Close Menu
AvaantarAvaantar

    Subscribe to Updates

    Get the latest creative news from FooBar about art, design and business.

    What's Hot

    Panchang : आजचे पंचांग, दिनविशेष आणि राशीभविष्य; 02 सप्टेंबर 2026

    September 2, 2026

    वजाबाकी

    September 1, 2026

    कहाणी एका घटस्फोटाची!

    September 1, 2026
    Facebook X (Twitter) Instagram
    Wednesday, September 2
    AvaantarAvaantar
    Facebook X (Twitter) Instagram YouTube
    Home
    • अवांतर
    • आरोग्य
    • फिल्मी
    • फूड काॅर्नर
    • मैत्रीण
    • ललित
    • पंचांग आणि भविष्य
    • अध्यात्म
    • शैक्षणिक
    • थर्ड अंपायर
    Latest From Avaantar
    AvaantarAvaantar
    Home » वजाबाकी
    ललित

    वजाबाकी

    दिलीप कजगांवकरBy दिलीप कजगांवकरSeptember 1, 2026No Comments7 Mins Read
    Share Facebook Twitter LinkedIn WhatsApp Copy Link
    अवांतर, मराठीकथा, मराठीलेख, मी मराठी, अभिजात मराठी, दिलीप कजगांवकर, लेखक दिलीप कजगांवकर, सदानंदांची पूंजी, सदानंदांची बेरीज, सदानंदांची वजाबाकी, राज नेहाचा प्रेमळपणा, सावित्रीबाईंची जाणीव, माणसांची पूंजी, आयुष्याची वजाबाकी,
    फोटो सौजन्य - गूगल जेमिनी
    Share
    Facebook Twitter LinkedIn WhatsApp Email Copy Link

    सदानंदांच्या आयुष्याचं एकच गणित होतं — पैशांची बेरीजच झाली पाहिजे… वजाबाकी नाही! पैसे कमवायचे, कमीत कमी खर्च करून शिल्लक बँकेत जमा करून पूंजी वाढवत जायची. बस्स! आयुष्याचं ध्येयच त्यांनी जणू या तीन गोष्टींत समाविष्ट करून ठेवलं होतं.

    एखादी आवश्यक वस्तू घ्यायची असली तरी, दहा वेळा विचार करायचा. भाजी महाग झाली तर भाजी कमी घ्यायची. वीजबिल वाढलं तर दिवे वापरणं कमी… नवीन चपला आणि कपडे कशाला? “जुने आहेत ना!”

    हॉटेलमध्ये जेवण? “घरचं जेवण किती रुचकर असतं, मग उगाच खर्च कशाला?”

    नवीन चष्मा? “नको नको, जुना दुरुस्त करूया.”

    सदानंदांसाठी खर्च म्हणजे पुंजीची वजाबाकी आणि पुंजीची वजाबाकी म्हटलं की, “नको… नको” हेच त्यांचं ठरलेलं उत्तर असायचं.

    दर महिन्याच्या शेवटी त्यांचा एक ठरलेला कार्यक्रम असायचा… बँकेचं स्टेटमेंट समोर ठेवायचं, वही उघडायची, मागची पूंजी लिहायची, या महिन्याची बचत लिहायची, व्याजाची रक्कम लिहायची आणि सगळ्यांची बेरीज करायची.

    आकडा मागच्या महिन्यापेक्षा मोठा दिसला की, त्यांच्या चेहऱ्यावर समाधान यायचं.

    “वा! पूंजी वाढली!”

    सावित्रीबाई त्यांच्याकडे पाहून हसायच्या… “अहो, एवढे पैसे साठवून काय करायचं?”

    सदानंद शांतपणे म्हणायचे, “आपल्या म्हातारपणासाठी.”

    “म्हातारपण कधी येणार?”

    “येईल एक दिवस.”

    “तुम्ही गेली वीस वर्षं हेच म्हणताय!”

    सदानंद हसायचे आणि पुन्हा वहीत आकडे लिहायला लागायचे.

    त्यांना समजत नव्हतं की, त्यांचं भविष्य सुरक्षित होत होतं… पण वर्तमान मात्र हळूहळू हातातून निसटत होतं.

    हेही वाचा – हा खेळ कागदांचा…

    राज हा त्यांचा एकुलता एक मुलगा. भरपूर शिकला, नोकरीला लागला आणि एक दिवस म्हणाला, “बाबा, मला एक मुलगी आवडते. आम्ही लग्न करणार आहोत.”

