रश्मीने केसांवरून एकदा परत कंगवा फिरवला. डबा पर्समध्ये टाकला आणि ऑफिसला जायला निघाली…
“झाला का नट्टापट्टा? ना रूप ना रंग, तरी दहा वेळा आरशासमोर उभी असते. आता या वयात कोण लग्न करणार ग तुझ्याशी? चाळिशीला आलीस तू! खायला काळ आणि भुईला भार…” मंगल रश्मीकडे बघत तिरसटासारखं बोलली.
ते ऐकून रश्मीच्या तळपायाची आग मस्तकात गेली. ही आई आहे का कोण? सावत्र आईसुद्धा इतकं वाईट वागत नसेल. इतकी मी तिरस्करणीय आहे का? सहा महिने झाले, ही अंथरुणाला खिळली आहे. बाबा जाऊन वर्ष होतंय आणि हिचे हे विखारी शब्द अजूनच ऐकावे लागताहेत. आयुष्याचा सगळा राग ती आता माझ्यावर काढते आहे. रश्मीने महत्प्रयासाने राग आवरला.
घरात पडल्याचं निमित्त झालं आणि मंगलच्या कंबरेचं हाड मोडलं. दोन ऑपरेशन्स झाली, पण चालता येत नव्हतं. नवऱ्याची नोकरी प्रायव्हेट कंपनीची होती म्हणून पेन्शन अगदी तुटपुंजी! मंगलच्या औषधालाच सगळी खर्ची पडायची. घराचा सगळा खर्च रश्मी निभावत होती, तरी तिला हे ऐकून घ्यावं लागतं होतं. लहानपणापासून मंगलने रश्मीला सतत तिच्या सामान्य रूपाची जाणीव करून दिली होती.
हेही वाचा – या डोळ्यांची दोन पाखरे…1
मंगल अतिशय देखणी होती, पण नवरा मात्र सुमार! मंगलच्या घरची परिस्थिती हलाखीची होती. मनासारखा, सुंदर नवरा निवडण्याचं स्वातंत्र्य मंगलकडे नव्हतं. वडिलांनी स्थळ पसंत केलं आणि ती मुकाट्याने बोहल्यावर चढली. रश्मीने वडिलांचा रंग, रूप घेतलं होतं. मंगल नवऱ्याचा राग राग करत होतीच, आता रश्मीचा देखील करू लागली. तिच्या लेखी रूप म्हणजे सगळं काही होतं. रश्मीला कळायला लागल्यापासून तिला हे जास्तच जाणवू लागलं होतं. कथा, कादंबरी किंवा चित्रपटात अशा गोष्टी घडतात, असं तिने ऐकलं होतं. पण तिच्या आयुष्यात प्रत्यक्षच घडत होतं.
ती मुळातच शांत होती. वाद घालण्याचा तिचा स्वभावच नव्हता… लहानपणापासून सतत पडतं घ्यायचं हेच अंगवळणी पडलं होतं. आईचं बोलणं ऐकून घ्यायची सवयच लागली होती. पण वडील कायम तिच्या पाठीशी राहिले. तिला फुलासारखं जपलं. वडिलांचं रंग-रूप घेऊन आली होती म्हणून आणि रश्मीला मंगलचं सतत ऐकून घ्यावं लागतं, यासाठी वडिलांना खूप अपराधी वाटायचं. वडील गेले आणि रश्मी एकाकी झाली. तिचा भावनिक आधारच गेला.
रश्मीने परत एकदा आरशात स्वतःला बघितलं. रंग सावळा, नाक अपरं! तिने डोळे मिटून घेतले. टपोरे, बोलके डोळे आणि लांबसडक केस इतकंच काय ते देवाने मनापासून दिलं होतं. इतकी वर्षं रडून रडून, डोळेही कोरडे झाले होते. आता रडायला सुद्धा येत नव्हतं.
