Close Menu
AvaantarAvaantar

    Subscribe to Updates

    Get the latest creative news from FooBar about art, design and business.

    What's Hot

    गौरीमायला निरोप…

    September 20, 2026

    माझ्या पोतडीतला मदन मोहन…

    September 20, 2026

    Homeopathy : होमिओ आख्यान

    September 20, 2026
    Facebook X (Twitter) Instagram
    Sunday, September 20
    AvaantarAvaantar
    Facebook X (Twitter) Instagram YouTube
    Home
    • अवांतर
    • आरोग्य
    • फिल्मी
    • फूड काॅर्नर
    • मैत्रीण
    • ललित
    • पंचांग आणि भविष्य
    • अध्यात्म
    • शैक्षणिक
    • थर्ड अंपायर
    Latest From Avaantar
    AvaantarAvaantar
    Home » माझ्या पोतडीतला मदन मोहन…
    फिल्मी

    माझ्या पोतडीतला मदन मोहन…

    विशाल कुलकर्णीBy विशाल कुलकर्णीSeptember 20, 2026No Comments10 Mins Read
    Share Facebook Twitter LinkedIn WhatsApp Copy Link
    अवांतर, मराठी कथा, मराठी साहित्य, विशाल कुलकर्णी, लेखक विशाल कुलकर्णी, हिंदी गाणी, हिंदी चित्रपट गाणी, मदन मोहन, मदनमोहन, मदनमोहन संगीत, मदन मोहन लतादिदी, मदन मोहन रफी, मदन मोहन तलत, मदन मोहन मन्ना डे, मदन मोहन आशाताई, मदन मोहन गीता दत्त,
    Share
    Facebook Twitter LinkedIn WhatsApp Email Copy Link

    अकरावी-बारावीत असताना स्व. नानामामांच्या (आईचे मोठे बंधू) तोंडी पहिल्यांदा ‘रंग और नूर की बारात किसे पेश करू…’ ऐकलं, तेव्हा मदन मोहन नावाचा एक विलक्षण संगीतकार हिंदी चित्रसृष्टीत होऊन गेला हे प्रथमच कळलं. त्यानंतर एकदा असंच आईच्या तोंडून ‘माई रीSS, मैं कासे कहूं…’ ऐकलं आणि मग मात्र मदन मोहन या माणसाने पछाडून टाकलं मला. मी लिस्ट बनवली आणि मदन मोहनची गाणी रेकॉर्ड करून आणायला कॅसेटवाल्याकडे गेलो. तेव्हा कोऱ्या कॅसेट्स घेऊन त्यावर आपल्याला हवी ती गाणी रेकॉर्ड करून मिळायची. आता इंटरनेटवर हवे ते सगळे मिळते. तेव्हा मात्र, “अरे, लष्करमध्ये नको, तिकडे नव्या पेठेत तो अमुक कॅसेटवाला आहे ना, तो तुला अगदी हुस्नलाल भगतराम सुद्धा मिळवून देईल, त्याच्याकडे जा…” असे संवाद व्हायचे आणि आम्ही वेड्यासारखे सायकलवर टांग टाकून नव्या पेठेत कुठल्यातरी टपरीत बसलेल्या त्या कॅसेटवाल्याला शोधत फिरायचो. ते दिवसच काही औरच होते राव! मी “मदन मोहन हवाय” म्हटल्यावर, त्या कॅसेटवाल्याने कौतुकाने माझ्याकडे टाकलेला दृष्टीक्षेप मला अजूनही आठवतोय. तेव्हा त्या क्षणी त्यात काही विशेष वाटलं नव्हतं. ती जाणीव जेव्हा त्या रेकॉर्डेड कॅसेटची पारायणे सुरू झाली, तेव्हा व्हायला लागली. हे काहीतरी वेगळं, काहीतरी अफाट आहे, हे कळायला लागलं होतं.

