Close Menu
AvaantarAvaantar

    Subscribe to Updates

    Get the latest creative news from FooBar about art, design and business.

    What's Hot

    शार्वीची वेगळी खेळी

    August 13, 2026

    कोणाशी बोलावे, आई की…? उमाला प्रश्न

    August 13, 2026

    रामरक्षेचे चिलखत

    August 13, 2026
    Facebook X (Twitter) Instagram
    Thursday, August 13
    AvaantarAvaantar
    Facebook X (Twitter) Instagram YouTube
    Home
    • अवांतर
    • आरोग्य
    • फिल्मी
    • फूड काॅर्नर
    • मैत्रीण
    • ललित
    • पंचांग आणि भविष्य
    • अध्यात्म
    • शैक्षणिक
    • थर्ड अंपायर
    Latest From Avaantar
    AvaantarAvaantar
    Home » रामरक्षेचे चिलखत
    अध्यात्म

    रामरक्षेचे चिलखत

    डॉ. शिरीष कुलकर्णीBy डॉ. शिरीष कुलकर्णीAugust 13, 2026No Comments7 Mins Read
    Share Facebook Twitter LinkedIn WhatsApp Copy Link
    अवांतर, मराठी साहित्य, मराठी आर्टिकल, मी मराठी, अभिजात मराठी, मराठी कथा, मराठी लेख, अध्यात्म साहित्य, शिरीष कुलकर्णी, अध्यात्मिक शिरीष कुलकर्णी, रामरक्षा कवच, रामरक्षा महात्म्य, बुधकौशिक ऋषींचे रामरक्षा स्तोत्र, रामरक्षा ईश्वरीय देणगी, रामाकडून रक्षण, रामरक्षा पठनातून मन:शांती
    फोटो सौजन्य - गूगल जेमिनी
    Share
    Facebook Twitter LinkedIn WhatsApp Email Copy Link

    रामनामृतपानेन, यस्य चित्तं प्रसीदति।

    तस्य रक्षा स्वयं रामः, कुरुते भवसागरे॥

    – गीताव्रत

    ज्यांचे चित्त रामनामाच्या अमृतात न्हाऊन निघते आणि राम स्मरणामुळे प्रसन्न होते, त्याच्या जीवनाचे रक्षण या भवसागरात साक्षात प्रभू श्रीराम करतात.

    ‘श्रीरामरक्षा स्तोत्र’ हे अगदी बालपणापासून आपल्या मनावर कोरले गेलेले स्तोत्र. आपल्या सामर्थ्य देणाऱ्या भावविश्वाचा ते एक अविभाज्य भाग बनले आहे. साक्षात श्रीरामांनी आपले रक्षण करावे, त्यांनी आपल्या आयुष्याचे सारथ्य करावे आणि आपण आपले जीवन ध्येय पूर्ण करावे. आपण अनेक प्रकारच्या चिंता, भीती आणि असुरक्षिततेच्या भावनांनी वेढलेले असतो. वादळी भवसागराच्या संघर्षमय लाटांविरुद्ध मार्गक्रमण करताना अनेकदा आपले मन सैरभैर होते. अशावेळी आपल्याला रामनामाच्या भक्कम आधाराची आवश्यकता असते. हा आधार मानसिकही असतो आणि आध्यात्मिकही असतो!

    श्रीरामरक्षा स्तोत्र हे अशाच एका आध्यात्मिक सुरक्षेचे, एका अभेद्य चिलखताचे काम करते. बाह्य संकटांपासून आपले रक्षण गरजेचे असले तरीही आधी आपल्याच मनातील नकारात्मक विचारांपासून, षड्-रिपूंपासून आपले रक्षण व्हावे, याची खूप अधिक गरज असते.

    रामरक्षा हे स्तोत्र प्रत्यक्ष भगवान शिवशंकरांनी बुधकौशिक ऋषी यांना स्वप्नात सांगितले आणि पहाटे जाग आल्यावर ऋषींनी ते शब्दबद्धही केले. रामरक्षा केवळ मानवी प्रज्ञेचा आविष्कार नाही, तर ती एक ईश्वरीय देणगी आहे. प्रत्यक्ष शिवशंकरालाही प्रभू श्रीरामाचे नाम प्रिय आहे.