    सदानंदांनी चष्म्याच्या वरून त्याच्याकडे पाहिलं…

    “नाव?”

    “नेहा.”

    “जात?”

    “आपल्याच जातीची.”

    नेहा घरी आली. सदानंद तिच्याशी बराच वेळ बोलले आणि राजला होकार मिळाला. लग्न ठरलं. सदानंदांनी वही काढली…

    “लग्नाचा खर्च किती येणार?”

    राज हसला… “बाबा, तुम्ही काही खर्च करायचा नाही.”

    “का?”

    “आम्ही दोघं कमावतो. लग्नाचा खर्च आम्हीच करणार.”

    नेहानेही सांगितलं, “हो बाबा. तुमची पूंजी कमी होऊ देणार नाही.”

    सदानंदांच्या चेहऱ्यावर समाधान उमटलं. त्यांनी वहीत लिहिलं —

    ‘राजच्या लग्नाचा खर्च — शून्य.’

    आणि खाली लिहिलं —

    ‘पूंजी सुरक्षित.’

    राज आणि नेहाचा विवाह झाला. दोघांनी मिळून लग्नाचा सगळा खर्च केला. सदानंदांच्या पुंजीची एक रुपयानेही वजाबाकी झाली नाही.

    लग्नाच्या दिवशी सदानंद सतत राज आणि नेहाकडे पाहात होते. दोघांच्या चेहऱ्यावरचा आनंद पाहून त्यांच्या मनात पहिल्यांदा एक वेगळाच विचार आला — पैसे खर्च करून एवढा आनंद मिळू शकतो?

    काळ पुढे गेला. राज आणि नेहाला एक मुलगा आणि एक मुलगी झाली. सदानंद आजोबा झाले. नातवंडं त्यांच्या अवतीभोवती असायची.

    “आजोबा, आईस्क्रीम!”

    “घरी छान आईस्क्रीम बनवू.”

    “आजोबा, पिक्चरला जाऊ!”

    “नको, टीव्हीवर बघा.”

    राजने लहानपणी हाच अनुभव घेतला होता. सावित्रीबाई मात्र मनात म्हणायच्या —

    “या माणसाने पैशांना खूप जवळ केलंय आणि माणसांना बरंच दूर ठेवलंय.”

    सदानंदांना मात्र त्याची काहीच खंत नव्हती. ते रात्री वही उघडायचे.

    पन्नास लाख… सत्तर लाख… नव्वद लाख…

    आकडा वाढत होता आणि सदानंदांचा आनंदही.

    एक दिवस अचानक सदानंदांची प्रकृती बिघडली. राज आणि नेहाने त्यांना रुग्णालयात दाखल केलं. तपासण्या झाल्या. डॉक्टरांनी राजला बाजूला घेऊन सांगितलं,

    “उपचार करावे लागतील. खर्च मोठा आहे.”

    राजने विचारलं, “किती?”

    डॉक्टर म्हणाले, “साधारण दहा लाख रुपये.”

    राजने क्षणाचाही विलंब न करता सांगितले, “करा डॉक्टर.”

    नेहानेही त्याला साथ दिली. दहा लाखांचा संपूर्ण खर्च राज आणि नेहाने केला.

    सदानंदांना मात्र याची कल्पनाच नव्हती. काही दिवसांनी ते बरे होऊन घरी आले. घरी आल्यावर पहिल्याच दिवशी त्यांनी विचारलं,

    “माझ्या खात्यातून किती पैसे गेले?”

    राज हसला… “एकही रुपया नाही.”

    सदानंदांच्या चेहऱ्यावर समाधान आलं.

    “म्हणजे माझी पूंजी तशीच?”

    “हो बाबा.”

    ते हसले. पण सावित्रीबाई मात्र शांत होत्या. त्या रात्री सगळे झोपल्यानंतर त्या सदानंदांच्या जवळ बसल्या.

    “अहो…”

    “काय?”

    “आता थांबवा.”

    सदानंदांनी भुवया उंचावल्या.

    “काय?”

    “हे पुंजी वाढवणं.”

    सदानंद चटकन म्हणाले, “का?”

    सावित्रीबाई शांतपणे म्हणाल्या,

    “डॉक्टरांनी तुम्हाला काही दिवस पूर्ण विश्रांती सांगितली आहे. आता पैसे जमविण्यासाठीची कामं बंद. धावपळ बंद. म्हणजे आता तुमची दर महिन्याची बेरीज थांबणार.”