    मदन मोहनची बहुतेक सगळीच गाणी गाजलीच. पण आजच्या लेखाचा विषय त्याची मला प्रचंड आवडणारी पण त्यातल्या त्यात तुलनेने कमी गाजलेली गाणी असा आहे.

    मदन मोहन यांची ‘कमी गाजलेली’ गाणी हा विषय ऐकायला जितका साधा वाटतो, तितका तो प्रत्यक्षात खोल आणि अनेक स्तरांवर विखुरलेला आहे. कारण, मदन मोहनचं संगीत लोकप्रियतेच्या निकषांवर मोजण्याऐवजी संवेदनशीलतेच्या, गुणवत्तेच्या, त्यातल्या छोट्या छोट्या जागांच्या निकषांवर ऐकावं, समजून घ्यावं लागतं. त्याच्या रचना पहिल्या वेळी कदाचित लगेच आवडणार नाहीत. त्या हळूहळू पुन्हा पुन्हा ऐकल्या की, उलगडत जातात आणि एकदा उलगडल्या की, आयुष्यभर सोबत राहतात.

    मदन मोहनच्या संगीताचा केंद्रबिंदू म्हणजे शब्द. गीतकार कोण आहे, तो काय म्हणतोय, आणि त्या शब्दांचा सूर नेमका कसा पकडायचा, कुठे ताणायाचा, कुठे थांबायला हवा, याची विलक्षण जाण मदन मोहनला होती. म्हणूनच त्याची अनेक गाणी ऐकताना असं वाटतं की, संगीत मागेच थांबलंय कुठेतरी आणि शब्द मात्र प्रखरपणे त्या संगीतावर स्वार होऊन पुढे येताहेत. प्रत्यक्षात त्याचं संगीत इतकं सूक्ष्मपणे काम करत पाझरत असतं की, आपल्याला ते फक्त ‘ऐकू’ येत नाही, तर ‘जाणवत’ राहतं. गात्रागात्रातून झिरपत राहतं.

    लताबाईंसोबतचं त्याचं नातं हा स्वतंत्र विषय आहे. 1955 साली आलेल्या ‘रेल्वे प्लॅटफॉर्म’मधलं “चांद मद्धम है आसमां चुप है…” हे गाणं पहिल्यांदा ऐकताना अजून एक हिंदी गाणं एवढंच वाटतं, फारसा प्रभाव जाणवत नाही. पण आपण जसं जसं पुन्हा पुन्हा ऐकायला लागतो, तसं लक्षात येतं की, या गाण्यात कुठेही भावनेचा अतिरेक नाही. साहिर लुधियानवींचे शब्द जणू रात्रीच्या रिकाम्या प्लॅटफॉर्मवर सहज, पण रात्रीशी एकरूप होऊन निवांत फिरावे तसे आपल्या मनात घुमायला लागतात. मदन मोहन आपल्या संगीताने त्या शब्दांना जणू काही श्वास प्रदान करतो. लताबाईंचा स्वर इथे नेहमीप्रमाणे आपल्या तेजाने तळपत नाही, तो निवांतपणे त्या शब्दांना तेज देतो, प्रकाश पसरवतो. मदन मोहनची खरी ओळख अशा गाण्यांतून स्पष्ट होते. रागाधारीत असूनही हे संगीत जड वाटत नाही. स्वर हळूवारपणे उमटत राहतात. जणू रात्रीच्या एकांतात, शांतपणे धुळवाटेवर उमटत जाणारी पावलं. लतादिदी गात नाहीत, त्या ती भावना जगतात आणि त्यांच्याबरोबर आपण सुद्धा…

    हेही वाचा – नूतन… मौनाचा संवाद!

