. वाचनसंस्कृती अबाधित आहे आणि ती अबाधित राहील. कारण, पुस्तकांच्याच जोडीला स्मार्टफोन, ई-बुक, ई-मॅगझिन यासारखी आधुनिक काळाशी सुसंगत माध्यमे उपलब्ध झाली आहेत. याच अत्याधुनिकतेची कास धरत आम्ही हे पाऊल उचलले आहे... अवांतर ही वेबसाइट!

    ‘अवांतर’ हा एक वेब प्लॅटफॉर्म आहे, जो विचार, साहित्य, कला आणि संस्कृतीच्या सर्जनशील प्रवाहाला समर्पित आहे. विविध विषयांवर लेख, कविता, कथा आणि विचार आपल्यापर्यंत पोहोचविण्याचा हा प्रयत्न आहे. दैनंदिन धावपळीच्या जीवनात मिळाणारी काही क्षणांची उसंत सार्थकी लावावी, उत्तम साहित्याद्वारे वाचकांना नवनवीन दृष्टिकोन देणे, विचारांना चालना देणे आणि सर्जनशीलतेला प्रोत्साहन देणे, हा उद्देश आमचा यामागे आहे.

    ‘अवांतर’च्या निमित्ताने विविध लेखक, कवी, विचारवंत आणि कलाकारांना एक हक्काची वेबसाइट उपलब्ध केली आहे. त्यांचे वैविध्यपूर्ण साहित्य, माहिती जगासमोर मांडण्यासाठी एक मुक्त व्यासपीठ असे या वेबसाइटचे स्वरूप आहे. ‘अवांतर’ च्या माध्यमातून आम्ही मराठी भाषेतील समृद्ध साहित्यिक परंपरेला नवी दिशा देत, आधुनिक काळाशी जोडून ठेवण्याचा आमचा प्रयत्न आहे.

    या वेबसाइटला ‘अवांतर’ नाव विचारपूर्वक देण्यात आले आहे. कोणत्याही एका विचाराला किंवा विचारधारेशी बांधिलकी न दाखवता, सर्वांना सामावून घेत, पुढे जाण्याचा एक निखळ उद्देश यामागे आहे. आमच्या या प्रवासात जवळपास 25 ते 30 लेखक, कवी, आरोग्यतज्ज्ञ, शैक्षणिक तज्ज्ञ साथसोबत आहेत. पण आमचा हा प्रवास तुमच्याशिवाय अपूर्ण आहे. सर्जनशीलतेच्या या प्रवासात सर्वच सहभागी होऊया!

    संपादकीय मंडळ

    • मनोज शरद जोशी (संपादक)
    • आराधना जोशी (कार्यकारी संपादक)
    • चिन्मय आचार्य (कायदेविषयक सल्लागार)
    • भालचंद्र गोखले (आर्थिक सल्लागार)
    • गार्गी देवधर (सल्लागार)
    Read More
    • M.A.Y. Multimedia Rg.No.MH-17-0175213 Palghar, Maharashtr

    © 2026 Avaantar.com All Rights Reserved. | Design & Developed By Creative Marketix

    • Terms & Conditions
    • Privacy Policy
    About Us
    About Us

    Your source for the lifestyle news. This demo is crafted specifically to exhibit the use of the theme as a lifestyle site. Visit our main page for more demos.

    We're accepting new partnerships right now.

    Email Us: info@example.com
    Contact: +1-320-0123-451

    Facebook X (Twitter) Pinterest YouTube WhatsApp
    Our Picks

    साप्ताहिक राशीभविष्य : 16 ते 22 ऑगस्ट 2026

    August 16, 2026

    सार्थ ज्ञानेश्वरी : पैं पाणियाचिये भूमिके, पाणी तळपे कौतुकें

    August 16, 2026

    Panchang : आजचे पंचांग आणि दिनविशेष; 16 ऑगस्ट 2026

    August 16, 2026
    Most Popular

    ज्योतिषशास्त्र… कुंडलीतील महत्त्वाचे सूत्र – भावलग्न आणि होरा लग्न

    August 15, 2026

    स्मृतीगंध

    January 26, 2025

    विष्णूरुपी जावई…

    January 26, 2025
    © 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.
    • Home
    • Buy Now

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.