काही गाणी आपण ऐकतो. काही गाणी आपल्याला गुणगुणावीशी वाटतात. पण काही निवडक गाणी अशी असतात की ती ऐकताना नकळत डोळे मिटतात, श्वास संथ होतो आणि मन एका वेगळ्याच शांत प्रदेशात पोहोचते. “मन आनंद आनंद छायो…” हे असेच एक गीत आहे.
1982 साली प्रदर्शित झालेल्या ‘विजेता’ या चित्रपटातील हे गाणे. गोविंद निहलानी दिग्दर्शित आणि शशी कपूर निर्मित हा चित्रपट एका तरुणाच्या आत्मशोधाची कथा सांगतो. जीवनातील गोंधळ, अपयश, आत्मविश्वासाचा अभाव आणि त्यानंतर स्वतःचा शोध घेत पुन्हा उभे राहण्याचा हा प्रवास आहे. या प्रवासातील अंतर्मनाचा उजेड म्हणजे हे गीत.
या गीताचे शब्द लिहिले आहेत कवी वसंत देव यांनी. त्यांच्या लेखणीत साहित्य, अध्यात्म आणि भारतीय संस्कृतीची खोल जाण होती. त्यामुळे या गीतातील प्रत्येक शब्द फक्त सुंदर नाही, तर अर्थपूर्ण आहे. येथे “आनंद” हा क्षणिक सुखाचा नाही, तर अंतःकरणात जागणाऱ्या आत्मानंदाचा आहे. अंधार म्हणजे केवळ रात्र नाही, तर मनातील अज्ञान, संभ्रम आणि अस्वस्थता आहे. पहाट म्हणजे केवळ उगवता सूर्य नाही, तर नव्या जाणीवांचा आरंभ आहे.
या शब्दांना सुरांची अमूल्य साथ लाभली ती अजित वर्मन यांच्या संगीताची. चित्रपटसंगीतात शास्त्रीय संगीताचा वापर करताना अनेकदा लोकप्रियतेसाठी काही तडजोडी केल्या जातात. पण या गाण्यात तसे कुठेही जाणवत नाही. रागाची शुद्धता जपत त्यांनी चित्रपटाच्या भावविश्वाशी पूर्णपणे सुसंगत अशी रचना केली आहे.
आशा भोसले आणि पंडित सत्यशील देशपांडे यांच्या सुमधूर आणि चिंतनात्मक सूरांनी सजलेले हे गीत आपल्याला एका वेगळ्याच विश्वात घेऊन जाते. आशाताईंचा आवाज आपण अनेक रंगांत ऐकला आहे. खट्याळ, रोमँटिक, गझल, भावगीत, लोकगीत… पण या गीतात त्यांचा स्वर विलक्षण संयमी, निर्मळ आणि भक्तिभावाने ओथंबलेला आहे. इथे शब्दांपेक्षा भावना बोलतात.
हेही वाचा – नूतन… मौनाचा संवाद!
दुसरीकडे, पंडित सत्यशील देशपांडे यांच्या आवाजात शास्त्रीय संगीताची परंपरा, रियाज आणि गांभीर्य स्पष्ट जाणवत राहते. त्यांच्या आलापांनी गाण्याला एक वेगळी उंची प्राप्त होते. दोघांचे स्वर जणू दोन प्रवाह आहेत, जे एकत्र येऊन शांत, निर्मळ नदी बनतात.
या संपूर्ण गीताचा आत्मा आहे राग अहीर भैरव.
हिंदुस्थानी शास्त्रीय संगीतात अहीर भैरव हा पहाटेचा राग मानला जातो. रात्र संपून दिवसाची चाहूल लागते, पक्ष्यांचे स्वर ऐकू येऊ लागतात, मंद प्रकाश क्षितिजावर पसरू लागतो, त्या वेळेचा हा राग. म्हणूनच या रागात एकाच वेळी गंभीरताही आहे आणि प्रसन्नताही.