    हेही वाचा – हनुमान चालीसा… चौपाईत साक्षात हनुमंताचे दर्शन

    ध्यान करणे म्हणजे, त्या देवतेचे रूप आपल्या डोळ्यांसमोर प्रत्यक्ष उभे करणे. रामरक्षेच्या सुरुवातीलाच श्रीरामांचे अत्यंत सुंदर आणि सगुण रूप आपल्यासमोर उभे केले आहे.

    ध्यायेदाजानुबाहुं धृतशरधनुषं

    बद्धपद्मासनस्थं।

    पीतं वासो वसानं नवकमलदल

    स्पर्धिनेत्रं प्रसन्नम्॥

    श्रीरामांचे बाहू आजानुबाहू म्हणजे गुडघ्यापर्यंत पोहोचणारे आहेत, ज्यांनी हातात धनुष्यबाण धारण केले आहे. प्रभू श्रीराम पद्मासनात बसले आहेत, श्रीरामांनी पीतांबर नेसलेला आहे आणि त्यांचे डोळे नुकत्याच उमललेल्या कमळाच्या पाकळीसारखे सुंदर आणि प्रसन्न आहेत. श्रीराम हे एक महान योद्धे असून, हातात धनुष्यबाण आहे आणि ते पद्मासनात स्थिर आहेत. त्यांच्या चेहऱ्यावर विलक्षण प्रसन्नता आहे. हे आपल्या जीवनातील आदर्श स्थितीचे प्रतीक आहे. आपल्या हातातही योद्धा म्हणून कर्तव्याचे, जबाबदाऱ्यांचे धनुष्यबाण असायला हवे, आपण जगात वावरताना पूर्णतः सावध आणि सुसज्ज असायला हवे, पण त्याचवेळी आपले अंतरंग पद्मासनासारखे स्थिर आणि कमळासारखे प्रसन्न असायला हवे. बाहेर कितीही मोठे युद्ध सुरू असले, तरी आतून आपण शांत आणि अविचल असायला हवे, हीच शिकवण आपण या सुंदर श्रीराम ध्यानातून घेतो.

    देहाच्या आणि मनाच्या अभेद्य रक्षणासाठी हे श्रीराम ‘कवच’ किंवा ‘अंगन्यास’ रामरक्षा सहाय्यभूत ठरते. आपल्या शरीराच्या प्रत्येक अवयवाचे रक्षण प्रभू श्रीरामांनी करावे, अशी आपण प्रार्थना करतो.

    शिरो मे राघवः पातु

    भालं दशरथात्मजः।

    कौसल्येयो दृशौ पातु

    विश्वामित्रप्रियः श्रुती॥

    यामध्ये आपण प्रभू श्रीरामांना विनंती करतो की, “राघवाने माझ्या मस्तकाचे रक्षण करावे, दशरथपुत्राने माझ्या कपाळाचे रक्षण करावे, कौसल्यानंदनाने माझ्या डोळ्यांचे आणि विश्वामित्रांच्या प्रिय शिष्याने माझ्या कानांचे रक्षण करावे.” आपण असे पायाच्या नखापर्यंत प्रत्येक अवयवाचे रक्षण मागतो.

    पण आपण खरोखरच केवळ या भौतिक शरीराच्या रक्षणाची मागणी करत आहोत का, तर नक्कीच नाही. रामाने माझ्या डोळ्यांचे रक्षण करावे, “हे प्रभू, माझ्या डोळ्यांना केवळ शुभ, पवित्र आणि सात्विक गोष्टीच दिसू देत. माझ्या दृष्टीत कधीही पाप किंवा वाईट विचार दिसू नयेत.” जेव्हा कानांच्या रक्षणाची प्रार्थना होते, तेव्हा “माझ्या कानांवर केवळ चांगले विचार आणि तुझेच गुणगान पडावे. निंदा किंवा असत्य ऐकण्यापासून माझे कान सुरक्षित राहावेत.”

    आपले शरीर हे एक मंदिर आहे आणि आपले मन हे त्या मंदिरातील गाभारा आहे. आपल्या पंचज्ञानेंद्रियांतूनच जगातील बरे-वाईट विचार आपल्या मनात प्रवेश करतात. त्यामुळे या सर्व ‘प्रवेशद्वारांवर’ आपण श्रीरामाच्या सात्त्विकतेचा जणू पहारा बसवत आहोत. आपले विचार, आपले शब्द, आपले कर्म हे सर्व राममय व्हावे, हेच या अंगन्यासाचे खरे मर्म आहे.

