वारकरी संप्रदायातील संतांच्या मांदियाळीत संत कान्होपात्रेचे स्थान मला अत्यंत आपलेसे वाटणारे आणि हृदयस्पर्शी असे आहे. तिचे मरण तिचे जीवन उजळवून टाकणारे आहे. एका अभागी जीवाचे ईश्वराच्या चरणी झालेले संपूर्ण समर्पण आहे.
मंगळवेढ्याची एक तेजस्वी, अनन्य सुस्वरूप कन्या, जिच्या अफाट सौंदर्याने जगाला वेड लावले होते. पण जिचे मन मात्र त्या पाषाणाच्या काळ्या सावळ्या विठ्ठलाच्या चरणांशी एकाग्र, एकरूप झाले होते. कान्होपात्रेचा ‘नको देवराया अंत आता पाहू’ हा अभंग ईश्वराला दिलेली तिची अखेरची प्राणांतिक आर्त हाक आहे. जेव्हा सहनशक्तीचे सगळे दोर तुटतात, आणि चोहोबाजूंनी संकटांचा विळखा पडतो, तेव्हा जी आर्तता निर्माण होते, ती या अभंगाच्या प्रत्येक शब्दातून जाणवते. हृदय हेलावून टाकणारा हा सर्वश्रेष्ठ अभंग आहे. याइतका सुंदर अभंग क्वचितच आढळेल! आर्तता तर आपल्याला दिसतेच, पण या अभंगानं दगडाला पाझर फोडला होता, असा हा अभंग!
एका नर्तकीच्या पोटी जन्म घेतल्यामुळे समाजाच्या नजरेत तिला स्थान नव्हते, तिच्या अंतर्यामी असणारी विठ्ठल भक्ती मात्र गंगेइतकीच निर्मळ होती. तिच्या अलौकिक सौंदर्याची चर्चा बिदरच्या बादशहापर्यंत पोहोचली आणि त्याने तिला आपल्या दरबारात आणण्याचे फर्मान सोडले, तेव्हा कान्होपात्रेसमोर अखेरचे दोनच मार्ग उरले होते – एक म्हणजे बादशहाचे दास्यत्व स्वीकारणे किंवा दुसरे म्हणजे आपल्या आराध्य देवतेच्या चरणी विलीन होणे. भक्तासाठी विठ्ठलाशिवाय जगणं ही कल्पनाच भयंकर असते!
अशा या कसोटीच्या क्षणी, जेव्हा जगणे आणि मरण यांच्या सीमा धूसर होतात, तेव्हा माणसाला फक्त तो परमात्माच आठवतो.
यदा सर्वे उपायाश्च
क्षीयन्ते जीवने खलु ।
त्रिशङ्कौ पतिते जीवे
विष्णुमेव समाश्रयेत् ॥
– गीताव्रत
कधी जेव्हा जीवनातले सगळे उपाय थकतात आणि माणूस ‘त्रिशंकू’सारखा अधांतरी अडकून जातो, ना जगता येत ना मरता येत. तेव्हा केवळ विष्णूचा म्हणजेच त्या परमात्म्याचा आश्रय घेणे, हाच एकमेव मार्ग आधार उरतो. कान्होपात्रेची अवस्था नेमकी अशीच झाली. ती धावत विठ्ठलाच्या मंदिरात पोहोचली, गाभाऱ्यात उभी राहिली आणि तिने पांडुरंगाला दरदरून घाम फोडणारी शेवटची याचना केली. त्याला म्हणाली,
‘हरिणीचे पाडस व्याघ्रे धरियेले,
मजलागी जाहले तैसे देवा…’
ही उपमा किती बोलकी आहे! वाघाच्या जबड्यात कोवळे पाडस जसे तडफडते, तशी माझी अवस्था आहे. ना जगणे शक्य, ना पटकन मरणे! उरल्यात फक्त वेदना आणि गुदमरणं! पाडसाचा मृत्यू अटळ आहे, वाघाचे दात मानेत खोल घुसलेत पण प्राण जात नाही. श्वास घेता येत नाही. अशीच अवस्था कान्होपात्रेची झाली होती. आजवर भोवतालचा संसार आणि आता बादशहाचे तिला उचलून नेण्यासाठी आलेले क्रूर नरभक्षक शिकारी दिसू लागले… या जगात तर तिचे कोणीच नव्हते, ना आई, ना समाज! तिला फक्त एकच आधार, तोच पांडुरंग!
