शाळा सुटली तसा गणेश आपल्या मोपेडवरून घरी निघाला. आज येताना काय आणायला घरून सांगितले आहे, हे तो आठवू लागला. आईने येताना केळी आणायला सांगितलेली, कारण उद्या एकादशीचा तिचा उपवास… अर्पिताने कन्येसाठी बिस्किट्स आणायला सांगितलेली, कारण सकाळी दूध बिस्किट्स खाऊन ती शाळेत जाते… बाबांच्या पोटात अधूनमधून दुखतं, त्याना अँटासिड्सची बाटली… आणि आपले कपडे परवा इस्त्रीला दिले होते, ते घ्यायचे होते…
गणेशने केळी घेतली, बेकरीमध्ये जाऊन कन्येच्या आवडीची बिस्किट्स घेतली, मेडिकलमध्ये जाऊन वडिलांसाठी औषध घेतलं, इस्त्री केलेले आपले कपडे घेतले. एवढ्या सर्व गोष्टी मोपेडच्या डिकीत घालून गणेश घरी आला.
नेहेमी बाहेरच्या बाकावर बसून पुस्तक वाचणारे त्याचे बाबा आज तेथे नव्हते, म्हणून त्याला आश्चर्य वाटलं. घरात शिरता शिरता त्याने आईला हाक मारली…
“आई, ही घे तुझी केळी… सध्या महाग झाली आहेत…”
आईने उत्तर द्यायच्या आधी त्याची पत्नी अर्पिता बाहेर आली आणि म्हणाली,
“आई आतल्या खोलीत आहेत, बाबांच्या पोटात दुखतंय, म्हणून गरम पाण्याने शेक देत आहेत…”
“तरीच! बाबा आज बाहेरच्या बाकावर बसलेले कसे नाहीत, असं प्रश्न मला पडला होताच. मी बघतो बाबांना…” असं म्हणून गणेश मागच्या बाजूच्या बाबांच्या खोलीत गेला. त्याची आई गरम पाण्याच्या पिशवीने त्यांच्या पोटावर शेक देत होती.
“जास्तच दुखतं काय हो?” – गणेश.
बाबांनी डोळे उघडून त्याच्याकडे पाहिले आणि मानेने ‘हो… हो…’ म्हणाले.
“अरे, आजारपणं अंगावर काढायची सवय! महिनाभर हे सुरू आहे… मी म्हटले गणेशला सांगते, डॉक्टरकडे जाऊन या. पण ‘नको नको’ म्हणत राहिले आणि कसले कसले काढे घेत राहिले… पण आज सकाळपासून खूपच वेदना सुरू झाल्या, म्हणून झोपले आहेत. तू यांना डॉक्टरकडे घेऊन जा.”
हेही वाचा – हळदीकुंकू… जुनी प्रथा मोडून काढणारे!
“हो, डॉक्टरकडे नेतोच… दहा मिनिटांत काहीतरी खाऊन येतो.”
गणेश स्वयंपाकघरात गेला. अर्पिताने चहा आणि उप्पीट केले होते, ते खाता-खाता तो म्हणाला, “बाबांना डॉक्टरकडे घेऊन जातो. हल्ली रोजच त्यांची तक्रार असते पोटात दुखतं म्हणून!”
“हो, न्याच त्यांना. बरेच दिवस सुरू आहे हे – चूर्ण, काढे घेत असतात. आम्हाला सांगतात ‘गणेशला काही सांगू नका म्हणून…’; पण कोणत्या डॉक्टरकडे नेणार त्यांना?”
“मला वाटते, त्यांना पित्त आणि त्यापासून झालेला काहीतरी आजार असावा. सुरुवातीला आपले फॅमिली डॉक्टर शिंदे यांना दाखवावे… ते काय म्हणतात त्याप्रमाणे पुढे…”
“बरोबर. मी तेच म्हणणार होते… पहिल्यांदा शिंदेंना दाखवा.”