    हृदये यस्य रामस्तु, वाणी राममयी तथा।

    तस्य सर्वार्थसिद्धिः स्यात्, रक्ष्यते स निरन्तरम्॥

    – गीताव्रत

    ज्याच्या हृदयात प्रभू श्रीराम आहेत आणि ज्याची वाणी राममय आहे, त्याला सर्वार्थाची प्राप्ती होते आणि त्याचे निरंतर रक्षण होते. राम हा उच्चार हाच ‘तारक मंत्र’ आहे.

    रामेति रामभद्रेति

    रामचन्द्रेति वा स्मरन्।

    नरो न लिप्यते पापै

    र्भुक्तिं मुक्तिं च विन्दति॥

    जो मनुष्य राम, रामभद्र, रामचंद्र या नावांचे सतत स्मरण करतो, तो कधीही पापांनी लिप्त होऊ शकत नाही. त्याला या जगात सर्व भौतिक सुखे मिळतात आणि अंतिमतः त्याला मोक्ष – मुक्ती प्राप्त होते.

    आपले मन भूतकाळात किंवा भविष्यकाळात सतत भरकटत असते. रामनामाचे स्मरण हे आपल्याला ‘वर्तमानकाळा’त आणते. जेव्हा आपण पूर्ण श्रद्धेने ‘राम’ या दोन अक्षरी मंत्राचा उच्चार करू, तेव्हा आपल्या मनातील सर्व कोलाहल शांत होतो. हे रामनाम असा हितकारक अग्नी आहे, ज्यामध्ये आपले सर्व संशय, भीती आणि नैराश्य भस्मसात होऊन जाते.

    रामनामाची ताकद अशी की, या नाम-कवचाने आच्छादलेला मनुष्य जगात कोणत्याही शक्तीला घाबरत नाही.

    पातालभूतलव्योमचारिण

    श्छद्मचारिणः।

    न द्रष्टुमपि शक्तास्ते रक्षितं रामनामभिः॥

    पाताळ, पृथ्वी किंवा आकाशात वावरणारी कोणतीही नकारात्मक शक्ती किंवा छळ करणारी प्रवृत्ती, रामनामाने रक्षित असलेल्या व्यक्तीकडे दुष्ट हेतूने पाहूही शकणार नाही. आपल्याला मनातील नैराश्य, मत्सर, क्रोध आणि न्यूनगंड यासारख्या वृत्तींपासून अधिक संरक्षणाची आवश्यकता असते. रामनामाने मन प्रसन्न, पवित्र आणि सक्षम, शक्तीसंपन्न राहते.

    श्रीरामरक्षा स्तोत्राची रचना ही दिव्य आहे. व्याकरणाच्या पातळीवरही अत्यंत श्रेष्ठ आहे. यातील एकेक श्लोक तर संस्कृत साहित्यातील एक अद्भुत अलंकार मानला जातो.

    रामो राजमणिः सदा विजयते रामं रमेशं भजे।

    रामेणाभिहता निशाचरचमू रामाय तस्मै नमः॥

    रामान्नास्ति परायणं परतरं रामस्य दासोऽस्म्यहम्।

    रामे चित्तलयः सदा भवतु मे

    भो राम मामुद्धर॥

    या एकाच श्लोकाचे बारकाईने निरीक्षण केले, तर आपल्याला दिसेल की, यात ‘राम’ या शब्दाच्या व्याकरणातील आठही विभक्तींचा म्हणजे प्रथमा ते संबोधन असा खूप कौशल्याने वापर केला आहे.

    प्रथमा – रामो राजमणिः

    राजांमध्ये श्रेष्ठ असलेला राम विजय पावतो.

    द्वितीया – रामं रमेशं भजे

    त्या रामाला मी भजतो.

    तृतीया – रामेणाभिहता…

    रामाने राक्षसांचा नाश केला.

    चतुर्थी – रामाय तस्मै नमः

    त्या रामाला माझा नमस्कार असो.

    पंचमी – रामान्नास्ति परायणं…

    रामाहून श्रेष्ठ असे दुसरे कोणतेही परायण किंवा आश्रयस्थान नाही.

