“डॉक्टर एक काम करता का? थेट फुफ्फुसात इंजेक्शन द्या की, वाफ घेऊन, गोळ्या खाऊन, औषधं पिऊन अक्षरश: कंटाळा आला होऽऽ” चार-पाच ठिकाणहून औषधं घेऊनही फरक न पडलेल्या आणि खोकल्यानं परेशान झालेल्या एका पेशंटनं मोठी अजबच विनंती केली!
“असं नाही होत काका; उद्या डोकं दुखलं तर मेंदूत इंजेक्शन द्यायला सांगाल,” म्हणत मी बॅक टू बेसिक औषधं उलट कमी केली आणि ॲलर्जिक खोकल्यासाठी एकच गोळी ठेवत सिरपही बंद केलं…
पेशंट बिचारं रवाना झालं खरं, पण काकांची ‘आयडीयाची कल्पना’ काही वाईट नव्हती, किंबहुना फुफ्फुसात संसर्ग झाला की, ॲस्पिरेशनसाठी इंजेक्शन वापरलं जातंच की… मध्यंतरी छातीवर त्वचेवरून लावायचे औषधी ट्रान्सडर्मल पॅचेस आलेत भविष्यात कदाचित काका म्हणतात तसले इंजेक्शनही येतील…
या सगळ्यात मला डॉक्टर वार्नर फार्समनची आठवण आली… साल असावं 1929… ठिकाण जर्मनी! या काळी हृदय म्हणजे अक्षरश: नाजूक अवयव… थेट देवाचं घर वगैरे मानलं जात होतं… इथं हात घालणं म्हणजे साक्षात मृत्यूला आमंत्रण, अशी ठाम समजूत होती आणि याच कालावधीत एका लहानशा रुग्णालयात एक तरुण आंतरवासीय डॉक्टर होता वार्नर फार्समन…
हेही वाचा – Waterloo Teeth… मानवतेला एक तडा!
“हृदयापर्यंत औषध थेट पोहोचवता आलं तर?”
हा एकच विचार त्याच्या मनात गेले अनेक महिने झाले घर करून बसला होता… पण वरिष्ठांचा स्पष्ट आदेश होता, ”हृदयात नळी वगैरे घालणं म्हणजे शुद्ध वेडेपणा, असले काही वेडगळ प्रयोग करायचे असतील तर आधी नोकरी सोड.”
फॉर्समन गप्प झाला… पण त्याचे विचार काही थांबले नाही अन् अशातच तो दिवस उगवला… रुग्णालय शांत होतं. दुपारची वेळ होती. एका सहाय्यक नर्सला या पठ्ठ्यानं विश्वासात घेतलं आणि हळूवारपणं समजावलं की, तो रुग्णावर फक्त एक छोटासा ‘प्रयोग’ करणार आहे… पण सत्य मात्र वेगळंच होतं; त्यानं स्वतःचे हात निर्जंतुक केले, कोपराजवळची शिर शोधली आणि… आणि कॅथेटर चक्क आत शिरेत घातला अगदी स्वत:च्याच… हळूहळू… श्वास रोखून… नळी पुढं सरकत होती… शिरेतून… हळूहळू हृदयाकडं… वेदना होत नव्हत्या असं नव्हे, बऱ्यापैकी दुखत होतं अन् वर भीतीही होती, पण हात मात्र अजिब्बात थरथरत नव्हता!
…अन् मग तो थरारक क्षण आला ज्याची तो उत्सुकतेनं वाट बघत होता. नळी छातीत पोहोचली होती, पण बघायचं कसं आणि कुणाला दाखवायचं तरी कसं?
तो नळीनिशीच हळूवार चालत चालत पायऱ्या उतरत खालच्या मजल्यावर आला आणि थेट एक्स-रे रूममध्ये गेला… एक्स-रे काढला गेला… चित्रात स्पष्ट दिसत होतं… नळी थेट हृदयात पोहोचली होती!
हेही वाचा – देवानं पृथ्वीला औषधांनी सजवलंय…
त्याचा हा भन्नाट प्रयोग धम्माल यशस्वी झाला, पण जग तयार नव्हतं!! वरिष्ठांनी त्याची यथेच्छ थट्टा केली, त्याला बेजबाबदार आणि महामूर्ख ठरवलं… त्याची नोकरी गेली..
फॉर्समननं शस्त्रक्रिया कायमची सोडली आणि हृदयाचा नाद सोडत युरोलॉजिस्ट म्हणून काम सुरू केलं आणि त्याची स्वप्नंही या सोबत दफन झाली…
यानंतर तब्बल 30 वर्षांनी हृदयात नळी घालून उपचार होऊ लागले… अँजिओग्राफी, स्टेंट, पेसमेकर… होय तेच तंत्र… कार्डिॲक कॅथेटरायझेशन!!
1956 साली डॉक्टर वार्नर फार्समनला यासाठी नोबेल पारितोषिक जाहीर झालं… होय, तोच माणूस ज्याला कधीकाळी मूर्खात काढण्यात आलं होतं!


