आज जवळपास दोन वर्षांनी चित्रपटगृहाची पायरी चढताना, अगदी दाटून येत होतं तिला. दोन वर्षांपूर्वीच्या घटना फेर धरून नाचत होत्या तिच्या डोळ्यांपुढे. ती येणारच नव्हती खरंतर, पण जिवलग मैत्रिणीच्या आणि मुलांच्या आग्रहामुळे ती वळली होती, परत त्या दिशेला. मन मारून, इच्छा दडपून जगली होती ती दोन वर्षं… स्वतःलाच दोष देत, दोष नसताना सुद्धा, उगाचच.
तो दिवस आठवला, की अजूनही एक विचित्र अशी अपराधाची भावना दाटून येत असे तिच्या मनात. नवरा कंपनीच्या कामासाठी दौऱ्यावर होता. घरात ती, सासूबाई आणि दोन मुलं. मुलगा आठवीत होता आणि मुलगी पाचवीत. रविवारच्या त्या दिवशी, तिचा आणि मैत्रिणीचा मस्त बेत ठरला होता. चित्रपट बघून मग बाहेर खादाडी करून, खरेदी आणि परत. तो दिवस जगायचा होता तिला मनाप्रमाणे…
आदल्या दिवशी सासूला सांगितल्यावर अपेक्षेप्रमाणेच तोंड वाकडं झालं, पण मी सगळा स्वयंपाक करून जाईन, हे म्हटल्यावर जरा नाखुषीनेच परवानगी मिळाली. अर्थात, ती नसती मिळाली तरी ती जाणार होतीच म्हणा, पण थोडं त्यांच्या कलाने घ्यायला हवं होतं, मुलांसाठी.
हेही वाचा – उपम्याला उपमा नाही…
“रविवार आहे उद्या, काहीतरी चटपटीत करा, आम्हाला जेवायला. स्वतः बाहेर खाल आणि आम्हाला मात्र भेंडीची भाजी कराल,” सासूचा टोमणा तिने ‘नळी फुंकीली सोनारे’ या न्यायाने घेतला हसत हसत.
‘12वीं फेल’ चित्रपटाचा सकाळी साडेदहाचा खेळ होता. सकाळी लवकर उठून पोहे, मटार उसळ, पोळ्या, कोशिंबीर हे सगळं करून, “फ्रीजमध्ये श्रीखंड आहे, ते न विसरता घ्या,” हे सांगून ती निघाली. “भांडू नका, आजीला त्रास देऊ नका, मी येतेच लवकर, गृहपाठ करून टाका”, वगैरे सूचना मुलांना द्यायला पण ती विसरली नाही.
“मला भजनाला जायचंय सात वाजता, त्याच्या आत उगवा”, हे ऐकून न ऐकल्यासारखं करत पर्स काखोटीला मारत ती एकदाची घराबाहेर पडली. मोकळ्या हवेत श्वास घ्यायला.
आपल्या मागे नणंदेला फोन जाऊन निश्चितच कागाळ्या होणार, याची खूणगाठ बांधली होतीच तिने मनाशी. नेहमीचाच प्रकार होता तो, अंगवळणी पडलेला तिच्या. पाचवीलाच पुजलेला जणू. ‘नवरा नाहीये गावात, तर उधळली ही. नक्की मैत्रिणीबरोबर जातेय का आणखी कोणाबरोबर, कोणास ठाऊक?’, हे असं कुचकट बोलणं पण अगदीच अनपेक्षित नव्हतं तिला. सरावली होती आता ती या सगळ्याला.
मैत्रीण भेटली चित्रपटगृहाच्या दारात; म्हणाली, “मला उगीचच वाटत होतं, येतेयस की नाही कोणास ठाऊक? नाहीतर दरवेळेसारखं काहीतरी खुसपट निघून रद्द व्हायचं तुझं येणं… तुला बघून फार छान वाटलं बघ. चल, पटकन आत जाऊ आता”.
आतल्या गारव्यात आणि अंधारात शिरल्यावर खूप छान वाटलं तिला. आता दोन अडीच तासांची निश्चिंती होती. तिने फोन बघून घेतला एकदा, काही खास मेसेजेस नव्हते. फोन सायलेंट् मोड वर ठेवून पर्समध्ये टाकला तिने आणि सज्ज झाली ती!
