उत्तरार्ध
वडिलांची इस्टेट नावावर करण्यासाठी सौरभला अक्काची सही पाहिजे होती. म्हणून तो अक्काच्या गावी गेला होता. निबंधकाच्या ऑफिसमधून सही करून दुपारी सगळेजण घरी आले तेव्हा सौरभचे मन काहीसे उदास होते. आपली सावत्र बहीण इतकी चांगली असेल अशी त्याने कल्पनाही केली नव्हती. आपण काय काय विचार करत होतो आणि प्रत्यक्षात काय घडले. दुसरीकडे, सीमा आणि रीमा या सख्ख्या बहिणींनी हक्कसोडपत्रावर सह्या करताना नाकीनऊ आणले होते.
घरी येतानाच प्रतिभाचा फोन आला, “काय रे झाले का काम?”
“हो”
“अक्काने पैसे किती घेतले?”
” घरी आल्यावर बोलतो सविस्तर, आता परत फोन करू नको.” तो काहीसे रागाने म्हणाला.
जेवण झाल्या झाल्या रवी म्हणाला, “मी शेतात जाऊन येतो. मामा तू आराम कर.”
“चल मी पण येतो.”
“एवढ्या उन्हात? त्यापेक्षा उद्या सकाळी जाऊ.”
“उद्या नको. उद्या सकाळी मी निघायचे म्हणतो.”
“हे तू आधी बोलला असता तर मी सहीच केली नसती,” अक्का बोलली… “आज ऑफिसला काम होते म्हणून साधाच स्वयंपाक केला. उद्या तुझ्या आवडीचे आंब्याचा रस घालून श्रीखंड करते.”
“पुढच्या वेळी नक्की,” सौरभ चप्पल घालत म्हणाला.
“डोक्याला रुमाल बांध रे नाहीतर ऊन लागेल.” अक्का आतून ओरडली…..
शेतावर पोहचताच गार हवेची झुळूक आली. बांधाला चिंच, आंबा, यांची झाडे होती, तर विहिरीच्या बाजूला काही फुलझाडे होती. रखरखीत ऊन असूनही विहिरीत बऱ्यापैकी पाणी होतं. आपल्या भाच्याबद्दल सौरभला पुन्हा कौतुक वाटले. कष्टाळू आहे. शेतात एक चक्कर टाकता टाकता सौरभ इकडेतिकडे पाहात होता…
“शेजारचे शेत कोणाचे रे?”
“आत्माराम म्हणून आहे. दोन एकर आहे. विकायला काढली आहे.”
“अरे, चांगले आहे की आपल्याला… सलग होईल.”
“हो रे. माझाही तोच विचार होता. पण भाव जास्तच सांगतोय. कदाचित आपण शेजारी आहे आणि घेऊच त्यामुळे असेल.”
“काय सांगतोय भाव?”
रवीने आकडा सांगितला. सौरभला तो बरा वाटला. तिकडचे भाव त्याला फारसे माहीत नव्हते. पण निगोशिएबल असेल तर हरकत नव्हती.
शेतातून चक्कर मारून ते झाडाच्या खाली बसले. एव्हाना सौरभचे पाय दुखू लागले. पाणी पिऊन त्याला थोडे बरे वाटले.
“मामा एक सांगायचे होते तुला…”
सौरभला वाटले आता पैशाचा विषय काढेलच. देऊन टाकू… अक्कासमोर त्याला मागायला संकोच वाटत असेल. बेभरवशाची शेती, दुकानासाठी भांडवल…
“बोल रे…”
“एक मुलगी आहे, माझ्यासाठी म्हणतोय.”
“छानच की. कोण आहे?”
“मुक्ता म्हणून आहे. BA झाली आहे. तिचे वडील पूर्वी आपली शेती करायचे निम बटाईने. वारले ते. अजूनही आहे थोडी शेती त्यांची.”
“बरे मग प्रॉब्लेम काय आहे?”
“आपल्या जातीची नाही. शिवाय, परिस्थिती जरा गरिबीची आहे.”