    1951 साली आलेल्या ‘अदा’ या चित्रपटामध्ये लतादिदी आणि मदन मोहनचं एक अप्रतिम गाणं होतं. राजा मेहदी अली खान यांनी लिहिलेलं, ‘प्रीतम मेरी दुनिया में दो दिन तो रहे होते…’ प्रेमाच्या वृथा वल्गना न करता त्याच्या अपूर्णतेची, न मिळालेल्या क्षणांची हळवी जाणीव करून देणारं हे गीत. अतिशय साधे शब्द, त्यांतून व्यक्त होणारी आयुष्यभराची आस. मदन मोहनचे मंद, संयत आणि विरहाच्या छाया शब्दांवर वागवणारे संगीत. अहाहा! यात सूर शब्दांवर अधिराज्य गाजवण्याचा प्रयत्न करत नाहीत, ते शब्दांना श्वास, प्राण देतात. लतादिदींचा आवाज या संगीताला एका वेगळ्याच स्तरावर नेऊन ठेवतो. एक विलक्षण खोली देतो. विरहगीत असले तरी दिदींचा स्वर आर्त होत नाही. उलट तो कमालीचा शांत आहे, जणू एकाकी मन स्वतःशीच बोलतय. शब्द, सूर आणि आवाज एकत्र येऊन हे गाणे विरहाच्या तक्रारीपेक्षा स्वीकाराचे, वेदनेपेक्षा आठवणीचे रूप धारण करते आणि म्हणूनच ते ऐकून झाल्यानंतरही मनाच्या कुठल्यातरी कोपऱ्यात हळूच नकळत रुतून बसते, रुजून जाते.

    1960 साली आलेल्या बहाना मधलं ‘जा रे बदरा बैरी जा’ या गाण्याचा उल्लेख अनेकदा ‘पावसाचं गाणं’ म्हणून केला जातो, पण प्रत्यक्षात ते विरहगीत आहे. इथे पाऊस हा फक्त निमित्त आहे. चाल रागदारीच्या जवळ जाणारी, पण तरीही शास्त्रीय संगीताकडे न वळणारी. मदन मोहनची खासियत इथे दिसते. तो राग वापरतो, पण शास्त्रीय संगीत ऐकवण्यासाठी नाही, त्या शब्दांना, त्यातल्या भावनेला अपेक्षित खोली देण्यासाठी तो शास्त्रीय संगीताचा वापर करतो. राजेंद्र कृष्ण यांच्या शब्दाचं गारूड मदन मोहन अजून पक्कं करतो.

    1965 साली आलेल्या ‘नीला आकाश’ची गाणी ऐकली आहेत? त्यातलं ‘ना आसमां ना सितारे फ़रेब देते हैं…’ ऐकलंय कधी? हे गाणं विशेष आहे. लताबाईंच्या आवाजातली ही रचना ऐकताना असं वाटतं की, मदन मोहनला गाण्याच्या लोकप्रियतेविषयी काही देणेघेणेच नसायचे. प्रत्येक वेळी काहीतरी अनवट वाट शोधून काढायचा त्याचा प्रयत्न असायचा. लताबाईंच्या आवाजातला तटस्थ, तत्वचिंतनशील सूर कुठेतरी आतवर मनाला स्पर्शून जातो, तेव्हा त्यात मदन मोहनचा वाटा सिंहाचा असतो. याच चित्रपटातील आशाताईंचे ‘आपको प्यार छुपाने की बुरी आदत है’ हे गाणे देखील याच श्रेणीतले.

    मला मदन मोहन सगळ्यात जास्त आवडला तो 1970 साली आलेल्या ‘दस्तक’मध्ये. मजरूहसाहेबांचे अंतर्बाह्य हलवून टाकणारे शब्द जेव्हा ‘न तड़पने की इजाजत है, न फ़रियाद की है, घुट के मर जाऊ ये मर्जी मेरे सय्याद की है’ म्हणत थेट अंगावर येतात आणि मग जेव्हा लताबाई ‘माई री, मैं कासे कहूं…’ म्हणत एक अस्फुट, मौन टाहो फोडतात, तेव्हा हादरून जायला होतं. याच चित्रपटातील दिदींचंच ‘बैयाँ ना धरो’ हे गाणं असंच. का कुणास ठाऊक पण मला सतत असं वाटत आलेलं आहे की, हे गाणं लोकप्रिय असूनही खरंतर समजून घेण्याच्या पातळीवर कमी ऐकलं गेलेलं आहे. ‘माई री’ किंवा ‘बैय्या ना धरो’ यासारखी गाणी ऐकताना एक गोष्ट जाणवते ती म्हणजे मदन मोहन फक्त गाण्याला संगीत नाही द्यायचा, तो त्या गाण्याला एक चिरंतन अस्तित्व द्यायचा. इथे मदन मोहनची चाल एकदम चिरेबंदी आहे. ठाम, शांत, आणि उत्कट…