तिने पर्स घेतली, देवाला नमस्कार केला आणि ऑफिसला निघाली. मंगलसाठी दिवसभराची एक मुलगी लावली होती. खर्च खरंतर आवाक्यापलीकडचा होता, पण काही इलाजच नव्हता.
ऑफिसमध्ये आल्याबरोबर शिपायाने रश्मीला सांगितलं की, साहेबांनी तिला केबिनमध्ये बोलावलं आहे. तिने घड्याळ बघितले… मी तर वेळेत पोहोचले आहे. साहेबांनी कशाला बोलावलं असेल?
“मे आय कम इन सर?” रश्मीने केबिनच्या दरवाजातून विचारले.
“येस प्लीज.” साहेबांनी त्यांच्या पुढची फाइल बंद केली.
“मिस देसाई, स्टाफमध्ये नवीन व्यक्ती ट्रान्सफर होऊन आली आहे, मिस्टर प्रसाद काटकर. त्यांना प्लिज को-ऑपरेट करा. तुम्ही ते खूप चांगल्या प्रकारे करता म्हणून मी दरवेळेस तुम्हालाच सांगतो,” साहेब स्मित करत म्हणाले.
“येस सर, मी नक्की मदत करेन,” रश्मी म्हणाली.
रश्मी केबिनच्या बाहेर आली. रश्मीची ऑफिसमधली मैत्रीण, श्रुतीकडून तिला कळलं होतं की, रावेतच्या जागी कुणीतरी नवीन व्यक्ती रुजू झाली आहे. रश्मीला रावेतच्या टेबलवर एक नवीन चेहरा दिसला. साधारण चाळीसच्या आसपास असावा. चेहऱ्यावर मृदू भाव होते, पण काहीतरी लपवतो आहे, असं वाटत होतं.
रश्मी त्याच्याजवळ आली… “आपणच मिस्टर काटकर का?”
“हो मॅडम, गुड मॉर्निंग!” प्रसाद हात जोडून म्हणाला.
“नमस्कार, मी मिस रश्मी देसाई. या फाइल्स चेक करा. काही अडचण आली तर, मी आहेच आणि सीनिअर क्लार्क शिंत्रे साहेब आहेत… आपण आधी कुठे होता?” रश्मी टेबलवर फाइल्स ठेवत म्हणाली.
“मी यवतमाळला होतो. तिथून आता इथे नागपुरला बदली झाली आहे…”
“ओके, हॅव अ गुड डे!” रश्मी तिच्या जागेवर येऊन बसली.
प्रसाद चार दिवसांतच ऑफिसमध्ये छान रुळला. कामात अगदी सातत्य, सचोटी होती. रोज लंच ब्रेकमध्ये बोलता बोलता रश्मी आणि प्रसादची छान ओळख झाली. एक दिवस प्रसाद स्वतः पुढाकार घेऊन रश्मीला म्हणाला, “आज कॅफेमध्ये थोडावेळ बसून गप्पा करू. ऑफिसमध्ये घरच्या गोष्टी करता येत नाहीत. सध्या माझी ऑफिसमध्ये सुरेंद्र आणि तुमच्याशी जास्त ओळख झाली आहे. जरा वेळ निवांत बसून बोलू… तुमची हरकत नसेल तर!”
रश्मीलाही प्रसादबरोबर निर्धास्त वाटत होतं. इतकी वर्षे नोकरी करून तिला पुरुषाची चांगली आणि वाईट नजर कळायला लागली होती.
एका छोट्या कॉफी हाऊसमध्ये दोघे बसले होते. प्रसादने ऑर्डर दिली आणि त्याचा मोबाइल वाजला. त्याने फोन घेतला, “पिल्लू, तुझी आज खूपच आठवण येते आहे. कशी आहेस बेटा? काकूला त्रास नको देऊस. मी येतोच आहे शनिवारी! छान अभ्यास कर. शहाण्या मुलींसारखी वाग.”
