अध्याय तेरावा
पाखांडाचे कडे । नागवीं लुंचिती मुंडे । नियोजिली वितंडें । ताळासि येती ॥21॥ मृत्युबळाचेनि माजें । हें जाईल वीण काजें । तें देखोनियां व्याजें । निघाले योगी ॥22॥ मृत्यूनि आधाधिले । तिहीं निरंजन सेविलें । यमदमांचे केले । मेळावे पुरे ॥23॥ येणेंचि क्षेत्राभिमानें । राज्य त्यजिलें ईशानें । गुंति जाणोनि स्मशानें । वासु केला ॥24॥ ऐसिया पैजा महेशा । पांघुरणें दाही दिशा । लांचकरू म्हणोनि कोळसा । कामु केला ॥25॥ पैं सत्यलोकनाथा । वदनें आलीं बळार्था । तरी तो सर्वथा । जाणेचिना ॥26॥
ऋषिभिर्बहुधा गीतं छन्दोभिर्विविधैः पृथक् । ब्रह्मसूत्रपदैश्चैव हेतुमद्भिर्विनिश्चितैः ॥4॥
एक म्हणती हें स्थळ । जीवाचेंचि समूळ । मग प्राण हें कूळ । तयाचें एथ ॥27॥ जे प्राणाचां घरीं । अंगें राबते भाऊ चारी । आणि मना ऐसा आवारी । कुळवाडीकरु ॥28॥ तयातें इंद्रियबैलांची पेटी । न म्हणे अवसीं पाहाटीं । विषयक्षेत्रीं आटी । काढी भली ॥29॥ मग विधीची वाफ चुकवी । आणि अन्यायाचें बी वाफवी । कुकर्माचा करवी । राबु जरी ॥30॥ तरी तयाचिसारिखें । असंभड पाप पिके । मग जन्मकोटी दुःखें । भोगी जीवु ॥31॥ नातरी विधीचिये वाफे । सत्क्रियाबीज आरोपे ।
तरी जन्मशत मापें । सुखचि मवीजे ॥32॥
हेही वाचा – सार्थ ज्ञानेश्वरी : क्षेत्र आणि क्षेत्रज्ञातें, जाणणें जें निरुतें
अर्थ
पाखंडी लोकांच्या पक्षाकडील दिगंबर वगैरे जैन श्रमणक आपल्या मस्तकावरील केस हाताने उपटून काढण्याचा लोंच विधि करतात (व वेदोक्त कर्म मात्र निंदतात). त्यांच्याशी चर्चा करू लागले म्हणजे त्याची ठराविक वितंडाची भाषणे आपोआप जाग्यावर येतात ॥21॥मृत्यूच्या तडाक्याने हे शरीर कारणाविना जाईल असे पाहून त्या निमित्ताने योगी क्षेत्र निर्णयाकडे सरसावले ॥22॥ मृत्यूच्या योगाने भ्यालेल्या त्या योग्यांनी वनाचा रस्ता धरला व तेथे (वनात) शम व दम यांचा अभ्यास पूर्ण केला ॥23॥ या क्षेत्राचा आपण पक्का निर्णय करू, या अभिमानाने व क्षेत्रनिर्णयास कैलासाचे राज्य अडथळा करील म्हणून ते टाकून शंकराने स्मशानात वास केला ॥24॥ या प्रतिज्ञेच्या योगाने शंकरास दाही दिशा पांघराव्या लागल्या (सर्वसंग सोडावा लागला). व त्याने काम हा योगभ्रष्ट करणारा (क्षेत्रनिर्णयाच्या आड पडणारा) लाचखाऊ आहे म्हणून त्यास जाळून टाकले ॥25॥ ब्रह्मदेवाला असलेली चार मुखे क्षेत्राचा निर्णय करण्याकरिता जोराने पुढे आली तरी त्यास क्षेत्राचा निर्णय मुळीच कळला नाही ॥26॥
हे (क्षेत्र व क्षेत्रज्ञाचें ज्ञान) ऋषींनी वेगवेगळ्या प्रकारांनी चर्चिले; छंदोबद्ध ग्रंथांनी अनेक प्रकारांनी वेगवेगळे वर्णन केले. वेदातील बृहत्सामसूत्र व त्याचप्रमाणे हेतुमान पंडितांनी हे चांगले निश्चित करण्याचा प्रयत्न केला आहे ॥4॥
(येथून ज्ञानदेव क्षेत्रासंबंधाने निरनिराळ्या मतांचा अनुवाद करतात). कित्येक (जीववादी) असे म्हणतात की ‘क्षेत्र हे स्थळ जीवाचेच संपूर्ण आहे. मग प्राण हे त्याचे येथे कुळ आहे (जीव हा घरचा एकटाच असल्यामुळे व त्याच्या घरी शेतकी चालवण्याचा बारदाना, बैल व नांगर गडी, माणसे वगैरे नसल्यामुळे त्याने हे क्षेत्र प्राण या कुळास बटाईने दिले. कारण प्राण या कुळाजवळ शेतकी चालवण्याचा सर्व बारदाना आहे, तो पुढे सांगतात) ॥27॥ कारण प्राणाच्या घरी अंगाने मेहनत करणारे चार भाऊ (अपान, ध्यान, उदान व समान हे चार वायु) आहेत आणि मनासारखा (चपल कारभारी) शेतीचा कारभार करणारा आहे ॥28॥ तो प्राण रात्र अथवा दिवस म्हणत नाही, आणि विषयरूपी शेतात चांगली मेहनत करतो ॥29॥ मग कर्तव्याची वाफ चुकवून (विहित कर्म करण्याची संधी दवडून) आणि अन्यायांचे बीज पेरवून (श्रुति आज्ञेचे उल्लंघन वगैरे, न्यायाच्या विरुद्ध गोष्टी करून) कुकर्मरूपी सर्व (पेरणीपासून तो मळणीपर्यंत) आटोकाट मेहनत जर त्याने करवली ॥30॥ तर जो बीज पेरतो, त्याचे मेहनतीप्रमाणे अतिशय पापाचे पीक येते आणि मग जीव हा कोट्यावधी जन्म-दु:खे भोगतो ॥31॥ अथवा विधीची योग्य वाफ साधून जर सत्कर्मरूप बीज पेरले तर शेकडोचे शेकडो जन्म सुख भोगावे, एवढे अचाट पीक येते ॥32॥
क्रमश:
हेही वाचा – सार्थ ज्ञानेश्वरी : तोंडेसीं तोंडा न पडे, बोलेंसीं बोला न घडे