    अर्थात, मदन मोहन म्हणजे फक्त लता मंगेशकर नाही. मदन मोहनचं आणि तलतचं एक वेगळंच, नितांत सुंदर, विलक्षण, अगदी जीवघेणं समीकरण आहे. तलत महमूदच्या आवाजात त्याचं संगीत काही वेगळ्याच रंगात दिसतं.

    1964 साली आलेल्या ‘जहाँआरा’मधली राजेन्द्रकृष्णजीची नज़्म आठवते? ‘फिर वही शाम, वही ग़म वही तनहाई है’ ही नज़्म ऐकताना असं वाटतं की, संध्याकाळ स्वतःच बोलतेय. तलतच्या आवाजात एक अबोल उदासी आहे, त्याच्या स्वरांमधला हळूवार, मुलायम कंप याचे द्योतक आहे आणि मदन मोहन त्या उदासीला अतिशय संयत, संवेदनक्षम चौकट देतो. कुठेही मोठे आरोह-अवरोह नाहीत, पण प्रत्येक ओळ मनावर एक प्रकारचा ताण उभा करते.

    जहाँआरा मधलंच ‘मैं तेरी नज़र का सुरूर हूँ, तुझे याद हो के ना याद हो’ हे असंच अजून एक अप्रतिम गीत. गाजलेलं पण तरीही कमी ऐकलं गेलेलं. मदन मोहनचे संयत, विरहप्रधान संगीत आणि तलतचा तरल, मृदू, किंचित उदास स्वर यांचा अतिशय नाजूक संगम आहे, हे गाणं. इथे प्रेमाची मागणी नाहीये, तर फक्त आठवणीत तरी स्थान मिळावे, अशी एक आर्त याचना आहे. मदन मोहनची शब्दांना त्यांची स्पेस देणारी, अपूर्णतेची जाणीव करून देणारी चाल तलतच्या आवाजात ती वेदना थेट मनात उतरवते. म्हणूनच ही गाणी निव्वळ विरहगीते म्हणून न राहता प्राक्तनाचा स्वीकार आणि एक हळवी स्मृती बनून श्रोत्याच्या मनात खोलवर रुजून बसतात.

    त्याच चित्रपटातील ‘किसी की याद में दुनिया को हैं भुलाए हुए, ज़माना गुज़रा है अपना ख़याल आए हुए’ ही राजेंद्रकृष्णजीची गझलसुद्धा तुलनेने फार कमी ऐकली जाते. इथे स्मृती ही वेदना नाही, ती सवय आहे. राजेंद्र कृष्ण यांच्या शब्दातल्या छोट्या छोट्या जागा, सूक्ष्म छटा मदन मोहन यांच्या संगीताने ठळकपणे उठून आल्या आहेत. रफी साहेबांनी फार सुंदर गायली आहे ही गझल.

