मेष
- हा आठवडा तुमच्यासाठी संमिश्र फळ देणारा आहे. नोकरदारांच्या दृष्टीने कामाचा ताण कमी असेल. संततीचे प्रश्न सुटतील. संततीकडून आनंदाच्या बातम्या मिळतील. तुमचा सुट्टीचा अर्ज मंजूर होईल. व्यावसायिक वर्गासाठी चांगला काळ आहे. प्रदर्शनात भरपूर विक्री होईल. नवीन संकल्पना उपयोगी पडेल. कामाचे कौतुक होईल. महिला माहेरी जाण्याचे नियोजन करू शकतील. त्या छान खरेदी करतील. विद्यार्थ्यांना मनाप्रमाणे काम करायला मिळेल. स्पर्धेत यश मिळू शकेल.
वृषभ
- या आठवड्यात राशीस्वामी तुळ राशीत, स्वाती नक्षत्रात आला आहे. नोकरदारांना कामात यश मिळेल. कामाचे श्रेय मिळेल. वरिष्ठ खूश राहतील. घरासाठी नवीन वस्तू खरेदी करू शकाल. व्यावसायिक वर्गाने आपल्या कर्मचाऱ्यांना, त्यांनी केलेल्या कामाचे बक्षीस द्यावे, कौतुक करावे आणि त्यांचा उत्साह वाढवावा. एखादी स्पर्धा आयोजित करा, त्यामुळे व्यापार वाढण्यास मदत होईल. महिला गणपती-गौरीसाठी नवीन खरेदी करतील. जुन्या मैत्रिणी भेटीला येतील. विद्यार्थी बाप्पाच्या स्वागताची तयारी करण्याचा आनंद घेतील.
मिथुन
- या आठवड्यात तुमचा राशीस्वामी बुध कन्या राशीत आला आहे. 11 तारखेला त्याचा उदय झाला असून त्याची सकारात्मक फळे मिळतील. नोकरदारांचे घरासंबंधीचे प्रश्न सुटतील. कामाच्या ठिकाणी तुमचे वर्चस्व सिद्ध होऊ शकेल. तथापि, बोलण्यावर नियंत्रण ठेवा. घरातून व्यापार करणाऱ्या व्यावसायिक वर्गाला नवीन वास्तू खरेदी करता येईल. व्यापारवृद्धी होईल. जुनी येणी वसूल होतील. महिलांचा आईशी वाद होण्याची शक्यता आहे, मात्र तिचे मन दुखावू नका. विद्यार्थी कला आणि क्रीडा क्षेत्रात प्रगती करू शकतील. मित्र किंवा कुटुंबीयांबरोबर फिरायला जाऊ शकाल.
कर्क
- या आठवड्यात मनाप्रमाणे गोष्टी घडतील. नोकरदारांना कामाच्या निमित्ताने प्रवास घडतील. प्रवासात चांगल्या ओळखी होतील आणि त्यांचा फायदा होईल. कामे तुमच्या ओळखीने आणि प्रयत्नाने पूर्ण करू शकाल. व्यावसायिक वर्गाच्या कामात शिथिलता येईल. व्यापारवाढीसाठी नवीन कल्पना शोधाव्या लागतील तसेच तज्ज्ञ लोकांची मदत घ्यावी लागेल. महिलांना गौरी-गणपतीसाठी माहेरी जाण्याचा योग आहे. नवीन खरेदी करू शकाल. विद्यार्थ्यांना अभ्यासात आणि खेळात यश मिळेल. शाळा-कॉलेजमध्ये कौतुक होऊ शकते.
सिंह
- राशीस्वामी रवी 18 तारखेला कन्या राशीत जात आहे. नोकरदारांना कामाच्या ठिकाणी मान-सन्मान मिळेल, महत्त्वाची जबाबदारी मिळेल आणि आत्मविश्वास वाढेल. वरिष्ठ आणि सहकारी मदत करतील. व्यावसायिक वर्गाची सरकारी कामे पटापट होतील. परवाना काढणे, करार नोंदणी करणे अशी कामे वेगाने होतील. महिलांचे घरात तसेच ऑफिसमध्ये वर्चस्व राहील. तुमच्या मताने सगळी कामे पूर्ण करू शकाल. विद्यार्थ्यांचा आत्मविश्वास वाढेल आणि अभ्यासात प्रगती होईल.
हेही वाचा – पत्रिका गुणमिलन करताना
कन्या
- राशीस्वामी बुध तुमच्याच राशीत आहे आणि रवी 18 तारखेला कन्या राशीत येत आहे. नोकरदारांना कामाच्या ठिकाणी महत्त्वाची जबाबदारी सोपविली जाईल. बढती होण्याची शक्यता आहे. मात्र, बोलण्यावर नियंत्रण ठेवा आणि विचारल्याशिवाय कोणाला सल्ला देऊ नका. व्यावसायिक वर्गाला व्यापारात खूप चांगला प्रतिसाद मिळेल. जुनी येणी वसूल होतील, नवीन करार होतील तसेच नवीन व्यावसायिक कल्पना सुचतील. महिलांकडून घरात बाप्पा आणि गौरीच्या आगमनाची तयारी उत्साहात केली जाईल. तथापि, मैत्रिणींशी बोलताना सांभाळून बोला. विद्यार्थ्यांना कामात यश मिळेल. नवीन कोर्स शोधून त्यावर काम करू शकाल, प्रगती होईल.
