नमस्कार, मी अभिनेत्री हर्षा गुप्ते पुन्हा एकदा तुमच्या भेटीला.
सध्या वातावरण खूप मस्त आहे. श्रावण सुरू होतानाच वेध लागतात सणांचे. हा श्रावण सरलाय, आता मात्र आतुरता बाप्पाच्या आगमनाची! बाजारात अगदी धांदल उडालीय, तऱ्हेतऱ्हेच्या सजावटी, मखर, खरी-खोटी फुलं-पान, वेली. रस्त्याच्या कडेला उभारलेले मांडव ज्यात विक्रीसाठी ठेवलेल्या बाप्पांच्या सुंदर सुबक मूर्ती. त्या पाहताना लहानपण आठवलं. आजोबा, वडील, काका, आत्या आणि आम्ही भावंड बाप्पाला घरी आणायला जायचो. छान टाळ, घंट्या, टाळ्यांच्या आणि ‘बाप्पा मोरया’च्या गजरात बाप्पा घरी यायचे. तेव्हा आतासारखं डीजेच्या गोंधळात बाप्पा येत नव्हते. टाळ वाजवत, फार तर फार ताशा, कोंबडी बाजा, मग कच्ची आणि बेंजो या वाद्यांवर सार्वजनिक गणपतींचं आगमन व्हायचं.
मला आठवतंय, माझ्या मामीने एकदा नवस करून आमचा बाप्पा ताशाच्या तालावर वाजत गाजत आणला होता. ब्रह्म मुहूर्तावर बाप्पाची स्थापना, आरती झाली की, रात्रभर जागरण झाल्यामुळे पेंगुळलेली आम्ही मुले जागा मिळेल तसे झोपून जायचो. आई, आजी, आत्या मात्र कामाला लागायच्या. पहाटेला पाणी यायचं… ते भरून सगळ्यांचं चहापाणी करून या बायका जेवणाच्या तयारीला लागायच्या. उकडीचे मोदक, अळूवड्या, वालाचं बिरडं हे महत्त्वाचं! शिवाय, बाकीचा सगळा स्वयंपाक. मिठाईवाल्याकडून एक माणूस यायचा… त्याच्याकडून स्पेशल साइझचे पेढे बनवून घ्यायचो आम्ही.
हेही वाचा – स्वयंपाक म्हणजे उत्तम कला आणि निखळ आनंद!
जाम भारी माहोल असायचा. आम्हा मुलांना मात्र न आवडणारी काम करावी लागायची. वाल, मूग सोलणे. दुर्वा निवडून त्याच्या 108च्या दोन जुड्या, 51 च्या दोन जुड्या आणि 21 दुर्वांच्या खूप साऱ्या जुड्या बांधून ठेवणे. अत्यंत कंटाळवाण काम… पण करावं लागायचं. दुसऱ्या दिवशी ऋषी पंचमी. आजीचा उपवास. त्या दिवशी बाई आजी घरी यायच्या. सोबत निमूआत्या… मग काय नुसता धुमाकूळ! ऋषीची भाजी बनायची घरात… अगदी भरपूर. शेजारीपाजारी वाटली जायची. दोन दिवस तर आम्ही सुद्धा सकाळ-संध्याकाळ त्याच भाजीवर ताव मारायचो.
गणपतीच्या दिवसांत आम्ही दोघी बहिणी, निमूआत्या संध्याकाळी साडी नेसून छान तयार होऊन पाहुण्यांची सरबराई करण्यात तत्पर. रात्री मोठी आरती… जागरण. दुसऱ्या दिवशी बाप्पाचं विसर्जन.
गौरीसोबत जाणारे गणपती म्हणजे कधी 5/6/7 दिवस घरातले पाहुणेच. रोज गोडधोड बनायचं. मस्त ताव मारायचो. ‘गोड जास्त खाऊ नकोस, पोटात दुखेल,’ असे सांगायला आईला उसंत नसायची. मग गौरी आगमन. आमच्या घरी (माहेरी) गौराई येत नाहीत. पण सासरी माझ्या घरी येतात. तशा गिरगावच्या वाडीत बऱ्याच घरी गौरी यायच्या.
हेही वाचा – वास्तव अन् आभासी जगामधली धूसर रेषा!
हे पाच-सात दिवस वाडीत सगळ्यांच्या घरी सगळी मित्रमंडळी घुसून तार स्वरात आरत्या गाणे, प्रसाद खाणे… यासारखी धम्माल कोणी केली नसेल. विसर्जनाच्या दिवशी संध्याकाळ पर्यंत ‘ओके’ असणारी आम्ही मंडळी बाप्पाला मखरातून बाहेर काढल्यावर रडवेले होत असू. ‘पुढल्या वर्षी लवकर’ या म्हणून पाठवणी करताना रडू तर यायचंच, पण पुढल्या वर्षी बाप्पा येणाराय, लवकर येणाराय या एका गोष्टीवर विश्वास ठेऊन ‘गणपती चालले गावाला, चैन पडेना आम्हाला…’, ‘पुढल्या वर्षी लवकर या…’, ‘पायी हळूहळू चाला…’ म्हणत, डोळ्यांतले अश्रू लपवत – ‘कपाळी केशरी गंध, गणेशा मला तुझा छंद’ म्हणत बाप्पाला निरोप देऊन घरी परत यायचो.
आता पलीकडच्या जागेवर मी आहे… म्हणजे आईच्या भूमिकेत मी आहे. पूजा, नैवेद्याची सगळी जबाबदारी मी आनंदाने पार पाडते आणि सणाचा भरपूर आनंद उपभोगते. मग चला एकदा जोरदार आवाजात बोलूया…
गणपती बाप्पा मोरया।। मंगलमूर्ती मोरया ।।


