खूप दिवसांनी ललिता घरी आली आणि आमच्या गप्पांना ऊत आला. आज शनिवार तिच्या मुलाला आणि सुनेला सुट्टी. त्यांना मोकळेपणा मिळावा म्हणून आली असणार. ललिताचं आणि अनूचं अगदी मेतकूट, गूळपीठ म्हणतात तसे संबंध! दोघींचं छान जमतं. एकतर ललिताला मुलगी नाह, त्यामुळे कन्याप्रेमाचा सगळा वर्षाव सुनेवर होतो, हे तर खरं आहेच! पण मुलगी ती मुलगी आणि सून ती सून! ती मुलीसारखी असते, पण मुलगी नसते. ती खरी मुलगी तर तिच्या आईबाबांची असते! एकाच वेळेला दोन-दोन आईबाबांची मुलगी ती कशी होऊ शकणार? मनातल्या मनात ती दोघांमध्ये पहिला, दुसरा नंबर लावेलच ना! तरीपण ललिता आणि अनूचं नातं अगदी आमरस पुरीसारखं आहे.
तिच्या यशाचं रहस्य तिने पाळलेल्या नियमांत आहे. अनू घरी येऊन रुळल्यावर ललिताने जाहीर केलं – “न धरी शस्त्र करी; गोष्टी सांगेन युक्तीच्या चार… विचारल्यास!!!”
आता घरात कशाला तलवार, कट्यार, भाला, धनुष्यबाण घ्यावे लागणार आहेत… या सर्व शस्त्रांचं काम करायला एकटे शब्द पुरेसे आहेत की! पण ललिताचं साधं बोलणं पण मधात घोळलेलं, तुपात तळलेलं असतं. त्यामुळे तिला शब्दांच्या शस्त्रांची गरज कधी पडली नाही. तर शस्त्र म्हणजे झारे, चमचे, पातेली, सतेली, पोळपाट, लाटणे इत्यादी! या शस्त्रांना हाती घ्यायचं नाही; म्हणजे स्वयंपाकघरात पाऊल टाकायला नको! मग कशाला लागणार आहे भांड्याला भांडं!
म्हणाली, “आज अनू दहीवडे करणार आहे!”
“ए, मग आपण दोघीही तुझ्याकडेच जाऊयात ना, मला आवडतात दहीवडे!”
“नको गं बाई! मला पत्ता लागला म्हणून तर तुझ्याकडे आले. अनूचे दहीवडे, चकल्या, कडबोळी, लाडू म्हणजे ‘नैनं छिन्दन्ति शस्त्राणि नैनं दहति पावकः । न चैनं क्लेदयन्त्यापो न शोषयति मारुतः…’ असे असतात.”
हेही वाचा – बायका म्हणजे…!
“पण सांगत का नाहीस तू तिला तुझ्या ट्रिक्स?”
“सांगितलं नं तुला? माझं ब्रीदवाक्य आहे… ‘गोष्टी सांगेन युक्तीच्या चार… विचारल्यास!’ विचारलं नाही तर आमचं तोंड बंद! ती फोन ओट्यावर ठेवते, स्पीकर सुरू करते, नाहीतर व्हिडीओ कॉल करते आणि तिच्या आईला विचारते… नाहीतर युट्यूबवरचे व्हिडीओ बघून करते. शिकतेय एकलव्यासारखी तर काय वाईट आहे गं?”
“तू घरातून पळून येऊ शकतेस गं, पण तुझ्या मुलाचं काय! तो बिचारा कुठे जाणार? त्याला त्या दगड… आपलं दहीवड्याला तोंड द्यावं लागेल ना!”
“तो हुशार आहे गं, अशा वेळेला तो लाडात येऊन आधी तिला भरवतो… बहुतेक आधी गुटूरगू करणाऱ्या कबुतराच्या जोडीचं नंतर फिस्कारणाऱ्या मांजरांत रुपांतर होतं! आपण कशाला तिथे साक्षीला राहायचं… म्हणून तर आले तुझ्याकडे. आता गप्पा मारत नको बसूस… पेपरमध्ये बघ बरं, एखादं चांगलं नाटक आहे का! आता मी एकदम रात्रीच घरी जाणार आहे.”
हेही वाचा – पित्याचा निर्णय!
“ललिता, तुझ्या गीतेच्या अभ्यासाचा रोजच्या जीवनात छान उपयोग करून घेतला आहेस हं!” मला हसू पण येत होतं आणि तिचं कौतुक पण वाटत होतं. पेपर उघडून मी नाटकाच्या जाहिराती बघायला लागले.