    षष्ठी – रामस्य दासोऽस्म्यहम्

    मी रामाचा दास आहे.

    सप्तमी – रामे चित्तलयः

    माझे चित्त सदैव रामाच्या ठायी लीन असावे.

    संबोधन – भो राम मामुद्धर

    तो राम, माझा उद्धार करेल! हे रामा, तू माझा उद्धार कर!

    भक्ती आणि प्रेम जेव्हा परमोच्च शिखर गाठते तेव्हा शब्द आणि व्याकरणही भक्तीच्या चरणी कसे लीन होतात पहा! श्लोक म्हणताना पूर्णपणे श्रीरामांशी एकरूप होत जावे. “हे प्रभू, मी तुझा दास आहे आणि माझे मन सदैव तुझ्यातच लीन रहावे.”

    या स्तोत्राची सांगता अत्यंत गोड आणि भावपूर्ण अशा शिव-पार्वती संवादाने होते. माता पार्वती भगवान शिवांना विचारतात की, “विद्वान लोक या विष्णू सहस्रनामाचा, विष्णूच्या एक हजार नावांचा पाठ कसा करतात?

    त्यावर भगवान शंकर अत्यंत मार्मिक आणि सोपे उत्तर देतात,

    राम रामेति रामेति

    रमे रामे मनोरमे।

    सहस्रनाम तत्तुल्यं

    रामनाम वरानने॥

    भगवान शिव म्हणतात, “हे देवी पार्वती, मी ‘राम राम राम’ असे म्हणत त्या मनोरम रामाच्या ठिकाणीच रममाण होतो. हे एकटे ‘राम’ नाम, हे श्रीविष्णूंच्या हजार नावांच्या,  विष्णूसहस्रनामाच्या बरोबरीचे आहे.”

    रामनाम सोबत असताना आपल्याला कोणत्याही कठीण अशा कर्मकांडांची वा लांबलचक पाठांची कधीच गरज पडू नये. आपले मन शुद्ध असेल आणि आपण अत्यंत प्रेमाने आणि एकाग्रतेने जर फक्त प्रभूंचे ‘राम’ एवढेच नाव घेतले, तरीही ते हजार नावांच्या बरोबरीचे पुण्य देते.

    ‘राम’ या शब्दामध्ये ‘रा’ म्हणजे प्रकाश आणि ‘म’ म्हणजे तो प्रकाश स्वतःच्या आत सामावून घेणे. रामनाम घेणे म्हणजे त्या परम ईश्वरीय प्रकाशाला आपल्या अंतःकरणात सामावून घेणे होय. नामस्मरण करीत असता राममय नाम तल्लीनता लाभणे ही पूर्ण ध्यानावस्था ठरते! तर रामरक्षा उच्चारण हे वाणी आणि उच्चार  स्पष्ट करायला फार‌फार मदत करते. यातून वाणी हमखास शुद्ध होते.

    हेही वाचा – कान्होपात्रेचे समर्पण

    सायंकाळी रामरक्षा म्हणावी. ती आपली भारतीय आध्यात्मिक जीवनपद्धती आहे. रामरक्षा मनशुद्धी, मनशक्तीसाठी आणि मन:शांतीसाठी आश्वासक उपचार करते. रामरक्षा आणि नामस्मरण हे स्वतःसाठी आणि त्या परमतत्वासाठी करीत जावे.

    जेव्हा आपण अर्थ समजून घेऊन रामरक्षेचे पठण करू, तेव्हा हळूहळू शौर्य वाढीस लागते. अनेक संकटात आपली कृती राममय होऊ लागते. प्रभू श्रीरामांचे जीवन हे मर्यादा, संयम, कर्तव्य, सत्य आणि प्रेमनिष्ठेचे प्रतीक आहे. रामरक्षा नकळतपणे रामाचे हे सगळे सद्गुण आपल्या आयुष्यात उतरवण्याची तयारी करत राहते. रामरक्षेमुळे मन स्थिर होते, आपली दृष्टी सात्त्विक होते आणि आपल्या वाणीमध्ये मृदुता येते. नंतर जगातली कोणतीही शक्ती अशा शुद्ध अंतःकरणाच्या व्यक्तीचे नुकसान करू शकत नाही.