“जातीचं काय घेऊन बसायचे काम नाही. गावातली आहे, शेतकऱ्याची मुलगी आहे. शिकलेली आहे. आपल्या घरात ॲडजस्ट होऊन जाईल. बरे, प्रेम आहे का तिच्यावर?”
हेही वाचा – हक्कसोडपत्र अन् अक्का!
“नाही रे. पण तिची मोठी बहीण माझी क्लासमेट होती. तिची इच्छा आहे.”
“आणि मुक्ताची.”
“तिची पण तयारी आहे, पण आईला सांगायला घाबरते. त्यांच्यात हुंडाही बराच लागतो. तेवढी परिस्थिती नाही त्यांची… आणि त्यांनी तयारी दाखवली तरी, आई स्वीकारेल का याची भीती वाटते.”
“तिची, तिच्या बहिणीची आणि त्यांच्या परिस्थितीची जेवढी माहिती असेल तेवढी सांग.”
0000
दुसऱ्या दिवशी अक्का सौरभला उठवायला आली.
“अरे, तू परत जायचे म्हणतो ना? मग उठायला हवे. एसटी सापडायला हवी.”
“अक्का मी काही जात नाही आज. तुझ्या हातचे श्रीखंड खाऊनच जाईन.”
“अरे, आता कसे बनेल ते. दूध आणून चक्का लावून एक दिवस तरी लागेल.”
“चालेल. उद्या सकाळी खाऊन निघतो. रवीला बोलाव.”
“काय मामा?”
“अरे, आज अनायेसे थांबलोच आहे, तर मला जरा गावात फिरवून आण. खूप वर्षांत तुमच्या गावात फिरलोच नाही.”
चहा-नाश्ता करून रवीच्या गाडीवर सौरभ बसला तसे रवीने विचारले,
“मामा सुरुवातीला कुठे जायचे?”
“मुक्ताच्या घराकडे.”
“क्काय…”
“मामा, खरेच सांगतोय?”
“हो”
0000
मुक्ताच्या घरासमोर गाडी लावताच कोण आले म्हणून मुक्ताच बाहेर आली आणि रवीला पाहताच आश्चर्यचकित झाली. तिची आईही बाहेर आली आणि सौरभकडे ‘कोण?’ या नजरेने बघत राहिली. मग घाईघाईने “या” म्हणाली.
“नमस्कार ताई, याले तर ओळखतेस ना?” सौरभ रवीकडे बोट दाखवून म्हणाला.
“आपला रवी शे ना. त्याले कसं काय नई ओळखावं?”
“बरं, मी त्यांना मामा.”
“बठा बठा. काय काम काढ दादा?”
“सांगस… पहिले पाणी पाजा.”
“हो.. हो, मुक्ता पाणी ले व.”
पाणी पिऊन झाल्यावर सौरभने मुद्याला हात घातला.
“ताई, तुमनी पोरं शे मुक्ता… तिनाकरता येयल शे. हौ मना भाचाना करता.”
“पण दादा…”
“मालूम शे.. तुमनी जात अलग, मनी जात अलग. पण तुमनी मोठी पोरं शे ना अनू. तिना बरोबर होता शिकाले रवी. तिनी इच्छा शे. पोरगा तुमना समोरच मोठा व्हयल शे. सात एकर शेती शे. मोठं घर शे. दुकान शे. दोनच भाऊ शेतस. तुमना पोरले काहीच कमी पडावं नै. आमना अक्काना स्वभाव तुमले माहीतच शे.”
“दादा बठठ खरं. पण एकदम दुसरी जातमा पोरं देवानी…”
“ताई, पोरं गावमा न गावमा राहयी तुमनासमोर. शिवाय, आमले हुंडा नको. अनुना टाइमले तुम्ही एकरभर शेत इकी टाक व्हतं. आते तुमनी काय दोन अडीच एकर खेती राहू द्या. पोऱ्याले काम पडी.”
“पण दादा असं एकदम कस काय ठरावान? मुक्ताले विचारणं पडी… नातेवाईक शेतस त्यास्ले विचारणं पडी.”