    सदानंद गप्प झाले.

    बेरीज थांबणार!

    हा शब्द त्यांच्या मनात घणासारखा आदळला. आयुष्यभर ज्यासाठी धडपड केली, तीच बेरीज आता थांबणार होती.

    सावित्रीबाई म्हणाल्या, “तुम्ही आयुष्यभर पैशांची बेरीज केलीत. पण आज तुमच्या उपचारांसाठी राज आणि नेहाने दहा लाख रुपये खर्च केले. तुमची पुंजी कमी होऊ नये म्हणून तुम्ही किती गोष्टी टाळल्या… किती हौशी मारल्या… किती वेळा स्वतःला थांबवलं, पण आज मुलाने आणि सुनेने तुमच्यासाठी दहा लाख आनंदाने खर्च केले. त्यांना तो खर्च वाटलाच नाही.”

    सदानंदांच्या डोळ्यांत पाणी आलं. सावित्रीबाईंचा आवाज हळूवार झाला…

    “अहो, आयुष्यभर आपण पैशांची बेरीज करत राहिलो. आता आयुष्याची बेरीज करू या. आपण एवढे पैसे साठवले… पण त्यातून राजचं बालपण परत विकत घेता येईल का? नातवंडांना नाराज केलेला वेळ परत आणता येईल का? पैसे पुन्हा कमावता येतात हो, पण गेलेला वेळ नाही.”

    सदानंद काहीच बोलले नाहीत.

    दुसऱ्या दिवशी सकाळी त्यांनी राज आणि नेहाला बोलावलं. आपली जुनी वही हातात घेऊन वहीची पानं उलटली. वर्षानुवर्षांच्या आकड्यांकडे पाहिलं.

    कुठे पाच हजारांची बचत… कुठे दहा हजार… कुठे लाख…

    प्रत्येक पानावर एकच गोष्ट होती — बेरीज. त्यांनी वही अलगद बंद केली.

    राजने विचारलं, “काय झालं बाबा?”

    सदानंद म्हणाले, “आजपासून या घराचा सगळा खर्च मी करणार.”

    राज दचकला.

    “पण बाबा—”

    “नाही, बेटा. मला थांबवू नकोस,” असं म्हणताना त्यांच्या चेहऱ्यावर एक वेगळंच समाधान होतं…

    “आता मला पैशांची बेरीज नको.”

    क्षणभर शांतता पसरली. मग सदानंद ठाम आवाजात म्हणाले— “होऊ दे वजाबाकी!”

    राज आणि नेहा एकमेकांकडे पाहू लागले.

    सदानंद पुढे म्हणाले, “घराचा किराणा मी आणणार. वीजबिल मी भरणार. नातवंडांना आईस्क्रीम मी खाऊ घालणार. सगळ्यांना बाहेर जेवायला मी घेऊन जाणार.”

    राजच्या डोळ्यांत पाणी आलं.

    सदानंद म्हणाले, “आजवर मी पैशांना जपलं. आता माणसांना जपणार.”

    त्यांनी सावित्रीबाईंचा हात हातात घेतला… “आणि अजून एक…”

    सगळे त्यांच्याकडे पाहू लागले.

    सदानंद म्हणाले, “जर कधी अशी वेळ आली की माझी पुंजी शून्य झाली…”

    ते थांबले… “तरी आम्हाला तुमच्या घरात दोन घास द्या.”

    राजच्या डोळ्यांत अश्रू आले. थरथरत्या आवाजात ते पुढे म्हणाले, “आणि जर कधी आम्ही दोघं तुमच्यावर ओझं झालो…”

    ते राज आणि नेहाकडे पाहत म्हणाले — “तर तुम्ही आम्हाला वृद्धाश्रमात सोडा.”

    घरात एकदम शांतता पसरली.

    मग सदानंद हसले… “पण तो दिवस येईपर्यंत मला माझी पूंजी खर्च करू द्या.”

    नेहा त्यांच्या जवळ आली. तिने त्यांच्या पाठीवर हात ठेवला… नेहा हळू आवाजात म्हणाली,

    “बाबा, तुम्ही आणि आईच तर आहात ना आमची पूंजी?”

    सदानंदांच्या डोळ्यांतून अश्रू वाहू लागले. त्यांनी नेहाच्या डोक्यावर हात ठेवला…

    “सून म्हणून घरात आलीस…” ते क्षणभर थांबले… “पण मुलगी कधी झालीस ते मला कळलंच नाही.”

