घरी गणपती बसवायचं ठरवलं तेव्हाची गोष्ट… कोणाला विचारायला गेलेच नाही. रीतीरिवाज… घराणं… परंपरा… मतं-मतांतरं… चर्चा… हे काही मला नको होतं. माझं मलाच विचारलं, मनाने कौल दिला! प्रत्यक्ष देवाला घरी आणायचं मग भीती कशाची? कुणाची?
सुबक सुरेख पितळी मूर्ती घेऊन आले. लहानगी दोन्ही नातवंडं एकदम खूश झाली. त्यांनी आरास केली. बाप्पाची चौरंगावर स्थापना केली. हौसेने सुरेख सजवलं… समई, उदबत्ती, दिवे लावले… फुलं, हारं घातले… पूजा केली… मोदकांचा नैवेद्य दाखवला… टाळ घंटेच्या गजरात आरती झाली… मंत्रपुष्पांजली… अथर्वशीर्षाची आवर्तनं… श्री गणेशाचे ब्रह्मणस्पती सूक्त म्हटलं.
सारं काही यथासांग सुरू होतं. घरभर चैतन्य पसरलं होतं. “आमच्याकडे गणपती आहे,” कौतुकाने नातवंडं सांगत होती. आनंदसोहळा सुरू होता. त्यात दिवस कसे गेले कळलंच नाही. निरोप द्यायचा दिवस आला. गौरीबरोबर बाप्पा निघाले. नैवेद्याला वाटली डाळ केली. शिदोरीचे दहीपोहे कालवले. ‘पुनरागमनायच्’ म्हणून साष्टांग नमस्कार घातला…
हेही वाचा – पावसाळा
बाप्पाचं विसर्जन करायचं…
अहो, ते तर मोठ्या पातेल्यात! ते पाणी घातलं तुळशीला, गुलाबाला आणि जास्वंदीला… यातून एक उमगलं होतं… विसर्जनाचा अर्थ… ते कशाचं? कुठे? कसं करायचं? ते आता नीट समजलं होतं…
बाप्पांना जागेवर ठेवलं. मनोभावे वंदन केलं. राहू देत की घरीच…! बाप्पा समोर आहेत, हे सुखाचं वाटत होतं. हे करताना मनात होतं, अनेक गोष्टींना चौकटी असतातच! वापरून वापरून थोड्या झिजतात, खराब होतात, अट्टाहासाने तशाच का ठेवायच्या? बदल करायला हवा ना! असाच बदल परंपरेत केला.
हेही वाचा – आपला धर्म आणि संस्कृती
घाबरून राहूदे तशाच, म्हणणारे असतील… तरी विचार करून त्या बदलाव्यात. नीट-नेटक्या कराव्यात… नवीन कल्पनांनी अधिक देखण्या सुंदर दिसतील. अनेक घरात आनंद पसरेल. आपोआप श्रद्धा जागृत होईल. हळूहळू शहाणपण येतं… मनाला न दुखवता बदल सुचतो… आपला आपल्यालाच… अनेक ठिकाणी आवश्यक असलेला, चौकटीत राहूनच आपण केलेला… कुणाला न घाबरता केलेला… तो आत्मिक समाधान देतो.
गणपती बाप्पाला आपण काय प्रार्थना करतो…
प्रारंभी विनती करू गणपती
विद्या दयासागरा
अज्ञानत्व हरोनी बुद्धिमती दे
आराध्य मोरेश्वरा…
एक सांगू का, मला गणपती बाप्पानेच ही बदलाची बुद्धी दिली आहे. त्यामुळे मला चिंताच नाही…