“ताई… अनुने रविले पहिले सांग. नंतर तिने मुक्तालेबी सांग. पण ती बिचारी पोरं म्हणे आई सांगी तरच हो म्हणसू. म्हणजे तिनिबी तयारी शे पण तुमनाबगर नै कराव. नातेवाईक कोण काम येवाव नै. तुम्ही फकस्त सांगा मुक्तान लग्न करान शे, थोडा पैसानी जरुरत शे. कोण देतंस का देखा. अनुना टाइमना अनुभव शे तुमले. मी काय जास्त बोलत नै.”
“दादा, पण हे एकदम.”
“ताई जबरदस्ती नै. तुम्ही दोन्ही पोरीसले विचारा. मग ठरावा. येतेस आम्ही.”
“दादा चहा?”
“ताई, आते तुम्ही दोनचार घंटा विचार करी ल्या. मी परत येस मंग ठरवू. नै सांग तरी चाली ताई. हो सांग तर सोनाथुन पिवळं…”
सौरभ आणि रवी बाहेर पडले.
“मामा तू तर डायरेक्ट विचारले.”
“अरे, तुझ्यासारखा मुलगा त्यांना शोधून सापडणार नाही. आता साडीच्या दुकानावर घे गाडी.”
एक भारीतली आणि एक मीडियम रेन्जची साडी आणि एक पेढ्यांचा बॉक्स घेऊन दोन तासाने सौरभ पुन्हा मुक्ताकडे आला.
मुक्ताची आई बाहेर येत म्हणाली, “दादा, तसं आमन काही म्हणणं नै, पण एकदम अर्जेन्ट मा…”
“ताई आमनी काई घाई नै. दिवाळीनंतर ठेवसू लगन. आते साखरपुडा करी लेवू. है ल्या साडी… परवा साखरपुडा करी लेऊत. है साखरपुड्यानी साडी. है लगन पक्क व्हयन त्यांनी साडी आणि हौ पेढाना बॉक्स. खर्चानी चिंता नको. बठ्ठा खर्च आम्ही करसु…”
मुक्ताची आई आ वासून पाहतच राहिली.
“मामा आता घरी जायचे.”
“नाही, आता अजून एक बाकी आहे ना काम.”
“कोणते काम?”
“मिशन आत्माराम!”
0000
सौरभ नंतर चार दिवस राहिला. दोनच दिवसांत रवी आणि मुक्ताचा साखरपुडा झाला. चौथ्या दिवशी आत्मारामच्या दोन एकर शेतीची खरेदी रवीच्या नावे झाली. अक्काला समजावण्याचे काम सौरभने केले. आत्मारामशी बैठक करून शेतीचा सौदाही त्यानेच केला.
आणि हो… रोख पैसे मिळतायत म्हटल्यावर त्याने किंमतही कमी केली.
हेही वाचा – अनिता… भूतकाळ अन् वास्तव!
रवीच्या साखरपुड्याचा आणि शेतीच्या खरेदीसाठीचा खर्च अर्थातच सौरभने केला, मात्र हे अक्काला कळू न देण्याचं काम त्याने रवीकडे सोपवले. रवीही पैसे घेतच नव्हता… पण शेजारची शेती घेण्याची संधी पुन्हा मिळणार नाही, तेव्हा हे पैसे उसने दिले असे समज पण ही शेती घेच, असे त्याला समजवून देण्यात सौरभ यशस्वी ठरला.
सौरभ तिथून निघाला तेव्हा अक्का डोळ्यातले पाणी पुसत पुन्हा पुन्हा त्याला परत येण्यासंबंधी सांगत होती आणि सौरभच्याही डोळ्यातले पाणी थांबत नव्हते…
परतीच्या प्रवासात सौरभला ना रस्त्याचे खड्डे जाणवत होते, ना एसटीतील गर्दी आणि कलकलाट. तो भारावल्यासारखा बसला होता. काही लोक देवासारखे असतात, किंबहुना देवच असतात… त्याची अक्काही त्यातलीच एक होती.