तेव्हा ‘विठाबाई’ अशी आर्त हाक बाहेर पडली, कान्होपात्रेने टाहो फोडला! मूर्ती थरथरली. लेकराला जेव्हा भीती वाटते, भूक लागते, एकटेपणा वाटतो, तेव्हा त्याला सर्वात आधी आपली ‘आई’ आठवते. वेदना झाली की, ‘आईss’ एवढेच आठवते. ती आपणच कळवळून मारलेली हाक आपण पुढे विसरतो. एकदा तीच, तशीच हाक परमेश्वराला हवीय. मग त्याच्यातली आई धावत येते.
हेही वाचा – भारतातील शक्तिपीठे
“भोग सगळे भोगून झाले पांडुरंगा, तू असा अंत का पाहतोस? माझा प्राण आता व्याकुळ झाला आहे.”
आपल्या मनात कधी कधी शंका येते की, ईश्वराने कान्होपात्रेसारख्या इतक्या गोड भक्ताला अशा संकटात का टाकावे?
पण ईश्वर हा दुःख देत नसून तो दु:खातून मुक्त करणारा वैद्य आहे. आपण काय करतो की, ईश्वरालाच नावे ठेवतो. तूच दुःख दिले आहेस, असे बेधडक बडबडतो. मानवाच्या वाट्याला येणारी संकटे ही त्याच्या प्रारब्धाचीच फळं असतात, ईश्वर त्या संकटात भक्ताची सोबत करतो. ईश्वरालाही प्रारब्ध चुकत नाही, हे आपल्या लक्षात आलं तर, मग आपला परमेश्वराकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलेल आणि मग आपण परमेश्वरावर राग काढणार नाही.
न देवः सृजते दुःखं
प्रारब्धं फलदायकम् ।
वैद्यवन्मुक्तिदाता सौ
रोगहर्ता जनार्दनः ॥
– गीताव्रत
ईश्वर कधीच दुःख निर्माण करत नाही, तर आपले संचित कर्मच आपल्याला बरे-वाईट फळ देते. वैद्य किंवा डॉक्टर आजार निर्माण करत नाहीत, ते रोगमुक्ती मात्र हमखास करतात. तसेच, जनार्दन हा आपल्या जन्म-मरणाच्या रोगाचे, भोगांचे हरण करणारा महान वैद्य आहे. कान्होपात्रेच्या आयुष्यात जे काही घडले, ते तिच्या गतजन्मीच्या कर्माचे भोग होते. त्या भोगांतून तिची सुटका विठ्ठलाने तिला जवळ घेऊन केली.

कान्होपात्रेने देवाला अखेरची साद घातली. तिने म्हटले,
“मोकलूनी आस
जाहले उदास,
घेई कान्होपात्रेस
हृदयात…”
‘आस’ मोकळणे म्हणजे जगातील सगळ्या आशा अपेक्षा सुटणे, मोकळ्या होणे, आकांक्षांचा त्याग होणे, सर्वसंगपरित्याग करून संन्यस्त होणे. असह्य वेदनातही कान्होपात्रा पूर्ण रिक्त आणि ‘उदास’ झाली. तिला जन्मभर पांडुरंगाशिवाय कुठलीच ओढ नव्हती. ना तिला तिच्या सौंदर्याचा अभिमान! तिला फक्त विठ्ठलाच्या हृदयात छोटीशी जागा हवी होती.
