सकाळीच एक ग्रुप रिक्षातून बेशुद्ध तरुणीला घेऊन आलं होतं… बिचारी ॲाफिसमध्येच गळपटली होती… बीपी आणि शुगर हलकंस ड्रॅाप होतं. थोडा स्पिरिटचा बोळा हुंगवला तसं ठसका देत ती शुद्धीत आली, पण तिची दातखीळ बसलेली होती!
“चक्कर येऊन बेशुद्ध पडली की फिट आली?” मी त्यांना विचारलं; पण त्यांना यातली काहीच कल्पना नव्हती. तिच्या ॲाफिसला फोन लावला तेव्हा संमिश्र आणि अजून गोंधळात टाकणारी माहिती मिळाली…
“चक्कर येऊन बेशुद्ध पडली काय किंवा फिट आली असली तरी उपचारापश्चात तिला निश्चितच बरं वाटेल, मात्र पण ‘फिट’ असेल तर, किमान पुढचे 24 तास ऑब्झर्वेशनखाली ठेवावं लागेल,” मी माहिती दिली.
हेही वाचा – आधी महामूर्ख ठरला आणि नंतर सर्वोच्च पुरस्काराने गौरविला!
“आम्ही विचार करून सांगतो,” कुणीतरी पुटपुटलं.
आता अपस्मारासाठी (Epilepsy) इतकी प्रभावी औषधं उपलब्ध आहेत की, क्षणिक का होईना पण घाबरवून टाकणाऱ्या या विचित्र आजाराची पूर्वीइतकी धास्ती आणि भीती राहिली नाही. पूर्वी झटके तीव्र असले किंवा औषधांनी काहीच फरक पडला नाही की, ठोस उपचार आणि ठराविक गाइडलाइन नसल्याने मोठा गोंधळ उडत असे. कधी कधी डॅाक्टर रुग्णाच्या नातलगांना बोलावून “आता कदाचित एकच मार्ग उरला आहे…” असं सांगत.
रुग्ण आणि त्याचे नातेवाईक अवाक् होऊन विचारत, ”काय?”
“मेंदू कापूयात!” चेहऱ्यावरची रेषा हलू न देता डॉक्टर सांगायचे, ”अर्थात, मेंदू नाही मेंदूला जोडणारा दुवा.”
आपला मेंदू दोन भागांचा आहे – एक डावा मेंदू अर्थात लेफ्ट हेमिस्फेअर, जिथं भाषिक-तार्किक-गणिती-व्होकल प्रक्रिया चालतात तर, दुसरा उजवा मेंदू अर्थात, राइट हेमिस्फेअर जिथं भावनिक-काल्पनिक-सांगितिक-कलात्मक प्रक्रिया चालतात आणि या दोघांमध्ये सतत संवाद चालू असतो आणि हा संवाद घडवणारा पूल म्हणजे ‘कॉर्पस कोलोजम’.
काही रुग्णांत अपस्माराचे झटके इतके तीव्र असत की, ते एका बाजूच्या मेंदूत सुरू होऊन दुसऱ्या बाजूला पसरतात.
डॉक्टरांनी विचार केला, ”जर हा पूलच तोडला तर झटका पसरू शकणार नाही…” आणि तिथूनच जन्म झाला ‘स्प्लिट ब्रेन सर्जरीचा’!
प्रारंभी चक्क काही शस्त्रक्रिया यशस्वी झाल्या. अनेक रुग्णांचे झटके प्रचंड कमी झाले, पण संशोधकांना काही विचित्र गोष्टी लक्षात आल्या…
रुग्णाला उजवा डोळा बंद करत एक शब्द वाचायला सांगितला, त्यानं तो वाचला, पण तोच शब्द डावा डोळा बंद करून उजव्या डोळ्याला दाखवला, तेव्हा रुग्ण म्हणाला, ”काहीच दिसलं नाही.”
हेही वाचा – Alcoholism : क्रांतिकारी शोधामागची कथा!
पण गंमत इथंच नव्हती, जे त्याला सांगता येत नव्हतं, ते तो लिहू शकत होता! कारण उजवा मेंदू पाहतो, पण बोलत नाही आणि डाव्या हाताला नियंत्रित करतो.
एका प्रयोगात रुग्णाचा उजवा हात शर्टचं बटण लावतो, तर डावा हात तेच बटण उघडतो… जणू दोन व्यक्ती एकाच शरीरात राहतात!
रुग्ण म्हणतो, ”माझाच हात माझ्या विरोधात वागतोय! या प्रयोगांमुळं एक ना अनेक प्रश्न उपस्थित झाले… आपण एक आहोत की दोन? चेतना म्हणजे नेमकं काय? ’मी’ कोण आहे? ‘स्प्लिट ब्रेन सर्जरी’ या प्रयोगानं हे दाखवून दिलं की, मानवी चेतना एकसंध नसून ती सहकार्याने चालणाऱ्या प्रणालींचा समूह आहे.
या प्रयोगांमुळे मेंदूतील कार्यविभागणी स्पष्ट झाली, मानसशास्त्र आणि न्यूरोसायन्सला नवी दिशा मिळाली. रॉजर स्पेरी यांना 1981 सालचा नोबेल पुरस्कार मिळाला.
मेंदू कापला गेला, पण माणूस दोन तुकड्यांत तुटला नाही; उलट माणूस किती गुंतागुंतीचा आहे, हे जगाला कळलं!