हेही वाचा – या डोळ्यांची दोन पाखरे… 2
प्रसादने फोन बंद केला आणि रश्मीकडे बघितलं. तिची प्रश्नार्थक नजर बघून तो म्हणाला, “ही माझी मुलगी रुही! पाच वर्षांची आहे. मी डिव्होर्सी आहे. माझे आणि माझ्या पत्नीचे खूप मतभेद व्हायला लागले. दोघांचं नाही पटलं. विचार अतिशय भिन्न होते. यात दोष कुणाचाच नाही. तडजोड करणं दोघांनाही अशक्य झालं होतं आणि मग दोघांनी सामंजस्याने निर्णय घेतला. ती आता एक प्रथितयश कलाकार आहे. उणापुरा दहा वर्षांचा संसार झाला आमचा! तिच्या करिअरमध्ये अडथळा नको म्हणून रुहीची जबाबदारी मी घेतली. आमचं एकत्र कुटुंब आहे. मोठा भाऊ, वहिनी, त्यांची दोन मुलं, मी, रुही आणि माझी आई! यवतमाळला आमचं मोठं घर आहे. आत्ता नागपूरला मला रुहीला घेऊन येणं शक्य नाही. तिथे वहिनी तिचं सगळं प्रेमाने करतात.”
“ओह, सॉरी! पण ओढूनताणून संसार नकोच!” रश्मी म्हणाली. तिच्या डोळ्यांसमोर आई आली. आईच्या मनाविरुद्धच ती बाबांशी संसार करत होती. कधीही न जुळलेली मनं!
रश्मी प्रसादशी मोकळेपणाने बोलत होती. पण तिला आश्चर्य वाटलं की, प्रसादने एकदाही तिची सखोल चौकशी केली नाही. तिच्या मनात आलं की, प्रसादला कदाचित माझ्याविषयी सगळं माहिती असावं. रश्मी पर्स घेत उठली, “मी निघते. माझी आई बेडरीडन आहे. दिवसभराची मुलगी आता घरी गेली असेल. मला जायला हवं. उद्या ऑफिसमध्ये भेटू.”
त्या दिवसांनंतर रश्मी आणि प्रसादमध्ये अजूनच मोकळेपणा आला. रश्मीने स्वतःबद्दल प्रसादला सगळे सांगितले. तिचा एकाकीपणा, आईचं वागणं यावर ती अनेकदा प्रसादशी बोलायची. रश्मीच्या मनात प्रसादविषयी फक्त मैत्रीची भावना होती, कारण तिला हे पक्कं ठाऊक होतं की, प्रसाद तिच्याकडे फक्त एक चांगली मैत्रीण म्हणून बघत होता. तिला पूर्ण जाणीव होती की, कुठलाही पुरुष तिच्यासारख्या सामान्य रूपाच्या मुलीच्या प्रेमात पडणं अशक्य होतं!
प्रसादच्या मैत्रीविषयी श्रुतीला रश्मी सगळं सांगत असे. एकलकोंड्या रश्मीची प्रसादशी वाढती मैत्री बघून श्रुतीलाही आनंदच झाला. रश्मी जरा मोकळी वागतेय, आनंदी दिसतेय, हे बघून श्रुतीला खूप बरं वाटलं…
एक दिवस हॉटेलमध्ये कॉफी पीत असताना अचानक प्रसादने रश्मीसमोर लग्नाचा प्रस्ताव मांडला. त्याने सरळच तिला विचारलं, “रश्मी, लग्न करशील का माझ्याशी? रुहीला आईची माया देशील? ती आईच्या मायेला पोरकी झाली आहे.”
त्याचं ते बोलणं ऐकून रश्मीला स्वतःवर ताबा ठेवता आला नाही. ती एकदम चिडलीच… “अच्छा, म्हणजे तुला तुझ्या मुलीचा सांभाळ करण्यासाठी बाई हवी आहे. तुला आयुष्याची साथीदार म्हणून नको आहे. माझ्यासारख्या सामान्य रूपाची बायको कोणाला हवी असणार? एक मुलगी पदरात आहे म्हटल्यावर तुझ्याशी लग्न करायला कोणी तयार नसेल आणि मला आजपर्यंत कोणी पसंत केलं नाही, हे देखील तुला माहिती आहे. मी हुरळून जाईन, असं वाटलं का तुला? यापुढे मला कधीही भेटू नकोस आणि माझ्याशी बोलायचा देखील प्रयत्न करू नकोस. गुडबाय.” रश्मी तडकाफडकी तिथून चालती झाली.