गणेशने रिक्षा बोलावली आणि बाबांना घेऊन तो डॉक्टर शिंदे यांच्या दवाखान्यात गेला. पाच-सहा पेशन्ट आधी होते, ते झाल्यावर ते दोघे आत गेले. डॉक्टर शिंदेंनी लक्षणे विचारली, त्यांचे पोट बाहेरून दाबून पाहिले. जीभ पाहिली आणि ते गणेशला म्हणाले,
“चार दिवसांसाठी गोळ्या लिहून देतो, लिक्विड देतो… या गोळ्यांनी बहुतेक पोटदुखी थांबेल, थांबली नाही तर मग पुढे बघू…”
गणेश बाबांना घेऊन घरी आला. गोळी आणि लिक्विड औषध सुरू केले. फक्त पातळ पेज दिली… पण बाबांना आराम वाटेना. रात्रभर या कुशीवरून त्या कुशीवर… तळमळत राहिले.
दुसऱ्या दिवशीचीही औषधे झाली… पण काहीच आराम नाही… शेवटी गणेशने रिक्षा बोलावली आणि पुन्हा डॉक्टर शिंदेंच्या दवाखान्यात बाबांना नेले.
“डॉक्टर, बाबांना काहीच फरक पडलेला नाही. रात्रभर ते तळमळत होते… एक-दोनदा उलटी पण झाली.”
“जर कालच्या औषधाने त्यांना काहीच फरक पडत नसेल तर, त्यांच्या पुढील टेस्ट कराव्या लागतील… म्हणजे सोनोग्राफी करून पहावे लागेल…”
“डॉक्टर तुमच्याकडे आहे का सोय सोनोग्राफीची?”
“नाही. तुम्ही मगदूम हॉस्पिटलमध्ये ॲडमिट करा यांना, मी चिट्ठी देतो…”
“पण डॉक्टर, त्या हॉस्पिटलमध्ये दोन मगदूम डॉक्टर आहेत ना? मग…”
“बाप आणि मुलगा… दोन्ही सर्जन आहेत, पण तुम्ही शक्यतो मोठ्या मगदूमना म्हणजे डॉक्टर बाजीराव मगदूम यांना दाखवा… शेवटी एवढी वर्षे त्त्यांचे हॉस्पिटल आहे, अनेक पेशन्ट पाहायचा त्यांना अनुभव आहे..”
“बरोबर आहे डॉक्टर, मी पण तेच म्हणणार होतो… तुम्ही सांगितले नसते तरी मी सीनिअर मगदूम सरांना दाखवणार होतो!”
डॉक्टर शिंदे यांनी मगदूम हॉस्पिटलच्या नावे चिट्ठी दिली. त्याच रात्री गणेशने बाबांना डॉक्टर मगदूम हॉस्पिटलमध्ये ॲडमिट केले.
मगदूम हॉस्पिटलच्या वेटिंगरूममध्ये गणेश बाबांना घेऊन आला होता. सीनिअर डॉक्टर मगदूम एकेका पेशंटला तपासत होते… पुढील ट्रीटमेंट सांगत होतें. त्यांच्या केबिनच्या बाजूला त्याच्या मुलाची म्हणजे डॉक्टर विनोद मगदूम याची कन्सल्टिंग रूम होती. बहुतेक पेशन्ट सीनिअर डॉक्टरच्या कन्सल्टिंगमध्ये जायला उत्सुक दिसत होते. गणेशही सीनिअर डॉक्टरांसाठी वेटिंगरूममध्ये बसून होता. खरेतर, डॉक्टर मगदूम यांचा मुलगा विनोद हा गणेशचा क्लासमेट. दोघे पाचवीपासून दहावीपर्यंत एका शाळेत, एका वर्गात होते. म्हटले तर ते मित्रच! तरी, गणेश सीनिअर डॉक्टरनाच आपल्या बाबांची तब्येत दाखवणार होता.
एवढ्यात डॉक्टर विनोद बाहेरून आला आणि गणेशला पाहाताच थांबला.
“गणेश, कुणाला बरे नाही?”
“बाबांना.”
“हो काय! बरेच दिवसांत दिसला नाहीस, फोन पण केला नाहीस.”
“हो रे, एक एक व्याप वाढत जातात… शाळेतच वेळ जातो आणि घरी कन्या आहे ना, तिच्यासाठी पण वेळ ठेवावा लागतो.”