भैरव रागाची स्थिरता आणि अहीर अंगाची कोमलता यांचा सुंदर संगम म्हणजे अहीर भैरव. कोमल ऋषभ आणि कोमल निषाद यामुळे रागाला विलक्षण माधुर्य लाभते. विशेषतः, ऋषभवरील मंद आंदोलन मनाला अंतर्मुख करते. हा राग कोणताही आवेग निर्माण करत नाही; तो मनाला हळूहळू शांत करत नेतो.
अनेक राग आनंद व्यक्त करतात, पण अहीर भैरवचा आनंद वेगळा आहे. तो उत्सवाचा गजर नाही. तो अंतर्मनात अलगद फुलणारा आनंद आहे. एखाद्या दीर्घ अंधारानंतर पहिल्या सूर्यकिरणांनी जशी मनात आशा निर्माण होते, तसाच त्याचा स्वभाव आहे.
गाण्याची सुरुवात तानपुऱ्याच्या स्थिर, गंभीर नादाने होते. त्यावर उमटणारा पहिला स्वरच श्रोत्याला रागाच्या विश्वात घेऊन जातो. तबला, बासरी, स्वरमंडल आणि तंतूवाद्यांचा वापर अत्यंत मोजका आहे. कोणतेही वाद्य गायकीवर वरचढ होण्याचा प्रयत्न करत नाही, वर्चस्व गाजवत नाही. ऐकणाऱ्याची कर्णेंद्रिये पूर्णतः स्वर आणि शब्द यावरच केंद्रित होऊन राहतात.
वर्मनसाहेबांचे कौशल्य हे की, हे गाणे ऐकताना असे भासत राहते की, संगीतकाराने निव्वळ संगीत रचलेले नाहीत, तर ती रम्य पहाटेची वेळच स्वरांत उतरवलेली आहे.
या गीतातील प्रत्येक प्रतिमा भारतीय तत्त्वज्ञानाशी जोडलेली आहे. अंधारातून प्रकाशाकडे, अस्वस्थतेतून शांततेकडे, भ्रमातून ज्ञानाकडे आणि अहंकारातून समर्पणाकडे नेणारा हा प्रवास आहे. त्यामुळे हे गाणे केवळ भक्तिगीत राहत नाही, तर आत्मशोधाची एक संगीतमय अनुभूती बनते.
चित्रपटातील याचे चित्रणही तितकेच संयत आहे. कुठेही अनावश्यक नाट्य नाही, भव्यता नाही, कृत्रिमता नाही. दृश्य, संगीत आणि शब्द यांचा समतोल इतका सुंदर साधला आहे की श्रोत्याचे लक्ष केवळ भावविश्वाकडे जाते. पहाटे पहाटे शुचिर्भूत होऊन तानपुरा घेऊन बसलेली, केस मोकळे सोडलेली, शुभ्रवस्त्रा रेखा इतकी शालिन आणि सात्विक कधीच दिसली नसेल.
हेही वाचा – घरौंदा… निरंतर आत्मबोधाचा शोध
आजच्या वेगवान काळातही हे गीत ऐकले की वेळ जणू थोडा थांबतो. मनाची धावपळ कमी होते. काही क्षण स्वतःकडे पाहावेसे वाटते. हेच या गीताचे खरे यश आहे.
“मन आनंद आनंद छायो” हे फक्त एक चित्रपटगीत नाही. ते पहाटेच्या प्रकाशासारखे आहे. रोज उगवणाऱ्या सूर्याप्रमाणे ते प्रत्येक वेळी नव्याने अनुभवता येते. वसंत देव यांचे चिंतनशील शब्द, अजित वर्मन यांचे अभिजात संगीत, आशा भोसले आणि पंडित सत्यशील देशपांडे यांची अप्रतिम गायकी आणि राग अहीर भैरवचे निर्मळ सौंदर्य या सर्वांचा संगम या गीताला कालातीत बनवतो.
काही गाणी काळाच्या ओघात विस्मृतीत जातात. पण काही गाणी काळालाच मागे टाकतात. “मन आनंद आनंद छायो…” हे त्यापैकीच एक. हे गाणे ऐकताना आपण केवळ संगीत ऐकत नाही, तर आपल्या अंतर्मनात उगवणारी एक शांत पहाट अनुभवत असतो.


