पूर्वार्ध
वकील आणि कोर्ट कचेरी कधी उभ्या आयुष्यात पाहिली नाही. पोलीस स्टेशनची पायरी तर नावच काढू नका. वकील म्हटलं की, पांढऱ्याचं काळं न् काळ्याचं पांढरं करणारा माणूस. त्यांना खऱ्याचं खोटं आणि खोट्याचं खरं करायचं लायसनच मिळालेलं असतंय. लहानपणी तर आण्णा सांगायचे, ‘कधी प्रसंग आला तर दोन म्हणता चार पावलं मागं सरायचं. पण वकिलांच्या आणि कोर्ट-कचेरीच्या नादाला कधी लागायचं नाही.’ पण आज मात्र या सगळ्या गोष्टी बाजूला सारून नेमकं नको त्या वाटेला जावं लागत होतं. आता कोण आणि कसला वकील भेटतोय काय माहीत?
दुपार सरत आली होती. घाटे वकिलांच्या कार्यालयाच्या खिडकीबाहेर आभाळ भरून आलं होतं. गार वारा सुटला होता. मक्याच्या दाण्याएवढा एक एक थेंब पडत होता… पण तुरळकच. थोड्याच वेळात धाडधाड पाऊस कोसळणार अशी चिन्हं दिसत होती. लगेच वारा सुटून पुन्हा आभाळ पांगत होतं. खिडकीच्या तावदानावर पावसाचे थेंब ओघळत होते.
ऑफिसमध्ये नेहमीची लगबग सुरू होती. बाहेरच्या बाकावर दोन पक्षकार आपापल्या फाइली घेऊन बसले होते. टेबलावर कायद्याची जाडजूड पुस्तके होती. संगणकाच्या झगझगीत पडद्यावर एखाद्या खटल्यातील अर्जांची अक्षरे चमकत होती. केबिनमध्ये कागदांची सळसळ सुरू होती… तेवढ्यात दार उघडलं. एक मध्यम वयाचा पुरुष आत आला. घाटे वकिलांनी चष्म्याच्या जाडजूड काचेतून त्याच्याकडे पाहिलं. त्याच्या मागे एक तरणीताठी बाई होती. पुरुषाने आजूबाजूला पाहिलं आणि सरळ समोरच्या खुर्चीत बसला.
बाई मात्र दाराशी क्षणभर थांबली. जणू आत यायचं की नाही, याचा निर्णय अजून तिच्या हातात नव्हता.
“या,” घाटे वकिलांनी म्हटलं.
ती हळूहळू आत आली. खुर्चीच्या अगदी टोकावर टेकली. कसायाला बघून भेदरलेल्या गाईसारखी ती घुगून बसली. पदर छातीवर ओढून घेतला. घाटे वकिलांनी तिच्याकडे पाहिलं. तिच्या कपाळावर कुंकू होतं. पण ते नेहमीसारखं वाटत नव्हतं. थोडं विस्कटलेलं. जणू घाईघाईत लावलं गेलं होतं.
हेही वाचा – हेच पक्ष कार्यकर्त्याचं वास्तव!
“काय काम आहे?” घाटे वकीलांनी विचारताच पुरुषाने बायकोकडे पाहिलं. ती काहीच न बोलता खाली पाहत राहिली.
“मी विशाल ढेरे…” बायकोकडे पाहून तो पुढे म्हणाला, “ही माझी पत्नी वैशाली ढेरे.”
“हिच्या माहेरकडच्या जमिनीचा वाद आहे म्हणून आम्ही तुम्हाला भेटायला आलो आहे.”
घाटे वकीलांनी तिच्याकडे पाहिले. तिचे ओठ हलले.
“मला…” आवाज घशातच अडकला. तिने खाकरून घसा साफ केला… “मला माझ्या भावावर वाटणीचा दावा ठोकायचा आहे.”
बाहेर पावसाचा जोरही वाढला. ताशा बडवल्यागत गॅलरीतला पत्रा वाजू लागला. घाटे वकिलांनी पुन्हा तिच्याकडे पाहिलं.
“सख्ख्या भावावर?”
तिने मान हलवली… “हो.”
“कशासाठी. कारण काय?”
तिने उत्तर दिलं नाही. तिच्या नवऱ्याने खुर्चीत सैलसर हालचाल केली… “कागद आहेत आमच्याकडे.”
“दाखवा.”
तिने मांडीवर ठेवलेली मोठी जुनी कापडी पिशवी उघडली. पिशवीतून कागद बाहेर येऊ लागले. जुने सातबारे… फेरफार नोंदी… खरेदीखतांच्या प्रती… कराच्या पावत्या.. बँकेची काही कागदपत्रं… आणि त्याखाली काही पोस्टाची पत्रं. घाटे वकिलांनी कागदांचा गठ्ठा हातात घेतला.
