“अण्णा आज लवकर फिरून आलात? आणि हे काय तुमची तर आंघोळही झालेली दिसतेय?” मनोजने उठल्यावर वडिलांना विचारलं.
“अरे, आज गुढीपाडवा ना! म्हणून आजचा मॉर्निंग वॉक थोडा लवकर आटोपला. येताना कडूनिंबाचा पाला आणि फुलंही तोडून आणली आहेत बघ पुजेला. आज मीच पूजा करणार आहे. सुनबाई उठली का?”
“नाही अजून. आज सुटी आहे ना शाळेला, म्हणून थोडं उशिरा उठेल.”
“बरं, झोपू दे.”
अण्णा पुजेला गेले. एरवी ते पाटावर बसणं जमत नाही म्हणून पूजा करायचे नाहीत, आज मात्र का कुणास ठाऊक त्यांना ती अडचण वाटत नव्हती. मनोज बेडरूममध्ये गेला. विद्या आणि मुलं गाढ झोपली होती. सात वाजले होते. सणासुदीला लवकर उठावं, असं अण्णांचं म्हणणं होतं आणि ते योग्यच आहे, असं मनोजलाही वाटायचं. त्याने विद्याला हाक मारली. विद्याने डोळे किलकले केले आणि म्हणाली,
“झोपू द्यानं थोडावेळ. रोज तर मेलं असतंच लवकर उठणं…”
तिचंही म्हणणं बरोबर होतं. रोज सकाळी पाच वाजता तिला उठावं लागायचं. मुलांचे डबे, मनोजचा डबा करून पावणेसातला ती शाळेत जायला निघायची. शाळेतून आल्यावर घरची कामं, शाळेची कामं, मुलांचा अभ्यास असं सगळं करता करता रात्रीचे अकरा वाजायचे. सुटीच्या दिवशीच काय ती थोडीफार झोप व्हायची. मनोजने बेडरूमचं दार बंद केलं आणि तो हॉलमध्ये आला.
नऊ वाजता सगळेजण नाश्त्याला बसले असताना विद्याने विचारलं,
“आज काय करायचं जेवायला?”
कोणी काही बोलायच्या आधीच अण्णांनी विचारलं,
“सुनबाई बटाटेवडे करतेस?”
बटाटावडा म्हणजे अण्णांचा विक पॉइंट! प्रत्येक सणाला अण्णांना बटाटावडा हवा असे. त्यात विद्या फार छान बटाटेवडे करायची. जगात सर्वात छान बटाटेवडे माझी सुनबाई करते, असं अण्णा सर्वाना अभिमानाने सांगायचे.
हेही वाचा – अण्णांचं मृत्युपत्र
“अण्णा मागच्या आठवड्यात एका लग्नात तुम्ही बटाटेवडे खाल्लेत, तेव्हा तुम्हाला किती त्रास झाला होता, हे विसरलात वाटतं! दवाखान्यात ॲडमिट करायची वेळ आली होती तुम्हाला,” विद्या काकुळतीने म्हणाली.
अण्णांनी संकोचाने मान खाली घातली. ते मुकाट्याने चहा पित राहिले.
“बासुंदी करायची का?” अंकिताने विचारलं.
“त्यापेक्षा श्रीखंड आणू या?” अण्णा मधेच म्हणाले.
“अण्णा, अहो मागच्या आठवड्यात तुमची शुगर तीनशेपर्यंत पोहचली होती. डॉक्टरांनी तुम्हाला गोड खायला स्ट्रिक्टली मना केलंय माहिती आहे ना?” मनोज थोडा वैतागानेच बोलला.
अण्णा परत एकदा चूप बसले. एकमत न झाल्याने शेवटी काय स्वयंपाक करावा, हे न ठरवताच सगळे उठले.
मग मनोजने गुढी उभारायची तयारी केली.
“मनू यावेळी मी गुढी उभारू?” अण्णांनी विचारलं.
“अहो उभारा ना, त्यात काय विचारायचं! नेहमी तुम्ही मलाच सांगता म्हणून मी चाललो होतो उभारायला.”