“होय रे… माझी पण कन्या आता पाच वर्षांची होईल. तिला आणि जयूला बाहेरच्या देशात न्यायचंय. पण इथे रोज रोज ऑपरेशन्स… बरं गणेश, ये घरी एकदा.”
“हो, येतो रे…”
डॉक्टर विनोद आपल्या केबिनमध्ये गेला. गणेशच्या मनात आले, हा विनोद आणि मी पाचवीपासून एका वर्गात, माझा नेहेमी पहिला नंबर आणि विनोद… असाच कसाबसा पास होणारा… पण आज आपण एका माध्यमिक शाळेत शिक्षक आणि विनोद… जनरल सर्जन! वडिलांच्या हॉस्पिटलमध्ये प्रॅक्टिस करणारा… ऑपरेशन्स करणारा… लाखोत पैसे मिळविणारा… आलिशान गाड्यामधून फिरणारा… त्याची बायको आणि मुलगी परदेशी ट्रिप करणाऱ्या… आपल्या बायकोला माहेरीही जाणे होत नाही… शाळेतले कसले नंबर आणि काय… शेवटी पैशांचा खेळ! गणेश स्वतःशी केविलवाने हसला.
डॉक्टर बाजीराव मगदूम त्या शहरातील निष्णात सर्जन.. किंबहुना त्या शहरातील पहिले सर्जन! अचूक निदान आणि सहज ऑपरेशन, हे त्यांचे वैशिष्ट्य. खेळीमेळीत ते पेशन्टबरोबर बोलायचे. प्रत्येकाच्या शंकाचे उत्तर द्यायचे. कधी चिडायचे नाहीत. पैसे पण वाजवी घ्यायचे. म्हणून त्या भागातील आणि शहरातील पेशन्टना ते आपले फॅमिली डॉक्टर वाटायचे.
गणेशच्या बाबांचा नंबर आला, तसे तो त्याच्या बाबांना घेऊन आत गेला. त्याने डॉक्टर शिंदे यांनी दिलेली चिट्ठी डॉक्टरांकडे दिली. डॉक्टर मगदूम यांनी चिट्ठी वाचली आणि गणेशच्या बाबांना तपासले.
“मला अल्सरचा अंदाज वाटतो. सोनोग्राफी करून पाहू, कितपत आत घुसलाय… ओके.”
त्यांनी हॉस्पिटलमधील सोनोग्राफी तज्ज्ञाला बोलावून बाबांची सोनोग्राफी करायला सांगितली.
ते रिपोर्ट घेऊन गणेश पुन्हा डॉक्टर मगदूमना भेटला. डॉक्टरांनी सोनोग्राफी रिपोर्ट पाहिला आणि गणेशला म्हणाले, “गणेश, माझा अंदाज खरा ठरला… तुझ्या बाबांना आतड्याचा अल्सर आहे.”
“मग डॉक्टर, यावर इलाज?”
“घाबरण्याचे कारण नाही. ऑपरेशन करून जेवढा भाग खराब झाला आहे, तो काढून टाकायचा आणि बाकी भाग परत जोडायचा… अशी ऑपरेशन्स आम्ही नेहेमी करतच असतो.”
“मग केव्हा करणार ऑपरेशन?”
“ते विनोदला विचारायला हवे… हल्ली तोच ऑपरेशन्स करतो या हॉस्पिटलची.”
“पण सर तुम्ही…”
“हल्ली मला चटकन थकायला होतं आणि रोजची ओपीडी पण असते… तो तरुण आहे, करतो ऑपरेशन. मला थोडी विश्रांती मिळते.”
“पण डॉक्टर, डॉक्टर…”
“काय म्हणायचंय काय? स्पष्ट बोल. तुला माहीत आहे, मी गेली तीस-पस्तीस वर्षे हे हॉस्पिटल बघतोय. माझे पेशन्ट माझ्याकडे स्पष्ट बोलतात.”
“डॉक्टर, तुमचा मुलगा डॉक्टर विनोद हा माझा मित्रच आहे. म्हणजे, तो माझ्या वर्गात होता.”
“अरे! हे मला माहीत नव्हतं.”