    नेहाने त्यांच्या खांद्यावर डोकं ठेवलं. राजही वडिलांच्या जवळ येऊन बसला.

    हेही वाचा – फिरकी… 1100 रुपयांचं बक्षीस!

    सदानंदांनी पुन्हा वही उघडली.

    शेवटच्या पानावर त्यांनी लिहिलं —

    “पैशांची पूंजी शून्य झाली तरी चालेल, पण माणसांची पूंजी शून्य होता कामा नये.”

    सावित्रीबाईंनी ते वाचलं आणि हसत विचारलं,

    “आता काय?”

    सदानंद म्हणाले, “उद्या सगळे बाहेर जेवायला जाऊ, मोठ्या हॉटेलला जाऊन भरपेट खाऊ. मी बिल देईन आणि टिपही.”

    सावित्रीबाईंनी विचारलं, “कुठे जायचं?”

    सदानंद म्हणाले, “जिथे बिल जास्त येईल तिथे!”

    सगळे मनसोक्त हसले. सदानंदही त्यांच्यात सामील झाले.

    आज त्यांच्या आयुष्यात पहिल्यांदाच हॉटेलचं बिल त्यांना कमी होणाऱ्या पुंजीचं चिन्ह वाटत नव्हतं, तर ते वाढणाऱ्या आनंदाची पावती वाटत होतं. त्या रात्री सदानंदांनी आपली जुनी वही उघडली.

    शेवटच्या पानावर एक नवीन हिशोब लिहिला —

    राजसोबत घालवलेला वेळ — अमूल्य.

    नेहाने दिलेलं प्रेम — अमूल्य.

    नातवंडांचं हसू — अमूल्य.

    सावित्रीसोबतचं उरलेलं आयुष्य — अमूल्य.

    खाली त्यांनी लिहिलं—

    “एकूण पूंजी — आता मोजणार नाही.”

    आणि त्या खाली शेवटची ओळ—

    “आजपासून बेरीज पैशांची नाही… माणसांची.”

    सदानंदांनी वही बंद केली. बाहेर नातवंडांच्या बागडण्याचा आवाज येत होता.

    सावित्रीबाई स्वयंपाकघरातून म्हणाल्या,

    “अहो, उद्या फिरून परत येताना नातवंडांना आईस्क्रीम आणायला विसरू नका!”

    सदानंद मोठ्याने हसत म्हणाले, “नाही आणणार.”

    “विचार बदलले का?” सावित्रीबाईंनी आश्चर्याने विचारले.

    “नातवंडांनाच नाही, सगळ्यांना आणणार!” सदानंद म्हणाले.

    सावित्रीबाईंच्या चेहऱ्यावर हसू आलं, कारण आयुष्यभर पैशांची बेरीज करत जगलेले सदानंद पहिल्यांदाच वजाबाकीला घाबरत नव्हते. उशिरा का होईना, पण त्यांना उमगलं होतं —

    पैशांची बेरीज करताना माणूस श्रीमंत होतोच असं नाही… कधी कधी पैशांची वजाबाकी करताना माणसांची बेरीज होत असते. आयुष्याच्या शेवटच्या हिशोबात बँकेच्या खात्यात किती शिल्लक आहे, यापेक्षा आपल्या माणसांच्या मनात आपण किती शिल्लक आहोत — हाच खरा हिशोब असतो.

    ते स्वतःशीच म्हणत होते —

    “आजपावेतो—

    पैशांची बेरीज करत राहिलो

    आयुष्य मात्र वजा होत गेलं

    यापुढे —

    माणसांची पूंजी जपणार

    जगणं नक्कीच फुलणार.”

