माझ्या अत्यंत आवडत्या चित्रपटांपैकी ‘दूसरा आदमी’ हा एक आहे. 1977मध्ये आलेल्या यश चोप्रांच्या या सिनेमात विवाहबाह्य संबंधांवर भाष्य केलेलं आहे. जास्त गुंत्यात न जाता, समाजमान्य मतांसमोर जटील, तापदायक प्रश्न उभे न करता केवळ मनोरंजनावर लक्ष केंद्रित केलं आहे. दरीच्या काठावर उभी असणारी व्यक्ती दरीत कोसळली तर एक दु:खद घटना घडेल… निराळे विचार, भावना आणि परिणाम होतील आणि जर ती सावरली, तिथून परत फिरली तर; तिथपर्यंत ती ज्या कारणांमुळे पोहोचली ते व्रण राहतील; पण हळूहळू ते सुकतील! त्यावर खपली धरेल! नवी त्वचा येईल! कदाचित एक नवीन आयुष्य सुरू होईल.
हा सिनेमा खोल दरीपर्यंत पोचलेल्या, पण योग्यवेळी तोल सावरून परत फिरलेल्या, दु:खाने सैरभैर झालेल्या निशाचा (राखी) आहे. दिग्दर्शक आहेत रमेश तलवार!
‘नज़रों से कह दो, प्यार में मिलने का मौसम आ गया…’ अशी एकमेकांबद्दल आतुरता असणारे दोघे – करण सक्सेना (ऋषी कपूर) आणि तिम्सी (नीतू सिंग) प्रेमात आकंठ बुडाले होते. दोन्ही कलाकार प्रत्यक्षात पण प्रेमात असल्याने, दोघांची अफलातून केमिस्ट्री जुळलेली आहे. त्यांनी आधीचे प्रेमवेडे आणि नंतर विवाह झाल्यावर कृतार्थ दोघे खूप लोभसपणे व्यक्त केले आहेत.
आँखों में काजल है, काजल में मेरा दिल है
चलो दिल में बिठा के तुम्हें तुमसे ही प्यार किया जाए…
हेही वाचा – माणूस नावाचं रसायन!
या एकमेकांना दिलेल्या आणाभाका, त्यांच्या चेहऱ्यावरून आणि देहबोलीतून व्यक्त होतात. बर्फाळ काश्मीरमधील काकडणाऱ्या थंडीत एकमेकांच्या उबेत असणारे ते दोघे. त्यांच्या हनिमूनच्या वेळी खोलीत, टेबलावर साठलेले तीन-चार दिवसांचे अन्नपदार्थ आणि बंद दारावर खडूने लिहिलेले – ‘Please do not disturb… हमें भूख नहीं है!’ यातून त्यांचं झोकून देऊन एकमेकांवर केलेलं तारुण्यसुलभ प्रेम कळतंच, पण नंतर कथेला मिळालेल्या कलाटणीमुळे; घरातल्या सगळ्यांच्या विरोधाला न जुमानता केलेल्या लग्नानंतर, एक जोडपं म्हणून दोन प्रेमिकांच्या आयुष्यात कशी वादळ येतात, त्यांच्या टवटवीत प्रेमाची कशी पानगळ सुरू होते; हा विरोधाभास आपल्याला भयचकित करतो
विवाह झाल्यावर, स्वतःच्या पायावर उभे राहण्यासाठी करण एक Advertising agency सुरू करतो. तिथे एक designer तो नोकरीवर ठेवतो. अत्यंत देखणी, बुद्धिमान, सौंदर्यदृष्टी आणि कलात्मकता यांचा आकर्षक मिलाफ असणारी निशा (राखी) त्याच्या ऑफिसात आणि जीवनात प्रवेश करते. निशा आधीच पोळलेली असते. तिच्या प्रियकराच्या (शशी कपूर) अकाली मृत्यूच्या धक्यातून ती अजून सावरलेली नसते. इथे कलाकारांची निवड अत्यंत योग्य केलेली आहे. शशी कपूर आणि ऋषी कपूर यांच्यामधील साम्य, कथेच्या दृष्टीने खूप उपयुक्त ठरलंय.
करणच्या प्रत्येक हालचालीत निशाला शशी दिसतो. ती त्याच्यात गुंतत जाते. आपल्या अधुऱ्या प्रेमकहाणीची स्वप्नं ती करणच्या सहवासात बघायला लागते. या प्रगल्भ, परिपूर्ण, बुद्धिमान निशाच्या प्रेमपाशात करण पूर्णपणे अडकतो…
आओ मनाये जश्न-ए-मोहोब्बच त मोहब्बत, जाम उठाये जाम के बाद
शाम से पहलो कौन सोचे, क्या होना है शाम के बाद…
आयुष्यातील आनंदाचे चषक दोघेही बेधुंद होऊन चाखतात. निशाने करणची उष्टी सिगरेट ओढणं, त्याच्या उष्ट्या चषकामधून वारुणीचा स्वाद घेणे… हे सर्व निशाच्या मित्राला (परीक्षित सहानी) अस्वस्थ करतं… हे संबंध लपून राहण्यासारखे नसतात आणि कोणाला मान्य होण्यासारखे पण नसतात, करणच्या वैवाहिक आयुष्यात आगडोंब उसळतो. तम्सी पण सहजासहजी हार मानणारी नसते. निशाच्या आयुष्यात उलथापालथ घडते. अपमान, मानहानी, तिरस्कार तिच्या वाट्याला येतो.
करणच्या गद्धे पंचविशीला हा उतावीळपणा शोभेसा होता, पण निशाच्या वयानुरूप आलेल्या प्रगल्भतेला हा उतरणीचा रस्ता कुठे नेणार आहे, ते कळत होतं. करण तिच्यावर प्रेम करत असतो, पण ती करणवर प्रेम करीत नसते तर, त्याच्यात दडलेल्या शशीवर प्रेम करत असते… करण असतो, ‘दूसरा आदमी’ शशी नसतोच!
हेही वाचा – कालातीत कलाकृती…
धुक्याने गच्च भरलेल्या जंगलात, कुणालाही न जुमानता करण तिला पुन्हा पुन्हा साद घालतो, आमंत्रण देतो…
क्या मौसम है, ऐ दीवाने दिल
अरे, चल कहीं दूर निकल जाए…
अत्यंत विचारपूर्वक, अतीव वेदनेने मनाला लगाम घालून… भावनांना बांध घालून निशाने कठोर निर्णय घेतलेला असतो,
अच्छा है सँभल जाए…
त्याच्या आर्त हाकेकडे अत्यंत उदासपणे दुर्लक्ष करून ती धुक्यात हरवलेल्या वाटेवरून निराशेच्या अंधारात नाहीशी होते.
राखीला उत्कृष्ट अभिनेत्री आणि उत्कृष्ट सहाय्यक अभिनेत्री म्हणून नॉमिनेशन मिळालं होतं. करण जोहरचा ‘ए दिल है मुश्कील’ हा सिनेमा याच कथानकावर आधारित आहे. यात रणबीर (पुन्हा कपूर) ऐश्वर्या आणि अनुष्का यांनी या भूमिका केल्या आहेत. कोणाच्याही मनाला भुरळ घालेल असंच हे कथानक आहे. ‘महाजाला’त सापडला तर नक्की बघा! पण जरा सांभाळून, ‘दूसरा आदमी’ नावाचा रामसेचाही एक सिनेमा आहे! तेव्हा जरा काळजी घ्या!