प्रसाद अवाक् होऊन तिच्याकडे बघायला लागला. त्याला हे अनपेक्षित होतं! प्रसादला रश्मी खरंच आवडायला लागली होती. तिचा साधेपणा आणि प्रेमळ स्वभाव त्याला आवडला होता. आयुष्यात एकदा सौंदर्याला महत्त्व देऊन तो पोळला होता. आता त्याला रश्मीसारखी समंजस जोडीदार हवी होती. पण आपण तिला लग्नाचं विचारून फार मोठी चूक केली याचा त्याला पश्चाताप झाला.
दुसऱ्या दिवशी ऑफिसमध्ये रश्मी आणि प्रसादच्या वागण्यात एक विचित्र दरी निर्माण झाली. रश्मीने तर प्रसादकडे पूर्णपणे दुर्लक्ष केलं. रोज ऑफिसमधला दिवस कसातरी पार पडत होता. एक चांगलं नातं संपुष्टात आलं होतं.
रश्मीने प्रसादशी बोलणं बंद केल्यापासून ती अस्वस्थ असायची. प्रसादशी ओळख झाल्यापासून तिला एक चांगला मित्र मिळाला होता. पण ते नातं तिनेच संपवलं होतं. आता तर ऑफिसला जाणं सुद्धा तिला नको वाटायला लागलं होतं.
आज सकाळपासूनच रश्मीचं डोकं गरगरत होतं. ऑफिसमध्ये जायची तिला इच्छा पण होत नव्हती; पण आठ दिवसांवर ऑडिट आलं होतं, त्यामुळे जाणं आवश्यक होतं. सगळं आवरून रश्मी ऑफिसमध्ये जायला निघाली. स्कुटी पार्क करून रश्मी ऑफिसच्या दरवाजापाशी आली आणि तिथेच कोसळली.
रश्मीने डोळे उघडले तर ती हॉस्पिटलच्या बेडवर होती. डोकं अतिशय जड झालं होतं. तिने आजूबाजूला बघितलं… श्रुती खुर्चीत वाचत बसलेली रश्मीला दिसली. रश्मीने हाक मारली, “श्रुती, मला काय झालं आहे? दवाखान्यात का आणलं?”
“रश्मी, तुझं ब्लड प्रेशर एकदम लो झालं होतं. आज सकाळी तू ऑफिसच्या दारातच कोसळली म्हणून तुला इथे आणलं आहे. हेडसरांनी मला इथे तुझ्याजवळ बसायला सांगितलं आहे. काळजी करण्यासारखं काहीही नाही. डॉक्टर म्हणाले, कुठलातरी स्ट्रेस आहे. उद्या डिस्चार्ज देतील. मी रात्री झोपायला येते परत आणि तू आईची काळजी करू नकोस. दिवसभर सांभाळणाऱ्या मुलीला आज रात्री झोपायला ये म्हणून मी सांगून आले आहे…”
श्रुतीने रश्मीच्या कपाळावरून हात फिरवला.
“श्रुती, हॉस्पिटलमधे ॲडमिट करताना पैसे तू भरले असशील ना? मी नंतर देते तुला!” रश्मी थकलेल्या स्वरात म्हणाली.
“रश्मी, ही वेळ पैशाचं बोलण्याची आहे का? आणि बाय द वे, पैसे प्रसाद सरांनी भरले. तू दारात कोसळल्यावर त्यांनीच उचलून तुला आत ऑफिसमध्ये आणून बेंचवर झोपवलं. सगळी धावपळ करून तुला इथे ॲडमिट केलं आहे.”