    श्रीरामरक्षा ही श्रीरामांशी आंतरिक संवादाच्या भावनेने म्हणू या. स्वतःला विसरून त्या रामस्मरणात एकरूप होऊ या! हा अयोध्येचा राजा राम, आपल्या हृदयाच्या गाभाऱ्यात विराजमान आहे, ही जाणीव आपल्याला निरंतर आनंद आणि शांती देत राहील.

    Avatar photo
    डॉ. शिरीष कुलकर्णी

    डॉ. शिरीष कुलकर्णी M.J. M.B.A.B.A. GDC&A., P.HD.... सहकार प्रशिक्षण केंद्रावर प्राचार्य म्हणून पाच वर्ष सेवा. कथा, कादंबरी, कविता, गझल, आध्यात्मिक चिंतन अशा विविध विषयावर 51 पुस्तके लिहिलेली आहे. कर्णधार हे व्यवस्थापनावरील पुस्तक, चौथा स्तंभ हे पत्रकारितेतील अभ्यासक्रमासाठी आवश्यक असलेले पुस्तक, यासोबत संतसम्राज्ञी, संत सत्संग, विश्वाराधन, सजल, गीताव्रत साधना - 3 भाग प्रसिद्ध, हिंदोळा, अमात्र, नामसाधना, नासदीय, ईशोवास्य, कबीराऽ रे, संपादकीय, माया, ब्रह्मजिज्ञासा, Editorials, luminous thoughts हे इंग्रजी संपादकीय लेखा़चे पुस्तक, किंचितरेषा, साधनारंभ, खराखुरा कर्मयोग, संत मीराबाईंच्या जीवनावर सखोल अभ्यास करून लिहिलेली संत मीराबाईंवरील पहिलीच कादंबरी 'संतसम्राज्ञी'. या कादंबरीचे हिंदी, इंग्रजीतून अनुवादही झालेले आहेत. स्वर्गोपनिषद, वीणा आणि वाणी, गीताव्रत साधना ही पुस्तके विशेष उल्लेखनीय ठरली. संशोधन हा त्यांच्या साहित्यनिर्मितीचा मुख्य आत्मा आहे. सजल या गझल संग्रहास अरुण दाते यांनी प्रस्तावना दिली. बायबल, कुराण आणि भगवद्गीता यावर अभ्यासपूर्ण लेखमाला आणि पुस्तके प्रकाशित झाली. ‘मुस्लिम धर्म आणि अहिंसा’, ‘संत कबीर’, ‘येशू ख्रिस्त आणि अहिंसा’, ‘रूमी आणि अद्वैत सिद्धांत’ या विषयावर लेखन आणि व्याख्याने. 2016नंतर सार्वजनिक जीवनातून निवृत्ती घेऊन साहित्यिक आणि अध्यात्मिक संशोधनासाठी पूर्ण आयुष्य अर्पण करण्याचा निर्णय. महाराष्ट्र पत्रकार संघाचे, मुख्य राज्य संघटक म्हणून सलग पंधरा वर्षं सेवा. चित्रपट कथा-पटकथा, संवाद आणि गीतलेखन. काही चित्रपटासाठी त्यांची गाणी रवींद्र साठे, वैशाली माडे, स्वप्निल बांदोडकर, अभिजीत कोसंबी, वैशाली चितळे, यांनी गायलेली आहेत. 14 चित्रपटांमधून छोट्या-मोठ्या भूमिका. ब्रह्मचैतन्यसाठी कथा-पटकथा आणि संवाद लेखन. कथालेखन, कादंबरी लेखन, कविता लेखनाच्या 40पेक्षा जास्त विनामूल्य कार्यशाळा घेतलेल्या आहेत. अथलेटिक्स असोसिएशनचे अध्यक्ष म्हणून वीस वर्षं अविरोध सेवारत. लायन्स क्लब योगा आणि मेडिटेशन टेरिटरी चीफ म्हणून सेवा. दोन मंदिरे, अनाथ आश्रम, शाळा, ग्रंथालये, टेक्सटाइल मिलची उभारणी निरपेक्ष भावनेने विनामूल्य केली. लोकव्रत प्रकाशनाचे मानद सचिव म्हणून वीस वर्षे विनामूल्य सेवा. त्या माध्यमातून आजवर हजारो पुस्तके प्रसिद्ध केली. आजवर 1600हून अधिक मुखपृष्ठे तयार केली आहेत. 1500पेक्षा जास्त संपादकीय लेख आणि वृत्तपत्रासाठी तितकेच लेख लिहिलेले आहेत. अनेक वृत्तपत्रांतून स्तंभ लेखन केलेले आहे. स्त्री मुक्ती, समस्या निवारण केंद्र आणि कामगार चळवळीच्या निमित्ताने यशवंतराव चव्हाण, भाऊ फाटक आणि सर्वोदय चळवळीचा प्रदीर्घ सहवास. भारतातील पहिल्या शासकीय पोलीस ठाण्यातील समस्या निवारण केंद्राचा सेक्रेटरी म्हणून सलग पंधरा वर्षे सेवा. अनेक साहित्य संमेलने, आणि ग्रामीण साहित्य संमेलनाची संकल्पना मांडून ती साहित्य संमेलने यशस्वीपणे पार पाडली. स्त्रीभ्रूण हत्या, नकूसा नामबदल चळवळ, स्वयंसहायता बचत गट चळवळ यासाठी पाचशेहून अधिक बचत गट स्थापनेच्या कार्यक्रमांमध्ये मार्गदर्शन आणि व्याख्याने. पन्नासहून अधिक सामाजिक आणि साहित्यिक पुरस्कार. न्यायमूर्ती धनंजय चंद्रचूड, दिल्ली यांच्या शुभहस्ते आणि पू. विष्णू महाराज पारनेरकर यांच्या उपस्थितीत 'अक्षर वाड्.मय' पुरस्कार. ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराजांचे अनुग्रहीत. त्यांच्या सजल या पेजला 75 हजारपेक्षा जास्त फॉलोवर्स आहेत.

