डॉ. किशोर महाबळ
अगदी लहान वयापासून प्रत्येक मूल आपापल्या पद्धतीने आजूबाजूच्या आई-वडील, ताई-दादा आणि अन्य व्यक्तींचे आवाज आणि बोलणे, त्यांनी व्यक्त केलेल्या भावभावना, आजूबाजूला घडणाऱ्या असंख्य छोट्या-मोठ्या घटना, असंख्य प्रकारचे छोटे-मोठे आवाज, सर्व विविध प्रकारचे गंध, लहान-मोठ्या आणि वेगवेगळ्या वजनाच्या अक्षरशः असंख्य वस्तू, वेगवेगळे आकार, विविध तापमान असलेल्या वस्तू किंवा रस, वेगवेगळे रंग, वेगवेगळे शब्द, पशू, पक्षी, झाडे असे मोजता येणार नाहीत आणि आपल्याला समजणार नाहीत, असे अक्षरशः जे जे दिसेल, ते ते समजून घेण्याचा प्रयत्न करते. मोठ्यांना ज्या गोष्टी बिलकूल आवडत नाहीत, अशाही वस्तू, रंग, पदार्थ कसे आहेत, हे जाणून घेण्यात त्या बालकाला कोणताही संकोच वाटत नाही!
झोपेची वेळ वगळता बालकाचे हे स्वयंशिक्षणाचे कार्य न थकता, न कंटाळता, अत्यंत आनंदाने अविरतपणे सुरू असते. नुसतेच लोळत पडण्यात, आळशीपणा करण्यात, आवश्यकतेपेक्षा जास्त खाण्यात वेळ दवडायला त्याला बिलकूल आवडत नाही; कारण काहीतरी नवीन शिकायचे असते ना! आजूबाजूच्या या सगळ्या गोष्टी त्या बालकासाठी एखाद्या कोड्यासारख्या असतात. हे कोडे मग ते बाळ आपल्या सर्व पंचज्ञानेंद्रिये आणि कर्मेंद्रियांचा पुरेपूर उपयोग करून, खूप उत्सुकतेने सोडविण्याचा प्रयत्न करते. एकदा का त्याला त्याच्या समाधानाएवढे कळले की, ते आनंदी होते आणि दुसऱ्या गोष्टीचे कोडे सोडवायला तेवढ्याच उत्साहाने पहिल्यापासून सुरूवात करते.
सुशिक्षित, सुजाण, जबाबदार कुटुंबातील आई, वडील, आजी, आजोबा, नातेवाईक, शेजारीही मोठ्या कौतुकाने अनेक गोष्टी बालकाला शिकवत असतात. हे शिकवणे आवर्जून विविध पद्धतीने केले जाते. कधी बगीच्यात, प्राणिसंग्रहालयात, बाजारात नेऊन, कधी त्याला खेळता येईल असा सोपा खेळ खेळून, जादू दाखवून, वेगवेगळ्या प्रकारचे पोशाख घालण्याची संधी देऊन, गंमतीदार सोप्या शब्दांत लिहिलेली आणि उडत्या आकर्षक चालीत म्हणता येतील अशी बालगीते गाऊन, चांगली गाणी ऐकवून, चित्रे काढून, चित्रे दाखवून, आकर्षक खेळणी खेळायला देऊन, नातेवाईकांकडे नेऊन, गंमतीदार गोष्टी सांगून हे शिक्षण केले जाते. जेवणे, हात धुणे, आंघोळ करणे यासारख्या वर्तनविषयक अनेक गोष्टीही शिकविल्या जातात. हे सारे शिक्षण न रागावता, न चिडता, न ओरडता, शिक्षा न करता, हसतखेळत, गंमत करीत, बालकाचा मूड बघून त्याच्या कलाकलाने व्हावे, असा पुरेपूर प्रयत्न केला जातो. बहुतांश वेळी हे शिकविणे जेवढे आनंददायी करता येईल, तेवढे करण्याचा प्रयत्न होतो.
तसेच हे सर्व मूल शिकते आहे की, नाही याचाही अंदाज वारंवार घेतला जातो आणि मुलाला शिकविलेले समजलेले नाही, असे जर लक्षात आले तर, अधिक सोप्या आनंददायक पद्धतीने शिकविण्याचा प्रयत्न सुजाण पालक तसेच बालकाच्या संपर्कात असलेले करतात. बालवाडीतील चांगल्या शिक्षिकाही अशाच आनंददायी पद्धतींचा उपयोग करतात. हे सारे करताना मूल लहान आहे. त्याला शिकवायचे आहे, रडवायचे नाही… याची नेहमीच जाणीव ठेवली जाते. या पद्धतीचा अतिशय फायदा होतो. मूल असंख्य गोष्टी आनंदाने आणि उत्तमरित्या शिकते.