चित्रपट सुरू झाला आणि ती गुंग झाली त्यात. नायकाच्या पोलीस अधिकारी होण्याच्या मार्गातला संघर्ष आणि थरार, त्याची जिद्द आणि त्याचे कष्ट अनुभवत. अगदी रंगात आला चित्रपट आणि मध्यंतर झालं… प्रसाधनगृहात जाऊन, तोंडावर पाण्याचा हबका मारून, ताजीतवानी होऊन, गरमागरम समोसे घेऊन ती परत आली. मोकळेपणाची झिंग झिरपली होती तिच्यात. कधी नव्हे ते स्वातंत्र्य उपभोगत होती ती मनमुराद. समोसे हादडून झाल्यावर एकदा फोन बघितला तिने. एकही missed call वगैरे नव्हता. व्हॉट्सप बघितलं, काही विशेष असं नव्हतं. नेहमीचेच किरकोळ मेसेज.
फोन परत आत टाकला तिने आणि चित्रपट सुरू झाला. नायकाच्या संघर्षात ती शोधत होती स्वतःला आणि स्वतःच्या आयुष्याला… हुशार आणि मेहनती असलेली ती, लग्नानंतर फक्त चूल आणि मूल यातच पार गुरफटून गेली होती… सगळ्या आशा, आकांक्षा आणि ध्येयं विसरून. कोणीतरी, तन मन अर्पून स्वतःच्या ध्येयाच्या दिशेने झेपावताना बघून, काहीतरी वेगळं आणि छान वाटत होतं तिला.
चित्रपट संपला, भारावलेल्या अवस्थेत ती आणि तिची सखी बाहेर पडली… आतल्या गारव्यातून, बाहेरच्या शुष्क उकाड्यात. जेवायला जायच्या आधी एकदा बघावा, म्हणून तिने फोन हातात घेतला आणि ती हादरली. नवऱ्याचे, नणंदेचे आणि घरचे असंख्य missed calls होते. तिला कळेच ना, काय झालंय ते!
मैत्रिणीला तिने फोन दाखवला… तिने धीर देत तिला शांत केलं थोडं. थरथरत्या हाताने तिने घरी फोन केला आणि लेकाने फोन उचलला. घाबऱ्या आवाजात तिने चौकशी केली आणि तिचं धाबंच दणाणलं. काय करावं सुचेचना तिला!
ती चित्रपट बघण्यात मग्न असताना, घरी वेगळंच काहीतरी घडलं होतं. सासूबाई मोरीत चक्कर येऊन पडल्या होत्या. बराच वेळ आजी बाहेर येत नाही म्हणून लेक बघायला गेला, तर आतून काहीच उत्तर येईना. दार वाजवूनसुद्धा आजी उत्तर देत नाही म्हटल्यावर तो घाबरला आणि शेजारच्या काकांना हाक मारली. दार तोडून सासूबाईंना बाहेर काढावं लागलं. बेशुद्ध होत्या त्या, डोक्याला खोक पडली होती आणि रक्तस्त्राव सुरू होता… हॉस्पिटलमध्ये अतिदक्षता विभागात ठेवलं होतं त्यांना.
अपराधीपणाची भावना आता ठाण मांडून बसली तिच्या मनात. जेवणखाण विसरून, ती आणि तिची मैत्रिण पोहोचल्या दवाखान्यात. बाहेर नणंद आणि नणंदेचा नवरा बसले होते. शेजारचे काकाही होते. नणंदेची कुत्सित नजर भेदत गेली तिला आरपार. जणू सिनेमाला जाऊन काहीतरी अक्षम्य गुन्हाच केला होता तिने!
“या, संपला सिनेमा एकदाचा? का अजून काही बाकी आहे बघायचं?” आयतं कोलीतच सापडलं होतं जणू माकडाच्या हातात… नणंदेचा पट्टा सुरू झाला, “आजच जायचं काही अडलं होतं सिनेमाला? दादा नाहीये इथे ठाऊक होतं ना तुला, तरी गेलीस? काय म्हणावं तुला?”
हिंडत्या फिरत्या सासूबाईंना असं काही होईल, असं स्वप्नात सुद्धा वाटलं नव्हतं. कुठून गेलो आजच, असं वाटत राहिलं तिला. मैत्रीणसुद्धा उदास झाली. जणू हे सगळं तिच्याचमुळे घडलं होतं. तेवढ्यात, नवऱ्याचा फोन आला आणि आधीच कान भरले गेले असल्यामुळे, तो ही तिच्यावरच डाफरला.
सगळ्यांचा एकच सूर – “तू गेलीसच का सिनेमा बघायला आईला एकटं टाकून?”
डोळे भरून आले तिचे आणि रडायला लागली ती हमसून हमसून. आवरेनाच तिला रडू अजिबात.
