माया भाग – 2
भानूद्गमे यथा लोके
दिङ्भ्रमो नश्यति ध्रुवम्।
सत्यानुभूतौ तद्वद्धि
अज्ञानं नश्यति ध्रुवम्॥
– गीताव्रत
रात्रीच्या घनदाट अंधारात आपण एखाद्या अनोळखी जंगलात रस्ता चुकलो आहोत अशी कल्पना आपण क्षणभर करूया. चारही बाजूंनी केवळ काळाकुट्ट अंधार पसरलेला आहे आणि आपल्याला पूर्व, पश्चिम, उत्तर, दक्षिण या दिशांचा कोणताही बोध होत नाहीये. आपण दिशाभूल होऊन सैरावैरा धावत सुटलोय आणि दुर्दैवाने एकाच ठिकाणी गोल गोल फिरत राहिलोय. मनात प्रचंड भीती आहे आणि मार्ग न सापडल्याने आलेली हतबलता जाणवते आहे. आपण आपल्या मर्यादित बुद्धीने रस्ता शोधण्याचा खूप प्रयत्न करतोय पण अंधारामुळे आपला गोंधळ अधिकच वाढत जातोय. अखेर रात्र संपतेय. पहाटे पूर्वेकडून सूर्याचा उदय होतोय आणि सूर्याची पहिली सोनेरी किरणे धरतीवर पडताहेत…
आता काय होईल तर आपल्याला दिशा शोधण्यासाठी काही वेगळे कष्ट करावे लागणार नाहीत. नक्कीच दिशा समजतील. सूर्याचा प्रकाश पडताच आपला तो दिशांचा भ्रम एका क्षणात आणि निश्चितपणे नष्ट होतोय. आता आपल्याला अंधाराशी युद्ध करावे लागत नाहीये. केवळ प्रकाशाची उपस्थिती पुरेशी ठरतेय. दिशा जिथे होत्या तिथेच होत्या. रस्ताही तिथेच होता. पण तो दिसत नव्हता, कारण आपल्या दृष्टीवर अंधाराचे सावट किंवा आवरण होते. अगदी याचप्रमाणे आपण या संसारात अज्ञानाच्या आणि मोहाच्या अंधारात पूर्णपणे दिशाहीन झालेले असतो. काय शाश्वत आहे आणि काय नाशवंत आहे, याचा आपल्याला कोणताही विसर पडलेला असतो. आपण नाशवंत गोष्टींमध्ये आनंद शोधत आयुष्यभर भरकटत राहतो. पण जेव्हा आपल्या अंतःकरणात सत्याचा म्हणजेच आत्मज्ञानाचा सूर्य उगवतो, जेव्हा आपल्याला ही प्रखर अनुभूती येते की, आपण केवळ हे नश्वर शरीर नसून एक अविनाशी चैतन्य आहोत! तेव्हा आपले सर्व अज्ञान आणि भ्रम एका क्षणात गळून पडतात. सत्य समजल्यानंतर अज्ञान हळूहळू जात नाही, तर ते प्रकाशात जसा अंधार नाहीसा होतो, तसे तत्काळ नष्ट होते आणि मग उरतो तो केवळ असीम प्रकाश आणि मार्ग सापडल्याची परम शांती.
ज्ञानचक्षुः समालोक्य
विश्वं पश्यति यः सदा।
सर्वमात्ममयं योगी
नान्यत् पश्यति सः सदा॥
– गीताव्रत
आपण सर्वसामान्य माणसे या जगाकडे नेहमी आपल्या चर्मचक्षूंनी म्हणजेच बाह्य डोळ्यांनी पाहत असतो. हे बाह्य डोळे आपल्याला नेहमी केवळ भेद आणि विविधता दाखवतात. आपल्याला कोणी गोरा दिसतो, कोणी काळा दिसतो, कोणी आपला वाटतो, तर कोणी परका वाटतो. या भेदभावामुळेच आपल्या मनात आकर्षण किंवा तिरस्कार निर्माण होतो आणि तिथूनच सर्व दुःखांची सुरुवात होते. पण जो खरा साधक आहे, जो योगी आहे, तो या जगाकडे पाहण्यासाठी एक वेगळाच डोळा उघडतो आणि तो म्हणजे ज्ञानाचा डोळा. जेव्हा हा ज्ञानचक्षू उघडू, तेव्हा पाहण्याची संपूर्ण दृष्टीच बदलून जाते. तो योगी या अफाट विश्वाकडे पाहतो, पण त्याला आता तिथे वेगवेगळी माणसे किंवा वस्तू दिसत नाहीत तर त्याला प्रत्येक कणात आणि प्रत्येक जीवात स्वतःचाच आत्मा भरून राहिलेला दिसतो.