    Avatar photo
    दिलीप कजगांवकर

    तंत्रज्ञान क्षेत्रातील चार दशकांचा अनुभव आणि साहित्यविश्वातील संवेदनशील लेखन यांचा सुरेख संगम. शिक्षणाने बी.ई., एम.बी.ए. आणि कॉस्ट अकाऊंटंट असलेले दिलीप कजगांवकर हे सर्टिफाइड प्रोजेक्ट मॅनेजर, सर्टिफाइड क्वालिटी मॅनेजर आणि सिक्स सिग्मा ब्लॅक बेल्ट आहेत. इंजिनिअरिंग व इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी क्षेत्रात त्यांना सुमारे 40 वर्षांचा समृद्ध व्यावसायिक अनुभव आहे. ग्रीव्ह्ज, महाराष्ट्र स्कूटर्स, पथेजा ग्रुप, झेन्सार, हेक्सावेअर, कॅपजेमिनी, इन्फ्रासॉफ्ट व टेस्टिंगएक्स्पर्ट यासारख्या नावाजलेल्या कंपन्यांमध्ये त्यांनी विविध जबाबदाऱ्या यशस्वीपणे पार पाडल्या आहेत. लेखन, कथाकथन आणि कवितेची त्यांना विशेष आवड आहे. 2012 साली प्रकाशित झालेला “वाचावेसे” हा त्यांचा काव्यसंग्रह रसिक वाचकांच्या विशेष पसंतीस उतरला. त्यांच्या कथा आणि कविता विविध वृत्तपत्रे आणि मासिकांत नियमितपणे प्रसिद्ध होत असतात. त्यांच्या लेखनात माणूस, नातेसंबंध आणि जीवनातील सूक्ष्म भावविश्व यांचे प्रामाणिक दर्शन घडते. गेली अनेक वर्षे विविध दिवाळी अंकांत त्यांच्या कथा प्रकाशित होत आहेत. तसेच, गेली दोन वर्षे दर मंगळवारी व शुक्रवारी “विश्वास रेडिओ” (नाशिक) तसेच आकाशवाणी पुणे आणि जळगाव येथून त्यांच्या कथा प्रसारित होत आहेत. विविध संस्थांकडून त्यांना “महाराष्ट्र भूषण”, “साहित्य रत्न” यासारख्या मानाच्या पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले आहे. ते विविध कार्यक्रमांत 30 मिनिटांपासून 2 तासांपर्यंत आपल्या कथांचे प्रभावी कथाकथन करून श्रोत्यांना मंत्रमुग्ध करतात. त्यांनी स्वतः कथन केलेल्या तसेच दत्ता सरदेशमुख, सचिन दातार, मुकुंद जोशी, डॉ. सुचिता पाटील, डॉ. जयश्री अय्यंगार, विनया देशपांडे आणि अर्चना कापरे यांसारख्या दिग्गजांनी सादर केलेल्या त्यांच्या अनेक कथा युट्यूबवर उपलब्ध आहेत. आपल्या साहित्यिक प्रवासात दादर येथील जनरल एज्युकेशन इन्स्टिट्यूशनचे माजी संचालक, डोंबिवली स्थित आदरणीय व्ही. एस. वाणी सर यांच्या लाभलेल्या मौल्यवान मार्गदर्शनाचा ते आवर्जून उल्लेख करतात.

    Related Posts

    कहाणी एका घटस्फोटाची!

    September 1, 2026 ललित

    गणरायाचे डोळे रंगविण्याचे कौशल्य

    September 1, 2026 ललित

    अट

    August 31, 2026 ललित
    Leave A Reply Cancel Reply

    Demo
    Stay In Touch
    • Facebook
    • Twitter
    • Instagram
    • YouTube
    Don't Miss
    ललित

    कहाणी एका घटस्फोटाची!

    By ॲड. कृष्णा पाटीलSeptember 1, 2026

    पूर्वार्ध खाली मान घालून तो बराच वेळ शांत बसला होता. हाताची बोटं चाळवत फरशीवर पहात…

    गणरायाचे डोळे रंगविण्याचे कौशल्य

    September 1, 2026

    अट

    August 31, 2026

    मोडक आणि सोहोनी आजोबांमध्ये पुन्हा रंगला बुद्धीबळाचा डाव!

    August 31, 2026

    Subscribe to Updates

    Get the latest creative news from Avaantar

    Latest From Avaantar

    Panchang : आजचे पंचांग, दिनविशेष आणि राशीभविष्य; 02 सप्टेंबर 2026

    September 2, 2026

    वजाबाकी

    September 1, 2026

    कहाणी एका घटस्फोटाची!

    September 1, 2026

    गणरायाचे डोळे रंगविण्याचे कौशल्य

    September 1, 2026

    शुक्राचे अध्यात्म

    September 1, 2026

    सार्थ ज्ञानेश्वरी : उपनिषदांकडे न वचे, योगशास्त्र न रुचे

    September 1, 2026

    POPULAR CATEGORY

    • Blogs 1
    • अध्यात्म 417
    • अवांतर 206
    • आरोग्य 142
    • थर्ड अंपायर 6
    • पंचांग आणि भविष्य 561
    • फिल्मी 65
    • फूड काॅर्नर 253
    • मैत्रीण 28
    • ललित 889
    • शैक्षणिक 86
    • 98699 75883
    • joshimanoj@avaantar.com
    Facebook X (Twitter) Instagram LinkedIn

    एक पाऊल सांस्कृतिक सर्जनशीलतेकडे...