बोलता बोलता मनोजने गुढी अण्णांच्या हातात दिली. अण्णांनी ती आनंदाने दारावर लावली.
बरोबर अकरा वाजता मनोज भाजी आणायला निघाला. त्याला पाहून अण्णा म्हणाले,
“मनू बाहेरच जातोयस तर, सुनबाईला साडी घेऊन ये माझ्यातर्फे!”
ते ऐकून विद्या बाहेर येत म्हणाली,
“अण्णा, अहो हे काय आता नवीन? अहो, ढीग पडलाय माझ्याकडे साड्यांचा…”
“अगं, आज गुढीपाडव्याच्या शुभमुहूर्तावर काही खरेदी नको करायला? ते काही नाही, साडी नको तर एखादी पर्स नाहीतर घड्याळ तरी घे.”
“ठीक आहे, तुमची इच्छाच आहे तर, पर्स घेऊन या.”
विद्या बोलून आत निघून गेली. अण्णांनी नातवांना हाक मारली. ती दोघं आल्यावर त्यांना विचारलं,
“मुलांनो, तुम्हाला तुमचे आईबाबा घेऊन देत नाहीत अशा वस्तू सांगा… आज माझ्याकडून मी तुम्हाला घेऊन देईन.”
“मला मोबाईल,” अंकिता म्हणाली.
“मला हेडफोन,” आदित्य म्हणाला.
“ओक्के! मनू तुला काय हवंय?” अण्णांनी मनोजला विचारलं.
“अण्णा एवढी करोडोची प्रॉपर्टी तुम्ही मला दिलीत. आता मला तुमच्याकडून काही नको आणि माझ्याहीकडे सगळं काही आहे.”
“असं कसं तुझे बूट बघ किती खराब झालेत! अरे, एवढा मोठा ऑफिसर तू आणि इतके खराब बूट घालतोस? जा नवीन चांगले बूट घेऊन ये.”
“बरं आणतो. तुम्हाला काय आणू?”
“अरे, या वयात आता काय लागणार मला? जे लागतं ते सगळं आहे माझ्याकडे! तुमच्यासाठीच घेऊन या. तुमचा आनंद तो माझा आनंद!”
मनोज हसला. कष्टात आयुष्य काढलेल्या अण्णांना साधी रहाणीच पसंत होती, हे तो जाणून होता. अण्णांनी आत जाऊन पैसे आणून मनोजला दिले. मनोजला निघताना काय वाटलं कुणास ठाऊक, पण तो किचनमध्ये गेला आणि विद्याला म्हणाला,
“कर बटाटेवडे आणि मी श्रीखंडही घेऊन येतो. आज अण्णा आनंदात आहेत. होऊन जाऊ दे त्यांच्या मनासारखं. त्यांची इच्छा अपूर्ण ठेवायला मन तयार होत नाही बघ!”
“अहो पण त्यांना त्रास…”
“होऊ दे. आहे आपल्या शेजारी डॉक्टर. बोलावून घेऊ त्याला.”
“ठीक आहे. माझे सासरे असले तरी, अगोदर ते तुमचे वडील आहेत. मला काही अडचण नाही. मी करायला तयार आहे. फक्त त्यांना काही त्रास झाला तर चिडचिड करू नका.”
“नाही करणार.”
“मग ठीक आहे.”
मनोजने सगळ्या वस्तू बाजारातून आणल्या आणि अण्णांच्या हातात दिल्या. अण्णांनी स्वतःच्या हातांनी सगळ्यांना गिफ्ट्स दिले. घेणाऱ्यापेक्षा देणाऱ्याच्या चेहऱ्यावर जास्त आनंद दिसत होता.
जेवताना बटाटेवडे आणि श्रीखंड पाहून अण्णा एकदम खूश झाले.
“मस्करी करता कारे तुम्ही म्हाताऱ्याची?”
