गणपती, गौरीच्या आगमनाचे दिवस जवळ आले. नेहमीप्रमाणे त्याची तयारी सुरू केली. माझं काम सुरू होतं. मधे जरा दमल्यासारखं झालं म्हणून बसले… शेजारी कोणीतरी आहे असा भास झाला… बघते तर माझी गौरीमायच समोर दिसली. अगदी माझ्याकडे मुखवटे आहेत तशीच!
सर्वांग सुंदर… हसरा चेहरा… अतिशय गोड चेहऱ्याची… शांत नजरेनं बघत होती…
मला आश्चर्य वाटले. काही सुचेना. तिच्याकडे बघतच बसले. मधुर आवाजात ती म्हणाली,
“ओळखलसं ना मला?”
“अगं हो गं… तू अशी… आत्ता अचानक कशी आलीस?”
गौरी मायला बघून मला अत्यंत आनंद झाला होता. मात्र तिला असं अकस्मात् समोर बघून मी गडबडून गेले होते.
“का आले ते सांगते… ये इथं. बैस शांतपणे माझ्याजवळ. तुझ्याशी थोडं बोलायचं आहे, त्यासाठी मी आले आहे. मला जवळ बसवून गौरी मायने बोलायला सुरुवात केली…
“लेकरा, माझ्या येण्याची तयारी सुरू केलीस म्हणून आधीच तुला भेटायला आले. मी येणार म्हणून काय करू अन् काय नाही, असं तुला होतं… त्याचं मला समाधान वाटतं. पण खूप काम करून दमून नको जाऊस… सण साजरा करताना त्यातला आनंद घ्यायला शिक.
लेकीबाळी नोकरी करणाऱ्या आहेत. त्या दिवसभर ऑफिसात कामं करत असतात… तेव्हा लक्ष्मी घरात येते… त्याच घराची खरी लक्ष्मी आहेत, हे विसरू नकोस! त्यांना समाधानात ठेव. त्या आनंदात असतील, तर घर सुखात असतं…
उगीच स्वतःचा मोठेपणा दाखवायला जाऊ नकोस. ‘हे कर…’, ‘ते केलंच पाहिजे…’ असं म्हणत बसू नकोस. ‘आपल्या घराण्यात अशी परंपरा आहे…’, ‘आपल्यात हीच रीत आहे…’, ‘माझ्या सासुबाईंनी मला हे शिकवलं…’, ‘वर्षांनुवर्ष हे चालू आहे…’ वगैरे पालुपद तर, अजिबात लावू नकोस. काळानुरूप वागायला शिक. इतरांनी काही बदल सुचवला तर जरूर कर… आणि तो करताना मनात भीती नको गं ठेवूस… माझ्यावर प्रेम करतेस ना, मग मला भ्यायचं कशाला? आणि आईला कोणी कधी भीतं का?
हेही वाचा – माझा गणपती बाप्पा
अजून एक सांगते, ते नीट ऐक… पूर्वी एकत्र कुटुंब पद्धती होती. घरात खाणारी माणसं होती. आता तसं नाहीये, हे लक्षात घे.
माझ्यासाठी हे करतेस ना? तर मग माझ्या मनातलं एक खरं सांगू?
मला हे काही नको असतं गं! आल्या दिवशी तू केलेल्या भाजी भाकरीवर मी तृप्त असते बघ… घरोघरी जाऊन तुम्ही सर्वजण कसे आहात? सुखात आहात ना, हे मला बघायचं असतं. तुमच्याशी बोलायचं असतं. मायेने, आनंदाने, त्या ओढीने मी येत असते गं… घडीभर माझ्याजवळ नुसती बसत जा. मनातलं सांगत जा… मलाही तुझ्याकडे प्रेमानी बघायच असतं.
सजावटीच्या गडबडीत तुझा पहिला दिवस जातो. दुसऱ्या दिवशी जेवणाची गडबड…
हो, आणि जेवणाचं आता मी सांगते तसचं कर! करायलाच हव्यात म्हणून भाज्या, कोशिंबिरी, भजी, वडे, पाच गोड पदार्थ, भातांचे प्रकार… इतकं सारं करतेस, तुझं हे करून होईपर्यंत दोन-अडीच वाजतात. घरातले भुकेजून जातात… याचा पण विचार कर…
एवढे करतेस ते संपत नाही. मग राहिलेल्या अन्नाचं काय करतेस ते आठव बरं! हे योग्य आहे का? शेतकरी बिचारा राब राब राबतो त्या अन्नाचा आदर कर. संपेल इतकच कर… चार पदार्थ कमी केले म्हणून बाळा मी तुझ्यावर रागवेन का कधी? मला ओळखतेस ना तू? मग आता शहाणी हो! काहीजण राहिलेलं अन्न गुरांना घालतात. गुरं पण त्या शिळ्या अन्नाला तोंड लावत नाहीत… फार नासाडी होते अन्नाची… बघवत नाही बघ. म्हणून यावर्षी आगोदर तुला समजावून सांगायला आले आहे… सणाची मजा घे, हसत आनंदात तो साजरा कर…
आणि हे बघ आईच ऐकायचं… आईचा लेकीला सांगायचा हक्कच असतो ना… म्हणून बाळा मायेने सांगितलं… तशी तू हुशार, समजूतदार, शहाणी आहेस.
हेही वाचा – आपला धर्म आणि संस्कृती
यावेळेस फार छान साडी घेतली आहेस माझ्यासाठी… आवडली बरं का. सुनबाईने घेतलेलं नव्या पद्धतीचं गळ्यातलं झकास आहे. आता सजून घ्यायला, तुम्हा सगळ्यांना भेटायला… आशीर्वाद द्यायला येते की! भेटू आपण लवकरच…”
आईचं बोलणं ऐकता ऐकता माझे डोळे भरून आले होते. गौरी माय कुठे आहे बघायला लागले… खरंच ती आली होती का? आलीच असणार लेकीची काळजी आईलाच असते! इतकं आपुलकीने बोलणारी तीच तर असते. तिला हात जोडले आणि आश्वासन दिलं…
“आई, तू सांगितलेलं लक्षात ठेवीन आणि तशीच वागेन…”
आपल्या गौरी मायच सांगणं तुम्ही पण लक्षात ठेवा बरं का!