स्वत:ला पडणाऱ्या प्रश्नांची जमेल तशी स्वत:च उत्तरे शोधण्याची जन्मापासून त्याला सवय लागलेली असते. मात्र, बोलता यायला लागल्यावर मूल प्रश्न विचारू लागते. आता प्रश्नांची उत्तरे शोधण्याचा एक नवा मार्ग बालकाला उपलब्ध होतो. पालक आणि बालवाडीतील शिक्षकही या प्रश्नांची आवर्जून उत्तरे देतात. शाळेत जसजशी नवनवीन विषयांची ओळख होऊ लागते, अनुभवविश्व व्यापक होऊ लागते, वय आणि समज वाढू लागते, नवीन व्यक्तींशी ओळख होऊ लागते, आजूबाजूच्या असंख्य घटना लक्षात येऊ लागतात… तसतशी बालकाची अनेक विषयांबद्दलची उत्सुकता वाढत जाते. उत्सुकतेमुळे ही मुले मग येता-जाता असंख्य विषयांवर अक्षरशः असंख्य प्रश्न विचारू लागतात. अशा वारंवार विचारल्या जाणाऱ्या असंख्य आणि कठीण प्रश्नांची उत्तरे देण्याचा पालकांना आणि शिक्षकांना कंटाळा येऊ लागतो, आणि अशी उत्तरे देण्यात वेळ वाया जातो असे वाटू लागते. त्यांना अनेक प्रश्नांची उत्तरे माहीत नसतात. प्रश्नांची उत्तरे येत नाहीत हे स्पष्ट सांगण्याचे धाडस नसते. कधी विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे माहीत असतात, पण ती सोप्या भाषेत कशी द्यायची हे कळत नाही. अशा वेळी त्याला प्रश्नांची उत्तरे शोधण्यास मदत न करता, प्रश्नांची उत्तरे देणे टाळले जाते. मुलाला ‘फालतू प्रश्न विचारू नकोस,’ असे सांगितले जाते. प्रश्न विचारल्याबद्दल रागावलेही जाते. फार प्रश्न विचारणाऱ्या विद्यार्थ्याला घरात पालक, तर शाळेत शिक्षक वेगवेगळ्या पद्धतीने त्रास देऊ लागतात. यामुळे मुलेही मग घाबरून प्रश्न विचारणे सोडून देतात. यामुळे आधीचे प्रश्न आणि वाढत्या वयानुसार पडणारे असंख्य नवनवीन प्रश्न यांची संख्या वाढतच जाते.
अभ्यासाबद्दलचे प्रश्न तर खूपच जास्त असतात. काही चांगले शिक्षक सोडून बाकीचे बहुतांश शिक्षक हे विद्यार्थ्यांच्या प्रश्नांकडे दुर्लक्ष करतात, प्रश्नांची उत्तरे देणे टाळतात चुकीची उत्तरे देतात, प्रश्नच विचारू देत नाहीत, फार प्रश्न विचारणाऱ्या विद्यार्थ्यांची टिंगल करतात, त्याच्यावर टीका करतात, त्याने प्रश्न विचारू नये म्हणून त्याला त्रास देतात, आणि वेळप्रसंगी रागावतातही. यामुळे भीतीने अभ्यासबद्दलचे अनेक प्रश्न विद्यार्थी विचारतच नाहीत. प्रश्न विचारणेच टाळू लागतात. असे असंख्य प्रश्न आणि नवे प्रश्न तसेच अनुत्तरित राहतात. त्यामुळे अभ्यासविषयातील महत्त्वाचा भाग समजतच नाही. शिक्षण हे अत्यंत नीरस आणि कंटाळवाणे वाटू लागते. विषयातील न समजलेल्या महत्त्वाच्या धड्यावर परीक्षेत प्रश्न विचारला जात असल्याने तो भाग न समजताच विद्यार्थी पाठ करून टाकतात आणि कसेबसे ते प्रश्न सोडवितात!