    Related Posts

    सार्थ ज्ञानेश्वरी : हात होती खुळे, हें पुढील मोटकें कळे

    August 13, 2026 अध्यात्म

    सार्थ ज्ञानेश्वरी : कुसळें कोरडीं, वारेनि जाती बरडीं

    August 12, 2026 अध्यात्म

    सार्थ ज्ञानेश्वरी : निदैव्याचे व्यवसाय, तैसे ठाकती हातपाय

    August 11, 2026 अध्यात्म
    Leave A Reply Cancel Reply

    Demo
    Stay In Touch
    • Facebook
    • Twitter
    • Instagram
    • YouTube
    Don't Miss
    अध्यात्म

    सार्थ ज्ञानेश्वरी : हात होती खुळे, हें पुढील मोटकें कळे

    By Team AvaantarAugust 13, 2026

    अध्याय तेरावा ऐसी वार्धक्याची सूचणी । आपणिया तरुणपणीं । देखे मग मनीं । विटे जो…

    सार्थ ज्ञानेश्वरी : कुसळें कोरडीं, वारेनि जाती बरडीं

    August 12, 2026

    सार्थ ज्ञानेश्वरी : निदैव्याचे व्यवसाय, तैसे ठाकती हातपाय

    August 11, 2026

    सार्थ ज्ञानेश्वरी : चोंढिये पाथरु गेला, तैसेनि जो बुडाला

    August 10, 2026

    Subscribe to Updates

    Get the latest creative news from Avaantar

    Latest From Avaantar

    शार्वीची वेगळी खेळी

    August 13, 2026

    कोणाशी बोलावे, आई की…? उमाला प्रश्न

    August 13, 2026

    रामरक्षेचे चिलखत

    August 13, 2026

    आई लहान की मुलगी?

    August 13, 2026

    सार्थ ज्ञानेश्वरी : हात होती खुळे, हें पुढील मोटकें कळे

    August 13, 2026

    Panchang : आजचे पंचांग, दिनविशेष आणि राशीभविष्य; 13 ऑगस्ट 2026

    August 13, 2026

    POPULAR CATEGORY

    • Blogs 1
    • अध्यात्म 394
    • अवांतर 204
    • आरोग्य 138
    • थर्ड अंपायर 6
    • पंचांग आणि भविष्य 531
    • फिल्मी 63
    • फूड काॅर्नर 248
    • मैत्रीण 24
    • ललित 847
    • शैक्षणिक 84
    • 98699 75883
    • joshimanoj@avaantar.com
    Facebook X (Twitter) Instagram LinkedIn

    एक पाऊल सांस्कृतिक सर्जनशीलतेकडे...