    रफीसाहेबांसोबत मदन मोहन यांची मैफल अधिक गंभीर, अधिक विस्तारलेली वाटते. 1964 साली आलेल्या ‘गझल’मधलं ‘रंग और नूर की बारात किसे पेश करूँ’ हे गाणं म्हणजे निव्वळ एक गीत नसून एक संगीतमय निवेदन आहे. खरेतर, साहिरच्या शब्दांची स्वतःचीच उंची इतकी अफाट आहे की, नुसते गद्यात वाचली असती गझल तरी हिट झाली असती, इथे तर मदन मोहनचे संगीत आणि जोडीला रफीसाहेबांचा दैवी आवाज. मदन मोहन कुठेही शब्दांना सुरांनी, संगीताने सजवण्याचा प्रयत्न करत नाही. तो फक्त साथ देतो आणि साहिरचे शब्दच दिग्विजय करतात. रफीसाहेब इथे फक्त गात नाहीत, ते साहिरचा शब्द न शब्द जणूकाही शोषून घेतात, ती गझल जगतात आणि मग जे काही जन्माला येतं, ते निखालस सोनं असतं!

    मन्ना डे यांच्यासोबत मदन मोहनची शैली अधिक शास्त्रीय बाजूकडे झुकताना दिसते. ‘देख कबीरा रोया’मधलं (1957) ‘कौन आया मेरे मन के द्वारे’ हे गाणं भक्तिरसाच्या सीमेला जाऊन भिडतं. रचना ऐकताना वाटतं की, हे गाणं चित्रपटासाठी नाही, तर एखाद्या शास्त्रीय संगीताच्या बैठकीसाठी, मैफलीसाठी संगीतबद्ध केले असावे.

    मन्ना डेचे ‘बावर्ची’मधलं ‘तुम बिन जीवन कैसा जीवन’ हे एक अप्रतिम गाणे आहे. यातच सगळे आले. या गाण्यातला हेमंत राग हा तसाही हिंदी चित्रपटात कमी वापरलेला राग.  माझ्या आठवणीत अजून इतर दोन गाणी आहेत. पहिले ‘अब मैं दुवा का क्या करू?’ हे लताचे आणि ‘सुध बिसर गयी आज’ हे मन्ना डे आणि रफीचे!

    आशा भोसले यांच्या आवाजातली मदन मोहन यांची गाणी तुलनेने कमी आहेत, कदाचित म्हणून ती तुलनेने दुर्लक्षित झाली असावीत का? ‘अदालत’मधलं (1958) मदन मोहनसाठी त्यांनी लतादिदींबरोबर गायलेलं ‘जा जा रे जा सजना’ असो, अथवा गीता दत्तबरोबर आशाताईंनी गायलेलं ‘दुपट्टा मेरा मलमल का’ असो, ही गाणी देखील तितकीच नितांत सुंदर म्हणता येतील, अशीच होती. पण अदालतमधली ‘उनको ये शिकायत है…’, ‘यूं हसरतों के दाग…’ आणि ‘जाना था हमसे दूर…’ ही गाणी लतादिदींनी आपल्या सुरांच्या ताकदीने इतक्या उंचीवर नेऊन ठेवलीत की, आशा आणि गीतादेखील निष्प्रभ झाल्यात या चित्रपटात.

    पण मदन मोहनने आशाला काही नितांत सुंदर अशी गाणी दिलेली आहेत. आशाने देखील तेवढ्याच ताकदीने, तेवढ्याच तन्मयतेने ती निभावली देखील आहेत. 1956 साली आलेल्या ‘मेमसाहिब’मधलं ‘इश्क एक जहर सही’ असो, वा 1953च्या ‘चाचा चौधरी’मधलं ‘मेरे पिया छेड़े जिया’ असो. अठ्ठावन्नच्या ‘आखरी दांव’मधलं नूतनवर चित्रित झालेलं ‘हाय उनकी वो निगाहें, दिल देखे जिनकी राहे’ असो, वा 1959 साली आलेल्या ‘बँक मॅनेजर’मधलं ‘सबा से ये कह दो के कलियाँ बिछाए’ असो. काही म्हणा, लतादिदी मदन मोहनला भाऊ मानायच्या, त्यांचं नातं काही विलक्षणच होतं. ‘गझलों का बादशाह’ म्हणायच्या लतादिदी मदन मोहनला. लताबाईंना जेवढी ग्रेट गाणी दिलीत मदन मोहनने, तेवढी इतर कुणालाच नाही दिली! पण आशाची ही गाणी ऐकताना लक्षात येतं की, आशाताईंच्या आवाजातली ताकद मदन मोहनने अगदी नेमकेपणाने ओळखली होती आणि तिचा त्याने व्यवस्थित वापरही करून घेतलेला आहे.

