अध्याय तेरावा
समं पश्यन् हि सर्वत्र समवस्थितमीश्वरम् । न हिनस्त्यात्मनात्मानं ततो याति परां गतिम् ॥28॥
जे गुणेंद्रियधोकटी । देह धातूंची त्रिकुटी । पांचमेळावा वोखटी । दारुण हे ॥1068॥ हें उघड पांचवेंउली । हे पंचधा आंगी लागली । जीवपंचानना सांपडली । हरिणकुटी हे ॥1069॥ ऐसा असोनि इये शरीरीं । कोण नित्यबुद्धीची सुरी । अनित्यभावाचां उदरीं । दाटीचिना ॥1070॥ परी इये देहीं असतां । जो नयेचि आपणया घाता । आणि शेखीं पंडुसुता । तेथेंचि मिळे ॥1071॥ जे योगज्ञानाचिया प्रौढी । वोलांडूनियां जन्मकोडी । न निगों इया भाषा बुडी । देती योगी ॥1072॥ जें आकाराचें पैल तीर । जें नादाची पैल मेर । तुर्येचें माजघर । परब्रह्म जें ॥1073॥ मोक्षासकट गती । जेथें येती विश्रांती । गंगादि अपांपती । सरिता जेवीं ॥1074॥ तें सुख येणेंचि देहें । पायपाखाळणिया लाहे । भूतवैषम्यें नोहे । विषमबुद्धी ॥1075॥ दीपांचां कोडी जैसें । एकचि तेज सरिसें । तैसा जो असे । सर्वत्र ईशु ॥1076॥ ऐसेनि समत्वें पंडुसुता । जिये जो देखतसाता । तो मरण आणि जीविता । नागवे फुडा ॥1077॥ म्हणोनि तो दैवागळा । वानीत असों वेळोवेळां । जे साम्यसेजे डोळा । लागला तया ॥1078॥
हेही वाचा – सार्थ ज्ञानेश्वरी : छत्तीसही वानीभेद, तोडोनियां निर्विवाद
अर्थ
ईश्वर सर्वत्र समानत्वाने स्थित आहे, असे जाणणारा स्वत:चा स्वत: घात करत नाही. नंतर तो श्रेष्ठ गति (परब्रह्मस्वरूप) पावतो. ॥28॥
कारण की, देह हा, गुण व इंद्रिये यांची राहण्याची धोकटी आहे, देह हा (कफ, वात व पित्त या) तीन धातूंनी बनलेला आहे. हा पंचमहाभूतांचा समुदाय आहे. तो वाईट आहे व भयंकर आहे. ॥1068॥ हा देह म्हणजे उघड पांच नाग्यांची इंगळी आहे (अथवा) जीवास लागलेली ही पाच नांग्यांची इंगळी आहे (अथवा) जीवास लागलेली ही पाच प्रकारची आगच आहे. जीवरूप सिंहाला हा देह, हे हरिणाचे (राहाण्याचे) घरच सापडले आहे. ॥1069॥ त्याप्रमाणे देहात, हा जीव असा (सिंहासारखा) असंग, नित्य, शुद्ध, बुद्ध व स्वतंत्र असून आपण नित्य आहोत, अशी ही बुद्धिरूपी सुरी, अनित्य भावाच्या पोटात कशी चालवीत नाही? (आपल्या नित्यभावाच्या स्मृतीने अनित्यभावाचा नाश का करत नाही, हे एक आश्चर्य आहे). ॥1070॥ (येथपर्यंत देहाशी तादात्म्य करून असणार्या मूर्खाची स्थिती सांगितली व या ओवीपासून पुढे, मागे सांगितलेल्या भाग्यवान ज्ञानी पुरुषाचे वर्णन करतात). परंतु ज्ञानी पुरुष देहात असतांना (देहतादात्म्याने) आपल्या घातावर येत नाही. (म्हणजे आपला घात करून घेत नाही). आणि अर्जुना, शेवटी मरणानंतर तो तेथे (ब्रह्मस्वरूपात) मिळतो. ॥1071॥ कोट्यावधी जन्म ओलांडून, योग व ज्ञान यांच्या बलाने योगी लोक आपण त्या ब्रह्मस्वरूपातून (परत) बाहेर पडणारा नाही, अशा कृतनिश्चयाने, ज्या ब्रह्मस्वरूपाचे ठिकाणी बुडी देऊन रहातात ॥1072॥ जे आकाररूप नदीचा पलीकडला काठ आहे, (निराकार आहे) व जे ब्रह्म नादाची पलीकडली कड आहे (शब्दातीत आहे) व जे परब्रह्म तूरीयावस्थेचे मध्यघर (गाभा) आहे, ॥1073॥ ज्याप्रमाणे गंगा वगैरे नद्या समुद्राच्या ठिकाणी विश्रांतीला येतात, त्याप्रमाणे मोक्षसुद्धा सर्व साध्ये, जेथे (ब्रह्माच्या ठिकाणी) विश्रांतीला येतात. ॥1074॥ भूतांच्या भिन्नपणाने ज्याची बुद्धि भिन्न होत नाही (भेदाला पावत नाही) त्याला ते सुख याच देहात पाय धुण्यास प्राप्त होते. (म्हणजे विपुल मिळाते). ॥1075॥ कोट्यावधि दिव्यात जसे एका तेज सारखे असते, तसा जो ईश्वर सर्वत्र (चराचरात) भरलेला आहे ॥1076॥ अर्जुना, अशा समत्वाने (चराचराकडे) पाहात असता जो जगतो, तो खरोखर जन्ममरणाच्या आधीन होत नाही. ॥1077॥ म्हणून तो फार भाग्यवान आहे, असे आम्ही त्याचे वारंवार वर्णन करतो. कारण की, त्याला अभेदभावरूपी बिछान्यावर डोळा लागला आहे. ॥1078॥
क्रमश:
हेही वाचा – सार्थ ज्ञानेश्वरी : पैं नानाप्रयोजनशीळें, दीर्घें वक्रें वर्तुळें