    आजकाल वाचनसंस्कृतीबद्दल चिंता व्यक्त केली जात आहे. वास्तविक ‘पुस्तक वाचन’ संस्कृतीला धोका निर्माण झाला आहे. वाचनसंस्कृती अबाधित आहे आणि ती अबाधित राहील. कारण, पुस्तकांच्याच जोडीला स्मार्टफोन, ई-बुक, ई-मॅगझिन यासारखी आधुनिक काळाशी सुसंगत माध्यमे उपलब्ध झाली आहेत. याच अत्याधुनिकतेची कास धरत आम्ही हे पाऊल उचलले आहे... अवांतर ही वेबसाइट!

    ‘अवांतर’ हा एक वेब प्लॅटफॉर्म आहे, जो विचार, साहित्य, कला आणि संस्कृतीच्या सर्जनशील प्रवाहाला समर्पित आहे. विविध विषयांवर लेख, कविता, कथा आणि विचार आपल्यापर्यंत पोहोचविण्याचा हा प्रयत्न आहे. दैनंदिन धावपळीच्या जीवनात मिळाणारी काही क्षणांची उसंत सार्थकी लावावी, उत्तम साहित्याद्वारे वाचकांना नवनवीन दृष्टिकोन देणे, विचारांना चालना देणे आणि सर्जनशीलतेला प्रोत्साहन देणे, हा उद्देश आमचा यामागे आहे.

    ‘अवांतर’च्या निमित्ताने विविध लेखक, कवी, विचारवंत आणि कलाकारांना एक हक्काची वेबसाइट उपलब्ध केली आहे. त्यांचे वैविध्यपूर्ण साहित्य, माहिती जगासमोर मांडण्यासाठी एक मुक्त व्यासपीठ असे या वेबसाइटचे स्वरूप आहे. ‘अवांतर’ च्या माध्यमातून आम्ही मराठी भाषेतील समृद्ध साहित्यिक परंपरेला नवी दिशा देत, आधुनिक काळाशी जोडून ठेवण्याचा आमचा प्रयत्न आहे.

    या वेबसाइटला ‘अवांतर’ नाव विचारपूर्वक देण्यात आले आहे. कोणत्याही एका विचाराला किंवा विचारधारेशी बांधिलकी न दाखवता, सर्वांना सामावून घेत, पुढे जाण्याचा एक निखळ उद्देश यामागे आहे. आमच्या या प्रवासात जवळपास 25 ते 30 लेखक, कवी, आरोग्यतज्ज्ञ, शैक्षणिक तज्ज्ञ साथसोबत आहेत. पण आमचा हा प्रवास तुमच्याशिवाय अपूर्ण आहे. सर्जनशीलतेच्या या प्रवासात सर्वच सहभागी होऊया!

    संपादकीय मंडळ

    • मनोज शरद जोशी (संपादक)
    • आराधना जोशी (कार्यकारी संपादक)
    • चिन्मय आचार्य (कायदेविषयक सल्लागार)
    • भालचंद्र गोखले (आर्थिक सल्लागार)
    • गार्गी देवधर (सल्लागार)
    Read More
    • M.A.Y. Multimedia Rg.No.MH-17-0175213 Palghar, Maharashtr

    © 2026 Avaantar.com All Rights Reserved. | Design & Developed By Creative Marketix

    • Terms & Conditions
    • Privacy Policy
    About Us
    About Us

    Your source for the lifestyle news. This demo is crafted specifically to exhibit the use of the theme as a lifestyle site. Visit our main page for more demos.

    We're accepting new partnerships right now.

    Email Us: info@example.com
    Contact: +1-320-0123-451

    Facebook X (Twitter) Pinterest YouTube WhatsApp
    Our Picks

    शार्वीची वेगळी खेळी

    August 13, 2026

    कोणाशी बोलावे, आई की…? उमाला प्रश्न

    August 13, 2026

    रामरक्षेचे चिलखत

    August 13, 2026
    Most Popular

    ज्योतिषशास्त्र… कारक ग्रहाचा भाव सुद्धा महत्त्वाचा!

    August 8, 2026

    स्मृतीगंध

    January 26, 2025

    विष्णूरुपी जावई…

    January 26, 2025
    © 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.
    • Home
    • Buy Now

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.