दर्शन कुलकर्णी
- आज, दिनांक : 14 सप्टेंबर 2026; वार : सोमवार
- भारतीय सौर : 23 भाद्रपद शके 1948; तिथि : तृतीया 07:06; नक्षत्र : चित्रा 13:54;
- योग : ब्रह्मा 12:45; करण : वणिज 19:20;
- सूर्य : सिंह; चंद्र : तुळ; सूर्योदय : 06:25; सूर्यास्त : 18:44;
- पक्ष : शुक्ल; अयन : दक्षिणायन; संवत्सर : पराभव;
- शालिवाहन शक : 1948; विक्रम संवत : 2082; युगाब्द : 5128
हरितालिका तृतीया
स्वर्णगौरी व्रत
श्रीगणेश चतुर्थी
पार्थिव गणपती पूजन
वेद कन्सल्टन्सी / 9987433660
दिनविशेष
नट, दिग्दर्शक पार्श्वनाथ यशवंत आळतेकर
टीम अवांतर
मराठीतील नट, दिग्दर्शक, नाट्यसंस्थाप्रवर्तक आणि नाट्यशिक्षक म्हणून ओळखले जाणारे पार्श्वनाथ यशवंत आळतेकर यांचा जन्म 14 सप्टेंबर 1898 रोजी रत्नागिरी जिल्ह्यातील खारेपाटण या गावात झाला. बी.ए. पर्यंतचे शिक्षण घेतल्यानंतर त्यांनी रंगभूमी आणि चित्रपटविश्व या दोन्ही क्षेत्रात आपल्या कार्यकर्तृत्वाचा ठसा उमटवला.
1924 पासून आळतेकर यांनी मूकपटांमध्ये काम करण्यास सुरुवात केली. केवळ नट म्हणूनच नव्हे, तर दिग्दर्शक म्हणूनही त्यांनी आपली वेगळी ओळख निर्माण केली. ‘इंपिरियल’, ‘सरस्वती सिनेटोन’, ‘रणजित’ आणि ‘नटराज फिल्म्स’ यांसारख्या नामांकित चित्रपटसंस्थांमध्ये त्यांनी काम केले. याशिवाय त्यांनी दिग्दर्शित केलेल्या मूकपट तसेच बोलपटांमध्ये संभाजी, साथी–सवंगडी (हिंदी-मराठी), सुखाचा शोध (हिंदी-मराठी), गीता (हिंदी-मराठी), महात्मा विदुर (हिंदी-मराठी) हे चित्रपट विशेष उल्लेखनीय ठरले. हिंदी, मराठी व्यतिरिक्त कन्नड तसेच तमिळ चित्रपटांचेही दिग्दर्शन करून त्यांनी आपल्या कर्तृत्वाला कोणत्याही भाषेचे बंधन नाही हे सिद्ध केले.
हेही वाचा – ‘तहादेर कथा’… आदर्शांच्या मृत्यूची कथा
आळतेकरांनी मराठी रंगभूमीच्या क्षेत्रात मोठे योगदान दिले. अगदी सुरुवातीला त्यांनी नंदू खोटे यांच्या ‘रेडिओ स्टार्स’ या नाट्यसंस्थेत काही काळ काम केले. या संस्थेमार्फत श्री. न. बेंडे लिखित ‘बेबी आणि पांचाली’, टिपणीस यांचे ‘स्वस्तिक बँक’, तसेच ठाकरे यांचे ‘खरा ब्राह्मण’ ही नाटके रंगभूमीवर आणली. कालांतराने त्यांनी ‘रेडिओ स्टार्स’ सोडून ‘नाट्यमन्वंतर’ या संस्थेत नट आणि सहकारी म्हणून काम केले.
त्यांच्या नाट्यदृष्टीत सातत्याने प्रयोगशीलता आणि पाश्चात्य नाट्यशैलींचा प्रभाव दिसून येतो. 1938 ते 1944 या कालावधीत त्यांनी ‘नॅशनल थिएटर ॲकॅडमी’ ही संस्था चालवली. अभिनयाचे शास्त्र, आवाजाची जपणूक आणि रंगकलेचे प्रशिक्षण देणारी ही संस्था म्हणजे मराठी रंगभूमीसाठी एक मोलाची देणगी होती. या अकादमीतील विद्यार्थ्यांच्या सहकार्याने त्यांनी 1941 मध्ये ‘लिट्ल थिएटर’ ची स्थापना केली. इंग्लंडमधील ‘लिट्ल थिएटर्स’ आणि अमेरिकेतील ‘कम्युनिटी थिएटर्स’ यांचा प्रभाव या प्रयोगशील संस्थेवर होता. या संस्थेच्या माध्यमातून त्यांनी माझ्या कलेसाठी आणि सारस्वत ही मामा वरेरकर यांची नाटके रंगभूमीवर आणली.
