पल्लवी खरोसे आंबेकर
भाग – 12
राहुल अग्रवाल पार्थच्या घरी गेला. त्याने दारावरची बेल वाजवली. विभाने म्हणजे पार्थच्या आईने दरवाजा उघडला. विभाला तिथं बघून राहुल जागीच थांबला. तीही त्याला आपल्या घरच्या दरवाज्यात बघून शॉक झाली. पण भानावर येत तिने त्याला आत घेतलं.
“आता काय बाकी राहील आहे, जे तू इथे आलास?” ती त्याला अगदी रुक्षपणे म्हणाली.
“वाहिनी प्लीज, असं नका बोलू माझ्याशी…” तो काकूळतीने म्हणाला.
“तुझ्या या तोंडाने मला वहिनी म्हणू नकोस. ज्या दिवशी तू माझ्या राजेशला बिझनेससाठी मारलंस त्याच दिवशी तुझी वहिनी मेली. मी आता कोणाचीही वहिनी नाही, समजलं?” ती रागाने म्हणाल्या.
“वाहिनी, तो माझा जिवलग मित्र होता. तो मला माझ्या भावापेक्षाही जास्त होता. मी त्याचा कसा जीव घेईन? तुमचा खूप मोठा गैरसमज झाला आहे आणि तोही तुमच्या घरच्यांनी केलाय!” तो म्हणाला.
“घरच्यांनी? आणि ते का करतील असं?” त्यांनी त्याला प्रतिप्रश्न केला.
“सांगतो…” तो एक दीर्घ श्वास घेत म्हणाला.
“राजेश आणि मी बिझनेस पार्टनर ह राजेशच्या दोन्ही भावांना बिजनेसमध्ये समान पार्टनरशिप पाहिजे होती. ते दोघेही कसे होते, ते तर तुम्हाला चांगल्या प्रकारे माहिती आहे. त्यामुळे राजेशने त्यांना नकार दिला. राजेशने मजबुरीने त्यांना नकार दिला, कारण त्यांना जर पार्टनरशिप दिली असती तर, त्यांनी सगळं काही जुगार आणि नशा करण्यात घालवलं असत. कोणत्या भावाला आपल्याच भावाचं आयुष्य खराब झालेलं पाहावंसं वाटलं असत. त्याने त्यांच्याप्रति चांगले विचार ठेवले, पण त्या दोघांनी याचा चुकीचा अर्थ घेतला आणि त्यादिवशी जेव्हा तो मीटिंगला जात होता, तेव्हा याच दोघांनी एका गुंडाला सुपारी देऊन त्याच्या गाडीचा अपघात घडवून आणला. त्यांनीच स्वतःच्या भावाचा अडसर दूर केला, प्रॉपर्टीसाठी!”
हेही वाचा – शार्वीची वेगळी खेळी
“मग असं होतं तर, हे तू मला आधी का नाही सांगितलंस?” त्याच्यावर नजर स्थिर करत त्यांनी विचारलं. बहुतेक त्या त्याच्या डोळयांत त्याचा खरेपणा शोधत होत्या आणि त्यांना तो दिसला.
“वाहिनी तुम्हाला तर माहिती आहे, त्याची ॲक्सिडेन्टची माहिती मिळाल्या मिळाल्या त्या दोघांनी जाऊन माझ्यावर केस केली आणि माझ्यावर कंपनी बळकवण्याचा आरोप लावला. मी सगळ्यांना सांगण्याचा प्रयत्न केला, पण कोणीच माझं ऐकलं नाही. कारण परिस्थितीही तशीच बनवली गेली होती. पोलीसही मलाच आरोपी समजत होते. अगदी तुम्हीही माझ्यावर विश्वास ठेवला नाही आणि याचाच गैरफायदा त्या दोघांनी घेतला…” तो विभाकडे बघत म्हणाला.
यावर विभाने त्याच्याकडे आश्चर्याने त्याच्याकडे पाहिलं. ‘हा काय म्हणतोय? त्या दोघांनी गैरफायदा घेतला म्हणजे त्या दोघांनी नक्की काय केलं आहे…’ ती मनातच विचार करत होती.
हेही वाचा – राहुल अग्रवाल पार्थच्या घरी गेला आणि…
तिच्या चेहऱ्यावरचे आश्चर्याचे भाव बघून त्याने परत बोलायला सुरुवात केली… “हो, ते दोघेही मला जेलमध्ये भेटायला आले होते. त्यांनी माझ्यासमोर एक प्रपोजल ठेवलं… आम्हाला माहिती आहे की, तू काही नाही केलंस. पण सगळे पुरावे तुझ्याविरोधात आहेत. जर तुला यातून बाहेर पडायचं असेल तर, आम्ही सांगतो तसं कर. नाहीतर विनाकारण तुला या जेलमध्ये सडावं लागेल, ते दोघेही एकमेकांकडे बघत हसत म्हणाले.
त्यावर मी त्यांना विचारलं, काय करावे लागेल मला?”
राहुल विभाला त्यावेळचा सर्व घटनाक्रम सांगत होता.