तुळ
- राशीस्वामी स्वतःच्या राशीत आहे आणि रवी कन्या राशीत येत आहे. नोकरदारांचा कामाच्या निमित्ताने परदेशी किंवा लांबचा प्रवास होण्याची शक्यता आहे. कामाचे नियोजन करावे लागेल, सर्व कामे पटापट होतील. व्यावसायिक वर्गाला नफा होईल आणि व्यापार उत्तम होईल. नवीन कामे मिळू शकतात, त्यासाठी मेहनत घ्यावी लागेल. सगळ्यांशी गोड बोलून कामे करून घ्यावी लागतील. महिलांचा कामाच्या ठिकाणी प्रभाव राहील. हाती घेतलेले काम व्यवस्थित पार पाडू शकाल. नवीन वाहन खरेदी केल्याने विद्यार्थी आनंदी होतील.
वृश्चिक
- या आठवड्यात राशीस्वामी मंगळ 19 तारखेला कर्क राशीत जात आहे. नोकरदारांना कामाचा ताण जाणवेल. गटबाजी आणि राजकारणापासून लांब राहा. स्वतःचे काम आधी पूर्ण करून मग इतरांना मदत करा. भागीदारी व्यवसायात व्यावसायिक वर्गाने एकत्रितपणे निर्णय घ्यावा. कामात आणि व्यवहारात स्पष्टता ठेवा. इतरांचे बोलणे ऐकून घ्या, घाईने कोणतीही गोष्ट करू नका. महिलांचा जोडीदाराशी वाद होण्याची शक्यता आहे. त्यामुळे शांत राहा. विद्यार्थ्यांनी वाहन सावकाश चालवावे आणि आपले वाहन कोणाला चालवायला देऊ नये.
धनु
- राशीस्वामी अष्टमात कर्क राशीत आहे. नोकरदारांच्या बाबतीत अचानक कामाचा ताण खूप वाढेल. घाबरून न जाता नियोजन करून काम पूर्ण करू शकाल. घरात खर्च वाढण्याची शक्यता आहे. व्यावसायिक वर्गाला हाताखालील माणसांना पगाराआधी ॲडव्हान्स द्यावा लागेल, त्याची तयारी ठेवा. कामे व्यवस्थित पार पडतील. घरकामाच्या मदतनीसाने अचानक दांडी मारल्यामुळे महिलांना जास्त काम करावे लागेल. विद्यार्थी अभ्यासात प्रगती करू शकतील, शिक्षक कौतुक करतील.
मकर
- राशीस्वामी शनि मीन राशीत वक्री आहे. नोकरदारांना कामाचा ताण जाणवेल. नेहमीच्या कामाव्यतिरिक्त नवीन सहकाऱ्यांना शिकवण्यात जास्त वेळ खर्च होईल. कामाचे नियोजन योग्य प्रकारे करूनही व्यावसायिक वर्गाला कामात अव्यवस्थितपणा जाणवेल, त्यामुळे चिडचिड होण्याची शक्यता आहे. महिलांनी कुटुंबातील व्यक्तींबरोबर तडजोड करण्याची तयारी ठेवावी म्हणजे सगळी कामे सुरळीत होतील. विद्यार्थ्यांनी आपल्याला मदत केलेल्या मित्रांना कधीही विसरू नये तसेच, इतरांना मदत करत राहावे.
कुंभ
- राशीस्वामी शनि मीन राशीत आहे. नोकरदारांना कामाचा ताण जाणवणार नाही. सततच्या बैठका आणि वरिष्ठांबरोबरील चर्चा यात वेळ जाईल; परिणामी तुमच्या कामाला उशीर होईल. सहकारी मदत करतील, पण स्वतः लक्ष देणे आवश्यक आहे. व्यावसायिक वर्गाची जुनी आणि वादग्रस्त येणी वसूल होतील. व्यापार वाढवण्यासाठी प्रदर्शन आणि सोशल मीडियाचा वापर करणे गरजेचे आहे. महिलांच्या बाबतीत घरात नवीन वस्तू येतील. त्याचबरोबर दुरुस्तीची कामेही निघतील. विद्यार्थ्यांना मनाप्रमाणे आवडत्या क्षेत्रात काम करण्याची संधी मिळेल.
हेही वाचा – वास्तुशास्त्र आणि नातेसंबंध, पैसा, प्रगती
मीन
- राशीस्वामी गुरू कर्क राशीत आहे. नोकरदारांनी कामे वेळेवर पूर्ण करावीत, इतरांवर अवलंबून राहू नये. वरिष्ठांची बोलणी खावी लागू शकतात. अशावेळी इतरांना दोष देणे टाळा. व्यावसायिक वर्गाला हितशत्रू त्रास देतील, स्पर्धकांपासून सावध राहावे. तुमची माहिती आणि व्यावसायिक गुपिते कोणाशीही शेअर करू नका. महिलांनी बोलण्यात आणि वागण्यात तारतम्य ठेवावे. वेळेवर भोजन करा आणि प्रकृतीची काळजी घ्या. विद्यार्थ्यांनी अभ्यासात लक्ष द्यावे आणि इतरांच्या गोष्टींत लक्ष देऊ नये.