“होय डॉक्टर, विनोद आणि मी पाचवी ते दहावी एका वर्गात होतो. वर्गात मी नेहेमी पहिला नंबर आणि विनोद जेमतेम पास व्हायचा.”
“हो, हे खरे आहे… विनोद शाळेत फारसा हुशार नव्हता.”
“पण डॉक्टर, माझ्या घरची परिस्थिती नसल्याने मी बारावीनंतर ग्रॅज्युएट केलं आणि बीएड करून शिक्षक झालो. पण तुमचा विनोद, जो कसाबसा पास होत गेला, तो सर्जन झाला.. कसा?”
“अरे, ते पेड-सीट्स असतात ना!”
“तेच डॉक्टर, विनोदसाठी तुम्ही दुसऱ्या राज्यात वर्षाला वीस-पंचवीस लाख डोनेशन देऊन ॲडमिशन घेतली, हे विनोदनेच मला सांगितलं.”
“हे खरे आहे, पण…”
“म्हणजे चार वर्षाला सत्तर-पंचांहत्तर लाख रुपये. परत पोस्ट ग्रॅज्युएशनसाठी किती लाख कोण जाणे! त्याने परीक्षा पास व्हावी म्हणून परत तुम्हाला फिल्डिंग लावावी लागली असणार…”
“ते एक बाप म्हणून करावेच लागते बाबा.. माझा मुलगा हुशार नव्हता. तो तुझ्यासारखा हुशार असता, तर मला पैसे देऊन दुसऱ्या राज्यात ॲडमिशन घ्यावी लागली नसती, माझे पैसे वाचले असते. पण गेल्या पस्तीस वर्षांपूर्वी मी हा जो धंदा सुरू केला आहे ना…”
“डॉक्टर, तुम्ही धंदा म्हणालात?”
“अरे, त्यात काय चूक? हा वैद्यकीय व्यवसायच आहे.. कुणाचा बरा धंदा होतो, कुणी माशा मारत असतो.. तर माझ्या पुढील पिढीतील हा धंदा सांभाळायला कुणीतरी हवे ना! म्हणून पटत नसले तरी, मला विनोदला पेड-सीट्स साठी ॲडमिशन घ्यावी लागली… आणि दुसरे म्हणजे, या व्यवसायाला प्रतिष्ठा आहे… समाजात मान आहे. डॉक्टर मग तो गुरांचा असो किंवा माणसाचा.. त्याच्या नावामागे ‘डॉ.’ लागले म्हणजे त्याला प्रतिष्ठा मिळते.”
“पण डॉक्टर, विनोदने सुरुवातीला ऑपरेशन करताना चुका केल्या होत्या… तुम्ही आजूबाजूला होतात म्हणून ते पेशन्ट वाचले, खरे ना?”
हेही वाचा – पाप आणि पुण्य
“या गोष्टी खरेतर गुप्त ठेवायच्या असतात… तरी या तुझ्यापर्यत कशा पोहोचल्या कोण जाणे! कदाचित माझ्या हॉस्पिटलमधील कुणीतरी या बातम्या लीक करत असेल… पण आता तो व्यवस्थित ऑपरेशन करतो… मग तुझे काय म्हणणे आहे?”
“डॉक्टर, विनोद माझा मित्र असला तरी मी माझ्या बाबांचे अल्सरचे ऑपरेशन त्याच्याकडून करणार नाही.”
“मग?”
“एकतर तुम्ही स्वतः ते ऑपरेशन करा, नाहीतर मी दुसऱ्या सर्जनकडून…”
“नको नको गणेश, मी माझ्या पेशन्टच्या मताचा नेहेमीच आदर केला आहे. तुला विनोदकडून ऑपरेशन करून घ्यायचे नाही ना? जवळ जवळ दोन वर्षांनी मी परत सर्जनचा ॲप्रेन उद्या घालेन आणि तुझ्या बाबांचे ऑपरेशन मीच करेन…”
“थँक यू, डॉक्टर!”
दुसऱ्या दिवशी डॉक्टर बाजीराव मगदूम यांनी दोन वर्षांनंतर सर्जनचा ॲप्रेन चढवून ऑपरेशन थिएटरमध्ये प्रवेश केला.


