सोन्या रुप्याच्या पावलांनी गौरी घरात आल्या. प्रत्यक्ष त्या महालक्ष्मींचं आगमन होतं घरी… किती भाग्याची गोष्ट आहे ना! घरातल्या प्रत्येक खोलीत नेऊन त्यांना घर दाखवलं. दोघींना नीट बसवलं. साडी, दागिने हार घातले. आरती, मंत्रपुष्पांजली झाली. आल्या दिवशी साधी भाजी भाकरी… ती दाखवून झाली. दूध देऊन दोघींना आराम करायला सांगितलं.
दुसऱ्या दिवशी सकाळीच लगबग सुरू झाली. पुरणावरणाचा स्वयंपाक, भाजी, कोशिंबीर, भात वरण… दोघींचा चेहरा तृप्त दिसत होता. गौरी प्रसन्न हसतमुख दिसत होत्या. घरात आनंद उत्साह भरला होता. तो दिवस गडबडीत गेला. रात्री निवांत दोघींसमोर बसले… समई तेवत होती. त्या प्रकाशात गौरीचा शांत, आश्वासक चेहरा उजळला होता. मनातलं तिला ओळखता येतंच, तरी सगळं तिला सांगितलं. तिच्याशी बोललं की, मन कसं शांत होतं!
तीन दिवसांच्या पाहुण्या म्हणून आलेल्या गौरी… निघाल्या की परत! मुरडीचा कानवला, दहिभाताचा नैवेद्य दाखवला. अक्षदा टाकल्या… जाता जाता निरोप देताना म्हटलं,
“आई, क्षणभर जरा थांबतेस का गं? तुझ्या लेकींचा निरोप सांगते तुला… गौरी माय तू यायच्या आधीच आम्हाला शहाणं केलं होतंस. यावेळी तुझं सांगणं सगळ्यांनी ऐकलं बरं का… त्यामुळे कोणी अन्न वाया नाही घालवलं, मोजकंच केलं. खूप जणींनी मला हे सांगितलं. त्यांचा स्वयंपाक लवकर झाला. एका ताईंची सवाष्ण दरवर्षी दोन वाजता जेवायची. यावर्षी त्यांनी तुला बारा वाजताच नैवेद्य दाखवला. तुझी आरती करून साडेबाराला घरच्यांना जेवायला वाढलं. खूप आनंदाने ताईंनी मला हे सांगितलं…
लेकी-सुनाच घरच्या लक्ष्मी आहेत, ते सर्वांना फार पटलं बघ! किती जणींनी पहिल्यांदाच तुझ्यासमोर बसून श्रीसूक्त, देवी अथर्वशीर्ष, नवीन नवीन आरत्या म्हटल्या… तुझी गाणी गायली… तू ऐकली असशीलच, तरीपण सांगते गं आई…
हेही वाचा – माझी गौरी माय
बऱ्याच जणी शहाण्या आणि सुज्ञ झाल्या. तू सांगितलं तसं वागल्या… घरातले लोक आनंदित झाले. हळूहळू जमेल तसा थोडा थोडा बदल करत आहेत सगळ्याजणी… तरी पण रूढी, परंपरा, रीती-रिवाज यांचा पगडा मनावर अजून खूप आहे. नव्हे, त्याचे दडपण आहे… बदल करताना मनात अजून थोडी भीती मात्र आहे. आई खरं सांगू का काय होतं… बदल केला आणि काहीतरी विपरीत घडलं की, वाटतं आपण बदल केला म्हणून हे असं झालं! लगेच मनात संशय येतो… देवी किंवा देव आपल्यावर कोपला तर नसेल…
हेही वाचा – आपला धर्म आणि संस्कृती
आमचं कसं आहे, आमची प्रगती, भरभराट झाली, चांगल्या गोष्टी घडल्या की, आम्हाला वाटतं ते आमचं कर्तृत्व! माझ्यामुळेच ते झालं… मी कष्ट केले म्हणून ते झालं… असं आम्ही म्हणतो. त्यावेळी ही ‘देवाची कृपा’ असं क्वचितच म्हणतो. पण विपरीत काही झालं की, आम्ही आपलं देवावर ढकलून देतो. हे अगदी खरंखुरं आमच्या मनातल आज तुला सांगते बरं का!
पण यापुढे नाही… आता आम्ही शहाणे होऊ… तू सांगितलं आहेस तसेच वागू… तसं तुला आश्वासन देते…
भेटूया आता पुढच्या वर्षी… पुनरागमनायच…”
असं म्हणेपर्यंत डोळे भरून आले होते. घर शांत झालं होतं. त्यांचं येणं आनंदाचं, सुखाचं समाधानचं असतं. घर भारुन टाकणार असतं. इतर कशाचीही आठवण या तीन दिवसांत येत नाही. त्यांच्याभोवती मन फिरत असतं. हे दिवस झटकन जातात…
आता लक्षात येतं, त्यासाठीच गौरी घरी येतात… मन तृप्त करायला… भरपूर सुख, आनंद द्यायला! राहिलेले दिवस त्यांच्या आठवणी काढत सरतात… सुख-दुःख, राग-लोभ करत आपला प्रत्येकाचा संसार चालूच राहतो…
हात जोडून तिला सांगितलं – “गौरीमाय अपार सुख देणारी आहेस. तुझा आशीर्वादाचा हात सदैव आमच्या पाठीवर असू दे, हीच तुझ्या चरणी आमची प्रार्थना. तू साथीला असलीस की, आम्हाला बळ येतं गं माय…
तुझ्याच सगळ्या लेकीबाळी.”