    गीता दत्त यांचं ‘भाई भाई’मधलं (1956) ‘ऐ दिल मुझे बता दे’ हे गाणं एक अस्वस्थ प्रश्न आहे. उत्तर नाही, फक्त शोध आहे. चाल साधी आहे, पण त्या साधेपणात एक अस्वस्थता आहे. गीता दत्त यांच्या आवाजातला कंप आणि मदन मोहन यांची मितभाषी धून मिळून हे गाणं खोलवर रुततं.

    हेही वाचा – घरौंदा… निरंतर आत्मबोधाचा शोध

    मुकेश यांच्या आवाजातली 1961 साली आलेल्या ‘संजोग’मधली ‘भूली हुई यादों मुझे इतना ना सताओ’ ही रचना आज क्वचित ऐकू येते. पण हे गाणं ऐकताना जाणवतं की, मदन मोहन यांनी मुकेश यांचा एक साध्या माणसाचा, सच्च्या माणसाचा म्हणून ओळखला जाणारा स्वर किती प्रामाणिकपणे वापरला आहे. इथे दु:ख वरवरचं न राहता ते जगण्याचा एक भाग बनून जातं.

    शमशाद बेगम आणि मुकेश यानी गायलेलं, 1950 साली आलेल्या ‘आँखें’मधलं ‘हमसे नैन मिलाना बीए पास करके’ हे गाणं मदन मोहन यांच्या वेगळ्या, थोड्या खेळकर बाजूचं उदाहरण आहे. फक्त गंभीर गझलाच नव्हे, तर गरज पडली तर तो लोकप्रिय, हलकंफुलकं संगीतही तेवढ्याच सफाईने देऊ शकत होता, हे सिद्ध करणारं हे देखणं गाणं.

    या सगळ्या गाण्यांकडे एकत्र पाहिलं, तर लक्षात येतं की, मदन मोहन यांची कमी गाजलेली किंवा फारतर कमी ऐकली गेलेली गाणी हा त्यांच्या संगीताचा खरा गाभा आहे. मदन मोहन प्रसिद्धी, यश, झगमगाट यापेक्षा, नेहमीच गुणवत्तेला, अंतर्मुख करणाऱ्या संगीताला प्राधान्य देत आलेला आहे. म्हणूनच ही गाणी आजही शांतपणे ऐकली जातात. ती कदाचित प्रत्येक सर्वसामान्य व्यक्तीचे लक्ष वेधून घेत नसतील, पण एकदा ऐकली की, कायमची मनात ठाण मांडून बसतात. मदन मोहन याचं संगीत म्हणजे शांत एकांतात, आवाज कमी करून निवांतपणे, वेळ देऊन ऐकायचं संगीत आहे… आणि कदाचित म्हणूनच, ते आजही तितकंच जिवंत आहे, तितकंच हवंहवंसं आहे.