घाटे वकील एकेक पान उलटू लागले.
“हं…”
“ही जमीन तुमच्या वडिलांच्या नावावर होती?”
“हो.”
“मग भावाच्या नावावर कशी गेली?”
“माहीत नाही,” पहिल्यांदाच तिचा आवाज थोडा स्पष्ट झाला.
“तुम्ही याआधी भावाशी बोललात?”
ती शांत राहीली. काहीच बोलली नाही.
“बोललात का भावाशी?”
तिने नवऱ्याकडे पाहिलं. तो खिडकीबाहेर पाहत होता.
“नाही,” ती म्हणाली.
वकिलांनी कागद बाजूला ठेवले. तेवढ्यात त्यांच्या हाताला एक जुनं पोस्टाचं पत्र लागलं. कागद पिवळा पडला होता. कोपऱ्यावरच्या दुमडी झिजल्या होत्या. त्यांनी ते जीर्ण पत्र उघडलं. दोन ओळी वाचल्या. मग ते पुन्हा तिच्याकडे पाहू लागले.
“हे तुमच्या भावाचं पत्र आहे?”
तिने मान वर केली… “हो.”
“तुम्हाला पोस्टाने आलेली पत्रंही आहेत फाइलमध्ये?”
ती काही बोलली नाही. वकिलांनी पुन्हा त्या पत्राकडे पाहिलं.
“तुम्हा बहीणभावाचं एकमेकांवर प्रेम तर भरपूर दिसतंय.”
तिच्या चेहऱ्यावर काहीतरी हललं. बाईच्या पापण्या लवलवलल्या. डोळे ओले झाले.
“हे पत्र बघा…” वकिलांनी पत्रातील ओळी पुन्हा वाचल्या…
“आई-बाबा नाहीत म्हणून तू स्वतःला एकटी समजू नकोस. मी आहे ना. तुला थॅलेसेमिया नावाचा आजार आहे. दर सहा महिन्याला रक्त चढवावे लागते. आपल्या दोघांचा रक्तगट एकच आहे. त्यामुळे मी आतापर्यंत तुला रक्त देत आलो. यापुढेही माझ्या शेवटच्या श्वासापर्यंत तुला रक्त देत जाईन. काही काळजी करू नकोस.”
ऑफिसमध्ये एकदम थंड शांतता पसरली. बाहेर भुरभुरत्या पावसाने रस्त्यावर चिखल झाला होता. खडखडाट करत चिखल उडवत रस्त्यावरून एक बस निघून गेली. खिडकीची काच थरथरली.
“मग,” वकिलांनी शांतपणे विचारलं, “तुम्ही भावावर केस का करायला आलात?”
तिने पदराने कपाळ पुसलं. घामाचा एक थेंब तिच्या कानाजवळून खाली आला. तिने तोही पुसला. मग तिरक्या नजरेने नवऱ्याकडे पाहिलं. तो खुर्चीत रेलून निवांत बसला होता. तिची नजर त्याच्या नजरेला भिडली. फक्त दोन सेकंद… पण त्या दोन सेकंदांत तिच्या डोळ्यांतली सगळी भीती एकवटली होती. तिने मान खाली घातली. घाटे वकील काही बोलले नाहीत. ऑफिसमध्ये पंख्याचा घर्रघर्र आवाज स्पष्ट ऐकू येत होता.
विशाल तिच्याकडेच पाहत होता. तिने लगेच नजर खाली केली. तिच्या पायाची बोटं घट्ट होऊन आकसली होती. हातांच्या बोटांची चाळवाचाळव सुरू होती. घाटे वकिलांनी ते पाहिलं. पण काही बोलले नाहीत. काही क्षणांनी तिचा नवरा विशाल पुढे झुकला.
“साहेब…”
“बोला.”
“माझं आणि माझ्या मेव्हण्याचं भांडण झालंय.”
“कशावरून?”
तो हसला. ते हसू हसण्यासारखं नव्हतं. चेहरा आक्रसला होता… “मला कधीतरी दारू प्यायची सवय आहे.”
वैशालीच्या पापण्या खाली गेल्या. नजर भुईला झुकली.
“काल त्याला सहज फोन केला होता.”
“मग?”
“म्हटलं, बहिणीच्या हिश्श्याची एवढी जमीन खातोस… कधीतरी बहिणीला साडी घेऊन ये. सणासुदीला तरी बघत जा काहीतरी.”
वकील शांतपणे ऐकत होते.
“त्यावर त्याने मला…” तो थांबला.
“काय?”
“नको ते बोलला.”
“म्हणजे?”
“मला सुधारायला सांगू लागला,” त्याचा आवाज अचानक कठोर झाला… “मला म्हणतो, दाजी आता तरी दारू सोडा. मुलं मोठी होतायत. घराकडे जरा बघा.”
तो उगीचच हसला.