कान्होपात्रेचे अन्य अभंग पाहिले तर तिची भक्ती किती श्रेष्ठ होती हे समजते. ती म्हणते,
“अगा वैकुंठीच्या राया,
काय तुझी वर्णू माया.”
ही माया तिला जाणवली होती, उगाच व्यर्थ भरवसा नव्हता. त्या विठ्ठलाचे रूप सावळे परब्रह्म! पण समाजाच्या नजरांनी, बंधनांनी तिला जर्जर केले होते. जीव नको केला होता. तिला सतत आपल्या उद्धाराची आठवण होत होती. परंतु भक्तीच्या क्षेत्रात जात, कुल किंवा व्यवसाय कधीच आड येत नाही, हेच कान्होपात्रेने आपल्या समर्पणातून सिद्ध केले.
पंढरपूरच्या मंदिरात जेव्हा सैनिकांनी तिला पकडण्याचा प्रयत्न केला, तेव्हा तिने देवाला विनवणी केली की, मला या अपवित्र, राक्षसी हातात देऊ नकोस. तिने देवाला विचारले, “देवा, जर तुझा हा भक्त अपवित्र झाला, तर तुझ्या देवत्वाचे काय?”
शरणं तव पादाब्जे
कान्होपात्रा स्थिता सदा ।
व्याघ्रभीतेव हरिणी
रक्ष मां करुणानिधे ॥
– गीताव्रत
आजवर मी, कान्होपात्रा, सदैव तुझ्या चरणकमलांच्याच आश्रयाला राहिले आहे. मरणप्राय वेदना सोसणाऱ्या, भ्यायलेल्या हरिणीच्या लहान बाळासारखी माझी अवस्था झालीय, हे करुणानिधे, तू माझे रक्षण कर! ही तिची शरणागती खरोखरच अचाट होती… आणि त्या क्षणी एक चमत्कार घडला. कान्होपात्रेचा प्राण मंदिरातच विरघळला आणि तिचा आत्मा त्या सावळ्या विठ्ठलाच्या मूर्तीत विलीन झाला. हे तिचे संत मीराबाईंसारखे मरण होते, हे महामरण होते, ज्याला आपण ‘मुक्ती’ म्हणतो.
म्हणतात की, तिच्या देहाचे अवशेष मंदिराच्या दक्षिण द्वारपाशी पुरले गेले आणि तिथे एक तरटीचे झाड उगवले. आजही वारकरी त्या झाडाचे दर्शन घेतात आणि कान्होपात्रेच्या त्या दिव्य त्यागाची आठवण काढतात. तिची मुक्ती ही केवळ एका व्यक्तीची मुक्ती नव्हती, तर ती भक्तीच्या विजयाची मोहोर होती.
कान्होपात्रेच्या मुक्तीच्या क्षणाचे वर्णन करताना अंगावर शहारे येतात. तो प्रसंग जसाच्या तसा डोळ्यासमोर उभा राहतो. बादशहाचे क्रूर सैनिक दारात उभे होते, पण आतमध्ये मात्र एक अलौकिक सोहळा चालू होता. कान्होपात्रेने देवाला पाहिले, देवाने आपल्या लेकराला पाहिले आणि भक्त-भगवंताचे अद्वैत सिद्ध झाले. जसा एखादा दिवा विझल्यावर त्याचा प्रकाश आकाशात विलीन होतो, तसेच कान्होपात्रेचे चैतन्य त्या परब्रह्मात विलीन झाले. मुक्तीक्षणाचे सार सांगणारा हा श्लोक पहा…
ज्योतिर्ज्योतौ समालीना
ब्रह्मरूपा हि साऽभवत् ।
पाण्डुरङ्गपदाम्भोजे
मुक्तिमाप सनातनीम् ॥
– गीताव्रत
ती दिव्य ज्योत त्या मूळ ज्योतीमध्ये विलीन झाली आणि कान्होपात्रा स्वतः ब्रह्मरूप झाली. पांडुरंगी चरणकमलांमध्ये तिने ती सनातन मुक्ती प्राप्त केली.
