अध्याय तेरावा
सुवायें मेघु सांवरे । जैसा चंद्रें सिंधु भरे । तैसा मातुला रसु आदरें । श्रोतयांचेनि ॥1151॥ आतां आनंदमय आघवें । विश्व कीजेल देवें । तें रायें परिसावें । संजयो म्हणे ॥1152॥ एवं जे महाभारतीं । श्रीव्यासें आप्रांतमती । भीष्मपर्वी शांती । म्हणितली कथा ॥1153॥ तो कृष्णार्जुनसंवादु । नागरीं बोलीं विशदु । सांगोनि दाऊं प्रबंधु । वोवियेचा ॥1154॥ नुसधीचि शांतिकथा । आणिजेल कीर वाक्पथा । जे शृंगाराचां माथां । पाय ठेविती ॥1155॥ दाऊं वेल्हाळे देशी नवी । जे साहित्यातें वोजावी । अमृतातें चुकी ठेवी । गोडिसेंपणें ॥1156॥ बोल वोल्हावतेनि गुणें । चंद्रासि घे उमाणे । रसरंगीं भुलवणें । नादु लोपी ॥1157॥ खेचराचियाही मना । आणी सात्त्विकाचा पान्हा । श्रवणासवें सुमना । समाधि जोडे ॥1158॥ तैसा वाग्विलास विस्तारू । गीतार्थेंसी विश्व भरूं । आनंदाचें आवारूं । मांडूं जगा ॥1159॥ फिटो विवेकाची वाणी । हो कानामनाची जिणी । देखो आवडे तो खाणी । ब्रह्मविद्येची ॥1160॥ दिसो परतत्त्व डोळां । पाहो सुखाचा सोहळा । रिघो महाबोधसुकाळा- । माजीं विश्व ॥1161॥ हें निफजेल आतां आघवें । ऐसें बोलिजेल बरवें । जें अधिष्ठिला असें परमदेवें । निवृत्तीं मी ॥1162॥ म्हणोनि अक्षरीं सुभेदीं । उपमा श्लोक कोंदाकोंदी । झाडा देईन प्रतिपदीं । ग्रंथार्थासी ॥1163॥ हा ठावोवरी मातें । पुरतया सारस्वतें । केलें असे श्रीमंतें । श्रीगुरुरायें ॥1164॥ तेणें जी कृपासावायें । मी बोलें तेतुलें सामाये । आणि तुमचिये सभे लाहें । गीता म्हणों ॥1165॥ वरि तुम्हा संतांचे पाये । आजि मी पातलों आहें । म्हणोनि जी नोहे । अटकु काहीं ॥1166॥ प्रभु काश्मिरीं मुकें । नुपजे हें कौतुकें । नाहीं उणीं सामुद्रिकें । लक्ष्मीयेसी ॥1167॥ तैसी तुम्हां संतांपासीं । अज्ञानाची गोठी कायसी । यालागीं नवरसीं । वरुषेन मी ॥1168॥ किंबहुना आतां देवा । अवसरु मज देयावा । ज्ञानदेव म्हणे बरवा । सांगेन ग्रंथु ॥1169॥
हेही वाचा – सार्थ ज्ञानेश्वरी : याचिलागीं सुमती, जोडिती शांतिसंपत्ती
अर्थ
अनुकूल वार्याने पाऊस पाडणारे मेघ जसे जमतात, अथवा जशी (पौर्णिमेच्या) चंद्राने समुद्राला भरती येते, त्याप्रमाणे श्रोत्याच्या (अर्जुनाच्या) ऐकण्य़ाच्या आदराने व्याख्यानाच्या रसभरितपणास भरते आले आहे. ॥1151॥ संजय म्हणतो, आता देवांकडून संपूर्ण विश्व आनंदमय केले जाईल, ते महाराजांनी (धृतराष्ट्र राजांनी) ऐकावे. ॥1152॥ (ज्ञानेश्वर महाराज म्हणतात) याप्रमाणे विशालबुद्धि व्यासांनी महाभारतात भीष्मपर्वामधे शांतरसाने भरलेली कथा सांगितली ॥