बऱ्याच दिवसांनी सुमन आणि दीपाची बाजारात भेट झाली. तसं बघितले तर, दोघीजणी लहानपणापासून मैत्रिणी. दोघींची लग्न झाली एकाच गावात. पण रोज भेटणाऱ्या मैत्रिणी नंतर धावपळीत कधीतरी भेटू लागल्या. तसं तर, दोघींची एकत्र कुटुंबात लग्न झालेली, पण सुनमच्या घरी थोडे अध्यात्मिक वातावरण होते; तसे दीपाकडे नव्हते. दोघींच्या घरी सासू-सासरे आहेत. दोघींचे यजमान पण चांगल्या ठिकाणी नोकरीला… तसेच या दोघीजणी पण चांगल्या ठिकाणी नोकरीला आहेत. दोघींची मुलं पण चांगल्या शाळेत शिकत आहेत. एकूण काय तर सगळं कसं छान चाललंय…
आज बाजारात भेटल्यावर दोघींना खूप आनंद झाला आणि जवळच असलेल्या हॉटेलमध्ये जाऊन चहा प्यायचा, असे ठरले… त्यानिमित्ताने गप्पा होतील ना!
दोघांच्या गप्पा सुरू झाल्या… उद्या एकादशी त्यात सुट्टी सगळ्यांना, मग काय काय फराळाचे होणार, हे सुमन सांगत होती. सासू-सासरे चातुर्मासात काय काय करतात, त्यामुळे या चार महिन्यांत आमच्याकडे कसे आनंदी वातावरण असते… मुले पण कशी येणाऱ्या सणांसाठी उत्साही असतात… सुमन अगदी भरभरून सांगत होती. प्रत्येक सण, त्यानिमित्त होणारी पूजा, कहाणी वाचन, नैवेद्य ती नोकरी संभाळून अगदी आनंदाने, उत्साहाने करते, हे तिच्या बोलण्यातून दीपाला समजत होते.
दीपाला खूप कौतुक वाटत होते. बराच वेळ झाला, दीपा काहीच बोलत नाही आपणच बोलत आहोत हे सुमनच्या लक्षात आले. सुमनने दीपाला तू कसे सगळे जुळवून घेते, ते विचारले. दीपाने सांगितले, “आम्ही पण उद्या उपवास करतो. पण खरंतर या पावसाळी वातावरणात जास्त जड खाणं पचतही नाही आणि सोसतही नाही म्हणून आम्ही फळं खातो… अगदीच वाटलं तर थोडी-थोडी भगर करते. संध्याकाळी मात्र काही खातं नाही,” असे सांगितले.
हेही वाचा – दान… गरज फक्त सत्पात्राची!
“उद्या सुट्टी आहे, त्यामुळे तर आमच्याकडेही उत्साहाचे वातावरण आहे, पण तो उत्साह यासाठी की, उद्यापासून चार महिने आम्हाला काहीतरी व्रत करायचे असते आणि ते माझे सासू-सासरे आम्हाला सांगतात.”
सुमन म्हणाली, “व्रत वेगळे काय सांगायचे. ते तर सगळे आपल्या ग्रंथांमध्ये, अगदी चातुर्मासाच्या पुस्तकामध्ये पण सांगितले आहे की!”
दीपा म्हणाली, “तुझे बरोबर आहे. वेगवेगळे सण, पूजा, त्यासंबंधीच्या कहाण्या हे तर सगळे आपल्या ग्रंथांमध्ये सांगितले आहेच. पण आमची पद्धत थोडी वेगळी आहे. म्हणजे, आम्ही पण सगळे सण साजरे करतोच, कहाण्या वाचतो, पण जुन्या पद्धतीबरोबर एखादी नवीन वेगळी पद्धत आत्मसात करून!”
सुमनला आता उत्सुकता वाटू लागली आणि ती दीपाचे बोलणे मन लावून ऐकू लागली.
