संपूर्ण जगाच्या पाठीवर भारतासारखी संस्कृती शोधूनही सापडणे कठीण. या संस्कृतीचे एक विलक्षण वैशिष्ट्य आहे — तिने बाहेरून आलेल्या गोष्टी केवळ स्वीकारल्या नाहीत, तर त्या इतक्या आत्मसात केल्या की, कालांतराने त्या मूळच्या भारतीयच असाव्यात, असे आपल्यालाच वाटू लागले. आपल्या रोजच्या संगीतातली पेटी असो, तबला असो किंवा आपल्या जेवणातील अनेक पदार्थ असोत — आज आपण ज्यांना अगदी सहजपणे ‘आपले’ म्हणतो, त्यापैकी अनेक गोष्टींची पाळेमुळे भारताबाहेर सापडतात. पण त्या आपल्या जीवनात इतक्या खोलवर रुजल्या आहेत की, सण-समारंभांपासून दैनंदिन आयुष्यापर्यंत त्यांच्याशिवाय आपले पान हलत नाही.
बाहेरून आलेली गोष्ट कुठून आली, यापेक्षा तिच्यातले चांगले काय आहे हे पाहणे, तिला स्वीकारणे, आपल्या गरजेनुसार तिच्यात बदल करणे आणि अखेरीस तिला आपलेसे करणे — ही भारतीय संस्कृतीची विलक्षण ताकद आहे.
हेही वाचा – आपल्या आरोग्याचं प्रतिबिंब
हीच व्यापकता आपल्या विचारविश्वातही दिसते. इथे सांख्य आहे, तर चार्वाकही आहे; आस्तिक आहे, तर नास्तिकही आहे; राम आहे, कृष्ण आहे; वेद आहेत आणि त्याच वेळी त्यांना प्रश्न विचारणारे विचारप्रवाहही आहेत. परस्परांच्या अगदी विरुद्ध टोकांवर उभ्या असलेल्या विचारसरणींनाही या भूमीने आपापली जागा दिली आहे. त्यामुळे भारतात आलेले धर्म, विचार आणि परंपराही येथे येऊन एका वेगळ्या भारतीय रंगात रंगले. जगभरातील ख्रिश्चन परंपरा आणि भारतातील ख्रिश्चन परंपरा किंवा अरब जगतातील इस्लाम आणि भारतीयांनी आत्मसात केलेला इस्लाम पाहिला, तरी या भूमीच्या संस्कारांचा त्यांच्यावर पडलेला ठसा जाणवतो.
होमिओपॅथीच्या बाबतीतही काहीसे असेच घडले.
भारताने होमिओपॅथीला इतके आत्मसात केले की, आज ती आपल्या वैद्यकीय संस्कृतीचाच एक भाग वाटते. केंद्र सरकारच्या आयुष मंत्रालयाच्या व्यवस्थेत होमिओपॅथीला अधिकृत स्थान आहे. आज भारतभर 250हून अधिक होमिओपॅथिक वैद्यकीय महाविद्यालये आणि संस्था आहेत. पदवीपासून पदव्युत्तर शिक्षणापर्यंत आणि पुढे शोधन आणि पीएचडीपर्यंत या क्षेत्रात शिक्षणाची वाट उपलब्ध आहे. दरवर्षी हजारो विद्यार्थी होमिओपॅथीचे शिक्षण घेऊन बाहेर पडतात आणि कदाचित त्यामुळेच होमिओपॅथीविषयीचा एक फार मोठा गैरसमज आजही आढळतो —
- होमिओपॅथी ही मूळची भारतीय वैद्यकीय पद्धती आहे.
- काहींना तर तिची मुळे चरकसंहिता किंवा सुश्रुतसंहितेत असावीत, असेही वाटते.
पण तसे अजिबात नाही. होमिओपॅथीचा जन्म भारतात झालेला नाही.
हेही वाचा – शरीरात वात आणि पित्त वाढवण्याचे एक कारण — अहंकार!
मग हे लिहायचे तरी कशासाठी?
मनोज जोशींनी मला विचारले, “तुम्ही होमिओपॅथीबद्दल लिहाल का?” क्षणभर माझ्या मनात प्रश्न आला — होमिओपॅथीबद्दल आजवर इतक्या लोकांनी, इतकी वर्षे लिहिले आहे; मग मी त्यात नवीन काय लिहिणार?
मराठी ही माझी मातृभाषा. माझे शालेय शिक्षणही मराठीतूनच झाले. पण दहावी-बारावीनंतर मराठी लेखनाशी तसा फारसा संबंध राहिला नाही. व्यवसायाच्या निमित्ताने देश-विदेशात प्रवास झाला. वेगवेगळ्या देशांतील माणसे भेटली, अनेक संस्कृती जवळून पाहता आल्या, विविध विचारप्रवाहांशी संबंध आला. तरीही मराठीशी असलेली नाळ कधी तुटली नाही. शेवटी माणसाने आपली मुळे विसरता कामा नयेत.
म्हणून ठरवले — होमिओपॅथीबद्दल तेच ते सांगण्यापेक्षा अशा काही गोष्टी सांगाव्यात, ज्या रंजकही असतील आणि ज्यांना इतिहासाचा आधारही असेल…
आणि म्हणून हे ‘होमिओ आख्यान’!


