Sunday, December 14, 2025

banner 468x60

Homeफिल्मीआठवणींचा जागर…

आठवणींचा जागर…

नमस्कार मी अभिनेत्री हर्षा गुप्ते, पुन्हा एकदा तुमच्या भेटीला…

‘आठवते का?’… ‘विसरलीस का?’… बरोब्बर आजचा एपिसोड आहे आठवणींचा! आठवणी – बालपणीच्या, तरुणपणातल्या, वाढत्या वयातल्या आणि हळूहळू वार्धक्याकडे प्रयाण करतानाच्या… छोट्या मोठ्या, विस्मरणात गेलेल्या घटना सुद्धा!

एका खूप मोठ्या माणसाची आठवण… ते एका मोठ्या पक्षाचे खूप मोठे नेते होते. माझ्या सवयीप्रमाणे मी त्यांना दादा आणि त्यांच्या पत्नीना वाहिनी म्हणायचे. दोघेही एवढे मोठे असून सुद्धा खूप साधे… अगदी साधारण म्हटलं तरी चालेल! दादा तर त्यांच्या आयुष्यात येणाऱ्या सगळ्यांना नावानिशी ओळखतात. काही काळ मी आणि माझा नवरा त्यांच्या कॉन्टॅकमध्ये बराच काळ होतो.

अचानक तीन-चार वर्षे सरली आणि पुन्हा एकदा दादांच्या भेटीला मी गेले. एका प्रकरणात मी खूप त्रासले होते. त्यांच्या ऑफिसबाहेर वाट बघत होते. एकदाचा माझा नंबर आला. मी आत गेले. दादा ओळखीचं हसले… “ताई कशा आहात?”

“त्रासात आहे,” मी म्हणाले आणि सोबत नेलेल पत्र त्यांना दिलं.

“मी बघतो. काळजी करू नका. एवढा मोठा भाऊ बसलाय न तुमचा…” असं सांगत त्यांनी आपल्या सेक्रेटरीकडे पाहिले… आणि म्हणाले, “गुप्ते ताईंना कॉफी, बिनसाखरेची. त्या कितीही नाही म्हणाल्या तरी!”

माझ्या डोळ्यांतून अश्रू नाही तर अश्रूधार ओघळली. मी बिनसाखरेची कॉफी पिते, हे एवढ्या काळानंतरही ते विसरले नव्हते आणि मी नाही म्हणणार, हेही त्यांच्या लक्षात होतं. आता हे लिहिताना पण अक्षरं धूसर झाली आहेत. डोळे भरून आलेच! एवढ्या मोठ्या माणसाने मला लक्षात ठेवलं… फक्त नावच नाही तर, माझ्या सवयीसहित!

हेही वाचा – …अन् व्हॉट्सॲप ग्रुपमधून ‘क्राइम’ने मुक्त केलं!


मी बरीच वर्षे ‘सीआयडी’ सीरियलमध्ये काम करत होते. अचानक सीरियल बंद झाली. काही काळाच्या विश्रांती नंतर ‘सीआयडी 2’ नावाने पुन्हा सुरू झाली. मला जरा जास्तच उशिराने बोलावलं. चार-पाच माणसं सोडल्यास सगळे जण मला नवीन होते. म्हणजे सीआयडीची ॲक्टर्स टीम तीच होती. शूट सुरू झालं, अचानक मला खोकला आला सेटवर… आणि पटकन स्पॉट दादांनी माझ्यासमोर गरम पाण्याचा ग्लास घरला. एक घोट घेतला आणि खूप काहीतरी गवसल्यासारखं वाटल. तेच ते आलं आणि मीठ घातलेलं नेहमीसारखं गरम पाणी! मी आजुबाजूला पाहिलं… कोणीही ओळखीचं नव्हतं! पाण्यासोबत आनंदाचा आवंढा गिळला.  मला अन् माझ्या सवयी माहीत असलेलं माझं असे कोणीतरी आसपास होतं!