“प्रसादने मला ॲडमिट केलं?” रश्मीने आश्चर्याने विचारलं.
“हो रश्मी, ॲडमिट करून प्रसाद सर लगेच गेले. तू त्यांच्याशी बोलणं बंद केलंस, त्यांना बघून तुला अजून त्रास होऊ नये म्हणून क्षणभर पण ते थांबले नाही. रश्मी, प्रसाद अतिशय सज्जन माणूस आहे. त्यांना नकार देऊन, त्यांचा अपमान करून तू फार मोठी चूक केली आहेस. घरी गेल्यावर, जरा बरं वाटलं की, या गोष्टीचा विचार कर. मी जरा घरी जाऊन परत येते आणि हा तुझा मोबाइल! तुझ्या जवळच ठेव. मी सिस्टरना सांगून जाते,” श्रुती खुर्चीतून उठत म्हणाली.
रश्मीच्या घशात एकदम आवंढा आला. प्रसादला फोन करावा का? नकोच! कदाचित त्याने माणुसकी म्हणून हे सर्व केलं असावं. परत विचारांचे दुष्टचक्र सुरू झाले. तिने मोबाइल घेतला. प्रसादला व्हॉट्सॲपवर मेसेज टाकला… “सॉरी अँड थँक्स!”
मोबाइल व्हायब्रेट झाला म्हणून रश्मीने मेसेज बघितला. प्रसादचा होता… “थँक्स कशासाठी सखी?”
रश्मीने परत मेसेज टाकला… “सखी?”
प्रसादचा मेसेज आला… “हो सखी! तू मला नकार दिलास तरी तू माझी सखी राहशीलच. मला एक चांगली मैत्रीण गमवायची नाहीये.”
प्रसादचा मेसेज वाचून रश्मीचे डोळे वाहायला लागले. तिला कळून चुकलं की, ती प्रसादवर प्रेम करायला लागलीय. तिचा नकार एका उदासीनतेमधून आला होता. रश्मीलाही प्रसादचा सहवास हवाहवासा वाटत होता. डोक्यातल्या सततच्या या विचारांनी तब्येतीवर परिणाम झाला होता… तिने थरथरत्या हाताने प्रसादला फोन लावला पण तिच्या तोंडातून शब्द निघत नव्हता.
“सखी!” पलीकडून प्रसाद बोलला आणि रश्मी हुंदके देऊन रडायला लागली.
“रश्मी, फोन बंद कर. मी दवाखान्यात येतो आहे…”
पंधरा मिनिटात प्रसाद पोहोचला आणि रश्मीच्या रूममध्ये आला. त्याला बघून रश्मी पुन्हा रडायला लागली. प्रसादने तिचा हात हातात घेतला, “रश्मी, मला फक्त बायको नको आहे. एक सखी हवी आहे, जिच्याशी मैत्रीच्या नात्याने मी माझ्या मनातलं सगळं सांगू शकेन. एक सखीच एक उत्तम बायको होऊ शकते. मैत्रीचं नातं असेल तर, संसार बहरतो… आणि रुहीची पण तू मैत्रीण होऊ शकतेस.”
“प्रसाद, मला व्हायचंय तुझी सखी आणि सहचारिणी! पण मी आईला एकटं सोडू शकत नाही. ती माझी जबाबदारी आणि कर्तव्य आहे…”
“आईची काळजी तू करू नकोस. तू माझ्या आयुष्यात आल्यावर त्यांना सांभाळणं, ही माझी पण जबाबदारी आहेच. पण तुझा निर्णय पक्का आहे ना? नाहीतर उद्या परत म्हणशील, मला ‘तुझं तोंडही दाखवू नकोस.’” प्रसाद रश्मीला चिडवत म्हणाला.
“प्रसाद…” रश्मीने हसत त्याच्या खांद्यावर डोकं ठेवलं.
एका गोड नात्याची सुरवात झाली होती…