सोनाराच्या दुकानात गेल्यावर आपण अनेक प्रकारचे दागिने पाहतो – जसे की बांगडी, अंगठी किंवा गळ्यातील हार. आपण आकाराला महत्त्व देतो, पण जो खरा सोनार आहे, तो त्या सर्व वेगवेगळ्या आकारांमध्ये केवळ शुद्ध सोने किती आहे, तेच पाहतो. तसेच, जर पाण्याने भरलेले शंभर माठ अंगणात ठेवले तर, आकाशातील एकच सूर्य त्या शंभर माठांमध्ये प्रतिबिंबित होतो. अज्ञानी माणसाला शंभर वेगवेगळे सूर्य दिसतील, पण ज्ञानी माणसाला माहिती असते की, पाण्यात दिसणारी केवळ रूपे आहेत, वेगळी वेगळी प्रतिबिंबे आहेत. मूळ सूर्य हा एकच आहे. जेव्हा आपण प्रत्येक प्राणिमात्रात तोच एक ईश्वरीय अंश पाहू लागतो, तेव्हा आपण कोणाचा द्वेष कसा करू शकणार? जिथे दुसरा कोणी उरलेलाच नाही तिथे मत्सर कोणाचा करायचा आणि राग कोणावर धरायचा? योग्याची ही अवस्था आहे. ही अवस्था अत्यंत उच्च असते. तो समाजात राहतो, सर्वांशी प्रेमाने वागतो, पण आतून त्याला संपूर्ण विश्व केवळ आत्मामय झालेले दिसते.
श्रवणाद्यैः प्रदीप्ते हि
ज्ञानाव्ह्नौ तापितो यदा।
जीवदोषविनिर्मुक्तः
स्वर्णवत् भासते तदा॥
– गीताव्रत
ज्ञानप्राप्तीची प्रक्रिया ही काही अचानक घडणारी जादू नाही तर, ती एक अत्यंत शिस्तबद्ध आणि टप्प्याटप्प्याने केली जाणारी साधना आहे. वेदांतामध्ये या साधनेचे तीन मुख्य टप्पे सांगितले आहेत ते म्हणजे,
श्रवण, मनन आणि निदिध्यासन!
श्रवण म्हणजे गुरूंच्या मुखातून आणि शास्त्रांमधून सत्याचे अत्यंत श्रद्धेने आणि एकाग्रतेने ऐकणे. पण नुसते ऐकून काम होत नाही. त्यानंतर येतो मननाचा टप्पा! ज्यामध्ये ऐकलेल्या ज्ञानावर स्वतःच्या बुद्धीने अत्यंत सखोल विचार करायचा असतो. आपल्या मनातील सर्व शंकांचे निरसन करायचे असते आणि शेवटचा टप्पा म्हणजे निदिध्यासन ज्याचा अर्थ आहे त्या सत्य स्वरूपाचे अखंड आणि एकरूप होऊन ध्यान करणे!
साधक या तीनही टप्प्यांमधून अत्यंत निष्ठेने जातो, तेव्हा त्याच्या अंतःकरणात ज्ञानाचा एक प्रचंड आणि तेजस्वी अग्नी प्रज्वलित होतो. या ज्ञानाग्नीमध्ये साधक स्वतःला पूर्णपणे झोकून देतो आणि स्वतःला तावून सुलाखून घेतो. जसे खाणीतून काढलेले कच्चे सोने अनेक अशुद्धींनी माखलेले असते, त्याला शुद्ध करण्यासाठी सोनार ते सोने अत्यंत प्रखर अग्नीत टाकतो. तो अग्नी सोन्याला जाळत नाही तर, सोन्याला चिकटून असलेली माती आणि इतर धातूंची अशुद्धी जाळून टाकतो. अगदी तसेच हा ज्ञानाचा अग्नी आपल्या आत्म्याला जाळत नाही तर, आपल्यावर साचलेले काम, क्रोध, लोभ, मोह आणि अहंकार हे सर्व जीवदोष समूळ जाळून भस्मसात करतो. जेव्हा हे सर्व दोष जळून जातात तेव्हा तो साधक त्या शुद्ध सुवर्णासारखा अत्यंत तेजस्वी आणि मूल्यवान होऊन चमकू लागतो. त्याचे संपूर्ण अस्तित्व लोकांसाठी दीपस्तंभासारखे मार्गदर्शक आणि प्रकाशमान होते.