    Avatar photo
    विशाल कुलकर्णी

    विशाल विजय कुलकर्णी राहणार - मु.पो. चिंचवड, पुणे - 33. शिक्षणाने इलेक्ट्रॉनिक्स अभियंता, व्यवसायाने विक्री आणि विपणन (Sales & Marketing) क्षेत्रातील अनुभवी. साहित्य आणि सर्जनशील लेखन ही माझी खरी ओळख आहे. शब्दांशी असलेली नाळ जपत मी कथा, कविता, ललित लेख, सामाजिक विषयांवरील लेखन आणि वैचारिक अभिव्यक्ती अशा विविध साहित्यप्रकारांत सातत्याने लेखन करत आलो आहे. माझ्या ‘Beyond Thresholds’ या इंग्रजी पुस्तकासह ‘यलगार’ आणि ‘ओलेत्या ओळी पावसाच्या...’ ही ई-पुस्तके (अमेझॉन केडीपी) आहेत. काही वेबसाइट्स तसेच फेसबुक सारखी विविध सामाजिक माध्यमे, वृत्तपत्रे, मासिके आणि ‘ऐसी अक्षरे मेळवीन’, ‘कविता माझी सखी’, ‘माझी भटकंती’ या माझ्या वैयक्तिक ब्लॉग्सवर नियमितपणे लेखन करतो. लेखन ही केवळ आवड नसून संवाद घडवण्याचे, विचारांना दिशा देण्याचे आणि ब्रँड्सना प्रभावी शब्दांची ताकद देण्याचे माध्यम आहे, या विश्वासातून मी VKS Storycraft Media या मालकी हक्काच्या (Proprietary) संस्थेची स्थापना केली आहे. VKS Storycraft Media ही संस्था कॉपीरायटिंग, कंटेंट रायटिंग, ब्रँड स्टोरीटेलिंग, कॉर्पोरेट कम्युनिकेशन आणि व्यवसायाभिमुख आशय निर्मिती (Business Content Creation) या क्षेत्रात व्यावसायिक सेवा प्रदान करते.

    Related Posts

    Movie : ‘The Intouchable’… जगावेगळी कहाणी

    September 14, 2026 फिल्मी

    ‘तहादेर कथा’… आदर्शांच्या मृत्यूची कथा

    September 13, 2026 फिल्मी

    मन आनंद आनंद छायो… आत्मशोधाची संगीतमय अनुभूती

    September 6, 2026 फिल्मी
    Leave A Reply Cancel Reply

    Demo
    Stay In Touch
    • Facebook
    • Twitter
    • Instagram
    • YouTube
    Don't Miss
    फिल्मी

    Movie : ‘The Intouchable’… जगावेगळी कहाणी

    By डॉ. अस्मिता हवालदारSeptember 14, 2026

    The Intouchable हा खूप गाजलेला, सगळे रेकोर्ड तोडणारा फ्रेंच भाषेतला सिनेमा मी पाहिला, तेव्हापासून विचारचक्र…

    ‘तहादेर कथा’… आदर्शांच्या मृत्यूची कथा

    September 13, 2026

    मन आनंद आनंद छायो… आत्मशोधाची संगीतमय अनुभूती

    September 6, 2026

    भूतकाळ न विसरलेला भिडुजी!

    August 31, 2026

    Subscribe to Updates

    Get the latest creative news from Avaantar

    Latest From Avaantar

    गौरीमायला निरोप…

    September 20, 2026

    माझ्या पोतडीतला मदन मोहन…

    September 20, 2026

    Homeopathy : होमिओ आख्यान

    September 20, 2026

    साप्ताहिक राशीभविष्य : 20 ते 26 सप्टेंबर 2026

    September 20, 2026

    सार्थ ज्ञानेश्वरी : रात्री आणि दिवसा, कनका आणि कापुसा

    September 20, 2026

    Panchang : आजचे पंचांग आणि दिनविशेष; 20 सप्टेंबर 2026

    September 20, 2026

    POPULAR CATEGORY

    • Blogs 1
    • अध्यात्म 441
    • अवांतर 208
    • आरोग्य 149
    • थर्ड अंपायर 6
    • पंचांग आणि भविष्य 590
    • फिल्मी 69
    • फूड काॅर्नर 256
    • मैत्रीण 30
    • ललित 931
    • शैक्षणिक 87
    • 98699 75883
    • joshimanoj@avaantar.com
    Facebook X (Twitter) Instagram LinkedIn

    एक पाऊल सांस्कृतिक सर्जनशीलतेकडे...