सीन संपला. थोड्यावेळाने मी चहा मागितला. भरपूर आले, थोडीशी साखर, थोडीशी चहा पावडर आणि काही थेंब लिंबू. एक घोट घेतला मात्र… “चाय किसने बनाई” म्हणून जोरात ओरडले… तो मुलगा नवीन होता, घाबरलाच… दुसऱ्या दादांना घेऊन आला. मी खूश होऊन हसले. “क्यों दादा छुप छुप के मेरी खातीर कर रहे हो! सामने क्यों नहीं आये?” त्या बिचाऱ्याला भीती वाटली होती की, मी त्यांना ओळखणार नाही किंवा काही वाईट वावगं बोलेन! माणसं बदलतात ना जरा नाव, फेम मिळालं की!! पण मला खूश झालेलं बघून त्यांनाही आनंद झाला… थोड्या गप्पा झाल्या आणि ते त्यांच्या कामाला निघून गेले. एवढ्या वर्षांनी भेटून सुद्धा ते मला, माझ्या सवयी विसरले नव्हते.


मी गोरेगावमध्ये एका स्टुडिओमध्ये शूट करत होते. तिथला ऑम्लेट पाव मला भारी आवडतो. तिथे मी 2008 साली एक सीरियल करत होते. तेव्हा दर बुधवार, शुक्रवार आणि रविवारी न चुकता एक ऑम्लेट पाव खायचे आणि चहाचा ग्लास… अगदी एक नंबर! ऑम्लेट पाव 10 रुपये… स्वस्त आणि मस्त! मी सांगितलं तसा बनवून मिळायचा… पोटभरीच.

हेही वाचा – अभ्यास एके अभ्यास… पाठ सोडेना!

मी नवीन शूटसाठी पुन्हा त्याच स्टुडिओमध्ये गेले होते. स्पॉट दादा पण नवीन होता. त्यांना पैसे दिले म्हटलं, “हा ‘असा असा’ ऑम्लेट पाव बनवून आणा…” आणि चक्क ते ऑम्लेट पाववाले दादाच माझं पार्सल घेऊन माझ्या रूममध्ये आले! ते एवढे खूश झाले… म्हणे, “मला वाटलंच… तुम्हीच असाल! म्हणून कन्फर्म करायला आलो.” जवळपास 17 वर्षांनी आम्ही पुन्हा भेटलो होतो. दादा चक्क म्हातारे झाले होते! नाही म्हणायला आता मी पण त्याच रस्त्यावर उभी आहे… फक्त माझी सवय काही लोकांच्या एवढी अंगवळणी पडलीय की, फक्त ऑम्लेटची रेसिपी ऐकून त्यांना माझी आठवण झाली! कारण काहीही असू देत, मी लोकांच्या आठवणीत आहे, राहीन… यासारखा आनंद दुसरा कुठलाच नाही!!!

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

banner 468x60

Most Popular

Recent Comments

डॉ सुधाकर संभाजीराव तहाडे on आशीर्वाद सर अन् Best Reader किताब
स्मिता जोशी on Navratri : नवरात्रीचे रंग!
रविंद्र परांजपे.योग शिक्षक व लेखक. मो.9850856774 on Mental Health : जसे मन, तसे तन आणि जीवन
रविंद्र परांजपे.योग शिक्षक व लेखक. मो.9850856774 on Basic Human Needs : निरामय आरोग्याची गरज
रविंद्र परांजपे.योग शिक्षक व लेखक. मो.9850856774 on Basic Human Needs : निरामय आरोग्याची गरज
मुकेश अनिल चेंडेकर on Heart touching story : अशीही एक आई… यशोदा
Team Avaantar on नवी दिशा
सुरेश गुरव सर on आमच्या मराठी शाळा
सुरेश गुरव सर on आमच्या मराठी शाळा
Shweta Gokhale on नवी दिशा
Shweta Gokhale on फासा
सुनिल अनंत बोरकर on मी पिदू आणि हा दनू…
error: Content is protected !!