“साहेब, मला शिकवायला लागला तो!” त्याच्या आवाजात रागापेक्षा दुखावलेपणा अधिक होता.
“मग?”
“मग काय? आता त्याला सोडायचं नाही. इंगा दाखवायचा म्हणजे दाखवायचा. बहिणीचा हिस्सा द्यायला लावायचा.”
वकिलांनी विशालकडे पाहिलं. मग त्याच्या पत्नीकडे. वैशाली अजूनही खालीच पाहत होती.
0000
तिच्या डोळ्यांसमोर माहेरचं घर उभं राहिलं… मातीचं. पावसाळ्यात भिंतीला टेवलं येणारं. अंगणात तुळशीचा कट्टा. आई सकाळी खराट्याने अंगण झाडायची. नक्षीदार रांगोळी काढायची. आण्णा बाहेरच्या सोप्यात बसून चहा प्यायचे… आणि ती?
ती नेहमी भावाच्या मागे लागायची. तो शाळेला जायला निघाला की, तीही दप्तर घेऊन मागे निघायची. तो नदीवर जायचा, तर तीही मागे जायची. तो आंब्याच्या झाडावर चढला की, खाली उभी राहून,
“पडशील रे!” असं ओरडायची. तो हसायचा.
“तू खाली आहेस ना!”
मग एक दिवस आई गेली. घर पोरकं झालं. काही दिवसांनी आण्णा गेले. घर आणखी पोरकं झालं. पण ती एकटी राहिली नाही. पाठीशी भाऊ होता. भाऊबीजेच्या दिवशी तो तिच्या घरी यायचा. मोकळ्या हातांनी कधीच नाही. मुलांसाठी काहीतरी घेऊनच यायचा… कधी बालुशा… कधी फरसाण… कधी कपडे… तिच्यासाठी साडी. कधी हिरवी. कधी जांभळी. कधी तिच्या आवडीची मोरपंखी निळी.
“ताई, ही तुझ्यासाठी.”
ती म्हणायची, “कशाला आणतोस एवढं?”
तो म्हणायचा, “तू माझी ताई आहेस म्हणून.”
त्या दिवसानंतर त्याने कधी तिला आई-बापाची आठवण होऊ दिली नाही. दिवाळीला साडी. भाऊबीजेला ओवाळणी. नागपंचमीला माहेरी बोलावणं. मुलांच्या वाढदिवसाला फोन. एकदा तिच्या मुलाला ताप आला तर रात्री दोन वाजता गाडी घेऊन दवाखान्यात पोहोचला. तिच्या संसारात अडचण आली की, “ताई, काळजी करू नकोस. मी आहे.” हे त्याचं कायमचं वाक्य.
त्याच्या संसारातही फार काही नव्हतं. तसा तो श्रीमंत नव्हता. पण तिच्यासाठी त्याच्याकडे नेहमी काहीतरी असायचं. बहीण सुखी, तर मी सुखी असे त्याने ठरवूनच टाकले होते.
0000
दारू मात्र तिच्या संसारात हळूहळू वाढत गेली. सुरुवातीला आठवड्यातून एकदा. मग दोनदा. मग रोज. पगार आला की, आधी दारू. घरखर्च नंतर. मुलांची फी राहिली की, तिचा फोन भावाला.
“दादा…”
इतकंच ती म्हणायची. पलीकडून आवाज यायचा, “किती पाहिजेत?”
तो कधी विचारत नसे.
एकदा पन्नास हजार.
एकदा दीड लाख.
एकदा त्याहूनही अधिक.
पैसे घेताना मेव्हणा म्हणायचा, “लवकर देतो.”
भाऊ म्हणायचा, “घाई नाही.”
पैसे कधी परत आले नाहीत. भावानेही कधी हिशेब मागितला नाही. कारण त्याला बहिणीचा संसार वाचवायचा होता.
0000
“वैशाली मॅडम…”
वकिलांचा आवाज पुन्हा ऐकू आला. ती वर्तमानात आली.
हेही वाचा – बापाचा स्वाभिमान सर्वांत मोठा!
“तुम्हाला खरंच वाटतं का, की भावाने तुमचा हिस्सा खाल्लाय?”
ती काही बोलली नाही. वकिलांनी समोरचा सातबारा तिच्याकडे सरकवला.
“तुम्ही हा कागद वाचलाय?”
तिने कागदाकडे पाहिलं. अक्षरं धूसर झाली.
“नाही.”
“मग?”
ती शांत.
“केस तुम्हाला करायची आहे.”
तिने पुन्हा नवऱ्याकडे पाहिलं. तो तिच्याकडे पाहत नव्हता.
“हो…”
तिचा आवाज इतका मंद होता की, स्वतःलाच ऐकू आला की नाही, याची तिलाच खात्री नव्हती. वकिलांनी मान हलवली. पण त्यांच्या नजरेत प्रश्न होता.