    आजकाल वाचनसंस्कृतीबद्दल चिंता व्यक्त केली जात आहे. वास्तविक ‘पुस्तक वाचन’ संस्कृतीला धोका निर्माण झाला आहे. वाचनसंस्कृती अबाधित आहे आणि ती अबाधित राहील. कारण, पुस्तकांच्याच जोडीला स्मार्टफोन, ई-बुक, ई-मॅगझिन यासारखी आधुनिक काळाशी सुसंगत माध्यमे उपलब्ध झाली आहेत. याच अत्याधुनिकतेची कास धरत आम्ही हे पाऊल उचलले आहे... अवांतर ही वेबसाइट!

    ‘अवांतर’ हा एक वेब प्लॅटफॉर्म आहे, जो विचार, साहित्य, कला आणि संस्कृतीच्या सर्जनशील प्रवाहाला समर्पित आहे. विविध विषयांवर लेख, कविता, कथा आणि विचार आपल्यापर्यंत पोहोचविण्याचा हा प्रयत्न आहे. दैनंदिन धावपळीच्या जीवनात मिळाणारी काही क्षणांची उसंत सार्थकी लावावी, उत्तम साहित्याद्वारे वाचकांना नवनवीन दृष्टिकोन देणे, विचारांना चालना देणे आणि सर्जनशीलतेला प्रोत्साहन देणे, हा उद्देश आमचा यामागे आहे.

    ‘अवांतर’च्या निमित्ताने विविध लेखक, कवी, विचारवंत आणि कलाकारांना एक हक्काची वेबसाइट उपलब्ध केली आहे. त्यांचे वैविध्यपूर्ण साहित्य, माहिती जगासमोर मांडण्यासाठी एक मुक्त व्यासपीठ असे या वेबसाइटचे स्वरूप आहे. ‘अवांतर’ च्या माध्यमातून आम्ही मराठी भाषेतील समृद्ध साहित्यिक परंपरेला नवी दिशा देत, आधुनिक काळाशी जोडून ठेवण्याचा आमचा प्रयत्न आहे.

    या वेबसाइटला ‘अवांतर’ नाव विचारपूर्वक देण्यात आले आहे. कोणत्याही एका विचाराला किंवा विचारधारेशी बांधिलकी न दाखवता, सर्वांना सामावून घेत, पुढे जाण्याचा एक निखळ उद्देश यामागे आहे. आमच्या या प्रवासात जवळपास 25 ते 30 लेखक, कवी, आरोग्यतज्ज्ञ, शैक्षणिक तज्ज्ञ साथसोबत आहेत. पण आमचा हा प्रवास तुमच्याशिवाय अपूर्ण आहे. सर्जनशीलतेच्या या प्रवासात सर्वच सहभागी होऊया!

    संपादकीय मंडळ

    • मनोज शरद जोशी (संपादक)
    • आराधना जोशी (कार्यकारी संपादक)
    • चिन्मय आचार्य (कायदेविषयक सल्लागार)
    • भालचंद्र गोखले (आर्थिक सल्लागार)
    • गार्गी देवधर (सल्लागार)
    Read More
    • M.A.Y. Multimedia Rg.No.MH-17-0175213 Palghar, Maharashtr

    © 2026 Avaantar.com All Rights Reserved. | Design & Developed By Creative Marketix

    • Terms & Conditions
    • Privacy Policy
    About Us
    About Us

    Your source for the lifestyle news. This demo is crafted specifically to exhibit the use of the theme as a lifestyle site. Visit our main page for more demos.

    We're accepting new partnerships right now.

    Email Us: info@example.com
    Contact: +1-320-0123-451

    Facebook X (Twitter) Pinterest YouTube WhatsApp
    Our Picks

    गौरीमायला निरोप…

    September 20, 2026

    माझ्या पोतडीतला मदन मोहन…

    September 20, 2026

    Homeopathy : होमिओ आख्यान

    September 20, 2026
    Most Popular

    Homeopathy : होमिओ आख्यान

    September 20, 2026

    स्मृतीगंध

    January 26, 2025

    विष्णूरुपी जावई…

    January 26, 2025
    © 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.
    • Home
    • Buy Now

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.