दर्शन कुलकर्णी
- आज, दिनांक : 10 मे 2026; वार : रविवार
- भारतीय सौर : 20 वैशाख शके 1948; तिथि : अष्टमी 15:05; नक्षत्र : धनिष्ठा 24:49;
- योग : ब्रह्मा 26:08; करण : तैतिल 27:21;
- सूर्य : मेष; चंद्र : मकर 12:12; सूर्योदय : 06:07; सूर्यास्त : 19:03;
- पक्ष : कृष्ण; अयन : उत्तरायण; संवत्सर : पराभव;
- शालिवाहन शक : 1948; विक्रम संवत : 2082; युगाब्द : 5128.
वेद कन्सल्टन्सी / 9987433660
दिनविशेष
भारताच्या रॉचे पहिले प्रमुख रामेश्वर नाथ काव
टीम अवांतर
भारताच्या रिसर्च ॲन्ड ॲनालिसिस विंग अर्थात रॉचे पहिले प्रमुख रामेश्वर नाथ काव यांचा जन्म 10 मे 1918 साली वाराणसीमध्ये झाला. 1940 साली ते त्यावेळची इंडियन पोलीस परीक्षा उत्तीर्ण होऊन पोलीस सेवेमध्ये रुजू झाले. भारत स्वातंत्र्य झाल्यानंतर, 1948 साली इन्टेलिजन्स ब्युरोची स्थापना करण्यात आली आणि त्याचे सहाय्यक संचालक म्हणून रामेश्वर काव यांची नियुक्ती करण्यात आली. तसेच, तत्कालीन पंतप्रधान जवाहरलाल नेहरू यांच्या सुरक्षेची जबाबदारीही त्यांच्यावर सोपवण्यात आली.
1955 साली चीनचे तत्कालीन पंतप्रधान चू एन लाय हे एअर इंडियाच्या ‘काश्मिर प्रिन्सेस’ नावाच्या एका विमानाने बांडुंग परिषदेत भाग घेण्यासाठी हाँगकाँगवरून जाणार होते. मात्र अगदी अंतिम क्षणी त्यांनी आपला दौरा रद्द केला. त्यानंतर झालेल्या विमान अपघातात चीनचे सर्व उच्च अधिकारी आणि पत्रकारांचा मृत्यू झाला. रामनाथ काव यांनी या घटनेचा तपास केला आणि या घटनेमागे तैवानच्या गुप्तचर खात्याचा हात असल्याचा अहवाल दिला. काव यांच्या या तपासावर चीनचे पंतप्रधान खूश झाले आणि काव यांना वैयक्तिक भेटीसाठी बोलावलं.
हेही वाचा – प्रसादची हीच ती सखी!
पुढे भारताच्या तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी अमेरिकेच्या सीआयए आणि ब्रिटनच्या एमआय 6 या गुप्तचर खात्याच्या धर्तीवर भारतातही 1968 साली रॉची स्थापना करण्याचा निर्णय घेतला. रॉचे पहिले प्रमुख म्हणून रामेश्वर काव यांची नियुक्ती करण्यात आली. आपली नियुक्ती योग्य आहे हे सिद्ध करण्याची संधीही काव यांना मिळाली. 1970 साली पूर्व पाकिस्तान म्हणजे सध्याच्या बांगलादेशात स्वातंत्र्याची चळवळ सुरू झाली होती. काव यांनी याचा फायदा घेतला आणि बांगलादेश मुक्ती वाहिनीच्या एक लाखांहून अधिक जवानांना सैनिकी प्रशिक्षण दिलं.
काव यांच्या गुप्तचरांचं जाळं इतकं मजबूत होतं की, त्यांना पाकिस्तान भारतावर कधी हल्ला करणार आहे, याची पक्की माहिती होती. त्या माहितीच्या आधारेच भारताने 1971 च्या युद्धात पाकिस्तानचा पराभव केला आणि त्याचे दोन तुकडे केले.
हेही वाचा – वाचनातून मिळणारे मानसिक आरोग्य लाभ
रामेश्वर काव यांचं आणखी एक महत्त्वाचं काम म्हणजे सिक्किमचं भारतात विलिनीकरण! केवळ चार अधिकाऱ्यांच्या मदतीने काव यांनी ही मोहिम फत्ते केली. जगभरातील कोणत्याच गुप्तचर खात्यांना त्यांनी कानोकान खबर लागू दिली नाही. अमेरिकेची गुप्तचर संघटना सीआयएच्या नाकावर टिच्चून 1975 साली सिक्किमचे भारतात विलिनीकरण करण्यात आलं.
रामेश्वर काव हे 70 च्या दशकातील जगप्रसिद्ध गुप्तहेर होते. आज भारतीय गुप्तचर यंत्रणा रॉ आणि इन्टेलिजन्स ब्युरोची जी घडी बसली आहे ती घडी रामेश्वर काव यांनीच बसवली आहे. त्यांच्या हाताखाली तयार झालेल्या भारतीय गुप्तचरांना ‘काव बॉईज’ असं म्हटलं जातं. भारताचे सध्याचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल हे देखील काव बॉय आहेत.
रामेश्वर काव यांनी जवाहरलाल नेहरू, इंदिरा गांधी आणि राजीव गांधी या तीन पंतप्रधानांसोबत काम केलं. रॉमधून निवृत्त झाल्यानंतर काव हे दिल्लीतील राहत होते. मात्र त्यांचे निवासस्थान नेमकं कुठं आहे हे अनेकांना माहिती नव्हतं. सार्वजनिक जीवनापासून काव हे नेहमीच बाजूला राहिले. आयुष्यात दोन वेळाच या माणसाचा फोटो काढण्यात आल्याचं सांगण्यात येतं. भारताच्या इतिहासातील अनेक गुंतागुंतीच्या आणि संवेदनशील सुरक्षा मोहिमांमध्ये ज्यांचा वाटा अत्यंत मोलाचा होता, त्या काव यांचे 20 जानेवारी 2002 रोजी निधन झाले.