हेही वाचा – देशविदेशातील शक्तिपीठे
तिचे मरण हे जगासाठी निश्चित दुःखद असले, तरी तिच्यासाठी ते एक महान वरदान होते. ज्या सौंदर्यासाठी जग तिच्यामागे धावत होते, ते सौंदर्य तिने त्या सौंदर्याच्या देवतेच्या चरणी अर्पण केले.
कान्होपात्रेची ती अखेरची हाक आजही प्रत्येक भक्ताच्या मनात गुंजत असते. आपणही जेव्हा संकटात असू, जेव्हा आपल्याला वाटतं की, आता कोणीही सोबतीला नाही, तेव्हा कान्होपात्रेला स्मरून दिलेली हाक आपल्याला बळ देईल.
नर्तकीची मुलगी असूनही ती संतपद मिळवू शकली, कारण तिची ओढ त्या विठ्ठलाकडे होती. तिने जगाचे पाय धरण्यापेक्षा विठ्ठलाचे पाय धरणे पसंत केले. तिची भक्ती इतकी श्रेष्ठ होती की, प्रत्यक्ष पांडुरंगाला तिचे रक्षण करण्यासाठी तिला आपल्यातच सामावून घ्यावे लागले. ही भक्तीची पराकाष्ठा आहे. जेव्हा आपण कान्होपात्रेचा अभंग मनोभावे म्हणू,
‘तुजविण ठाव न दिसे त्रिभुवनी…’
तेव्हा त्या एकाच सत्याची जाणीव होईल की, हे जग अनित्य आहे आणि तो एकच शाश्वत आहे.
आज प्रत्येक साधकाला कान्होपात्रेची आर्त हाक समजायला हवी. आपण अनेकदा छोट्या छोट्या गोष्टींनी हतबल होतो, निराश होतो. पण अशा वेळी जर आपण त्या आराध्याला, विठ्ठलाला हाक दिली, तर तो नक्कीच धावून येईल. तो संकटे देत नाही, पण त्या संकटांशी लढण्याचे बळ तो आपल्याला नक्कीच देईल, तो त्या वैद्यासारखा आहे जो वेदना जाणवू देत नाही. आपल्या कर्माचे औषध देऊन आपल्याला मुक्त करतो.
प्रत्येक संत आपलं आयुष्य, आपला अभंग, आपल्या रचना या अन्य समाजासाठी तुमच्या माझ्यासाठी निर्माण करतो. कान्होपात्रेने हा जो मार्ग आपल्याला दाखवला, तो पूर्ण शरणागतीचा, समर्पणाचा आहे. आपणही आपल्या जीवनातून ‘मी’पणा घालवला, आणि जर केवळ ‘तो’च उरला तरच आपण त्या परब्रम्हाच्या ‘हृदयात’ स्थान मिळवू शकू.
या अभंगात कान्होपात्रेचे आर्त आरस्पानी सुंदर दर्शन होते. त्यात भीती आहे, पण त्या भीतीहून अधिक त्या विठ्ठलावर विश्वास आहे. संसाराच्या या व्याघ्रमुखातून सुटण्यासाठी त्या ‘विठाबाई’कडे धाव घेतली पाहिजे. तिची हाक ही केवळ तिची राहिली नाही, तर ती समस्त मानवी समुदायाला ईश्वराला देण्यासाठी ‘आर्त हाक’ शिकवून गेली आहे. तिच्या मुक्तीचा क्षण हा साधकांच्या भक्तीच्या इतिहासातील एक सुवर्णपान आहे, ज्यात लिहीले आहे की, मृत्यू हा अंत नसून तो एका नवीन, शाश्वत प्रवासाची सुरुवात असते, जर आपण ईश्वराशी जोडले गेलो असू तर..!
भक्तीत त्या आर्ततेचा थोडा जरी अंश आपण आणू शकलो, तरी आपले जीवन सार्थकी लागेल.