1153॥ तो कृष्णार्जुनांचा संवाद ओवीबद्ध काव्यात सुंदर शब्दांनी स्पष्ट करून दाखवू. ॥1154॥ केवळ शांतरसाची कथा शब्दांनी सांगितली जाईल. परंतु ती शृंगाररसावर ताण करील, अशी सांगितली जाईल. ॥1155॥ ज्या रीतीने देशी भाषा अलंकाराला सजवील व अमृताला आपल्या गोडपणाने मागे सारील, अशा रीतीने अपूर्व सुंदर मराठी भाषा उपयोगात आणू. ॥1156॥ माझे शब्द, त्यांची शांत करणारी शक्ति पाहिली तर, चंद्राच्यावर ताण करतील व माझे शब्द आपल्या रसांतील रंगांच्या मोहक शक्तीने नादब्रह्मास लोपवतील ॥1157॥ पिशाच्चादि अज्ञानी योनी आहेत, पण त्यासही माझे शब्द सत्वगुणाचा पान्हा फोडतील आणि शुद्ध अंत:करणाच्या लोकांना तर, माझे शब्द ऐकल्याबरोबर समाधि लागेल. ॥1158॥ याप्रमाणे वाणीच्या विलासाचा विस्तार करू. व गीतार्थाने विश्व भरून टाकू. व सगळ्या जगाला आनंदाचा कोट करू. ॥1159॥ आत्मानात्मविवेकाचा कमीपणा नाहीसा होवो, कानाचे व मनाचे जगण्याचे सार्थक होवो व वाटेल त्याला ब्रह्मविद्येची खाण बघता येवो. ॥1160॥ परब्रह्म (सर्वांच्या) डोळ्यांना दिसो, सुखाचा उत्सव उदयास येवो व सर्व जग ब्रह्मज्ञानाच्या विपुलतेत प्रवेश करो. ॥1161॥ श्रेष्ठ देव जे निवृत्तिनाथ, त्यांनी माझा अंगीकार केला असल्यामुळे, हे (वर सांगितलेले) सर्व आता घडून येईल, असे मी चांगले बोलेन. ॥1162॥ एवढ्याकरिता मर्म स्पष्ट करणाऱ्या शब्दांनी, उपमा व काव्य यांची रेलचेल करून या गीताग्रंथातील प्रत्येक पदाचा अर्थ स्पष्ट करून सांगेन. ॥1163॥ माझ्या श्रीमंत गुरुरायांनी मला इतक्या पूर्ण विद्येने युक्त केला आहे. ॥1164॥ महाराज, त्या कृपेच्या साह्याने मी जितके बोलेन, तितके तुम्हाला मान्य होत आहे आणि तुम्हा संतमंडळींमध्ये गीतार्थ सांगण्याचे सामर्थ्य मला आले आहे. ॥1165॥ शिवाय तुम्हा संतांच्या चरणांजवळ आज मी प्राप्त झालो आहे, म्हणून काही अडचण राहिली नाही. ॥1166॥ महाराज, सरस्वतीच्या पोटी मुके बालक सहजदेखील उत्पन्न होणार नाही, (व तसेच) लक्ष्मीला चांगल्या सामुद्रिक चिन्हांचा कमीपणा नसतो. ॥1167॥ त्याचप्रमाणे तुम्हा संतांजवळ अज्ञानाची गोष्ट कसली? म्हणून मी नवरसांचा वर्षाव करीन. ॥1168॥ फार काय सांगावे! देवा (श्रीगुरुराया), मला बोलण्याला आता संधी द्यावी, म्हणजे मी ग्रंथ चांगल्या रीतीने सांगेन, असे ज्ञानेश्वर महाराज म्हणतात. ॥1169॥
॥तेरावा अध्याय समाप्त॥
क्रमश:
हेही वाचा – सार्थ ज्ञानेश्वरी : स्नेहाचिया भरोवरी, आंबुथिला दीपु घे थोरी