“आता नाटकं नको करूस. आईला काही झालं ना तर बघ, सांगून ठेवते,“ नणंद थांबायला तयारच नव्हती!
सासूबाई सावरल्याच नाहीत, त्या दुखण्यातून आणि चारच दिवसांत त्यांचं दुर्दैवी निधन झालं. दोष तिच्या माथी मारून सगळे नामानिराळे झाले आणि ती सावरूच शकली नाही स्वतःला. एक कोष विणून घेतला तिने स्वतःभोवती. तिचा सगळा उत्स्फूर्तपणा, आनंद, मोकळेपणा हिरावून घेतला त्या प्रसंगाने. जबरदस्त मानसिक आघात झाला तिच्यावर. या सगळ्याला मीच कारणीभूत आहे, हे घर करून बसलं तिच्या अंतर्मनात. खोल रूतला होता काटा. जिव्हारी लागले होते बोल, सगळ्यांचे. मिटूनच गेली ती अचानक!
असले नसले संबंध पण संपवून टाकले नणंदेने, पण ते तोडायच्या आधी तिला आयुष्यभराची जखम देऊन गेली ती, कुठलाही सारासार विचार न करता.
‘या पुढे मी सिनेमा बघणारच नाही, जगण्यातला कुठलाही आनंद उपभोगणार नाही,’ असा निर्धार केला तिने मनोमन आणि तो कसोशीने पाळला. फक्त मुलांसाठी जगत होती ती, निर्विकार मनाने.
नवरा तर त्याच क्षणी मेला होता तिच्यासाठी. घरासाठी एवढं राबून, जर काहीही दोष नसताना उगाचच गुन्हेगार ठरवण्यात येत असेल, तर त्या जगण्याला तरी काय अर्थ होता? आत्महत्येचे विचार डोकावून जायचे मनात कित्येक वेळा, पण मुलांकडे बघून पाय मागे ओढले जात. मैत्रिणीला कळत होती तिची कुतरओढ. यावर एकच उपाय होता तो म्हणजे चांगले मानसोपचार. निराशेच्या गर्तेतून तिला बाहेर काढण्यासाठी तोच एक पर्याय होता. ते सुरू झाले आणि त्याचबरोबर, मनाचं सामर्थ्य वाढविण्यासाठी ती थोडीशी भक्ती मार्गालाही लागली.
हेही वाचा – कर्तव्याने घडतो माणूस…
मैत्रिणीनेच तिला अक्कलकोटचाचा मार्ग दाखवला. तिथे जाऊन आल्यावर, सगळंच काही संपलेलं नाही, याची जाणीव तिला झाली. एक नवी ऊर्जा लाभली तिला जगण्यासाठी… ‘दवा आणि दुवा’ या दोघांची सांगड तिला हळूहळू सावरायला लागली.
‘भिऊ नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे’ म्हणत स्वामी भक्कम उभे राहिले तिच्यासाठी आणि तिची घसरण थांबून ती स्थिर व्हायला लागली, रमायला लागली परत एकदा जीवनात. घ्यायला लागली आनंद छोट्या छोट्या गोष्टीत… जवळपास दोन वर्ष लागली तिला या गर्तेतून बाहेर यायला, पण आली ती एकदाची बाहेर. बघायला लागली जगाकडे पुन्हा नव्या दृष्टीने.
आज ‘क्रांतीज्योती’ बघण्यासाठी, त्याच मैत्रिणीसोबत परत एकदा चित्रपटगृहाच्या पायऱ्या चढताना, संमिश्र भावना येत होत्या तिच्या मनात. आपण आलोय तर खरं, पण परत काहीतरी अशुभ, अघटित घडणार तर नाही ना आपल्या आयुष्यात? ही शंका भेडसावत होती तिला. सिनेमा सुरू असताना, मधेच फोन बघायची न राहवून, तरी चित्रपटात पण रमली ती आणि कुठलीही अप्रिय घटना न घडता, सिनेमा संपवून बाहेरही पडली.
एक अनामिक आनंद झाला होता तिला, अदृश्य शृंखला तुटल्याचा. परत उभारी घेतली होती तिच्या मनाने. पुन्हा एकदा आता ती जगणार होती, नव्याने. दुखऱ्या जाणीवा मागे टाकत.
एक जाणीव मात्र झाली तिला. स्त्री हीच तिची शत्रू आणि शेवटी स्त्री हीच तिची मैत्रीण. एकाच नाण्याच्या दोन बाजू, देवाचीच करणी जणू!