उपाधिनाशे जाते तु
पूर्णज्ञानं यदा भवेत्।
जीवात्मब्रह्मणोरैक्यं
तत् ज्ञानं परमं भवेत्॥
– गीताव्रत
आपण माणसांनी स्वतःला ओळखण्यासाठी स्वतःभोवती अनेक कृत्रिम आवरणे किंवा लेबले लावून घेतली आहेत. मी श्रीमंत आहे, मी गरीब आहे, मी सुशिक्षित आहे, मी अमुक जातीचा आहे किंवा मी तमुक धर्माचा आहे… या सर्व कृत्रिम आवरणांना वेदांतामध्ये उपाधी असे म्हणतात. या उपाधींमुळे आपण स्वतःला एका अत्यंत लहान आणि मर्यादित चौकटीत बंदिस्त करून घेतो आणि अथांग विश्वापासून वेगळे समजतो. हे समजून घेण्यासाठी आपण मातीच्या घटाचे म्हणजे माठाचे उदाहरण घेऊया. माठाच्या आत जी पोकळी असते तिला आपण घटाकाश म्हणतो आणि माठाच्या बाहेर जे अफाट आणि अनंत आकाश असते त्याला आपण महाकाश म्हणतो. आपल्याला वाटते की, माठातले आकाश वेगळे आहे आणि बाहेरचे आकाश वेगळे आहे. पण जेव्हा तो माठ फुटतो तेव्हा काय होते. माठातले आकाश बाहेरच्या आकाशाला जाऊन मिळते का, नाही! मुळीच नाही. ते आकाश नेहमी तिथेच आणि एकच होते केवळ त्या मातीच्या आकारामुळे म्हणजेच उपाधीमुळे ते वेगळे वाटत होते. जेव्हा पूर्ण ज्ञानाचा उदय होतो, तेव्हा आपल्या अहंकाराची आणि देहभावाची ही मातीची उपाधी पूर्णपणे नष्ट होते. ती उपाधी गळून पडली की, आपल्याला अत्यंत स्पष्टपणे जाणवते की, ज्याला आपण आपला छोटासा जीवात्मा समजत होतो तो आणि हे संपूर्ण विश्व व्यापून उरणारे परब्रह्म हे दोन वेगळे नसून ते पूर्णपणे एकच आहेत. जीवात्मा आणि परमात्मा यांच्यातील हे अद्वैत आणि अतूट ऐक्य अनुभवणे, हेच मानवी जीवनातील सर्वात सर्वोच्च आणि परम ज्ञान मानले गेले आहे. तिथे मग साधक आणि साध्य असा कोणताही भेद उरत नाही.
वासनात्यागतो ज्ञानं
वैराग्यं जायते यदा।
आत्मानन्दमनुप्राप्य
शान्तिर्भवति वै तदा॥
– गीताव्रत
आपले सगळे आयुष्य हे मृगजळामागे धावण्यातच संपून जाते. आपल्याला नेहमी असे वाटत असते की, एखादी बाह्य वस्तू मिळाली, म्हणजे गाडी, बंगला, मोबाइल, ऑफिस, सोने, किंवा भरपूर संपत्ती मिळाली किंवा मोठे पद मिळाले की, आपल्याला खरे सुख मिळेल. बाह्य जगात सुख शोधण्याच्या या अदम्य आणि कधीही न संपणाऱ्या इच्छेलाच वासना असे म्हणतात. पण आपला अनुभव आपल्याला नेहमी हेच सांगतो की, एक इच्छा पूर्ण झाली की, त्यातून दहा नवीन इच्छा जन्म घेतात. आगीत जसे तूप टाकले की, आग विझण्याऐवजी अधिकच भडकते तसाच हा इच्छा आणि वासनांचा खेळ आहे. जेव्हा माणसाला या व्यर्थ धावपळीचे सत्य समजते आणि तो अत्यंत आनंदाने आणि स्वेच्छेने या सर्व बाह्य वासनांचा त्याग करतो, तेव्हा त्याच्या अंतःकरणात खऱ्या वैराग्याचा जन्म होतो.
वैराग्य म्हणजे संसाराचा तिरस्कार करणे नव्हे. वैराग्य म्हणजे संसारात राहूनही संसारातील कोणत्याही गोष्टीची आपल्या मनावर पकड नसणे. जेव्हा मन बाहेरच्या विषयांकडे धावणे थांबवते, तेव्हा साहजिकच ते मन आतल्या बाजूला म्हणजेच स्वतःच्या स्वरूपाकडे वळते आणि तिथे अंतरंगात त्याला जो शुद्ध आत्मानंद प्राप्त होतो, तो अवर्णनीय असतो. हा आनंद कोणत्याही बाह्य व्यक्तीवर किंवा परिस्थितीवर अवलंबून नसतो तर, आनंद हा आपला मूळ स्वभाव असतो. स्वयंपूर्ण आत्मानंदाची प्राप्ती झाली की, मग मनाची सर्व तडफड थांबते आणि त्याला जी शाश्वत आणि चिरंतन शांती मिळते ती जगातील कोणतीही संपत्ती किंवा सत्ता देऊ शकणार नाही. ही शांती मिळवणे हेच या ज्ञानमार्गाचे अंतिम ध्येय आहे.
आपण हळूहळू शंकराचार्यांच्या अद्वैत तत्त्वज्ञानाच्या अगदी गाभाऱ्यात पोहोचत आहोत.