सगळे हसू लागले. अण्णांनी बटाटावड्याची चव घेतली…
“सुनबाई, या बटाटावड्याच्या बदल्यात तुम्ही शंभर गिफ्ट मागितले तरी, मी देईन. व्वा, काय टेस्ट आहे! गजब!”
मनोजने श्रीखंडाची वाटी अण्णांच्या ताटात ठेवली.
अण्णा मनसोक्त जेवले. मनोज, विद्यानेही त्यांना अडवलं नाही.
दुपारी सगळे झोपले असताना अण्णांनी टीव्हीवर जुनी गाणी पाहिली. सगळे उठल्यावर त्यांनी जुने फोटो अल्बम काढले. मुलगा, सून आणि नातवांना फोटो दाखवता दाखवता आणि जुन्या आठवणी सांगताना ते सारखे हसत होते.
संध्याकाळी अण्णा विद्याला म्हणाले, “सुनबाई आज रात्री मी जेवणार नाही.”
“का हो अण्णा? काही त्रास होतोय का?”
“नाही नाही. एकतर सकाळचं जेवण फार मस्त झालं. दुसरं आज आम्ही मित्र पिक्चरला जाणार आहोत. परत येताना भेळ आणि पाणीपुरी खायचा बेत आहे.”
“चालेल. पण लवकर या हं घरी. सकाळी फिरायला जायचंय ना?”
अण्णा थोडे शांत बसले मग म्हणाले, “ते बघू पुढचं पुढे!”
दुसऱ्या दिवशी सकाळी मनोज उठला तेव्हा विद्या सगळ्यांच्या डब्यासाठी स्वयंपाक करत होती. मुलांची शाळा-कॉलेजची तयारी सुरू होती. बाहेरचं दार बंद पाहून त्याने विद्याला विचारलं,
“आज अण्णा फिरायला गेले नाहीत वाटतं?”
“काल रात्री उशिरा आले होते घरी, म्हणून झोपले असतील.”
का कुणास ठाऊक मनोज थोडा अस्वस्थ झाला.
“पण रात्री कितीही उशीर झाला तरी, सकाळचं फिरणं ते चुकवत नाहीत. काही त्रास तर होत नाही ना त्यांना?” त्याने विचारलं.
विद्याने खांदे उडवले. मग म्हणाली,
“काय माहीत! बघा तरी जाऊन त्यांच्या रूममध्ये…”
हेही वाचा – मोबदला
मनोज त्यांच्या रूममध्ये गेला. अण्णा शांत झोपले होते. तृप्ती आणि समाधानाचं स्मित त्यांच्या चेहऱ्यावर विलसत होतं. मनोजला हायसं वाटलं. त्याने बाहेर जाण्यासाठी बेडरूमचं दार उघडलं… अचानक काहीतरी शंका येऊन त्याने मागे वळून त्यांच्या छातीकडे पाहिलं. तिथं काहीच हालचाल दिसत नव्हती. घाबरुन तो त्यांच्याजवळ आला. त्यांचा हात उचलून त्याने नाडी बघितली. नाडी हाताला लागत नव्हती. पटकन मोबाइल काढून तो शेजारच्या डॉक्टरशी बोलला. त्याला ताबडतोब यायला सागितलं.
दोनच मिनिटांत डॉक्टर आला. त्याच्यासोबत विद्याही आत आली. डॉक्टरने अण्णांना तपासलं. मग मनोजकडे पाहिलं. त्यांच्या चेहऱ्यावरचे भाव पहाताच मनोजला समजलं, अण्णांनी या जगातून एक्झिट घेतलीय. या एक्झिटबद्दल अण्णांना कालच कळलं असेल का? म्हणून तर त्यांनी कालचा गुढीपाडवा खूप आनंदात घालवला तर नसेल? विचार करता करता मनोजला एकदम भडभडून आलं आणि अण्णांच्या पार्थिवाला मिठी मारून तो हमसून हमसून रडू लागला. तो रडत होता, पण मनाच्या एका कोपऱ्यात त्याला काल अण्णांच्या सगळ्या इच्छा आपण पूर्ण केल्या याचं समाधान वाटत होतं.