दीपा सांगू लागली, “दरवर्षी आम्ही एक विषय घेतो आणि तो चार महिने व्रत म्हणून त्यावर काम करतो. जसं की, पुस्तक वाचन – चार महिने कितीही काहीही होवो पुस्तकाची काही पानं वाचल्याशिवाय झोपायचे नाही. यामुळे चार महिन्यांत घरातील सर्वांचे आपापल्या आवडीनुसार पुस्तक वाचन होते. जेव्हा कोणाचे एखादे पुस्तक वाचून होते, त्यावेळी रात्री जेवणानंतर तो त्या पुस्तकाबद्दल सगळ्यांना सांगतो. आम्ही घरात पाचजण चार महिन्यांत साधारण प्रत्येकी एक पुस्तक जरी म्हटले तरी सगळ्यांची मिळून कमीत कमी 20 पुस्तकं! ती वाचून झाली की, वेगवेगळ्या प्रकारच्या पुस्तकांबद्दल माहिती समजते. तुला सांगू का सुमन मागच्या वर्षी तर खूपच भारी विषय आई-बाबांनी सांगितला होता. सोमवार ते शुक्रवार प्रत्येकाला एक-एक दिवस सांगितला होता; त्या-त्या दिवशी संध्याकाळी ज्यांचा वार असेल त्याने काहीतरी स्वयंपाक करायचा. संध्याकाळी असेही जास्त कोणी जेवत नाही. सणाच्या दिवशी तर नकोच वाटते, संध्याकाळी जर काही वेगळेच काही खायला मिळाले की, मजा येते. माझे सासू-सासरे तर करतातच, पण हौसेने माझा नवरा आणि मुलगा पण स्वयंपाक करतो. नुसता स्वयंपाक करायचा नाही तर, नंतर सगळे आवरून पण ठेवायचे. यामुळे किती छान सवयी लागल्या, कितीतरी गोष्टी साध्य झाल्या. जसे की, अन्नाला नावे ठेवायची नाही… बनवणाऱ्यांच्या कष्टाला कमी लेखायचे नाही… कौतुक करायचे अशा कितीतरी… आम्ही तर सगळे उद्या सकाळची खूप आतुरतेने वाट बघत असतो.”
सुमनला चातुर्मासाचा हा नवीन पैलू समजला. तिला पण अनेक गोष्टी समोर दिसू लागल्या. तिच्या घरातील वातावरण पण नवीन गोष्टींना नेहमीच प्रोत्साहन देते, हे पण तिच्या लक्षात होते. त्यामुळे घरी गेल्यावर सगळ्यांबरोबर बोलायचे, हे सुमन ने ठरवले.
दीपा सांगत होती, “बघ, विषय आई-बाबा सुचवतात म्हणजे नकळत आम्ही आमच्या मुलाला त्यांचे महत्त्व पण सांगतो. सगळ्यांनी एकत्रित काम करायचे कोणी लहान-मोठे नाही, हेही सांगतो. सगळ्यांच्या विचारांचा मान ठेवायला हवा, याचीही जाणीव कृतीमधून करून देतो. शेवटी काय गं ‘संस्कार’ म्हणजे वेगळे काय असते? ते असे “बस, मी तुझ्यावर संस्कार करतो…” असे म्हणून देण्याची गोष्ट नाही ना ती! आपल्याला आपल्या कृतीमधूनच दाखवावी लागते. तुला लक्षात आहे का –
“Don’t worry that children never listen to you. Worry that they are always watching you.” — Robert Fulghum यांची ही ओळ? आपण वाचलेली ही ओळ किती खरी आहे!
हेही वाचा – आश्वस्त करणारी मिठी
म्हणून हा चार महिन्यांचा काळ आम्ही आपल्या मनातील विकारांना विश्रांती देऊन सद्गुणांना जागृत करण्याचा काळ आहे, असे समजतो.”
सुमन हे सगळे ऐकून खूपच खूश झाली होती. एक वेगळीच ऊर्जा तिच्यामध्ये आली होती, वेगळा दृष्टिकोन घेऊन सुमनने दीपाचा निरोप घेतला…
मग काय, तुम्ही काय करणार का, असे एखादे नवीन व्रत? चार महिने करायचे… उतायचे नाही, मारायचे नाही, घेतलेले व्रत पूर्ण करायचे!