हेही वाचा – शाळांमधील चित्रकारांचा शोध
काही प्रश्नांची उत्तरे शोधण्याचा विद्यार्थी स्वत:हून प्रयत्न करतात. काही जण काही प्रमाणात यशस्वी होतातही. मात्र मार्गदर्शनाच्या अभावामुळे असंख्य जण प्रश्नांची उत्तरे शोधू शकत नाहीत. मनातील प्रश्न तसेच राहतात. हे असंख्य प्रश्न पुढचे शिक्षण घेण्यात आणि पुढचे विषय समजण्यात अडथळे ठरतात. यातून अध्ययनविषयक अनेक समस्या निर्माण होतात. प्रश्नांची उत्तरे न मिळाल्याने अज्ञान टिकून राहते ते राहतेच.
या प्रश्नांमुळे खरेतर विद्यार्थ्याला कोणता विषय कोणत्या स्तरापर्यंत समजला आहे, त्याला नेमके काय समजलेले नाही, काय शिकवायला हवे, हे सारे सहजगत्या कळू शकते. त्यानंतर न समजलेले जर नीट शिकविले तर, बऱ्याच अध्ययनविषयक समस्या लगेच सुटू शकतात. लहानपणी मुलाला शिकविताना पालकांनी आणि बालवाडीतील शिक्षकांनी तर नेमके हेच केलेले असते. आपण शिकविलेले बालकाला काय समजलेले नाही, हे सुजाण पालक लगेच ओळखतात आणि पुन्हा आनंददायी पद्धतीने शिकवितात. यामुळे मूल असंख्य गोष्टी उत्तमरित्या शिकते.
जसजसे मुल मोठे होत जाते तसतसे पालक आणि शिक्षकांचा दृष्टिकोन पूर्णतः बदलत जातो. आनंदाने शिकविणारे, शंकानिरसन करणारे शिक्षक, पालक मुलांना काय समजते आहे, काय समजत नाहीये, याची दखल घेण्यात टाळाटाळ करू लागतात. यामुळे मुलांच्या अध्ययनविषयक समस्या त्यांच्या योग्य वेळी लक्षातच येत नाहीत. अनुभव आणि आत्मपरीक्षणाच्या अभावी सर्वच विद्यार्थ्यांना त्यांच्या अध्ययनविषयक समस्या लक्षात येतीलच, याची शक्यता नसते. त्यामुळेच या समस्या ओळखणे ही शिक्षकांचीच जबाबदारी असते.
हेही वाचा – ‘वेगळ्या’ चित्रकारांचा शोध
बालपणापासून सुरू असलेल्या आनंददायी शिक्षणाचा अनेकदा शालेय स्तरावर मागमूसही दिसत नाही. काही अपवाद वगळता शाळांमधील शिक्षण हे अत्यंत निरस, कंटाळवाणे, रूक्ष, चैतन्यशून्य होत जाते. अध्यापन हे जर विद्यार्थ्याची उत्सुकता जागविणारे, प्रश्न विचारण्यास आणि विचार करण्यास प्रोत्साहन देणारे, प्रयोग करण्यास महत्त्व देणारे, चित्रफलक, दृकश्राव्य माध्यमांच्या योग्य उपयोगावर भर देणारे, प्रत्येक विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रगतीकडे आवर्जून लक्ष देणारे असेल, तर प्रत्येक विद्यार्थ्याला तो विषय शिकायला आवडेल. अभ्यासविषयातील धडे जर कोडी, प्रश्नमंजूषा, प्रदर्शने, प्रयोग, छोट्या स्पर्धा, स्थळभेटी, प्रश्नोत्तरे अशा अभ्यासाशी संबंधित उपक्रमांच्या आधारे शिकविले गेले, तर ते शिक्षण अधिक प्रभावी ठरते, हे संशोधनांती सिद्ध झालेले आहे. विद्यार्थ्यांनाही ते आवडते. या उपक्रमांमुळे विद्यार्थ्यांना विषय समजतो आहे की नाही, विषय समजण्यात त्याला काही अडचणी येत आहेत का, हे अध्यापकाला सहज आणि लगेच कळू शकेल तसेच, तो या अध्ययनविषयक समस्याही लगेच सोडवू शकेल.
शालेय स्तरावरील शिक्षण हे रंजक, आनंददायी कसे करावे याबद्दल मार्गदर्शन करणारे खूप सारे प्रयोग, शैक्षणिक साहित्य आज अनेक ग्रंथात आणि माहितीच्या महाजालात उपलब्ध आहे. त्याचा उपयोग केल्यास बालपणी घरी आणि बालवाडीत होणारे आनंददायी शिक्षण शालेय स्तरावरही देता येईल. त्यामुळे असंख्य अध्ययनविषयक समस्या सोडविणे सहज शक्य होईल. असा प्रयत्न शिक्षक करतील का?


