पल्लवी खरोसे आंबेकर
भाग – 11
पार्थने दिलेला नकार शार्वीला पचता पचत नव्हता. तिचा इगो हर्ट झाला होता. ती रागातच घरी आली आणि आपल्या रूममध्ये गेल्यावर दरवाजा लावून घेतला.
“राहुल बघ ना, कालपासून ना ती दरवाजा उघडतेय, ना काही खातेय… ऐकायलाच तयार नाही. तू बघना एकदा तिच्याशी बोलून तुझं तरी ऐकते का…” शार्वीच्या काळजीने आई शर्वरी म्हणाली.
‘हं… बघतो…” ती दरवाजा उघडत नाही, हे ऐकून त्यालाही टेंशन आलं. तो उठला आणि तिच्या रूमकडे गेला. त्याने परत मास्टरकीने दरवाजा उघडला आणि आत गेला… त्याला माहिती होतं की, ती अशी नाही ऐकणार!
तो गेला तेव्हा ती झोपली होती. चेहरा पूर्ण कोमेजला होता. गालावर अश्रूचे वाळलेले डाग होते. आपल्या प्रिन्सेसला अशा अवस्थेत बघून त्याला कसंतरी झाल. त्याने तिच्या डोक्यावरून हात फिरवला. काहीतरी ठरवून तो बाहेर निघून आला…
हेही वाचा – शार्वीने पार्थकडे प्रेमभावना व्यक्त केल्या, पण…
तो गेला तसं शार्वी उठून बसली. आता तिच्या चेहऱ्यावर एक क्रूर हास्य होतं. ती तिच्या योजनेत यशस्वी झाली होती. तिला माहिती होतं की, डॅडकडून काहीही कसं मिळवायचं. उठून ती फ्रेश व्हायला गेली, कारण रडत बसणाऱ्यातली ती नव्हती.
0000
राहुल डायरेक्ट त्या मुलाच्या म्हणजेच पार्थच्या घरी गेला. त्याने कल्पना केल्यापेक्षा तो एरिया त्याला जरा ठीक वाटला. त्याच्या ड्राइव्हरने दरवाजा उघडला तसा तो त्याचा कोट झटकत खाली उतरला आणि पार्थच्या घराकडे निघाला. त्याने दारावरची बेल वाजवली. विभानेच म्हणजे पार्थच्या आईने दरवाजा उघडला. विभाला तिथं बघून राहुल अग्रवाल जागीच थांबला. तीही त्याला आपल्या घरच्या दरवाज्यात बघून शॉक झाली. पण भानावर येत तिने त्याला आत घेतलं.
“आता काय बाकी राहील आहे, जे तू इथे आलास?” त्या त्याला अगदी रुक्षपणे म्हणाल्या.
“वाहिनी प्लीज, असं नका बोलू माझ्याशी…” तो काकूळतीने म्हणाला.
“तुझ्या या तोंडाने मला वहिनी म्हणू नकोस. ज्या दिवशी तू माझ्या राजेशला बिझनेससाठी मारलंस त्याच दिवशी तुझी वहिनी मेली. मी आता कोणाचीही वहिनी नाही, समजलं? आणि इतक्या वर्षांनी तू का आला आहेस, ते सांगण्याची कृपा करशील का..?” त्या रागाने म्हणाल्या.
“मी इथे पार्थबद्दल बोलण्यासाठी आलो होतो, तो कुठे आहे?” तो इकडे तिकडे बघत म्हणाला.
“पार्थ! तुझं आता पार्थकडे काय काम आहे? सगळ्यांना दूर केलंस तसं त्यालाही करायचं आहे का? हं?” त्याच्यावर नजर रोखत त्यांनी विचारलं.
“नाही, तुमचा काहीतरी गैरसमज होत आहे. पार्थ आणि माझी मुलगी शार्वीबद्दल मी बोलायला आलो होतो. पण वाटलं नव्हतं आपली भेट अशी होईल…” तो त्यांना म्हणाला.
“ते सगळं ठीक आहे, तू तुझं काम बोल आणि चालता हो इथून…” त्या रागाने म्हणाल्या.
“ते… माझी मुलगी शार्वी पार्थवर प्रेम करते. तिला त्याच्याशीच लग्न करायचं आहे… नाहीतर ती जीव देण्याची धमकी देत आहे, म्हणून आलो आहे इथं. प्लीज त्यांच्या लग्नासाठी होकार द्या आणि तिला तुमच्या घरची सून बनवा,” तो रिक्वेस्ट करत म्हणाला.
हेही वाचा – शार्वीची वेगळी खेळी
“मला तुझ्यासारख्या खुनी माणसाच्या घरात कोणतेही संबंध जोडायचे नाहीत. आधी जोडून बघितले… त्याचीच तर शिक्षा भोगतोय आम्ही. आता माझ्यात अजून एवढी शक्ती नाही की, मी अजून एक धोका सहन करू शकेन…” त्या काहीतरी आठवत म्हणाल्या.
“वाहिनी, तो माझा जिवलग मित्र होता. तो मला माझ्या भावापेक्षाही जास्त होता. मी त्याचा कसा जीव घेईन? तुमचा खूप मोठा गैरसमज झाला आहे आणि तोही तुमच्या घरच्यांनी केलाय!” तो म्हणाला.
“घरच्यांनी? आणि ते का करतील असं?” त्यांनी त्याला प्रतिप्रश्न केला.
“सांगतो…” तो एक दीर्घ श्वास घेत म्हणाला.