नट म्हणून आळतेकरांच्या अभिनयात योजनाबद्धता, परिश्रम आणि सखोल विचार यांचा संगम दिसतो. त्यांच्या गाजलेल्या भूमिकांमध्ये अण्णासाहेब (आंधळ्यांची शाळा), रामशास्त्री (भाऊबंदकी), बापूसाहेब (रंभा) यांचा विशेष उल्लेख करता येईल. साकारलेल्या प्रत्येक व्यक्तिरेखेचे मनोविश्लेषण अचूक साकारत त्यांनी प्रेक्षकांच्या मनावर छाप सोडली.
1957 साली सोलापूरच्या ‘अभिनय साधना मंदिर’ संस्थेतर्फे भरलेल्या नाट्यसंमेलनाच्या एकोणचाळिसाव्या अधिवेशनाचे अध्यक्षस्थान आळतेकरांना लाभले. हे त्यांच्या नाट्यदृष्टीची मोठी मान्यता मानली जाते. 22 नोव्हेंबर 1959 रोजी कोल्हापूर येथे त्यांचे निधन झाले. मात्र त्यांची कला, त्यांचे प्रयोगशील कार्य आजही जिवंत आहे.
1964 पासून त्यांच्या स्मरणार्थ ‘अभिनय’ संस्थेच्या वतीने मुंबईतील हौशी नाट्यसंस्थांसाठी नाट्यस्पर्धा आयोजित केल्या जात आहेत. या स्पर्धा म्हणजे त्यांच्या कलात्मक वारशाचे जिवंत प्रतीक आहे. पार्श्वनाथ यशवंत आळतेकर यांनी मराठी रंगभूमीकडे मनोरंजनाचे व्यासपीठ म्हणून न बघता, तिला प्रयत्नपूर्वक प्रयोगशीलतेचा आणि शिक्षणाचा वारसा दिला. आधुनिक पाश्चात्य नाट्यप्रणालींचा मराठी रंगभूमीवर केलेला त्यांनी केलेला प्रयोग, शास्त्रशुद्ध अभिनयाची त्यांनी केलेली जपणूक आणि नव्या पिढीस दिलेले प्रशिक्षण हीच त्यांची खरी ओळख बनली.
आजचे राशिभविष्य
मेष – गणपती बाप्पांच्या स्वागतासाठी आज तुमचे लक्ष कुटुंब आणि घरगुती बाबींकडे अधिक असेल. आजच्या दिवशी तुमचे विचार व्यावहारिक ठेवा. आर्थिक परिस्थिती स्थिर राहील आणि भविष्यातील योजना आखण्यासाठी दिवस चांगला आहे. भावनेच्या आहारी जाऊन अनावश्यक खर्च टाळा. करिअर अतिशय उत्तम राहील. तणाव, झोप किंवा पचनाशी संबंधित किरकोळ आरोग्य समस्या उद्भवू शकतात, त्यामुळे मन शांत ठेवा.
वृषभ – गणपती बाप्पाच्या कृपेने आजचा दिवस प्रवास, वैयक्तिक प्रयत्न आणि आपले म्हणणे प्रभावीपणे मांडण्यासाठी चांगला असेल. आर्थिक परिस्थिती सुधारण्याची शक्यता आहे. उत्पन्न वाढवण्यासाठी किंवा गुंतवणूक करण्यासाठी चांगल्या योजना आखू शकता. मात्र दिखाऊपणावर जास्त खर्च करणे टाळा. तुमच्या संवाद कौशल्यामुळे एखादी महत्त्वाची चर्चा यशस्वी होऊ शकते. अर्थात घाईने निर्णय घेणे टाळा. मानसिक थकवा टाळण्यासाठी पुरेशी विश्रांती घेणे आवश्यक आहे.
