अध्याय तेरावा
पुरुषः प्रकृतिस्थो हि भुक्ते प्रकृतिजान् गुणान् । कारणं गुणसंगोऽस्य सदसद्योनिजन्मसु ॥21॥
जे अनंगु तो पेंधा । निकवडा नुसधा । जीर्णु अतिवृद्धा- । पासोनि वृद्धु ॥980॥ तया आडनांव पुरुषु । एऱ्हवीं स्त्री ना नपुंसकु । किंबहुना एकु । निश्चयो नाहीं ॥981॥ अचक्षु अश्रवणु । अहस्तु अचरणु । रूप ना वर्णु । नाम आथी ॥982॥ अर्जुना कांहींचि जेथ नाहीं । तो प्रकृतीचा भर्ता पाहीं । कीं भोगणें ऐसयाही । सुखदुःखांचें ॥983॥ तो तरी अकर्ता । उदासु अभोक्ता । परी इया पतिव्रता । भोगविजे ॥984॥ जियेतें अळुमाळु । रूपा गुणाचा चाळढाळु । ते भलतैसाही खेळु । लेखा आणी ॥985॥ मा इये प्रकृती तंव । गुणमयी हेंचि नांव । किंबहुना सावेव । गुण तेचि हे ॥986॥ हे प्रकृती क्षणीं नीच नवी । रूपाचीच आघवी । जडातेंही माजवी । इयेचा माजु ॥987॥ नांवे इया प्रसिद्धें । स्नेहो इया स्निग्धें । इंद्रियें प्रबुद्धें । इयेचेनि ॥988॥ कायि मन हें नपुंसक । कीं ते भोगवी तिन्ही लोक । ऐसें अलौकिक । करणें इयेचें ॥989॥ हे भ्रमाचे महाद्वीप । व्याप्तीचेचि रूप । विकार उमप । इया केले ॥990॥ हे कामाची मांडवी । हे मोहवनींची माधवी । इये प्रसिद्धचि दैवी । माया हे नाव ॥991॥ हे वाङ्मयाची वाढी । हे साकारपणाची जोडी । प्रपंचाची धाडी । अभंग हे ॥992॥ कळा एथुनि जालिया । विद्या इयेचिया केलिया । इच्छा ज्ञान क्रिया । वियाली हे ॥993॥ हे नादाची टांकसाळ । हे चमत्काराचें वेळाउळ । किंबहुना सकळ । खेळु इयेचा ॥994॥
हेही वाचा – सार्थ ज्ञानेश्वरी : तरी पुरुष अनादि आथी, आणि तैंचि लागोनि प्रकृति
अर्थ
प्रकृतीच्या ठिकाणी स्थित असलेला (प्रकृतितंत्र झालेला) पुरुष प्रकृतीच्या गुणांचा भोग घेतो व हा गुणसंयोगच त्याच्या चांगल्या व वाईट जन्मांना कारण होय. ॥21॥
कारण की तो (पुरुष) अंगहीन (निराकार), पांगळा, द्रव्यहीन, एकटा, जुनापुराणा, अति म्हातार्यांपेक्षा (म्हातारा) आहे. ॥980॥ त्याला पुरुष हे आडनाव आहे. वास्तविक विचार करून पाहिले तर तो स्त्रीही नाही अथवा नपुंसक नाही. फार काय सांगावे! तो अमुक एक आहे, असा त्याच्याबद्दल काही एक निश्चय करता येत नाही. ॥981॥ (त्याला) डोळे, कान, हात, पाय, रूप, रंग व नाव ही काही नाहीत. ॥982॥ अर्जुना, ज्याच्या ठिकाणी काहीच नाही, तो प्रकृतीचा नवरा आहे, असे समज. पण अशासही (पुरुषासही) सुखदु:खे भोगावी लागतात. ॥983॥ तो पुरुष तर अकर्ता, द्वेषशून्य व अभोक्ता आहे, परंतु ही प्रकृति त्याला भोगावयाला लावते. ॥984॥ ज्या स्त्रीला आपल्या रूपाची व गुणांची थोडीशी हालचाल करता येते, ती स्त्री वाटेल तो खेळ आकाराला आणते. म्हणजे न घडणार्या गोष्टी घडविते. (म्हणजे आपल्या रूपाने व गुणाने कोणत्याही पुरूषाला मोहविते) ॥985॥ मग या प्रकृतीला तर गुणमयी हेच नाव आहे, फार काय सांगावे! प्रकृति म्हणजे मूर्तिमंत गुणच होत. ॥986॥ ही प्रकृति क्षणोक्षणी नित्य नवे रूप धारण करणारी आहे व ही सर्व रूपानेच भरलेली आहे आणि हिचा उन्मत्तपणा जडालाही हालचाल करावयास लावतो. ॥987॥ हिच्यामुळे नाममात्र प्रसिद्धीला आले व स्नेह हिच्यामुळे प्रेमळ आहे. हिच्यामुळे इंद्रिये आपापल्या कामात तरबेज आहेत. ॥988॥ मन हे नपुंसक नाही काय? पण ही प्रकृति त्याला सर्व त्रैलोक्यातील भोग भोगवते. याप्रमाणे या प्रकृतीची सर्वच कृति चमत्कारिक आहे. ॥989॥ ही प्रकृति भ्रमाचे मोठे बेट आहे व ही मूर्तिमंत व्यापकपणाच आहे आणि हिनेच विकार असंख्य (तयार) केले आहेत. ॥990॥ ही प्रकृति, कामरूपी वेलाचा मांडव (आधार) आहे व ही मोहरूपी वनातील वसंत ऋतु आहे व हिला दैवीमाया हे नाव प्रसिद्धच आहे. ॥991॥ ही शब्दसृष्टीची वाढ आहे, ही साकारपणाची प्राप्ति आहे व ही प्रपंचाची न भंगणारी टोळधाड आहे. ॥992॥ (सर्व) कला येथूनच झाल्या आहेत, विद्या हिनेच केल्या आहेत व हीच इच्छा, ज्ञान व क्रिया यास प्रसवली आहे. ॥993॥ ही नादाची टांकसाळ आहे (म्हणजे शब्दमात्र हिच्यापासून उत्पन्न झाला आहे) ही चमत्कारांचे घर आहे. फार काय सांगावे! सर्व खेळ हिचा आहे. ॥994॥
क्रमश:
हेही वाचा – सार्थ ज्ञानेश्वरी : तेंचि कारण ठाकावया, जें सूत्र धरणें उपाया


