पल्लवी खरोसे आंबेकर
भाग – 13
“राजेश आणि मी बिझनेस पार्टनर ह राजेशच्या दोन्ही भावांना बिजनेसमध्ये समान पार्टनरशिप पाहिजे होती. राजेशने मजबुरीने त्यांना नकार दिला, कारण त्यांना जर पार्टनरशिप दिली असती तर, त्यांनी सगळं काही जुगार आणि नशा करण्यात घालवलं असत. कोणत्या भावाला आपल्याच भावाचं आयुष्य खराब झालेलं पाहावंसं वाटलं असत. पण त्या दोघांनी याचा चुकीचा अर्थ घेतला आणि त्यादिवशी जेव्हा तो मीटिंगला जात होता, तेव्हा याच दोघांनी एका गुंडाला सुपारी देऊन त्याच्या गाडीचा अपघात घडवून आणला. त्यांनीच स्वतःच्या भावाचा खून केला प्रॉपर्टीसाठी!” राहुल अग्रवालने विभाला माहिती दिली.
“वाहिनी त्यानंतर त्या दोघांनी जाऊन माझ्यावर केस केली आणि माझ्यावर कपंनी बळकवण्याचा आरोप लावला. मी सगळ्यांना सांगण्याचा प्रयत्न केला, पण कोणीच माझं ऐकलं नाही. ते दोघेही मला जेलमध्ये भेटायला आले होते. ते म्हणाले, आम्हाला माहिती आहे की, तू काही नाही केलंस. पण सगळे पुरावे तुझ्याविरोधात आहेत. तुला यातून बाहेर पडायचं असेल तर, आम्ही सांगतो तसं कर… त्यांनी माझ्यासमोर एक प्रपोजल ठेवलं… राजेश बिजनेसमध्ये तुझा पार्टनर होता. तर त्याच्या मालकीच जेवढं होतं, तेवढी आम्हाला एक ठराविक रक्कम दे, आम्ही केस परत घेऊ. एवढंच तर करायचं आहे तुला. बाकीचं आम्ही बघून घेऊ काय ते,” देवेश सुरेशला (दोघे पार्थचे काका) टाळी देत म्हणाला.
मी खूप विचार केला त्यांच्या म्हणण्याचा. माझ्याकडेही दुसरा काही पर्याय नव्हता आणि नाईलाजाने मला त्यांची डील मान्य करावी लागली. ठरल्याप्रमाणे मी त्यांना पैसे दिले आणि त्यांनी माझ्याविरोधातील केस मागे घेतली. त्यांनी जास्तीचे पैसे देऊन तो आरोप त्या सुपारी दिलेल्या गुंडालाच त्याच्या माथी घ्यायला लावला आणि जास्तीच्या पैशासाठी तोही तयार झाला…” राहुल अग्रवालने विभाला त्यावेळचा घटनाक्रम सांगितला.
“माझी सुटका झाल्यावर मी बाहेर येऊन नव्याने माझा बिझनेस परत सुरू केला आणि परत एकदा त्या दोघांनी तुमचे कान भरले की, मी कसे पैसे भरून सुटलो आणि सगळा बिझनेस कसा माझ्या नावावर करून घेतला. काही दिवसांनी तुम्ही ते घर सोडलं आणि नेमक तेव्हाच मी तुम्हाला भेटायला आलो होतो. पण त्यांनी मला धक्के मारून घराबाहेर हाकलवून दिलं. नंतरही मी तुम्हाला भरपूर शोधलं, पण तुमची काहीच माहिती मिळाली नाही. आजही कदाचित आपली भेट झाली नसती, पण योगायोग बघाना कसा आहे, पार्थ माझ्याच ऑफिसमध्ये काम करतो आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे माझी मुलगी शार्वी पार्थच्याच प्रेमात पडली. जसं मी आणि राजेशन ठरवलं होतं की, भविष्यात आम्ही एकमेकांचे व्याही बनू अगदी तसंच होत आहे सगळं! बहुतेक नियतीलाही हे मान्य असावं…” तो विभाकडे मोठ्या आशेने बघत म्हणाला.
हेही वाचा – राहुल अग्रवाल पार्थच्या घरी गेला आणि…
“हं… असं आहे तर, तुझी मुलगी माझ्या मुलावर प्रेम करते! पण त्या दोघांच लग्न होणं अशक्य आहे.” विभा म्हणाली.
“पण का वहिनी?” त्याने आश्चर्याने विचारलं. कारण त्याला तिच्याकडून नकार अपेक्षित नव्हता.
“कारण तो दुसऱ्या मुलीवर प्रेम करतो आणि लवकरच त्या दोघांचं लग्न होणार आहे, त्यामुळे तुझ्या मुलीला पार्थला विसरून जायला सांग आणि तू तिच्यासाठी तुमच्या बरोबरीचा आणि तुझ्या मुलीला शोभेल असा मुलगा शोध आणि तिचं लग्न लावून दे,” त्या निर्विकार चेहऱ्याने म्हणाल्या.
“वाहिनी, प्लीज असं नका म्हणू… माझी शार्वी हे सगळं सहन नाही करू शकणार. वाटलं तर मी सगळा बिझनेस त्याच्या नावावर करतो, पण त्याला शार्वीसोबत लग्न करण्यासाठी तयार करा,” तो शार्वीच्या काळजीने म्हणाला.
हेही वाचा – राजेशच्या भावांचे नेमके प्रपोजल काय?
“नाही राहुल, हे अशक्य आहे. तोही त्या मुलीवर खूप प्रेम करतो आणि तेही एकमेकांना सोडून राहू शकत नाहीत आणि त्यांचं प्रेम एवढं स्वस्त नाही की, त्याची किंमत पैशाने करतो आहेस. असले विचार तुझ्या मनातून काढून टाक… असं होणं कधीच शक्य नाही. त्यामुळे तूच शार्वीला व्यवस्थित समजावून सांग… बाप आहेस तू एवढं तरी करू शकतोस,” ती म्हणाली.
त्याने खूप वेळ थांबून विभाला समजवण्याचा प्रयत्न केला, पण त्याचा काहीच उपयोग झाला नाही. शेवटी निराश मनाने तो तिथून निघून गेला.