मिथुन – आज तुमचे लक्ष पैसा, बचत आणि कौटुंबिक जबाबदाऱ्यांवर असेल. तुमचे संभाषण कौशल्य आणि आत्मविश्वास लोकांना प्रभावित करेल, ज्यामुळे तुमची सामाजिक प्रतिष्ठा वाढेल. मात्र मानसिक ताण किंवा गोंधळामुळे कोणताही निर्णय घेणे टाळा. प्रलंबित रक्कम मिळण्याची शक्यता आहे, परंतु अविचारीपणे खर्च करणे टाळा. तुमची सर्जनशीलता आणि ओळखी तुमच्या करिअरसाठी फायदेशीर ठरतील. तुमचे वरिष्ठ तुमच्या प्रतिभेची प्रशंसा करू शकतात. मनःस्थितीतील चढ-उतार टाळण्यासाठी, शांत वातावरणात स्वतःला वेळ द्या.
कर्क – गणेशाच्या कृपेने आज अंतर्ज्ञान प्रबळ असेल. स्वतःच्या वैयक्तिक निर्णयांबद्दल पूर्वीपेक्षा अधिक स्पष्टता जाणवू शकते. आर्थिक बाबी स्थिर राहतील, भविष्यात गुंतवणुकीच्या चांगल्या संधी उपलब्ध होऊ शकतात, परंतु भावनेच्या आहारी जाऊन खर्च करणे टाळा. करिअरमध्ये जबाबदाऱ्यांचा दबाव जाणवू शकतो, परंतु तुमची समज आणि भावनिक संतुलन परिस्थिती हाताळण्यास मदत करेल. जास्त विचार केल्याने झोपेवर किंवा पचनक्रियेवर परिणाम होऊ शकतो, त्यामुळे विश्रांतीला प्राधान्य द्या.
सिंह – आत्मपरीक्षण आणि आध्यात्मिक कार्यांकडे आज कल वाढू शकतो. तथापि, जास्त विचार केल्याने मानसिक थकवा आणि अस्वस्थता येऊ शकते. तुमचा व्यावहारिक दृष्टिकोन तुम्हाला तुमच्या करिअरमध्ये पुढे नेईल आणि मोठी जबाबदारी स्वीकारण्याचे धैर्य देईल. चैनीच्या वस्तू किंवा प्रवास यामुळे अचानक खर्च वाढू शकतो, त्यामुळे आपल्या बजेटची काळजी घ्या. ध्यान किंवा शांत वातावरणात वेळ घालवणे तणाव कमी करण्यासाठी फायदेशीर ठरेल.
कन्या – बाप्पांच्या कृपेने आज, तुम्हाला मित्र, सहकारी आणि सामाजिक संपर्कांमधून महत्त्वपूर्ण लाभ मिळू शकतात. तुमचा आत्मविश्वास वाढेल, निर्णयक्षमता सुधारेल. सामायिक जबाबदाऱ्या किंवा आर्थिक बाबींशी संबंधित काही भावनिक दबाव तुम्हाला जाणवू शकतो, त्यामुळे संयम बाळगा. करिअरमध्ये तुमच्या मेहनतीची आणि प्रतिभेची दखल घेतली जाऊ शकते. आरोग्य सामान्य राहील, परंतु तणाव आणि मनःस्थितीतील चढउतार टाळण्यासाठी स्वतःच्या आहार आणि विश्रांतीकडे लक्ष द्या.
तुळ – आज तुमचे संपूर्ण लक्ष तुमच्या करिअर, जबाबदाऱ्या आणि सामाजिक प्रतिष्ठेवर असेल. कामाच्या ठिकाणी तुमची समज आणि भावनिक संतुलन तुम्हाला इतरांपेक्षा वेगळे ठरवू शकते. अनुभवी व्यक्तींचा पाठिंबा आणि तुमची सर्जनशील विचारसरणी तुम्हाला पुढे जाण्यास मदत करेल. आर्थिक परिस्थिती स्थिर राहील. भविष्यातील सुरक्षिततेसाठी गुंतवणुकीचे नियोजन करू शकता, परंतु दिखाऊपणासाठीचा खर्च टाळा. मानसिक थकवा टाळण्यासाठी, हलका व्यायाम करा, पुरेशी विश्रांती घ्या.