    आजकाल वाचनसंस्कृतीबद्दल चिंता व्यक्त केली जात आहे. वास्तविक ‘पुस्तक वाचन’ संस्कृतीला धोका निर्माण झाला आहे. वाचनसंस्कृती अबाधित आहे आणि ती अबाधित राहील. कारण, पुस्तकांच्याच जोडीला स्मार्टफोन, ई-बुक, ई-मॅगझिन यासारखी आधुनिक काळाशी सुसंगत माध्यमे उपलब्ध झाली आहेत. याच अत्याधुनिकतेची कास धरत आम्ही हे पाऊल उचलले आहे... अवांतर ही वेबसाइट!

    ‘अवांतर’ हा एक वेब प्लॅटफॉर्म आहे, जो विचार, साहित्य, कला आणि संस्कृतीच्या सर्जनशील प्रवाहाला समर्पित आहे. विविध विषयांवर लेख, कविता, कथा आणि विचार आपल्यापर्यंत पोहोचविण्याचा हा प्रयत्न आहे. दैनंदिन धावपळीच्या जीवनात मिळाणारी काही क्षणांची उसंत सार्थकी लावावी, उत्तम साहित्याद्वारे वाचकांना नवनवीन दृष्टिकोन देणे, विचारांना चालना देणे आणि सर्जनशीलतेला प्रोत्साहन देणे, हा उद्देश आमचा यामागे आहे.

    ‘अवांतर’च्या निमित्ताने विविध लेखक, कवी, विचारवंत आणि कलाकारांना एक हक्काची वेबसाइट उपलब्ध केली आहे. त्यांचे वैविध्यपूर्ण साहित्य, माहिती जगासमोर मांडण्यासाठी एक मुक्त व्यासपीठ असे या वेबसाइटचे स्वरूप आहे. ‘अवांतर’ च्या माध्यमातून आम्ही मराठी भाषेतील समृद्ध साहित्यिक परंपरेला नवी दिशा देत, आधुनिक काळाशी जोडून ठेवण्याचा आमचा प्रयत्न आहे.

    या वेबसाइटला ‘अवांतर’ नाव विचारपूर्वक देण्यात आले आहे. कोणत्याही एका विचाराला किंवा विचारधारेशी बांधिलकी न दाखवता, सर्वांना सामावून घेत, पुढे जाण्याचा एक निखळ उद्देश यामागे आहे. आमच्या या प्रवासात जवळपास 25 ते 30 लेखक, कवी, आरोग्यतज्ज्ञ, शैक्षणिक तज्ज्ञ साथसोबत आहेत. पण आमचा हा प्रवास तुमच्याशिवाय अपूर्ण आहे. सर्जनशीलतेच्या या प्रवासात सर्वच सहभागी होऊया!

    संपादकीय मंडळ

    • मनोज शरद जोशी (संपादक)
    • आराधना जोशी (कार्यकारी संपादक)
    • चिन्मय आचार्य (कायदेविषयक सल्लागार)
    • भालचंद्र गोखले (आर्थिक सल्लागार)
    • गार्गी देवधर (सल्लागार)
    Read More
    • M.A.Y. Multimedia Rg.No.MH-17-0175213 Palghar, Maharashtr

    © 2026 Avaantar.com All Rights Reserved. | Design & Developed By Creative Marketix

    • Terms & Conditions
    • Privacy Policy
    About Us
    About Us

    Your source for the lifestyle news. This demo is crafted specifically to exhibit the use of the theme as a lifestyle site. Visit our main page for more demos.

    We're accepting new partnerships right now.

    Email Us: info@example.com
    Contact: +1-320-0123-451

    Facebook X (Twitter) Pinterest YouTube WhatsApp
    Our Picks

    Panchang : आजचे पंचांग, दिनविशेष आणि राशीभविष्य; 02 सप्टेंबर 2026

    September 2, 2026

    वजाबाकी

    September 1, 2026

    कहाणी एका घटस्फोटाची!

    September 1, 2026
    Most Popular

    स्मृतीगंध

    January 26, 2025

    विष्णूरुपी जावई…

    January 26, 2025

    नजर

    January 26, 2025
    © 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.
    • Home
    • Buy Now

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.