वृश्चिक – आज बाप्पांची तुम्हाला मोठी साथ मिळणार आहे. धार्मिक किंवा आध्यात्मिक कार्यांमधील तुमची आवड वाढू शकते. वाढलेला कामाचा भार आणि दैनंदिन जबाबदाऱ्यांमुळे शारीरिक थकवा येऊ शकतो. करिअर-संबंधित निर्णयाबाबत तुम्ही संभ्रमात असाल, तर घाई करू नका. आर्थिक परिस्थिती हळूहळू सुधारेल. गुंतवणूक किंवा संयुक्त आर्थिक बाबींमधून फायदा होऊ शकतो. तथापि, जोखमीच्या गुंतवणुकी टाळा. आज अंगदुखी किंवा तणाव जाणवू शकतो, त्यामुळे मानसिक शांतीसाठी ध्यान आणि विश्रांतीचा अवलंब करा.
हेही वाचा – ऑपरेशन
धनु – आज तुमच्या मनात दडलेल्या चिंता किंवा असुरक्षिततेची भावना उफाळून वर येऊ शकते, त्यामुळे स्वतःला विनाकारण ताण देणे टाळा. गणपती बाप्पा तुम्हाला आत्मविश्वास आणि सर्जनशील ऊर्जा देईल, परंतु अनावश्यक जोखीम पत्करण्याच्या तुमच्या प्रवृत्तीवर तुम्हालाच नियंत्रण ठेवावे लागेल. काम आणि आरोग्याशी संबंधित बाबींमध्ये शिस्त राखणे आवश्यक असेल. आर्थिकदृष्ट्या, दिवस सामान्य राहील. जोखमीच्या गुंतवणुकी करणे किंवा भावनिकदृष्ट्या वाहवत जाऊन अनावश्यक खर्च करणे टाळा. करिअरमधील व्यावहारिक विचारसरणी तुम्हाला तुमच्या जबाबदाऱ्या सहजतेने पार पाडण्यास मदत करेल.
मकर – आज नातेसंबंध आणि भागीदारीशी संबंधित बाबींवर विशेष लक्ष दिले जाईल. बाप्पांच्या आशीर्वादाने आत्मविश्वास आणि व्यावहारिक निर्णयक्षमता मजबूत राहील. कामाच्या ठिकाणी प्रगतीच्या संधी उपलब्ध होतील, मात्र वाढलेल्या जबाबदाऱ्यांमुळे मानसिक थकवा येऊ शकतो. घरात तणाव किंवा वाद होण्याची शक्यता आहे, त्यामुळे हट्टीपणा टाळा. आर्थिक स्थिरता टिकून राहील, ज्यामुळे दीर्घकालीन योजना अधिक मजबूत होतील, परंतु चैनीच्या वस्तूंवरील अनावश्यक खर्च टाळा. नातेसंबंधातील तणावामुळे मानसिक शांततेवर परिणाम होऊ शकतो, त्यामुळे शांत राहण्याचा प्रयत्न करा. तुमचे करिअर स्थिर राहील.
कुंभ – आज काम, आरोग्य आणि दैनंदिन जबाबदाऱ्या यामुळे संपूर्ण दिवस व्यस्त असाल. कामाचा ताण वाढू शकतो, तुम्हाला मध्येच गोंधळल्यासारखे किंवा चिंताग्रस्त वाटू शकते. अर्थात गणेशाच्या कृपेने परिस्थिती व्यवस्थितपणे हाताळू शकाल. तुम्हाला संभाषणात आत्मविश्वास वाटेल, पण कठोर शब्द टाळा. आर्थिक परिस्थिती स्थिर राहील, परंतु घरगुती गरजांसाठी बजेटमध्ये राहूनच खर्च करणे महत्त्वाचे आहे. आज थकवा किंवा पचनाच्या समस्या जाणवू शकतात, त्यामुळे पुरेशी झोप आणि पाणी घ्या.
मीन – आज तुमची कल्पनाशक्ती, सर्जनशीलता या भावना प्रबळ असतील. संततीशी संबंधित बाबींकडेही लक्ष द्याल. तुमची निर्णयक्षमता सुधारेल, संयमामुळे तुम्ही भावनिक परिस्थिती चांगल्या प्रकारे हाताळू शकाल. आर्थिक बाबींमध्ये व्यावहारिक दृष्टिकोन ठेवा. अनावश्यक खर्च आणि जोखमीच्या गुंतवणुकी टाळा. मानसिक संवेदनशीलतेमुळे झोपेवर परिणाम होऊ शकतो, त्यामुळे योग आणि ध्यान उपयुक्त ठरेल. तुमच्या करिअरमध्ये तुमच्या सर्जनशीलतेचे खूप कौतुक होईल; शिस्त राखणे महत्त्वाचे आहे.


